मुलाटे, वासुदेव : (१३ ऑक्टोबर १९४३). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार, समीक्षक, प्रकाशक आणि ग्रामीण साहित्य चळवळीमधील अग्रणी साहित्यिक. चाळीसहून अधिक वर्षे त्यांनी मराठी साहित्यात आपले योगदान दिले आहे. कविता,कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, ललितगद्य,एकांकिका व समीक्षा अशा विविध लेखनप्रकारातून त्यांनी लेखन केले आहे. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण एम्. ए. बी.एड. पीएच. डी. आहे. मराठी ग्रामीण कथा : स्वरूप आणि विकास (सन १९४५ते १९७५) या विषयावर संशोधन करून त्यांनी आचार्य पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी अनेक छोट्या मोठ्या नोकऱ्या करत शिक्षण घेतले. काही काळ पुणे येथील पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रपाठक म्हणून अध्यापनाचे काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या मराठी विभागातील प्रपाठक म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली (१९९८). नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रम समितीचे सदस्य , महाराष्ट्र ग्रामीण साहित्य परिषदेचे मुख्य कार्यवाह असे संस्थात्मक पातळीवरील अनेक पदभार त्यांनी सांभाळलेले आहेत.
वासदेव मुलाटे यांच्या लेखनाचा परीघ साहित्याच्या सर्वच अवकाशाला स्पर्श करणारा आहे.त्यांची साहित्यसंपदा पुढीलप्रमाणे – समीक्षा :- सहा दलित आत्मकथने: संकल्पना व स्वरूप (१९८५), ग्रामीण कथा: स्वरूप आणि विकास (१९९२), ग्रामीण साहित्य: स्वरूप आणि दिशा (१९९४), उलगुलान आणि तडजोड: एक अनुबंध (१९९५), ऋणानुबंध आणि झुंबर : रंग-अंतरंग (१९९५), नवे साहित्य : नवे आकलन (१९९६), साहित्य: रूप आणि स्वरूप (२००४), ग्रामीण साहित्य: चिंतन आणि चर्चा (२००५), साहित्य, समाज आणि परिवर्तन (२००७), साहित्य : स्वागत व समीक्षा (२०११), साहित्य पालवीचे रंग आणि रूप (२०१२), ग्रामीण साहित्य चळवळ एक ध्यास पर्व (२०२३), शोध जाणिवांचा (२०१३), साहित्य : बिंब प्रतिबिंब (२०१७); कथा :- व्यथाफुल (१९७६), अबॉर्शन आणि इतर कथा (१९८३), अंधाररंग (१९८४), झाड आणि संबंध (१९९७ दीर्घकथासंग्रह), काळोखवेणा (१९९९); व्यक्तिचित्रे: – वाटेवरच्या सावल्या (२०१५), भावलेली माणसे (२०२१); कादंबरी :- विषवृक्षाच्या मुळ्या (१९८९) याशिवाय झाकोळलेल्या वाटा (२०१७) हे आत्मकथन आणि हार्टक्रँकर(१९८१) ही त्यांची एकांकिका प्रसिध्द आहे.
वासुदेव मुलाटे यांनी मराठी साहित्य आणि संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान असणाऱ्या अनेक ग्रंथांचे संपादन केले आहे; ते पुढीलप्रमाणे :- शेतकऱ्याचाअसूड (१९८३), महदंबेचे धवळे (१९९०), गद्यसौरभ (१९९०), मराठवाड्याची कथा (१९९४), संगीत सौभद्र (१९९४), श्री.गोविंदप्रभू चरित्र (१९९५), ग्रामीण साहित्य चळवळ आणि आम्ही (१९९५), तुकारामांचे निवडक अभंग (१९९६) आधुनिक मराठी गद्याचा पायाभूत अभ्यास (१९९७), बळीबा पाटील: पहिली ग्रामीण कादंबरी (१९९८), गुलामगिरी (१९९९), सार्वजनिक सत्यधर्म (१९९९), प्रबोधनाचे साहित्य (१९९९),ग्रामायन (कै. के. बी. रोहमारे स्मृतिग्रंथ२००२), इ. अनेक पुस्तकांना प्रस्तावना लेखन व इतर स्फुट लेखनही त्यांनी केले आहे.त्यांच्या साहित्यावरही अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.
कथा हा वासुदेव मुलाटे यांचा आवडता लेखन प्रकार आहे. गेल्या चाळीस-बेचाळीस वर्षाच्या काळात निम्न- ग्रामीण भाग जसजसा बदलत गेला, त्या प्रमाणात ग्रामीण जनमानसही बदलत गेले त्याचे प्रतिबिंब मुलाटे यांच्या कथांमध्ये दिसते. ग्रामीण जीवनातील शोषण, उपासमार आणि ग्रामीण माणसाची सर्व बाजूंनी झालेली कोंडी मुलाटे यांच्या कथेत समर्थपणे प्रकट झालेली दिसते. मुलाटे यांच्या कथांमधून फक्त ग्रामीण भागातीलच नाही तर ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतरित झालेले माणसे ; ग्रामीण जीवनाशी कायम असणाऱ्या त्यांच्या जाणीवा याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात दिसते. ग्रामीण साहित्य चळवळीचे आधारस्तंभ म्हणून त्यांची साहित्यिक क्षेत्रात ओळख आहे. ग्रामीण समाज जीवन मराठी साहित्यात प्रवाहित करण्यात त्यांच्या लिखाणाचा महत्वपूर्ण वाटा आहे. मनुष्य जीवनाच्या परिप्रेक्ष्यातील शोषण केंद्रे लिखाणाच्या माध्यमातून उध्वस्त करणे हे ग्रामीण साहित्य चळवळीचे अंतिम लक्ष होते. ग्रामीण म्हणजे गावकुसातील व गावकुसाबाहेरील पूर्वास्पृश्य आणि डोंगरदऱ्यातील आदिवासी असा या चळवळीने ग्रामीण शब्दाला व्यापक अर्थ दिला. मुलाटे यांनी या चळवळीचे सारथ्य केले आहे.
मराठी साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दाखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कै. भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार (१९९०-९१), महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार (१९९१-९२, विषवृक्षाच्या मुळ्या), महाराष्ट्र शासनाचा श्री.के. क्षीरसागर पुरस्कार (१९९३-९४, ग्रामीण कथा: स्वरूप आणि विकास), महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार (१९९४-९५, मराठवाड्याची कथा – संपादित ग्रंथ), मराठवाडा साहित्य संमेलन माजलगाव जीवन गौरव पुरस्कार (२००७), मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादचा म. भी. चिटणीस पुरस्कार (२००८), कै. मामासाहेब कडलग पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ पुरस्कार, कै. सुदाम सावरकर स्मृती पुरस्कार, अ. भा. सत्यशोधक समाजाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, महाराष्ट्रसारस्वत पुरस्कार, आद्य कवयित्री महादंबा जीवन गौरव पुरस्कार (२०१२), ग.ल. ठोकळ ग्रामीण साहित्यमित्र पुरस्कार (२०१७), महाराष्ट्र शासनाचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार इ सन्मान त्याना मिळाले आहेत. वासुदेव मुलाटे यांनी विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कार्यवाहक, कार्याध्यक्ष, व प्रमुख मार्गदर्शक म्हणूनही भूमिका बजावलेली आहे.
संदर्भ : व्हटकर,अर्जुन , वासुदेव मुलाटे : व्यक्ती आणि वाड्मय, निनाद प्रकाशन,पुणे,२०१७.