ग्रीक मिथकांनुसार ओरायन हा एक अत्यंत भव्य शिकारी देवता होता. ओरायनविषयी अनेक मिथककथा आहेत. त्यांपैकी त्याच्या जन्माविषयीच्या दोन आणि मृत्यूविषयीच्या अनेक कथा प्रचलित आणि प्रख्यात आहेत. पोसिडॉनचा पृथ्वीपासून निर्माण झालेला अत्यंत देखणा मुलगा म्हणजे ओरायन. अनेक प्राचीन संदर्भांवरून त्याचा जन्म बीओशा येथे झाल्याचे कळते. एका मिथककथेनुसार पोसिडॉन आणि इतर देवतांनी पाणी लपविण्याच्या हेतूने स्त्रीशिवाय ओरायनला जन्माला घातले आणि ते पाणी पुढे नऊ महिने जमिनीमध्ये गाडून ठेवले, ही एक लोककथा असून ‘लघवी’ (Urine) चा संबध ओरायनशी असावा, असा यावरून कयास केला जातो. त्यामुळे ‘ओरायन’ शब्दाची व्युत्पत्ती वरील प्रचलित लोककथेवरून कळून येते.
दुसऱ्या मिथकानुसार तो समुद्रदेवता पोसिडॉन आणि क्रीटच्या राजाची ‒ मिनोजची ‒ मुलगी यूरेलचा मुलगा होता. वडील समुद्रदेव असल्याने लाटांवरून लीलया चालत जाण्याची शक्ती त्याच्याकडे होती. याच शक्तीचा वापर करून त्याने केऑस हे बेट ओलांडले आणि मद्य पिऊन ईनोपियन या राजाची मुलगी मेरोपी हिच्यावर बळजबरीने समागम केला. तेव्हा ईनोपियनने ओरायनला अंध केले आणि पळवून लावले. मग ओरायन लेम्नॉस या बेटावर आला. जिथे त्याला हीफेस्टसनामक लोहारांचा देव (Smith God) भेटला. पुढे हीफेस्टसने आपल्या नोकराला ‒ सेडॅलियनला ‒ ओरायनला पूर्वदिशेस जाण्यास मदत करण्यास सांगितले. तिथे हीलिऑसने ‒ सूर्याने ‒ ओरायनवर उपचार केले आणि तो सेडॅलियनसोबत ईनोपियनचा सूड घेण्याच्या हेतूने पुन्हा केऑस बेटावर आला. पण तेव्हा ईनोपियन भूमिगत होऊन लपून बसला आणि त्याने ओरायनपासून अशा पद्धतीने आपली सुटका करून घेतली.
पुढे ओरायन क्रीटच्या दिशेने निघाला, असे मिथकांमध्ये वर्णिले आहे. याच मार्गामध्ये त्याने शिकारी देवता आर्टेमिस आणि तिची आई लेटो यांच्याबरोबर शिकार केली. तसेच शिकार करीत असताना त्याने पृथ्वीवरील सर्व श्वापदांना मारेन, अशी धमकी दिली. पृथ्वीदेवता गी हिने यावर आक्षेप घेतला. तसेच त्याला मारण्यासाठी तिने अजस्र अशा विंचवाला पाठविले. विंचवाने ओरायनला ठार केले. त्याच्या मृत्यूनंतर गी हिने झ्यूसला तारकासमूहांमध्ये ओरायनला समाविष्ट करून घेण्यास सांगितले. अशा पद्धतीने ओरायन एक तारकासमूह म्हणून अंतराळात कायमचा स्थिर झाला. याचप्रमाणे आर्टेमिसने त्याला मारले, असाही संदर्भ अनेक ठिकाणी येतो. तसेच ती त्याची प्रेयसी होती. काही प्रजननविषयक विधींमध्ये पुरुषदेवता असणाऱ्या या ओरायनबरोबर स्त्रीदेवता म्हणून आर्टेमिसचा उल्लेख येतो. त्याच्या पत्नीचे नाव ‘पोमोग्रेनेट’ जिला हेराशी सामना करण्यासाठी हेडीसकडे पाताळात पाठविण्यात आले होते.
ग्रीक साहित्यात होमरच्या ओडिसीमध्ये जेव्हा ओडिशियस स्वतःची सावली पाताळात पाहतो तेव्हा ओरायन एक शिकारी म्हणून प्रथम दृष्टोत्पत्तीस पडतो. तसेच तो प्राण्यांना मारणारा आणि उषस् देवतेचा प्रियकर म्हणूनही प्रख्यात आहे. होमरच्या इलिअडमध्ये तो एका तारकासमूहाचे नाव म्हणून प्रसिद्ध असून सिरियस हा तारा त्याचा कुत्रा दाखविला आहे. हीसिअडच्या ‘वर्क्स अँड डेज’ या कवितेमध्ये तो सूर्याबरोबर उदयाला येणारा आणि अस्तास जाणारा तारकासमूह म्हणून उल्लेखिलेला असून वर्षांची मोजणी त्याच्या आधारे होत असे.
बहुतांश मिथकांनुसार हीरिअस हा ओरायनचा पिता म्हणून प्रसिद्ध आहे. यामुळे ओरायनचा संबध बीओशामधील हीरियासकट अनेक ठिकाणांशी जोडता येतो. ही मिथके प्राचीन असावीत आणि हीरिअस हे हीरियाचे टोपणनाव असावे, असा विद्वानांचा कयास आहे. बीओशामध्ये ओरायनला नायकासमान पूजले जाते. तंगारा या ठिकाणी ओरायनची जत्राही भरविण्यात येते. जी प्रथा अत्यंत प्राचीन आहे. तंगारा पर्वताच्या पायथ्याशी ओरायनचा घुमट आहे.
संदर्भ :
- Pinsent, John, Greek Mythology, Oxford, 1982.
समीक्षक – सिंधू डांगे