आ.१. प्राणी सृष्टी वर्गीकरण

सजीवांच्या वर्गीकरणासाठी रॉबर्ट व्हिटाकर यांनी प्रतिपादित केलेल्या पंचसृष्टींपैकी (मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय/कवक, प्राणी आणि वनस्पती) ही एक सृष्टी आहे. यातील प्राण्यांची दृश्यकेंद्रकी पेशी, बहुपेशीय शरीररचना आणि परपोषी पोषणपद्धती ही प्रमुख लक्षणे आहेत. ते त्यांचे अन्न इतर कार्बनी संयुगांपासून मिळवितात. म्हणजेच ते वनस्पती, प्राणी, कवके व इतर सजीवांचे भक्षण करून ऊर्जा मिळवतात.

कवक आणि वनस्पती पेशींप्रमाणे प्राणी पेशीस पेशीभित्तिका नसते. प्राण्यांच्या पेशी एकमेकांशी प्रथिनांनी बांधलेल्या असतात. बहुपेशीय प्राण्यांमधील पेशी वैशिष्ट्यपूर्ण कार्यांसाठी ऊतींमध्ये संघटित होतात. याचाच परिणाम म्हणून बहुतांश प्राणी गुंतागुंतीचा वर्तणूक प्रतिसाद (Complex behavioral responses) आणि वेगवान हालचाल (Rapid movement) यांसाठी सक्षम असतात.

आ.२. सामान्य मूलभूत घटक गुणांवर आधारित प्राणी सृष्टीचे स्थूल वर्गीकरण

प्राणी पेशीत गुणसूत्रांच्या दोन जोड्या असतात (द्विगुणित; Diploid). म्हणजेच जीवनचक्राच्या जास्तीत जास्त काळात त्यांच्या अनुवंशिक माहितीच्या दोन प्रती असतात. प्राणी लैंगिक पद्धतीने प्रजनन करतात. युग्मक  पेशींचा (मोठया अचल अंडपेशी आणि लहान शुक्रपेशी) एकमेकांशी संयोग होऊन एक नवीन द्विगुणित जीव तयार होतो, ज्याला युग्मनज (Zygote) म्हणतात. युग्मनज पेशी विभाजनाच्या अनेक मालिकांमधून (Series) जातो, या प्रक्रियेस विदलन (Cleavage) म्हणतात. एकपेशीय युग्मनज पेशीच्या विभाजनापासून भ्रूण तयार होतो. पहिल्या अवस्थेतील भ्रूण पोकळ असून त्याची भित्तिका एक थरांच्या पेशीने बनलेली असते. याला कोरकपुटी (Blastula) म्हणतात. यानंतर ही एकपेशी थराची कोरकपुटी दोन थरांच्या आद्यभ्रूणामध्ये (Gastrula) पुनर्गठीत होते. काही प्राण्यांची वाढ होऊन ते प्रौढांमध्ये विकसित होतात, तर काही  प्राण्यांच्या वाढीमध्ये त्यांच्या डिंभ किंवा अळी अवस्थेचा समावेश होतो. डिंभ किंवा अळी ही  अपरिपक्व अवस्था असून बाह्यरूपाने प्रौढ अवस्थेपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. रूपांतरण (Metamorphosis) प्रक्रियेत डिंभाचे किंवा अळीचे प्रौढात रूपांतर होते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बेडकाचे (Tadpole) प्रौढात होणारे रूपांतरण किंवा फुलपाखराचे अंडे – अळी – कोश – प्रौढ असे रूपांतरण.

प्राणी सृष्टी एकोद्भव (Monophyletic) सिद्धांतावर आधारित आहे. म्हणजे सर्व प्राण्यांच्या उगमाचा  शोध हा एकाच पूर्वजापर्यंत येऊन पोहोचतो. साधारणपणे सजीव प्राण्यांचे ३२ गट किंवा किंवा संघ आहेत. प्रत्येक संघ वेगवेगळ्या शरीररचनेवरून व जैविक गुणधर्मावरून केलेले आहेत.

प्राणी सृष्टी

पृथ्वी कालमापनाप्रमाणे सु. ५४१ दशलक्ष वर्षांपूर्वी कॅम्ब्रियन काळात केवळ ४० दशलक्ष वर्षांच्या काळात प्राण्यांच्या शारिरीक रचनेत आणि जीवनपद्धतीत आमूलाग्र बदल झाला. सर्वसाधारणपणे ५६५–५२५ दशलक्ष वर्षांपूर्वी अत्यंत आश्चर्यकारकपणे ४० दशलक्ष वर्षांच्या छोट्या कालावधीत प्राण्यांच्या शारिरीक रचनेत बदल घडून आले. आजच्या प्राण्यांच्या रचनेत दिसून येणारी विविधता ही त्यांच्या मूलभूत शारिरीक रचनेत झालेल्या उल्लेखनीय वैविध्यामुळे दिसून येते. हा कॅम्ब्रियन काळात  झालेल्या उत्क्रांतीचा परिणाम आहे. यांतील सर्वांत प्राचीन प्राणी छिद्री संघ (Phylum Porifera),  ज्यामध्ये स्पंजवर्गीय प्राण्यांचा समावेश होतो. सर्वांत प्राथमिक रचना असलेल्या छिद्री संघामधून अधिक गुंतागुंतीचे सजीव संघ तयार होत गेले. प्राण्यांची शरीररचना, शरीर सममिती, पृष्ठरज्जू असणे अथवा नसणे, देहगुहा असणे वा नसणे, प्रचलनाचे अवयव यांनुसार प्राण्यांचे वर्गीकरण केले जाते (पहा : आ.२.).

प्राणी सृष्टीमध्ये पाठीचा कणा असलेले पृष्ठवंशी व पाठीचा कणा नसलेले अपृष्ठवंशी असे दोन उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले आहे. पृष्ठवंशी उपसृष्टीमध्ये रज्जूमान (कॉर्डेटा) संघाचा समावेश होतो. तसेच अपृष्ठवंशी उपसृष्टीमध्ये (१) आदिजीव (प्रोटोझोआ), (२) छिद्री (पेरफेरा), (३) आंतरदेहगुही (सीलेंटरेटा), (४) चपटकृमी (प्लॅटिहेल्मिंथिस), (५) गोलकृमी (नेमॅटोडा), (६) वलयांकित (ॲनेलिडा), (७) संधिपाद (आथ्रोपोडा), (८) मृदुकाय (मॉलस्का), (९) कंटकचर्मी (एकायनोडर्माटा) आणि (१०) अर्धमेरूक (हेमिकॉर्डेटा) अशा १० संघांचा समावेश होतो.

पहा : अपृष्ठवंशी; पंचसृष्टी वर्गीकरण; पृष्ठवंशी उपसंघ; प्राणिसृष्टीचे संघ व वर्ग (पूर्वप्रकाशित).

संदर्भ :

  • http://www.biologyreference.com/A-Ar/Animalia.html#ixzz5orBemMDd
  • https://www.britannica.com/animal/Protostomia

        समीक्षक : मोहन मद्वाण्णा