ग्रीक साम्राज्यात अथेनाला अथेन्स शहराची पालकदेवता मानले गेले. तिच्या नावाचे उगमस्थान कदाचित हेच असू शकेल. अथेना ही ग्रीक युद्धदेवता. कालांतराने बुद्धिचातुर्याची देवता म्हणून विकास पावली. ‘अथीना’, ‘पलास अथेना’ या नावांनीही ती ओळखली जाते. रोमन लोकांमध्ये ‘मिनर्व्हा’ म्हणून ती प्रसिद्ध आहे.

अथेनाच्या अनेक जन्मकथा रूढ असून त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत :

  • हीफेस्टसने कुऱ्हाडीने झ्यूसच्या मस्तकावर प्रहार करताच घोर रणगर्जना करीत अथेना प्रकट झाली.
  • पंखधारी राक्षस पलास याची ती कन्या. काही काळानंतर, शीलभंग करण्याचा प्रयत्न केल्याकारणाने तिने पलासचा वध केला.
  • पोसिडॉन व ट्रिटॉनिस यांची ती मुलगी.
  • सर्वाधिक प्रचलित कथा याप्रमाणे : अथेना ही झ्यूस (अत्याधिक सामर्थ्यशाली पुरुष) व मीटिस (सर्वांत विचक्षण स्त्री) यांची कन्या. ‘भावी अपत्य तुझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान असेल’ हे भाकीत ऐकल्यानंतर झ्यूसने मीटिसला गिळले, तेव्हा अथेना तिच्या गर्भात होती. नंतर झ्यूसचे डोके दुखू लागले म्हणून त्याची कवटी उघडली, तेव्हा ती बाहेर आली.

ती बुद्धिमत्ता, कला, युद्ध, शांती इत्यादींची देवता होती. तिने आपले कौमार्य कटाक्षाने जपले होते. टैरेसिआसने तिला स्नान करताना पाहिले म्हणून तिने त्याला अंध केले; परंतु नंतर त्याला भविष्यकथनाची कला दिली. अथेनाप्रमाणेच आर्टेमिस ही कृषिदेवताही कुमारी होती आणि तिने आपल्या मैत्रिणींनाही कुमारी राहायला लावले होते.

देवांच्या सभेत, पिता झ्यूस याच्या उजव्या बाजूस तिचे स्थान दिसते. तिच्यात सामर्थ्य व बुद्धिचातुर्य यांचा उत्तम मिलाप आहे. तेजस्वी डोळे हे ठळक वैशिष्ट्य असलेली ही देवता अविवाहित व प्रेमिकरहित मानलेली आहे.

घुबड हे अथेनाचे सहचर. त्यामुळे तेच अथेन्सचे राष्ट्रीय प्रतीक व नंतर बुद्धीचे प्रतीक मानले गेले.

ही शौर्याची अधिष्ठात्री देवता चिलखतधारी रूपात शूर योद्ध्यांच्या बरोबर असते. ती नेहमी न्याय्य कारणासाठीच युद्धास प्रवृत्त होते. लढाईच्या शिस्तबद्ध, नियोजनात्मक व धोरणात्मक पैलूंशी ती निगडित आहे. याविरुद्ध, तिचा भाऊ एरिस हा हिंसा, रक्तपात, नृशंस संहार यांचे प्रतिनिधित्व करतो.

शेती, व्यापार, नवीन शोध यांसारखे राष्ट्राला सामर्थ्य व ऐश्वर्य प्रदान करणारे घटक तसेच दुर्ग, बंदरे असे संरक्षक घटक यांच्याशी अथेनाचा घनिष्ट संबंध जोडला जातो. वस्त्रनिर्मितीसारख्या कलाकौशल्यांचीदेखील ती पालक आहे.

इसवी सन पूर्व पाचव्या शतकात अथेन्सजवळ ॲक्रोपलिस टेकडीवर अथेनाच्या सन्मानार्थ पार्थेनॉन मंदिर बांधले गेले. आता अवशेषरूपात असलेले हे ठिकाण एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ झाले आहे.

संदर्भ :

  • Rangarajan, T. Dictionary of World Gods and Goddesses, Delhi, 2008.
  • Smith, William, Ed. A Dictionary of Greek and Roman Biography and Mythology Vol.1, New York, 2007.
  • UdayLal, L. A Simple Dictionary of Gods and Other Mythological Characters, New  Delhi, 1999.

समीक्षक – सिंधू डांगे

प्रतिक्रिया व्यक्त करा