भारतीय अभिजात ललितकलांचे व संस्कृतीचे शास्त्रोक्त शिक्षण गुरुकुल पद्धतीने देणारी आंतरराष्ट्रीय कीर्तीची संस्था. या संस्थेची स्थापना १९३६ साली भरतनाट्यम् या प्रकारातील एक श्रेष्ठ भारतीय नर्तिका असलेल्या रुक्मिणीदेवी ॲरंडेल यांनी त्यांचे पती जॉर्ज ॲरंडेल यांच्या सहकार्याने चेन्नईजवळील अड्यार येथे केली. केवळ कुशल कलावंत न घडवता प्रगत पाश्चिमात्त्य विचार, कल्पना आणि प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानातील परंपरागत मूल्याधारित ज्ञान यांचा मेळ या प्रशिक्षणात घालून जागतिक हिताचा, कल्याणाचा दृष्टिकोन असलेले प्रगल्भ विद्यार्थी तयार करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट प्रथमपासून आजवर जपले गेले आहे.

या संस्थेच्या माध्यमातून रुक्मिणीदेवींनी भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्यप्रकाराची वेगळी नृत्यशैली विकसित केली. हातापायांची अगदी ताठ व जोशपूर्ण स्थिती, साध्या सहज हालचाली, नैसर्गिक पद्धतीने केलेल्या हस्त, ग्रीवा व नेत्र यांच्या मुद्रा ही त्यांनी या नृत्याला प्रदान केलेली वैशिष्ट्ये होत. या संस्थेत निवडक गुणी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि मान्यवर शिक्षकांना, संगीततज्ज्ञांना व कलाकारांना निमंत्रणपूर्वक अध्यापनासाठी व मार्गदर्शनासाठी पाचारण केले जाते. संस्कृत काव्यातील, महाकाव्यांतील प्रसंग-घटना, ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्तींची चरित्रे, यांवर आधारित जवळजवळ ३० नवीन नृत्यनाट्यांचे येथील विद्यार्थ्यांनी आदर्श सादरीकरण केले आहे. २००६ साली ‘दासरू कंद कृष्ण’सारखे नवीन नृत्यनाट्य सादर करून हीच परंपरा राखली गेली आहे. संस्थेमध्ये प्रामुख्याने भरतनाट्यम् नृत्याचे (मूलभूत शास्त्र व सादरीकरण); गांधर्ववेद (कर्नाटक) पद्धतीच्या गायनाचे, वाद्यवादनाचे; दृश्य अशा नृत्य-नाट्यकलेचे (नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा, अलंकार, वाद्यमेळ, गायन, अभिनय अशा विविध अंगांसहित); चित्र–शिल्प वगैरे ललित कलांचे; पारंपरिक हस्तकलेचे; वस्त्रनिर्मितीच्या प्राचीन रंगसंगतीचे, वस्त्र संरचनेचे (डिझायनिंगचे) व विणकामाचे (परंपरेच्या व सौंदर्यशास्त्राच्या अंगाने); सुताचे नैसर्गिक रंगकाम व कापडावरील कलमकारी (काठ, बुट्टे यांचे छापकाम व संरचनांच्या, बाह्यरेषांची हस्तचित्रकारी); (त्यातील अभिजातता व सौंदर्य यांच्या जपणुकीच्या दृष्टिकोनासह) शास्त्र व सादरीकरण या दोन्ही पातळ्यांवर प्रशिक्षण दिले जाते. तसेच इतिहास, तत्त्वज्ञान हे विषयही शिकवले जातात. अध्यापनात शिस्त, स्वातंत्र्य आणि वातावरणातला मोकळेपणा या तिन्हींचा समन्वय येथे साधला जातो. प्रवेशप्रक्रियेसाठी तज्ज्ञांची निवड समिती आहे. १८ ते २५ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. नृत्य, दृश्यकला, संगीत यांतील पदविका व भरतनाट्यम् व कर्नाटक संगीत यांतील पदविकोत्तर अभ्यासक्रमही येथे आहेत. तमिळ, तेलुगू, संस्कृत व इंग्लिश या भाषा, भरतनाट्यम् व कथकली नृत्याचा इतिहास, शास्त्र, परंपरा; योगविद्या; शारीरिक आरोग्य हे विषयही पदविकेत शिकवले जातात. पदविकोत्तर शिक्षण घेत असताना संस्थेच्या कार्यात सहभागी होता येते. कलाभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी भरपूर मौलिक हस्तलिखिते आणि दुर्मीळ पुस्तके असलेले ‘स्वामिनाथन’ वाचनालय, ‘रुक्मिणीदेवी’ संग्रहालय (Archives), प्रकाशने व इतर व्यावहारिक गोष्टी यांतून संस्थेच्या कार्याचे दस्तऐवजीकरण झाले असून ते सामान्य नागरिकांपासून ते शोधनिबंध लिहिणाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. दक्षिण चेन्नई शहरात वसलेल्या या संस्थेची वास्तू साधी, पण सर्व आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असून आवारात अनेक मोठे वृक्ष आणि नियोजित हिरवाई असल्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश, नैसर्गिक शांतता, प्रसन्नता, सुसंस्कृत व कलेला पोषक वातावरण येथे असते.

संस्थेत वर्षभर कला विषयांसंबंधी व्याख्याने, प्रात्यक्षिके, रंगमंचीय कलाविष्कार, कार्यशाळा वगैरे कार्यक्रमांची रेलचेल असते. फेब्रुवारी अखेर पहिला, (संस्थापिकेचा जयंत्योत्सव), सप्टेंबरमध्ये दुसरा व डिसेंबरअखेर ते जानेवारी आरंभापर्यंत तिसरा असे वार्षिकोत्सव असतात. शिवाय दर महिन्याला दृश्यकलेतील सुस्थापित व इतर उदयोन्मुख कलाकारांचे कार्यक्रम होतात. यांत दर्जेदार अशा नृत्य, नाट्य, गायन, वाद्यवादन, चित्रपट, कळसूत्री बाहुल्या, लोककला इत्यादी कार्यक्रमांचा तसेच कोणत्याही माध्यमातील कथाकथन यांचा समावेश असतो. यांची माहिती वृत्तपत्रे, संकेतस्थळ इत्यादींद्वारे प्रसारित केली जाते. जयंत्योत्सवाव्यतिरिक्त इतर सर्व कार्यक्रम श्रोते व प्रेक्षकांसाठी विनामूल्य असतात. संस्थेत तीन रंगमंच आहेत. ‘टागोर थिएटर’ हा २०० आसनांचा छोटा रंगमंच, ‘रुक्मिणी आरंगम्’ हा संस्थेत मध्यभागी असलेला वडाच्या झाडाखालचा उघडा रंगमंच व विस्तृत असा ‘भरत कलाक्षेत्र थिएटर’ (Koothambalam) हा तिसरा रंगमंच आहे. भरतनाट्यम् हा नृत्यप्रकार मूळचा देवळातल्या देवदासींनी देवासाठी म्हणून सादर करायचा नृत्यप्रकार असल्यामुळे रंगमंचावर देवळासारखे पवित्र वातावरण निर्माण केले जाते. १९६२ साली चेन्नईतील बेझंटनगरच्या १०० एकर जागेत संस्थेचे स्थलांतर झाले. डॉ. ॲनी बेझंट यांच्या इच्छेनुसार या विस्तृत परिसरात नंतरच्या काळात ‘बेझंट प्रार्थना समाज हायस्कूल’, ‘द बेझंट-ॲरंडेल सीनिअर सेकंडरी स्कूल’, ‘क्राफ्ट एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर’ (या अंतर्गत वस्त्र विणकाम विभाग, कलमकारी नॅचरल डाइंग, प्रिंटिंग अँड पेंटिंग विभाग), ‘रुक्मिणीदेवी कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स’ अशा विविध शिक्षणसंस्था सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर मुलांसाठी व मुलींसाठी वसतिगृहे स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे कलांबरोबरच नियमित शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना शक्य झाले आहे. शालेय शिक्षण संस्थेतील वस्त्रोद्योग विभाग मूळ प्रांगणापासून थोडा विलग आहे. तेथे रेशमी व सुती साड्यांची निर्मिती केली जाते आणि कलाक्षेत्र क्राफ्ट शॉपमध्ये त्या विक्रीला ठेवलेल्या असतात. कार्यक्षेत्राच्या अशा विस्तारीकरणामुळे ही संस्था आता ‘कलाक्षेत्र फाउंडेशन’ म्हणून ओळखली जाते. १९९२ मध्ये या संस्थेला कायद्यान्वये ‘राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण संस्था’ अशी सन्माननीय अधिकृत ओळख मिळाली. सध्या संस्थेचे प्रमुख एस. रामादुराई व संचालक अनिश राजन हे आहेत. राधा बर्निअर, कमलादेवी चटोपाध्याय, सी. व्ही. चंद्रशेखर, अड्यार के.लक्ष्मण, धनंजयन्स, लीला सॅमसन, आनंद शंकर जयंत व इतर अनेक नामवंत कलाकार कलाक्षेत्रचे माजी विद्यार्थी आहेत. ते रुक्मिणीदेवींचे वारसा निष्ठेने व प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत.

संदर्भ :

  •  http://kalakshetra.in

समीक्षण : सुधीर पोटे