इशर जज अहलुवालिया (Isher Judge Ahluwalia) : (१ ऑक्टोबर १९४५ – २६ सप्टेंबर २०२०). प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ. आर्थिक सिद्धांत व आर्थिक धोरण यांचा समन्वित विचार करून आर्थिक विश्वामध्ये आपल्या भूमिकेचा स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या भारतातील मोजक्या अर्थतज्ज्ञांपैकी अहलुवालिया या एक आहेत. त्यांचा जन्म एका पारंपरिक मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण इंदौर (म. प्र.) व १९५० नंतर कोलकाता (प. बंगाल) येथे गेले. त्यांनी अर्थशास्त्र विषय घेऊन बी. ए. ही पदवी प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकाता येथून मिळविली. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून त्यांनी एम. ए. ही पदवी मिळविली, तर पीएच. डी. या संशोधन पदवीसाठी त्यांनी मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका) येथे प्रवेश घेतला. स्टॅनले फिशर हे त्यांचे पीएच. डी. पदवीचे मार्गदर्शक होते. त्याचबरोबर त्यांना या संस्थेमध्ये रिचर्ड एकीस, जगदीश भगवती, पॉल अँटनी सॅम्युएल्सन, रॉबर्ट सोलो अशा विख्यात अर्थतज्ज्ञांचे मार्गदर्शनही लाभले. अमेरिकेतील वास्तव्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या वॉशिंग्टन येथील कार्यालयात पॉलिसी इकॉनॉमिस्ट या पदावर काही काळ काम केले. आर्थिक धोरण प्रत्यक्षात राबविताना विविध देशांना व विशेषत: विकसनशील देशांना कसा अनुभव येतो याची पाहाणी करणे, त्याबाबत चर्चा करणे आणि अहवाल सादर करणे अशी कामे त्यांनी पार पाडली. त्यांचा विवाह भारतीय योजना आयोगाचे माजी उपाध्यक्ष मोंटेक सिंह अहलुवालिया यांच्याशी झाला. त्यांना दोन मुले आहेत.

अहलुवालिया या भारतामध्ये परतल्यानंतर नवी दिल्ली येथील ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ येथे प्राध्यापक पदावर काम केले. समग्रलक्षी अर्थशास्त्र, आर्थिक धोरण, नागरी भागातील पायाभूत सुविधा, शाश्वत नागरीकरण, नागरी भागातील घनकचरा व्यवस्थापन, पेयजल पुरवठा, नागरी परिवहन यंत्रणा या विषयांवर देशातील विविध शहरांमधून प्राथमिक सांख्यिकी माहिती संकलित करणे; त्या माहितीचे विश्लेषण करणे; त्यावरून आर्थिक धोरण सुचवणे; त्यासाठीच्या आर्थिक निधीबाबत शिफारशी करणे अशी कामे त्यांनी केली. नागरी पायाभूत सुविधा व सेवा यांच्या अभ्यासासाठी केंद्र सरकारने एक उच्च स्तरीय समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्षपद अहलुवालिया यांच्याकडे होते. देशातील ६९ शहरांमध्ये २००५ ते २०१४ या कालखंडादरम्यान जी जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण मोहीम राबविण्यात आली, तिची प्रेरणा अहलुवालिया यांच्या संशोधन अभ्यासात होती.

अहलुवालिया या ‘इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकनॉमिक रिलेशन्स’ या संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्या, तसेच काही काळ संचालकही होत्या. सरकारच्या ‘नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पिटिटिव्हनेस कौन्सिल’च्या सदस्य; ‘इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट, वॉशिंग्टन’च्या अध्यक्षा; पंजाच राज्य नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षा; ‘इंटरनॅशनल बॉटर मैनेजमेंट इन्स्टिट्यूट’च्या नियामक मंडळाच्या सदस्या अशी मानाची पदे त्यांनी भूषविली. त्यांना शिक्षण व साहित्यातील महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी २००९ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नागरी अर्थशास्त्र, नागरी विकासाच्या समस्या, विकासाचे अर्थशास्त्र, आर्थिक धोरण या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. तसेच लेख, शोधनिबंध, व्याख्याने, पुस्तके यांद्वारे त्यांनी आपले संशोधन मांडले. त्यांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : बिहेवियर ऑफ प्राइसेस अँड आउटपुट इन इंडिया, १९७९; इंडस्ट्रियल ग्रोथ इन इंडिया… १९८९; प्रोडक्टिव्हिटी अँड ग्रोथ इन इंडियन मॅन्युफॅक्चरिंग, १९९१; इंडियाज इकॉनॉमिक रिफॉर्मस (सहसंपादन), १९९८; ऑर्गनायझेशन इन इंडिया (सहलेखन), २०१४; ट्रान्स्फॉर्मिंग अवर सिटीज, २०१४; ब्रेकिंग थ्रू : ए मेमॉयर, २०२० इत्यादी.

इशर अहलुवालिया यांचे कर्करोगाने मुंबई येथे निधन झाले.

समीक्षक : अविनाश कुलकर्णी