एक ग्रीक देवता. ही झ्यूस आणि डीमीटर यांची अतिशय सुंदर आणि एकुलती एक मुलगी असून हेडीसनामक पाताळातील देवाची ती पत्नी होय. होमरनुसार ही अत्यंत विलक्षण आदरणीय आणि भव्य अशी पाताळाची देवता होय. पाय्लॉस येथे सापडलेल्या मायसीनियन ग्रीक भाषेत लिहिलेल्या एका शिलालेखामध्ये पर्सानामक देवतेचा उल्लेख सापडतो. ही देवता म्हणजे ओशिॲनसची मुलगी होय आणि हीच पर्सेफोनी, असा कयास केला जातो. पर्सेफोनी हे तिचे नाव ग्रीक महाकाव्यांमधील आयोनिक ग्रीक भाषेमध्ये सापडते. पर्सेफोनीचे होमेरिक रूप हे ‘पर्सेफोनेईआ’ होय. याशिवाय ह्या नावाची आणखी एक पर्यायी व्युत्पत्ती  फेरीन फोनॉन (pherein phonon) अशी असून तिचा अर्थ ‘मारणे’ अथवा ‘मृत्यू घडविणे’ असा आहे. पर्सेफोनी ही डेस्पुॲना, मेलिन्डिया, कोरे, मेलिविया, डीमीटर्स अशा वेगवेगळ्या विशेषणांनी ग्रीक मिथकांमध्ये प्रसिद्ध आहे.

पर्सेफोनीशी संलग्न अनेक मिथकांमध्ये हेडीसने तिचे केलेले अपहरण हे अत्यंत प्रख्यात मिथक आहे. पर्सेफोनी ही हेडीसची बहीण डीमीटरची मुलगी. हेडीसशी विवाह करण्यास ती उत्सुक नसल्याने तिचे त्याने बळजबरीने अपहरण केल्याचे मिथकांमध्ये वर्णिले आहे. ह्या त्याच्या कृत्याचा निषेध म्हणून डीमीटरने पृथ्वीवर मोठा पूर आणला. पृथ्वीवर पिके येऊ दिली नाहीत. सगळ्या देवतांनी तिला विनविले. ‘जोपर्यंत मी माझ्या मुलीस पाहत नाही, तोपर्यंत ही पृथ्वी नापीक राहील’, असे तिने जाहीर केले. अखेरीस झ्यूसने हर्मिसच्या मध्यस्थीने हेडीसला पर्सेफोनीला माघारी पाठविण्याची विनंती केली आणि ती परत आली. पण तिने पाताळामध्ये डाळिंब चाखले होते, ज्यामुळे डीमीटर नाराज झाली आणि तिने तिला पाताळात पुन्हा जाण्यास सांगितले. नंतर झ्यूसने यावर एक तोडगा काढला. तो असा की, पर्सेफोनीने वर्षाचा एकतृतीयांश कालावधी हेडीसबरोबर व्यतीत करायचा आणि इतर वेळेस डीमीटरसोबत राहायचे. ही कथा होमेरिक हिम्न्स टू डीमीटर यामध्ये सापडते. त्यामुळेच पृथ्वीवर हिवाळा सुरू झाला, जो ग्रीक मिथकशास्त्रानुसार दुःख आणि शोक यांचा काळ समजला जातो. पर्सेफोनी ही पृथ्वीवरील धान्यसंपत्तीचे, वनस्पतिसुफलतेचे प्रतीक मानले जाते. हेडीसकडून तिचे झालेले अपहरण आणि त्याच्यासोबत काही काळ पाताळात व्यतीत करण्याची बळजबरी यांमुळे तिचा हकनाक बळी गेला, असे मानले जाते. पण जरी ती वर्षातील अर्ध्याहूनअधिक काळ पृथ्वीवर घालवीत असली, तरी तिच्या पृथ्वीवरील वास्तव्याशी निगडित मिथककथा आपल्याला सापडत नाहीत. तिच्या अपहरणाशिवाय तसेच पृथ्वीवरील तिच्या पुनरागमनाशिवाय ती इतर सर्व मिथकांमध्ये पाताळातील एक भयंकर देवता म्हणूनच दिसते. काही पुराव्यांनुसार ती झ्यूस आणि स्टिक्सनामक पाताळातील देवता यांची मुलगी होय. यावरून तिचे घर हे नेहमीच पाताळात होते, असे मानले जाते.

पाताळाची देवता असणाऱ्या पर्सेफोनीने मृत्यात्म्यांना हेडीसपेक्षाही जास्त नियंत्रित केल्याचे मिथकांमधून प्रत्ययास येते. ती मृतात्म्यांची पृथ्वीवर (upper world) प्रसंगानुरूप पाठवणी करीत असे. तिने ॲल्सेस्टिसनामक मृत स्त्रीला जीवदान दिल्याचे सांगितले जाते. याउलट, आर्टेमिसने मारूनदेखील जिवंत राहिलेल्या एथिमियानामक स्त्रीला हेडीसकडे पाताळात आणल्याचा तपशील सापडतो. शापांमध्ये पर्सेफोनीला नेहमी आवाहन केले जाते. उदा., आरेस्टस आणि इलेक्ट्रा या दोहोंनी आपले वडील ॲगमेम्नॉन ह्यांना जीवदान मिळावे आणि त्यांना मारणाऱ्या एगिस्थसला त्यांनी मरताना पाहावे या हेतूने पृथ्वीकडे (गीकडे) मागणी केली होती. त्यामध्ये यश मिळावे म्हणून त्यांनी पर्सेफोनीला प्रार्थिले होते.

पिरिथसने पर्सेफोनीला स्वतःची वधू बनवून पुन्हा पृथ्वीवर जबरदस्तीने आणण्याचा प्रयत्न केला. पण हेडीसने त्याला आपल्या जाळ्यात फसवून त्याच्या सहकाऱ्यासोबत ‒ थीसससोबत ‒ त्याला पाताळात आणले. थीससची पुढे हीरॅक्लझने सुटका केली. पण पिरिथसला मात्र कायमच पाताळात राहावे लागले.

पाताळदेवता तसेच सुपीकता प्रदान करणारी देवता अशा पर्सेफोनीच्या चरित्राच्या जरी दोन विरुद्ध बाजू असल्या, तरी त्या प्राचीन ग्रीकांसाठी नव्हत्या. त्यांच्या पिकांची-अन्नाची बीजे ज्यांवर त्यांचे आयुष्य अवलंबून होते, ती शिशिरात मृतांसारखी जमिनीमध्ये रुतून जायची आणि मग पुढे वसंतामध्ये ती पुन्हा अंकुरित व्हायची. प्राचीन ग्रीकांसाठी ही जादूच होती. त्यामुळे ह्या जादूला देवतेचे नाव देणे त्यांच्या दृष्टीने स्वाभाविक होते. तसेच पृथ्वीखाली पाताळात राहणाऱ्या मृतात्म्यांनाही त्यांनी देव मानले.

संदर्भ :

  •  Leeming, David, The Oxford Companion to World Mythology, New York, 2005.
  •  Tripp, Edward, Crowell’s Handbook of Classical Mythology, New York, 1970.

समीक्षक – सिंधू डांगे

प्रतिक्रिया व्यक्त करा