डामरॉश, बार्बरा : (१९४२). अमेरिकन व्यावसायिक उद्यानविद्या तज्ज्ञ. त्या एक लेखिका आणि फोर सीझन फार्म या नावाने असणाऱ्या कृषिक्षेत्राचे सह-संस्थापक आहेत.
डामरॉश यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण न्यू यॉर्क येथील ब्रेली स्कूल येथे झाले. पुढील शिक्षण त्यांनी मॅसॅच्युसेट्स येथील व्हिटन कॉलेज येथे घेतले. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी साहित्य या विषयातून पीएच.डी. पदवी संपादन केली.
डामरॉश यांनी उद्यान विषयात अनेक पुस्तके लिहिली आहेत. उदा., – गार्डन प्रिमियर, थीम गार्डन्स इत्यादी. एलिऑट कोलमन या त्यांच्या पतीसह त्यांनी लिहिलेल्या फोर सीझन फार्म गार्डनर्स कुकबुक या पुस्तकला अमेरिकन हॉर्टिकल्चरल सोसायटीचा पुरस्कार मिळाला आहे. मेन प्रांतांतील हार्बर्साइड येथे त्यांचा फोर सीझन फार्म नावाचा बगीचा असून त्यात वर्षभर अन्ननिर्मिती केली जाते. हा बगीचा शाश्वत लघु-शेतीसाठी देशभर प्रसिद्ध आहे. टि.व्ही.वरील शैक्षणिक वाहिनीवर त्यांनी पतीसह गार्डनिंग नॅचरली नावाची शैक्षणिक माला चालवली होती. वॉशिंग्टन पोस्ट या नामांकित नियतकालिकाच्या साप्ताहिकात त्यांनी पंधरा वर्षे नियमितपणे लेख लिहिले. लंडन येथील अलिटॅक्स लिमिटेड चेल्सा यांच्या पुष्पप्रदर्शनातील स्वयंपाकासाठी बगीचा या नावाने निर्माण केलेला बगीचा पुरस्कारासाठी ते पात्र ठरले. त्यां लँडस्केप डिझाइन (भूदृश्य आरेखन) या कंपनीच्या मालक होत्या (१९७२–९२).
डामरॉश यांनी लिहिलेल्या थीम गार्डन्स या सुप्रसिद्ध पुस्तकात निरनिराळ्या प्रकारांच्या अग्रणी वनस्पती उद्यानांची संकल्पना सांगतानाच त्यात वाढविण्याचे वनस्पती प्रकार आणि त्यांची मांडणी (लँडस्केपिंग) इत्यादींचा समावेश आहे. या पुस्तकात १६ प्रकारांच्या अग्रणी उद्यानांची माहिती सविस्तरपणे दिली आहे. त्यांपैकी काही उद्यानप्रकार पुढीलप्रमाणे : सुगंधी, फुलपाखरे, लहान मुलांसाठी, गुलाब, झेन, वसाहतीनुरूप, शेक्सपिअर, ग्रे, प्रेम, हम्मिंग पक्षी, खाजगी, गवत, प्राचीन, व्हिक्टोरियन आणि शीत-उद्यान. काही उद्यान-प्रकारांचा इतिहासही त्या पुस्तकात अंतर्भूत केला आहे.
कळीचे शब्द : #बगीचातज्ज्ञ, #गार्डनिंगनॅचरली, #वनस्पतीउद्यान
संदर्भ :
- https://www.goodreads.com/book/show/2066218
- http://fourseasonfarm.com.about/barbara-damrosch
- https://en.wikipedia.org/wiki/Barbara_Damrosch
समीक्षक : शरद चाफेकर