सजीवांच्या वर्गीकरणासाठी रॉबर्ट व्हिटाकर यांनी प्रतिपादित केलेल्या पंचसृष्टींपैकी (मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय/कवक, प्राणी आणि वनस्पती) ही एक सृष्टी आहे. वनस्पती सृष्टीतील सजीव बहुपेशीय व दृश्यकेंद्रकी आहेत. वनस्पती पेशींना पेशीभित्तीकेचे संरक्षक आवरण असून ती सेल्युलोजपासून बनलेली असते. काही समूहाने राहाणाऱ्या व्हॉल्व्हॉक्स (Volvox), क्लॅमिडोमोनस (Chlamydomonas) यांसारख्या वनस्पती वगळता बहुतेक वनस्पती जमिनीत एका ठिकाणी स्थिर असतात. वनस्पतींची वाढ सतत होत असते अशी एक समजूत आहे; परंतु, वनस्पतींच्या वाढीस त्यांच्या जीनोमनुसार कालमर्यादा आहे. उदा., काही वनस्पतींचा आयु:काल एक वर्षे, म्हणजे वर्षायू, द्विवर्षायू व बहुवर्षायू असा असतो. आयु:काल संपल्यावर वनस्पती वाळून जातात व मृत होतात.
वनस्पती स्वत: अन्ननिर्मिती करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी म्हणतात. वनस्पती पेशीतील हरीतलवके (Chloroplast) प्रकाश ऊर्जेच्या साहाय्याने कार्बन डाय-ऑक्साइड व पाण्याचा रेणू यांच्या संयोगापासून ग्लूकोजसारखे अन्नद्रव्य बनवितात, या क्रियेस प्रकाशसंश्लेषण म्हणतात. प्रकाशसंश्लेषण क्रियेमधून ऑक्सिजन उपपदार्थ म्हणून मुक्त होतो. केवळ प्रकाशसंश्लेषण क्रियेमुळे पृथ्वीवरील हवेमध्ये मुक्त ऑक्सिजनचे प्रमाण २०.९६% राखले गेले आहे.
अन्ननिर्मिती प्रक्रियेनुसार वनस्पती वर्गीकरणाच्या पुढील पद्धती आहेत –
स्वयंपोषी : हरितलवके असणाऱ्या वनस्पती; उदा., स्पायरोगायरा.
परपोषी : दुसऱ्या वनस्पतींतून आयते अन्न मिळवणाऱ्या वनस्पती; उदा., अमरवेल.
कीटकभक्षी : कीटकापासून नायट्रोजनसारखे घटक मिळवणाऱ्या वनस्पती; उदा., ड्रॉसेरा. शवोपजीवी (Saprophyte) : मृतघटकांतून अन्न शोषून घेणाऱ्या वनस्पती; उदा., भूछत्र, इंडियन पाईप इत्यादी.
जीवोपजीवी (Parasite) : जिवंत वनस्पतींतून अन्न शोषून घेणाऱ्या वनस्पती; उदा., बॅलॅनोफोरेसीई (Balanophoraceae).
वनस्पतींच्या रचनेवरून करण्यात येणारे वर्गीकरण हे वनस्पतीचे अवयव (मूळ, खोड, पान, फूल व फळ), अन्नद्रव्य व पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे स्वरूप, अशा वाहिन्यांचे असणे किंवा नसणे, बीजनिर्मिती क्षमता, बीजावर आवरण असणे किंवा नसणे यांवरून करण्यात आलेले आहे. अशा रचनेवरून वनस्पती सृष्टीचे शेवाळी (ब्रायोफायटा), कायक (थॅलोफायटा), वाहिनीवंत अबीजी (टेरिडोफायटा) व बीजी वनस्पती (फॅनेरोगॅमी) अशा अशा चार प्रमुख विभागांत वर्गीकरण केलेले आहे.
शेवाळी (Bryophyte) : यातील वनस्पती स्थलवासी म्हणजे बव्हंशी जमिनीवर वाढणाऱ्या, अत्यंत साध्या, अगदी लहान साधी पाने, खोड व मूळकल्प (मुळावरील केसासारखी उपांगे असणाऱ्या व स्वोपजीवी (अकार्बनी द्रव्ये अन्न म्हणून वापरण्याची क्षमता असलेल्या) आहेत. या वनस्पतींत पाणी, खनिजे व अन्नरस यांची ने-आण करण्यासाठी विशिष्ट प्रकारची ऊतके नसतात. उदा., रिक्सिया (Riccia), फ्युनेरिया (Funaria).
कायक वनस्पती (Thallophyte) : यामध्ये निम्नस्तरीय वनस्पतींचा समावेश होतो. यातील वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पाने, फुले, फळे व बीजे यांचा पूर्ण अभाव असतो. या विभागात शैवले, शैवाक (दगडफूल) यांचा समावेश होतो. उदा., स्पायरोगायरा, कारा (Chara) व यूलोथ्रिक्स (Ulothrix).
वाहिनीवंत अबीजी वनस्पती (Pteridophyta) : वाहिनीवंत (पाणी व अन्नरस यांची ने-आण करणारे स्वतंत्र घटक असणाऱ्या) वनस्पतींपैकी एक गट. हा गट फार प्राचीन काळापासून पाण्यातून जमिनीवर उत्क्रांत झालेल्या बीजहीन वनस्पतींचा आहे. खोड, मुळे व लहान किंवा क्वचित मोठी पाने असतात. ज्या पानावर बीजुके तयार होतात, त्यांना बीजुकपर्णे (Sporophyll) म्हणतात. बीजुकपर्णे साधी किंवा संयुक्त असून नेहमीच्या हिरव्या पानासारखी, तर कधी कधी थोडीफार निराळी असतात. त्यावर एकेकटे किंवा समूहाने बीजुके (Spores) निर्माण करणाऱ्या पिशव्या असतात, त्यांना बीजुककोश (Sporangium) म्हणतात. उदा., नेचे, मार्सेलिया (Marselia). या वनस्पतींचे पुनुरुत्पादन बियांच्या ऐवजी बीजुकामधून होते.
बीजी वनस्पती (Phanerogam/Spermatophyte) : यांतील वनस्पतींमध्ये बीजे निर्माण होतात. ज्यांचे प्रजोत्पादन वा नवीन वनस्पतींची निर्मिती बीजामुळे होते, अशा सर्वसामान्य वनस्पतींना बीजी वनस्पती असे म्हणतात. बीजी वनस्पतींचे प्रकटबीज व आवृतबीज असे दोन उपविभाग पडतात. ज्यांची बीजे किंजदलावर उघडी असतात, त्यांना प्रकटबीजी (Gymnosperm) म्हणतात. प्रकटबीजी वनस्पतींमध्ये ज्यामध्ये धागे असलेले लाकूड असते अशा काष्ठयुक्त वनस्पती, लहान झुडपे ते मोठे वृक्ष यांचा समावेश होतो. सर्व प्रकटबीज वनस्पतींमध्ये अलैंगिक अवस्थेत बीजुकधारी पिढी व लैंगिक अवस्थेत गंतुकधारी पिढी असे पिढ्यांचे एकांतरण (Alternation of generation) असते. उदा., पाइन, सायकस.
ज्यांची बीजे बीजकोशात (किंजपुटात) झाकलेली असतात, त्यांना आवृतबीजी (Angiosperm) म्हणतात. उदा., आंबा, नारळ, मका इत्यादी. आवृतबीजी वनस्पतींचा अधिवास, आकार व आकारमान यांत खूपच विविधता आढळते. या वनस्पतींना फुले येतात. त्यामुळे त्यांना सपुष्प वनस्पती म्हणतात. यांचे परागकण वाहून नेण्याची क्रिया म्हणजे पराग वहन कीटक, फुलपाखरे, पक्षी, वटवाघळे व क्वचित इतर सस्तन प्राणी यांच्याकडून होते. दुसऱ्या सजीवाकडून परागवहन होण्याच्या क्रियेस परपरागण म्हणतात. परपरागण हे बहुसंख्य आवृत्तबीजी वनस्पतींचे वैशिष्ट्य आहे. काही आवृत्तबीजी वनस्पतींमध्ये स्वपरागणही होते. वनस्पती उत्क्रांतीमध्ये आवृत्तबीजी वनस्पती जमिनीवर सर्वत्र आढळतात.
वनस्पती सृष्टीमध्ये कमालीची विविधता आहे. केवळ सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने दिसू शकतील अशा वनस्पतींपासून ते निलगिरीसारख्या गगनचुंबी आणि वडासारख्या महाकाय वनस्पती पृथ्वीतलावर आहेत. सर्व प्राणीसृष्टी अन्नासाठी व ऑक्सिजनसाठी हरित वनस्पतींवर अवलंबून आहेत. यांशिवाय औषधे, सुगंधी द्रव्ये, उत्तेजक पेये, टॅनिने, राळ, रबर, डिंक, कागद, मसाल्याचे पदार्थ, फर्निचर व इतर शोभिवंत वस्तू बनविण्यासाठी लागणारे लाकूड वनस्पतींपासून मिळते.
पहा : कायक वनस्पति (पूर्वप्रकाशित); पंचसृष्टी वर्गीकरण; वनस्पति, अबीजी विभाग (पू.प्र.); वनस्पति, आवृतबीजी उपविभाग (पू.प्र.); वनस्पति, प्रकटबीजी उपविभाग (पू.प्र.); वनस्पति, बीजी विभाग (पू.प्र.); वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग (पू.प्र.); वनस्पतींचे वर्गीकरण; शेवाळी (पू.प्र.); शैवले (पू.प्र.).
संदर्भ :
- https://www.britannica.com/plant/plant/Definition-of-the-kingdom
- https://www.geeksforgeeks.org/plant-kingdom/
समीक्षक : कांचन एरंडे