उ. अल्लारखाँ : (२९ एप्रिल १९१९ – ३ फेब्रुवारी २०००). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय तबलावादक आणि श्रेष्ठ कलावंत. त्यांचे मूळनाव अल्लारखाँ कुरैशी खाँसाहेब असे होते. ते ए. आर. कुरैशी आणि अब्बाजी या नावानेही सुपरिचित होते. त्यांचा जन्म जम्मूजवळील फगवाल या छोट्याशा खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या घरात संगीताची वा तबलावादनाची परंपरा नव्हती; मात्र अल्लारखाँ यांना लहानपणापासूनच तबलावादनाची आवड होती. ते वयाच्या बाराव्या वर्षी घर सोडून लाहोरला गेले. येथे त्यांचा परिचय पंजाब घराण्याचे उ. मियाँ कादिरबक्ष यांच्याशी झाला. त्यांनी उ. मियाँ कादिरबक्ष यांना आपले गुरू मानले व त्यांच्याकडून काही काळ तबलावादनाचे धडे घेतले. यानंतर ते पतियाळा घराण्याचे उ. आशिक अलीखाँ यांच्याकडून त्यांनी अथक प्रयत्नाने रागदारी संगीताचे शिक्षण घेतले.

१९४० साली अल्लारखाँनी मुंबई नभोवणी केंद्रावर तबलावादकाची नोकरी पतकरली. नभोवाणीवर त्यांनी तबलावादनाचे अनेक एकल कार्यक्रम सादर केले. याशिवाय मुंबईभर अनेक ठिकाणी त्यांनी तबलावादनाचे कार्यक्रम केले. ते रसिकश्रोत्यांच्या पसंतीसही उतरले. या नोकरीत असताना त्यांनी अनेक गायकवादकांना तबल्याची साथसंगतही केली. १९४३-४८ दरम्यान त्यांनी ए. आर. कुरैशी या नावाने अनेक चित्रपटांना यशस्वी रीतीने संगीत दिग्दर्शन केले; मात्र फार काळ चित्रपटक्षेत्रात न रमता त्यांनी देशविदेशात तबलावादनाचे जाहीर कार्यक्रम केले आमि आपल्या कलाकारीचा ठसा उमटवला.

अल्लारखॉं हे  बनायक – बजायक – बतायक अशा दुर्मीळ गुणांनी सिद्ध होते. त्यांना असलेल्या ताल व लयकारीच्या सूक्ष्म जाणीवेमुळे व त्यांच्या चौकस बुद्धिमत्तेमुळे त्यांची या कलेवर उत्तम पकड बसली. त्या बळावर त्यांनी अगणित सौंदर्यपूर्ण रचना केल्या. जगप्रसिद्ध सतारवादक पं. रविशंकर यांच्याशी त्यांचा  परिचय झाला. त्यांच्यासमवेत अल्लारखाँ यांनी जपानमध्ये एक कार्यक्रम केला. तो फारच रंगला. पुढे या जोडीने जगभर अनेक कार्यक्रम केले. पाश्चात्त्य संगीत रसिकांत भारतीय संगीत लोकप्रिय करण्यात या दोन दिग्गजांची कामगिरी मोलाची आहे. अतिशय हजरजबाबी साथसंगत हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य होते. पं. रविशंकर यांच्या अपेक्षेनुसार साथीदाराने मूळ वादकाच्या रचनेला अनुसरून संगत करावी, या विचाराला न्याय देत अल्लारखॉं यांची संगतीचे एक नवीन तंत्र निर्माण केले.

खॉंसाहेबांनी कायदे, तिपल्ली, गत चक्रदार, तुकडे, चलने, विविध विरामांच्या तिहाया इ.ची निर्मिती केली. पाऊण मात्रेंच्या विरामाच्या तिहाईच्या निर्मितीचे श्रेय अल्लारखॉं यांच्याकडे जाते. पंधरा मात्रांची सवारी, अकरा मात्रांची चार तालाची सवारी, नऊ मात्रांचा मत्रताल, तेरा मात्रांचा जयताल अशा अनेक तालांत ते स्वतंत्र रीत्या वादन करीत तसेच साथसंगतही करीत. त्यांच्या या चतुर्स्त्र कलाकारीचा गौरव म्हणून त्यांना अनेक मानसन्मान देण्यात आले. त्यांपैकी भारत सरकारने दिलेला पद्मश्री (१९७७), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८२), कालिदास सन्मान (१९९४-९५) इत्यादी प्रमुख होत.

अल्लारखाँ यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करताना अनेक शिष्यही घडविले. यामध्ये परदेशातील अनुराधा पाल यांसारख्या महिला वादक तसेच अमेरिकेतील ड्रमवादक बडी रीच यांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या शिष्यवर्गात प्रामुख्याने पं. योगेश समसी, आदित्य कल्याणपूर, डी. आर. नेरूरकर, विनायक इंगळे, प्रफुल्ल आठल्ये इ. नावे उल्लेखनीय आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन व फजल कुरैशी आणि वाद्यवृंदसंयोजक तौफिक कुरैशी हे त्यांचे तीनही सुपुत्र त्यांचे शिष्य होते. व त्यांचा वारसा पुढे चालवित आहेत. १९८५ मध्ये अल्लारखाँ यांनी मुंबई येथे तबलावादनाचे प्रशिक्षण-शिक्षण देण्यासाठी अल्लारखाँ इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक ही संस्था स्थापन केली. त्यांच्या पश्चात या संस्थेचा कार्यविस्तार आणि व्यवस्थापन त्यांचा मुलगा तौफिक यांनी सांभाळले आहे.

वयांच्या ८० व्या वर्षी अल्लारखाँ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबई येथे निधन झाले. एक सोज्ज्वळ, सभ्य प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेला कलाकार म्हणून त्यांनी जगभरात नावलौकिक मिळविला आणि जगाला भारतीय सांगीतिक संस्कृतीचे त्यांनी दर्शन घडविले.

समीक्षक : आनंद गेडाम