भावे, सुमित्रा : (१२ जानेवारी १९४३–१९ एप्रिल २०२१). मराठी चित्रपटसृष्टीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपट निर्मात्या, लेखिका आणि प्रतिभावान दिग्दर्शिका. सुमित्रा भावे यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव गणेश उमराणी आणि आईचे नाव कमलाबाई असे आहे. त्यांचे वडील उच्चशिक्षित होते. घरात वेगवेगळ्या विषयांवरील शेकडो पुस्तके त्यांना वाचनासाठी उपलब्ध होती. साहित्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. त्यांना संगीताचीही खूप आवड होती. वडिलांसमवेत त्यांनी लहानपणीच देशविदेशातील चित्रपट पाहिले. फ्रेंच तत्त्ववेत्त्यांच्या साहित्यकृती त्यांना वडिलांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या. त्यामुळे खूप कमी वयात त्यांच्या जाणीवा समृद्ध झाल्या. त्या उत्तम चित्रकार होत्या आणि नृत्याची त्यांना चांगली जाणही होती. पं. रोहिणी भाटे यांच्याकडे तब्बल दशकभर त्यांनी नृत्याची तालीम घेतली. विविधांगी शिक्षणामुळे आणि आवडीमुळे कारकीर्दीसाठी खूप वेगवेगळी क्षेत्रे त्यांच्यासाठी खुली होती. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर टाटा सामाजिक शिक्षण संस्थेतून त्यांनी सामाजिक कार्याचे शिक्षण घेतले.

चित्रपटीय कारकीर्दीच्या अगोदरच्या काळात सुमित्रा भावे यांनी विविध क्षेत्रात काम केले होते. दिल्ली आकाशवाणीवर मराठी बातम्यांचे वाचन त्या करीत असत. त्यानंतर पुण्यातील कर्वे शिक्षणसंस्थेत त्यांनी शिक्षक म्हणून काम सुरू केले. भोवतीचा समाज हा कायमच त्यांच्या प्रत्येक गोष्टीच्या अग्रस्थानी राहिला. समजून घ्यायला आणि अंमलबजावणी करायला अवघड असणारा सामाजिक कार्य हा विषय त्यांनी आवडीने शिकवला; परंतु केवळ शिकवून समाज जागा होणार नाही, याची त्यांना लवकरच जाणीव झाली. गांधीवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते आणि स्वातंत्र्यचळवळीतील एक कार्यकर्ते असलेल्या दादा धर्माधिकारींशी त्यांचा परिचय झाला. त्यांच्या प्रेरणेने त्या आणखी जास्त समाजाभिमुख झाल्या. ‘महात्मा गांधींचे सामाजिक योगदान’ ह्या विषयावर त्यांनी पीएचडीसाठी प्रबंध लिहिला; परंतु त्याचे सादरीकरण केले नाही. प्रत्यक्ष काम करण्याचा धर्माधिकारींचा सल्ला मानून सुमित्राताई ‘स्त्रीवाणी’ या सामाजिक समस्यांवर काम करणाऱ्या संस्थेत दाखल झाल्या. तेथे ग्रामीण भागातील शाळा सोडलेली मुले, अविवाहित माता, महिला गुन्हेगारांना शिकवण्याचे अवघड काम त्यांनी स्वतःकडे घेतले. कुमारी मातांचा अभ्यास करताना त्या जवळपास ३०० महिलांना भेटल्या. गुन्हेगारी स्त्रियांची मनोवस्था समजावून घेण्यासाठी तुरुंगात जाऊन त्यांनी हत्येचे आरोप सिद्ध झालेल्या अनेक महिलांची भेट घेतली. या सगळ्या अभ्यासातून सुमित्राताईंच्या मनातील स्त्रियांची प्रतिमा आणखीनच ठळक झाली. त्यांना स्त्रीची प्रतिमा बदलत्या संदर्भांनुसार चितारायची होती. एखाद्या पुस्तकाद्वारे त्यांना ती समाजासमोर आणता आली असती; परंतु ज्या अशिक्षित स्त्रियांच्या दुःख, वेदना आपण जाणून घेतल्या, त्या त्यांनाच वाचता आल्या नाहीत, तर मग या सगळ्या प्रयोगाचा काहीच उपयोग नाही, हे त्यांनी जाणले आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्या चित्रपट या माध्यमात शिरल्या. १९८५ मध्ये सुमित्राताईंनी बाई नावाचा लघुपट बनवला. यावेळी त्यांनी वयाची चाळीशी पार केली होती. एवढ्या उशीरा मराठी चित्रपट क्षेत्रात येऊनही या माध्यमावर त्यांनी आपला ठसा उमटविला. त्यानंतर सातत्याने ३५ वर्षं त्या या माध्यमात कार्यरत राहिल्या.

सुमित्राताईंचे चित्रपट हे १९८०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आलेल्या समांतर चित्रपटांसारखे वाटत असले तरी त्यांची ओळख यापेक्षा वेगळी आहे. हिंदीतील समांतर चित्रपट चळवळीतले दोष टाळून सुमित्राताईंनी त्याला समांतर अशी आपली स्वतःची वेगळी वाट बनवली. दोघी हा त्यांनी सुनिल सुकथनकर यांच्या बरोबरीने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. ज्या विषयावर अजूनही बिचकत बोलले जाते अशा सामाजिक विषयावर भाष्य करणारी ही दोन बहिणींची कथा सुमित्राताईंनी परिणामकारकपणे पण हळूवार साकारली आहे.

चित्रपट माध्यमात येण्यापूर्वी स्त्रियांच्या अनुषंगाने समाजाचा केलेला अभ्यास त्यांना चित्रपट निर्मितीसाठी उपयोगी ठरला. पुण्याच्या ‘फिल्म अँड टेलिव्हिजन’ संस्थेत दिग्दर्शनाचा अभ्यास केलेल्या सुनिल सुकथनकर यांची त्यांना तेवढीच तोलामोलाची साथ लाभली. या दोघांनीही आपापल्या जबाबदाऱ्या उत्तमप्रकारे वाटून घेतल्या. सुकथनकर छायांकन, गीतलेखन, कलाकारांची निवड याकडे लक्ष द्यायचे, तर सुमित्राताईंनी त्यांचे लक्ष कथा, पटकथा, वेशभूषा, संकलन, संगीत या आघाड्यांवर केंद्रित केले.

सुमित्राताईंनी ज्या वेळी मराठी चित्रपट दिग्दर्शित करायला सुरुवात केली, तेव्हा मराठी चित्रपटसृष्टी कठीण अवस्थेतून जात होती. ती अवस्था एका वेगळ्या स्थित्यंतराची होती. सुमित्राताईंनी दोघी (१९९५), दहावी फ (२००२), वास्तुपुरुष (२००२), देवराई (२००४), नितळ (२००६), अस्तु (२०१३), कासव (२०१७), वेलकम होम (२०१९), दिठी (२०१९) यांसारखे विविध विषयांवरचे उत्तमोत्तम कसदार चित्रपट दिग्दर्शित केले आणि या स्थित्यंतराला त्यांनी अधिक गतिशील केले. मराठी चित्रपटसृष्टीला वेगळी वाट दाखविणाऱ्या अभिजात मराठी दिग्दर्शकांपैकी सुमित्राताई एक बनल्या. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच चित्रपट वैश्विक ठरले. महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याआधीच ते विदेशी चित्रपट महोत्सवात पोहोचून गाजू लागले. राज्य तसेच खासगी संस्थांनी दिलेल्या पुरस्कारांबरोबरच सुमित्राताईंच्या बऱ्याच कलाकृतींचा राष्ट्रीय पुरस्कारांद्वारे गौरव झाला. त्यांच्या दोघी, वास्तुपुरुष, देवराई, अस्तु, कासव या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित द डिसायपल या बहुचर्चित आणि व्हेनिससह अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली छाप उमटवलेल्या चित्रपटात सुमित्राताईंचा आवाज ‘माई’ या व्यक्तिरेखेसाठी घेतलेला आहे.

सुमित्राताईंच्या लघुपटांचे आणि चित्रपटांचे विषय हे समाजाशी निगडित असलेल्या सर्व घटकांचे होते. अंध, मूकबधीर, गतिमंद, दत्तक मुलांचे विषय त्यांनी आपल्या चित्रपटांमधून हाताळले. स्किझोफ्रेनिया, नैराश्य, एड्स, थॅलेसेमिया, अल्झायमर यांसारखे मनोकायिक आजारदेखील त्यांनी आपल्या चित्रपटांमधून मांडले. विशेष म्हणजे आजारांवरील चित्रपट असूनही ते कंटाळवाणे वाटत नाहीत. पाणी, जंगल, माहितीचा अधिकार यांसारखे काहींना रुक्ष वाटणारे विषयही त्यांनी त्यांच्या चित्रपटांतून अगदी सहजपणे हाताळलेले दिसून येतात.

चित्रपट ही कला असली तरी तिला तंत्राची जोड मिळाली तरच ती प्रेक्षकांचे मन जिंकू शकते. ही बाब सुमित्राताईंना अवगत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांचे चित्रपट तंत्राच्या बाजूने कमी पडत नाहीत. त्याची काळजी त्यांनी घेतली. अनेक चांगल्या दिग्दर्शकांना निर्माते मिळण्यात अडचणी येतात; पण सुमित्राताईंना त्यांच्या कलाप्रमाणे चित्रपट बनवू देणारे निर्माते मिळाले; मात्र या चित्रपटांना चित्रपटगृहांतून प्रेक्षकांचा जितका प्रतिसाद मिळायला हवा तितका दिसून येत नाही.

सुमित्राताईंच्या चित्रपटांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामधील नामवंत कलाकार मंडळी. नसिरुद्दीन शहा, सदाशिव अमरापूरकर, मोहन आगाशे, रवींद्र मंकणी, विक्रम गोखले, उत्तरा बावकर या ख्यातनाम व मान्यवर कलावंतांनी त्यांच्या चित्रपटांतून कसदार भूमिका साकारल्या. तसेच विजय तेंडुलकर, कमल देसाई, महेश एलकुंचवार या प्रयोगशील लेखकांनीही त्यांच्या चित्रपटात उपस्थिती लावली. सुमित्राताई नवीन कलाकारांसाठी दर्जेदार अभिनयाचे एक चालतेबोलते विद्यापीठच बनल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, अमृता सुभाष, रेणुका दफ्तरदार, देविका दफ्तरदार अशा संवेदनशील व प्रयोगशील कलाकारांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. चित्रपट माध्यम हे समाजाचा सांस्कृतिक ठेवा आहे असे त्या मानीत. त्यांच्या चित्रपट कारकीर्दीचा सविस्तर आढावा घेणारा सुमित्रा भावे – एक समांतर प्रवास हा माहितीपट चित्रपटांविषयक चिकित्सक लेखन करणारे अभ्यासक संतोष पाठारे यांनी निर्माण केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या प्रयोगशील चित्रपटांनी समृद्ध करणाऱ्या सुमित्रा भावे यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले.

समीक्षक : संतोष पाठारे