भारत-चीन १९६२च्या युद्धातील एक लढाई.

पार्श्वभूमी : संरक्षणमंत्री कृष्ण मेनन, आयबी. (Intelligence Bureau) प्रमुख बी. एन. मलिक आणि लेफ्टनंट जनरल बी. एम. कौल यांच्या ‘फॉरवर्ड पॉलिसी’नुसार लडाख विभागात भारतीय लष्कराच्या छोट्याछोट्या तुकड्या पुरेशी पुरवठाव्यवस्था उपलब्ध नसतानाही चिनी सैन्याच्या डोळ्याला डोळा भिडवून पार सीमेवर तैनात करण्यात आल्या. नेफाच्या कामेंग विभागात, मात्र तवांगच्या पुढे, सैन्य पाठविण्यात आले नव्हते. ब्रिगेडियर जे. पी. दळवी यांच्या ७ इन्फन्ट्री ब्रिगेडवर कामेंग विभागाच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. जून १९६२ मध्ये ७ इन्फन्ट्री ब्रिगेडचे मुख्यालय आणि दोन पलटणी१/९ गोरखा रायफल्स (जी. आर.) व १ सिखतवांगमध्ये पोहोचले होते. तवांगपरिसरात संरक्षणफळी उभारून कामेंग विभागावरील चिनी सैन्याच्या कोणत्याही आक्रमणाला पायबंद घालण्याची त्यांची योजना होती.

सीमेलगतचा भूप्रदेश : तेजपूरहून कामेंग विभागाला जोडणारा मिसामारी-टेंगा-सेला-नुरानांग-जंग-तवांग हा एकच मार्ग त्या वेळी अस्तित्वात होता. तवांगच्या पुढे कोणताही रस्ता नव्हता. तिथून उत्तरेस सीमेलगत वाहणारी नामकाचू नदी २२ किमी. दूर होती.

तवांगहून नामकाचूपर्यंत पोहोचण्यासाठी दोन पायवाटा होत्या. पहिली, करपोला खिंडीवाटे आणि दुसरी, हथुंगला खिंडीवाटे. या सर्व परिसराची उंची सु. ३०४८ मी. ते ४५७२ मी.च्या दरम्यान होती.

नामकाचू ही नदी थागला डोंगरसरींच्या दक्षिणेला आहे. ती ओलांडण्यासाठी तिच्यावर पाच तकलादू पूल अस्तित्वात होते (ब्रिज १ ते ५). त्या परिसरातील दुसरी नदी न्यामजंगचू उत्तर-दक्षिण वाहते. नामकाचूपासून दक्षिणेला येणाऱ्या चार पायवाटा होत्या : पहिली, त्सांगले-त्सांगधार- करपोला- लुंपू; दुसरी, ब्रिज ३- रोंगला- धोला- लुंपू; तिसरी, खिंझेमाने- ब्रिज २- हथुंगला – साराखेन – लुंपू आणि चौथी, न्यामजंगचूच्या  पूर्वेस ड्रोन्गकुंग सांबा ब्रिज – झिमिथान्ग – गोर्सेम चॉर्टेन. चीनच्या मतानुसार मॅकमहोन रेषा नामकाचू नदीच्या सहा किमी. दक्षिणेस होती. म्हणजे त्यांच्या नकाशानुसार त्सांगधार चिनी प्रदेशात होते.

लढतीचा आरंभ : ४ जून १९६२ रोजी नामकाचूच्या दक्षिणेस ब्रिज ३ जवळ आसाम रायफल्सचे धोला ठाणे उभारण्यात आले. चिनी सरकारने १९५९ मध्ये थागला डोंगरसरींवरील खिंझेमाने येथे उभारलेल्या आसाम रायफल्सच्या भारतीय ठाण्याला गंभीर आक्षेप घेतला होता. भारतीय सैन्याने नव्याने उभारलेले धोला ठाणे पाहून चिनी बिथरले. ८ सप्टेंबर १९६२ रोजी ६०० ते १२०० चिनी सैनिकांनी धोला ठाण्याला वेढा घातला. वास्तविक ७ इन्फन्ट्री ब्रिगेडचे मुख्य काम तवांगमध्ये तटबंदी करणे हे होते. परंतु तडकाफडकी आदेश बदलून ७ ब्रिगेडला पुढे जाऊन चिनी सैन्याला नामकाचू कोणत्याही स्थितीत पार न करू देण्याचे काम देण्यात आले. पुढे ही घोडचूक ठरली. नामकाचूवरील पराभवाची त्यायोगे पायाभरणी झाली.

सप्टेंबरच्या अखेरीस ७ इन्फन्ट्री ब्रिगेडच्या १/९ जी आर, २ राजपूत, ९ पंजाब आणि ४  ग्रिनेडियर या बटालियनांनी पश्चिमेस त्सांगलेपासून पूर्वेस ड्रोन्गकुंग सांबा ब्रिजपर्यंत नामकाचूवर आपली ठाणी उभारून कशीबशी मोर्चेबंदी पुरी केली. ही सर्व हालचाल तातडीने झाल्यामुळे त्यांच्यापाशी पुरेसा दारूगोळा नव्हता आणि कडाक्याच्या थंडीला तोंड देण्यासाठी कपडेही नव्हते, शिवाय पुरेसा धान्यपुरवठा नव्हता. तेजपूरच्या सखल प्रदेशातून सु. ४८७६ मी. उंचीवर तडकाफडकी आणल्या गेलेल्या या पलटणींना वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी (अक्लायमेटायझेशनसाठी) पुरेसा अवधी मिळाला नव्हता. आपल्या अग्रगामी (फॉरवर्ड) धोरणाचा कसून पाठपुरावा करण्यासाठी तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांनी लेफ्टनंट जनरल बी. एम. कौल यांची तेजपूरमधील ४ कोअरचे कमांडर म्हणून नेमणूक केली होती. ५ ऑक्टोबरला कौल हेलिकॉप्टरने धोला येथे पोहोचले. तवांगहून पायी निघालेले ब्रिगेडचे प्रमुख ब्रिगेडियर दळवीसुद्धा तोपर्यंत तिथे पोचले नव्हते. नामकाचूच्या उत्तरेस असलेल्या थागला डोंगरसरींचा ताबडतोब ताबा घेण्याच्या निर्धाराने जनरल कौल तिथे आले होते. आल्याबरोबर २ राजपूत या पलटणीला तातडीने युमत्सोलाला पोहोचून तिथे मोर्चेबंदी करण्याचे त्यांनी स्वतः आदेश दिले. थागलावर हल्ला केला, तर चिनी कसा प्रतिसाद देतील याची चाचपणी घेण्यासाठी ९ पंजाबच्या ५० जवानांचे एक गस्तपथक सेंगजोंगला ९ ऑक्टोबरला पाठविण्याचे त्यांनी आदेश दिले. चिनी वाटच पाहत होते. दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर प्रखर चिनी हल्ला झाला. आपले मृत आणि जखमी जवान घेऊन त्यांना परतावे लागले. चिनी कोणत्याही अग्रगामी चालीला तडाख्याचे उत्तर देतील, हे आता मात्र कौल यांना पटले आणि ते दिल्लीला परतले. नामकाचूच्या खबदाडात अडकून राहण्यापेक्षा मागे जाऊन उंचीवरच्या हथून्गाला डोंगरसरीवर संरक्षणफळी उभारली, तर कोणत्याही चिनी हल्ल्याचा आपण अधिक समर्थपणे प्रतिकार करू शकू, ही दळवींची सूचना कौल यांनी पुनःश्च धुडकावून लावली. परत जाताना नामकाचूवरील मोर्चेबंदी तटवून ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. आपल्याजवळ तोफखान्याची एकही तोफ नसताना हे जवान तयारीनिशी आलेल्या चिनी सैन्याशी कशी टक्कर देतील, हा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही.

चीनचे सैन्यबळ आणि योजना : तवांग विभागातील हल्ल्यासाठी चीनने फोर्स ४१९ (१५४,१५५,१५७, इन्फन्ट्री रेजिमेंट), ११ इन्फन्ट्री डिव्हिजन (३१,३२, १३ इन्फन्ट्री रेजिमेंट ) आणि २ इन्फन्ट्री रेजिमेंटइतका फौजफाटा गोळा केला होता. चिनी इन्फन्ट्री रेजिमेंट म्हणजे भारताच्या एका इन्फन्ट्री ब्रिगेडइतकी असते. थोडक्यात, भारताच्या एका ब्रिगेडवर हल्ला चढविण्यासाठी चिन्यांनी सातपट सैन्यबळ उपलब्ध करून दिले होते. नामकाचू नदीपार भारताच्या मोर्चेबंदीवर समोरून एका बाजूने हल्ला चढवायचा आणि त्यांना मागे रेटायचे, पण त्याचबरोबर पूर्वेच्या बाजूने खिंझामानेमार्गे झिमिथांगपर्यंत पोहोचायचे आणि नामकाचू परिसरातील  भारतीय सैन्याची कोंडी करायची, अशी फोर्स ४१९ कमांडरची योजना होती.

चीनचा हल्ला : नामकाचू मोर्चावर चिनी सैन्याने दि. २० ऑक्टोबर १९६२ रोजी पहाटे तोफमाऱ्यासह प्रखर हल्ले चढविले. नामकाचू ओलांडून चिनी १५५ रेजिमेंटने २ राजपूतवर पाठीमागून हल्ला चढविला. उलटा हल्ला आल्यामुळे राजपुतांची कोंडी झाली, तरीही ते निकराने लढले. लढाई तीन तास चालली. नामकाचूवरील त्यांच्या ठाण्यातील ५१३ जवानांपैकी २८२ धारातीर्थी पडले आणि ८५ जखमींसहित १७१ सैनिक युद्धबंदी झाले. त्यात २ राजपूतचे कमांडर कर्नल रिखी यांचा समावेश होता. ८० चिनी सैनिक ठार झाले आणि १२० जखमी झाले. २० ऑक्टोबरच्या दुपारी पूर्वेकडील ९ पंजाब आणि ४ ग्रिनेडियरवर १५४ रेजिमेंटने हल्ला चढविला; परंतु तो हल्ला चढविण्यात चिन्यांनी थोडी दिरंगाई केल्यामुळे या दोन्ही बटालियन सुरक्षितपणे माघार घेऊ शकल्या.

त्सांगधार हे विमानांकरवी पुरवठ्यासाठी ७ इन्फन्ट्री ब्रिगेडचे ड्रॉपिग झोन (डीझेड) होते. तिथे १/९ जी आर या पलटणीची एक कंपनी मोर्चेबंद होती. ती कंपनी सोडून उरलेली पलटण २० ऑक्टोबरच्या सकाळी जनरल कौल यांच्या हुकुमानुसार उत्तरेला त्सांगलेमधे मोर्चेबंदी करण्यासाठी जाण्याच्या तयारीत होती. चिनी १५७ रेजिमेंटने पश्चिमेकडून वळसा घालत त्सांगधार काबीज केले.  मोर्चे सोडून पुढे जाण्यासाठी बाहेर आलेले १/९ जी आरचे कमांडर कर्नल आलुवालिया आणि ४९२ जवान चिन्यांच्या हातात सापडले आणि युद्धबंदी झाले. पूर्वेकडे चिनी ३२ इन्फन्ट्री रेजिमेंटने हथुन्गला खिंडीवर हल्ला चढवून २१ ऑक्टोबरची पहाट होण्याआधी तिचा ताबा घेतला. २१ ऑक्टोबर १९६२ च्या दुपारपर्यंत नामकाचू, त्सांगधार आणि हथुन्गला या लढाया चिनी सैन्याने जिंकल्या होत्या. त्याबरोबर एक लढाऊ तुकडी या स्वरूपातील ७ इन्फन्ट्री ब्रिगेडचे अस्तित्व संपुष्टात आले होते. २२ ऑक्टोबरला ब्रिगेडिअर दळवीसुद्धा चिन्यांच्या हातात पडून युद्धबंदी झाले. १९६२च्या युद्धातील भारतीय लष्कराच्या निर्णायक पराभवाची ही नांदी होती.

संदर्भ :

  •  Dalvi, J. P. Himalayan Blunder : The Angry Truth about India’s Most Crushing Military Disaster,  Dehradun,  2003.
  •  Maxwell, Neville, India’s China War, Dehradun, 2013.
  •  Sandhu, P. G. S. 1962 The Battle of Namka Chu and Fall of Tawang : A View from other Side of The Hill,
    USI Journal, vols. 163, April – June 2013
    .
  •  Singh, Amarinder, Lest We Forget, New Delhi, 1999.
  •  पित्रे, शशिकान्त, न सांगण्याजोगी गोष्ट : १९६२च्या पराभवाची शोकांतिका, पुणे, २०१५.   

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा