शिक्षण, संशोधन आणि प्रशासन विज्ञान यांच्याद्वारे वैद्यकीय सराव प्रदान करण्यासाठी आरोग्यसेवा कशी वापरावी याचे वर्णन परिचर्या माहितीशास्त्र प्रतिकृतीद्वारे केले जाते. आवश्यक तांत्रिक ज्ञान प्रदान करण्यासाठी संगणक आणि माहिती शास्त्राच्या सहाय्याने परिचारिकेचे ज्ञान, कौशल्ये आणि तज्ज्ञ साहाय्य वाढविणे हा यामागचा उद्देश आहे. परिचर्या माहितीशास्त्र प्रतिकृतीची रचना आधारसामग्री (data), माहिती (information) व ज्ञान (knowledge) या केंद्रभूत संकल्पनावर अवलंबून असते. येथे आधारसामग्री म्हणजे असंघटित नोंदी होय. जेव्हा आधारसामग्रीला ठराविक प्रक्रिया करून संघटित केले जाते तेव्हा तिला माहिती असे संबोधले जाते. तर सर्व संश्लेषित किंवा आत्मसात केलेली माहिती म्हणजे ज्ञान होय.
परिचर्या माहितीशास्त्र प्रतिकृतीचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत :
- रुग्णाच्या संदर्भात गोष्टी कशा व कोणत्या कारणास्तव घडतात याचे कारण समजावून घेणे.
- रुग्णाच्या आजाराशी संबंधित प्रक्रिया आणि त्याच्या परिणामाच्या बदलांसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियांची ओळख संदर्भासहित समजावून घेणे.
- रुग्ण उपचारासाठी उपलब्ध असलेल्या उपाययोजना/संधी आणि त्यातील समस्या यांमधून जास्त गरजेची समस्या शोधून त्यास प्राधान्य देणे .
- तांत्रिक प्रक्रिया व त्याच्याशी संबंधित माहिती जाणून घेणे, तसेच त्यात काही बदल करण्यासाठी कोणत्या प्रक्रिया/संधी अनिवार्य आहे ते जाणून घेणे
- माहिती तंत्रज्ञानावर आधारित रुग्ण उपाय योजनेचे नियोजन करणे .
- रुग्णाच्या मतपरिवर्तनाची आवश्यकता असल्यास तंत्रज्ञान व इतर बदलासाठी आवश्यक असलेली माहिती देणे.
- नवीन तंत्रज्ञान व त्यानुसार रुग्णसेवा देण्यासाठी होणाऱ्या बदलांची ओळख करून देण्याचे नियोजन करणे.
- रुग्णसेवा व त्यातील परिणामाचे मूल्यांकन व समीक्षा करून योग्य ते फेर नियोजन करून परिचर्या प्रक्रिया मूल्ये ठरविणे व त्यानंतर योग्य ते माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान निवडणे.
- वरील तंत्रज्ञानाच्या आधारे आरोग्याच्या सारख्या समस्या असणाऱ्या ज्ञात लाभार्थींचा समावेश करून शुश्रुषेचे नियोजन केले जाते.
- या सर्व प्रक्रियेतून रुग्ण परिचर्येतील होणारे संभाव्य फायदे ओळखणे, यशस्वी रीत्या नियोजनाची आखणी करणे, अंमलबजावणी करणे व त्यातून होणाऱ्या बदलाच्या परिणामाचे मूल्यांकन करणे.
परिचर्या व्यवसायात संगणक वापरण्यासाठी विशिष्ट प्रशिक्षणासोबतच संगणकाचे मूलभूत शिक्षण हा विषय समाविष्ट केलेला असतो. तसेच रुग्णालयाच्या व्यवस्थापनाच्या विशिष्ट पद्धतीला अनुसरून परिचर्या माहिती प्रणाली प्रतिकृती तयार करून वापरले जाते.
संदर्भ :
- Elakkuvana Bhaskara Raj D; Anbu, T. Nursing Informatics, Mumbai.
समीक्षक : सरोज उपासनी