नव्याने उदयास आलेले अर्थशास्राचे एक अभ्यासक्षेत्र. युनेस्कोच्या वर्ल्ड कल्चरल रिपोर्ट (२०००) अनुसार आता संस्कृतीची चर्चा आर्थिक संदर्भातही होऊ लागली आहे. या बदलास अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शासकीय सांस्कृतिक धोरणे आणि जागतिकीकरणामुळे जे आर्थिक बदल घडून आलेत त्यांचा समावेश आहे. अर्थशास्रामध्ये वेगवेगळ्या पदनामासहित उपयोजित अर्थशास्त्राची अभ्यासक्षेत्रे आहेत. उदा., शिक्षणाचे अर्थशास्त्र, आरोग्य व पर्यावरणाचे अर्थशास्त्र इत्यादी. सांस्कृतिक अर्थशास्त्र हे सांस्कृतिक क्षेत्राच्या विशिष्ट गुणवैशिष्ट्यांचा अंगीकार करते.

व्यक्तीच्या सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कला आणि संस्कृती यांस एक भावनिक स्पर्श आहे. त्यामुळेच कला आणि संस्कृतीसंबंधी ज्या आर्थिक क्रिया पार पाडल्या जातात, त्यांचा अभ्यास आधुनिक अर्थशास्त्रात वेगळ्या दृष्टिकोणातून करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातूनच सांस्कृतिक अर्थशास्त्राचा हळूहळू विस्तार होऊ लागला आहे. सांस्कृतिक अर्थशास्त्र हे अर्थशास्त्र आणि संस्कृतीच्या संबंधांवर लक्ष केंद्रित करते आणि संस्कृतीच्या विविध आर्थिक पैलूंचे परीक्षण करते. हे अर्थशास्त्र संस्कृतीच्या आर्थिक पैलूंचे मूल्यांकन करण्यासाठी एक चांगली चौकटही उपलब्ध करून देते. तसेच ते अर्थशास्त्र आणि संस्कृती यांच्यामध्ये एक प्रकारचा बंध निर्माण करते.

सांस्कृतिक अर्थशास्त्रामध्ये सांस्कृतिक निदेशकांची मोजदाद करण्याचा प्रयत्न केला जातो. उदा., सांस्कृतिक उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांची संख्या, सांस्कृतिक क्षेत्राचे ढोबळ घरेलू उत्पादनामधील (जीडीपी) योगदान, विदेशी चलन निर्मिती इत्यादी. सांस्कृतिक अर्थशास्त्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्र, कला (सादर केली जाणारी कला, दृश्यमान कला आणि साहित्य), वारसा (संग्रहालये आणि सांस्कृतिक वास्तू), निर्मितीक्षम उद्योग (संगीत, प्रकाशन व चित्रपट उद्योग इत्यादी) या सर्वांचा विशेषत्वाने अभ्यास केला जातो. तसेच कला आणि संस्कृतीशी संबंधित असणाऱ्या वैधानिक बाबी अर्थात प्रादेशिक मानांकन (जिऑग्राफिकल इंडिक्शन), बौद्धिक संपदा, स्वामित्व हक्क इत्यादींचा अभ्यास केला जातो.

सांस्कृतिक अर्थशास्त्रामध्ये मूल्य या संकल्पनेचा विचार एका निराळ्या दृष्टिकोणातून केला जातो; कारण वस्तू व सेवांचे सांस्कृतिक मूल्य आणि आर्थिक मूल्य यांमध्ये फरक आहे. एक म्हणजे, सांस्कृतिक मूल्य जे अंगभूत गुण, श्रद्धा व ग्राहक किंवा श्रोते यांची अनुभूती दर्शविते. दुसरा, हा आर्थिक मूल्याशी संबंधित असून त्याद्वारे वस्तू व सेवांचे मूल्य किंवा किंमत दर्शवितो.

सांस्कृतिक अर्थशास्त्र हे आपल्या आंतरिक, सौंदर्यात्मक, एकसंघ किंवा अमूर्त मूल्यांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक परिप्रेक्ष्यदेखील निर्माण करते. त्यामुळे हा सांस्कृतिक उपक्रम हा अर्थशास्राच्या अभ्यास विषयांपैकी एक असू शकतो. १९६०च्या दशकात सांस्कृतिक अर्थशास्त्र हे अभ्यासाचे एक वेगळे क्षेत्र म्हणून उदयास आले. या विषयांवरील सुरुवातीच्या लेखनामध्ये जॉन केनेय गॅलन्नेय आणि लिओनेल रॉबिन्स यांच्या पुस्तकांचा समावेश केला जातो. यामध्ये संग्राहालयाच्या खर्चावर अनुदान देणाच्या सरकारी भूमिकेची चर्चा केली आहे; परंतु आताच्या सांस्कृतिक अर्थशास्त्राचे मूळ हे १९६६ मध्ये प्रकाशित झालेल्या बाैमेल आणि बोवेन यांच्या द परफॉर्मिंग : द इकॉनॉमिक डायलेमा या पुस्तकात आहे. बमिल आणि बोवेन वांनी सर्वप्रथम अर्थशास्त्राची साधने कलांना कशी लागू होतात, याचा पद्धतशीर अनुभवजन्य अभ्यास मांडला आहे. असे असले तरी, सांस्कृतिक अर्थशास्र या संकल्पनेस वेगवेगळे अर्थ दिले जातात. काही बाबतीत ते सांस्कृतिक आणि सर्जनशील (निर्मितीक्षम) उद्योगांचे संदर्भ देते, तर इतर बाबतीत ते समाजाच्या संस्कृतीच्या आर्थिक शोषणाचे संदर्भ देते. सांस्कृतिक अर्थशास्त्रामध्ये वापरली जाणारी सर्जनशील / निर्मितीक्षम उद्योग ही संज्ञा विसाव्या शतकाच्या शेवटच्या वर्षात वापरामध्ये आली. ही संज्ञा अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड केव्स यांनी त्यांच्या २००० मध्ये प्रकाशित झालेल्या क्रिएटीव्ह इंडस्ट्रिज कॉन्ट्रॅक्ट्स बिट्विन आर्ट अँड कॉमर्स या पुस्तकात वापरली.

सांस्कृतिक अर्थशास्त्र हे वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधून उदयास आलेले एक संकरित अभ्यासक्षेत्र आहे. यामध्ये आर्थिक-समाजशास्त्र, सांस्कृतिक अभ्यास, समाजाचा वित्तीय अभ्यास, व्यवसाय व्यवस्थापन अभ्यास, सांस्कृतिक भूगोल, आर्थिक मानवशास्त्र इत्यादींचा समावेश केला जातो. यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक अथवा निर्मितीक्षम उद्योग, सांस्कृतिक वारसा, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत संस्कृती, आर्थिक विकासामध्ये संस्कृती, बौद्धिक संपदा, सांस्कृतिक संख्याशास्त्र आणि इतर उपयोजित विषयांचा अभ्यासही केला जातो.

नव्या शतकाच्या सुरुवातीस अर्थशास्त्राचा वापर आणि वावर सर्वत्र आढळून येतो. सामाजिक बदलांचे अनेक घटक आढळून येतात; परंतु त्याचे सांस्कृतिक आणि आर्थिक अशा दोन ठळक मुद्यांत एकत्रीकरण करता येते. आता दृकश्राव्य आणि सादरीकरण कलेचा समावेश सांस्कृतिक अर्थशास्त्रात केला जाऊ लागला आहे. म्हणूनच आज संपूर्ण अर्थव्यवस्थांमध्ये निर्मितीक्षम उद्योगांचे योगदान आणि भूमिका यांचे सखोल विश्लेषणदेखील समाविष्ट आहे.

संदर्भ ꞉

  • Amin, Ash; Thrift, Nigel, Cultural Economy Reader, USA, 2004.
  • Einarsson, Augst, Cultural Economics, Iceland, 2016.
  • Throsby, David, The Economics of Cultural Policy, UK, 2010.
  • Towse, Ruth, A Text Book of Cultural Economics, UK, 2010.

समीक्षक ꞉ अनील पडोशी