शावकरूपजनन (Paedomorphosis) ही काही उभयचर प्राण्यांमध्ये आढळून येणारी एक अवस्था. यास अकालजनन असेही म्हणण्याची पद्धत आहे. या प्रकारात सामान्य वयात  प्रजननक्षम होण्याऐवजी त्यापूर्वीच सजीव प्रजननक्षम होतो.

सॅलॅमँडरमधील शावकरूपजनन अवस्था

१८७५ मध्ये अर्न्स्ट हेकेल (Ernst Haeckel) यांनी ‘हेटेरोक्रॉनी’ (Heterochrony) म्हणजे अकालजनन ही संकल्पना मांडली. ज्या पाण्यात आयोडीनची कमतरता असते अशा पाण्यातील सॅलॅमॅंडर डिंभावस्थेत प्रजननक्षम होत असत. एकेकाळी सॅलॅमॅंडरचे बाह्य कल्ले असलेले डिंभ प्रौढ होण्यापूर्वीच प्रजननक्षम झाल्याचे आढळत असत. या उदाहरणावरून आयोडीनची कमतरता असलेल्या पाण्यात आयोडीनचे क्षार पुरवले असता बाह्य कल्ले जाऊन नेहमीचा सॅलॅमॅंडर तयार होत असे. या प्रकारास १८८५ मध्ये जर्मन वैज्ञानिक ज्युलियस कोलमन (Julius Kollman) यांनी ‘निओटेनी’ (Neoteny) म्हणजे चिरडिंभता असे नाव दिले. काही प्राण्यांमध्ये डिंभावस्था असतानाच त्यांची प्रजोत्पादक इंद्रिये कार्यक्षम होतात व हे डिंभावस्थेतील प्राणी प्रजोत्पादन करतात. काही प्राण्यांत ही अवस्था अल्पकालिक असते, तर काहीत ती चिरकालिक असते. या अवस्थेला चिरडिंभता असे म्हणतात. या संकल्पनेची जागा अकालजनन या संकल्पनेने घेतली आहे. यामध्ये वाढीच्या कालावधीतील टप्प्यामध्ये झालेला बदल गृहीत धरलेला आहे. तसेच यामध्ये अवयवांचा आकार बदल, एखादा अवयव आधी निर्माण होणे किंवा वाढीचा क्रम अकाली थांबणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. अकालजननामध्ये आकाराने नवा जीव निर्माण होतो.

अकालजनन ही वाढ आणि उत्क्रांती यामधील एक आंतरक्रिया आहे. जीवामध्ये होणारी उत्क्रांती ही अकालजननासाठीच्या जनुकांमुळे होते. हा बदल उत्परीवर्तनामुळे (Mutation) होतो. अकालजनन या प्रक्रियेचे दोन गटांत वर्गीकरण केले जाते — (१) क्रमबद्ध अकालजनन : यामध्ये वाढीच्या टप्यामध्ये होणारे बदल समाविष्ट होतात आणि (२) वाढीचे अकालजनन : यात वाढीचा दर बदलतो.

प्रोजेनेसिस (Progenesis) : हा प्रकार शावकरूपजननाहून थोडा वेगळा आहे. यामध्ये प्रौढावस्थेपूर्वीच डिंभ जननक्षम होतो. त्याची प्रजा प्रौढासारखीच असते. यात वडिलोपार्जित प्रजातीप्रमाणे कायिक वाढ होते. परंतु, अंडज पेशीची (Germline cell) वाढ त्यापेक्षा अधिक असते. वाढीचा क्रम सामान्य वाढीपूर्वी असतो, याला ‘डिंभ जनन’ असे म्हणता येईल. सूत्रकृमीमध्ये हा प्रकार आढळतो.

मोल सॅलॅमॅंडरच्या (Mole salamander) प्रजाती प्रोजेनेसिस वाढ दर्शवितात. परंतु, सॅलॅमॅंडर हे लैंगिकदृष्ट्या सक्षम असून ते डिंभ अवस्थेत असतात. अनेक सॅलॅमॅंडर प्रजातींच्या जलीय डिंभामध्ये प्रौढ अवस्थेत बह्य कल्ले नष्ट होतात. उदा., प्रौढ टायगर सॅलॅमॅंडर (Ambystoma tigrinum) याच्या डिंभाला पुरेश्या प्रमाणात आयोडीनची मात्रा दिली, तर त्याचे रूपांतर प्रौढ सॅलॅमॅंडरमध्ये होते.

पहा : डिंभजनन (पूर्वप्रकाशित नोंद); चिरडिंभता (पूर्वप्रकाशित नोंद); रूपांतरण (पूर्वप्रकाशित नोंद); सॅलॅमँडर (पूर्वप्रकाशित नोंद).

संदर्भ :

  • https://www.smithsonianmag.com/science-nature/the-salamanders-that-refuse-to-grow-up-64827289/
  • https://www.britannica.com/animal/amphibian/Larval-stage#ref467496
  • https://www.slide share.net
  • https://en.wikipedia.org/wiki/Heterochrony

             समीक्षक : मोहन मद्वाण्णा