पूर्व आफ्रिकेच्या केन्या (केनिया) येथील रूडॉल्फ (तुर्काना) सरोवर भागातील एक विख्यात पुराजीवशास्त्रीय स्थळ. कूबी फोरा हे मानवजातीच्या उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी जगातील एक अग्रगण्य पूर्व-ऐतिहासिक स्थळ असून अश्मयुगीन आणि त्या पूर्वीच्या काळातील पुरामानवाच्या अश्मीभूत सांगाड्यांसाठी एक महत्त्वपूर्ण स्थान मानले जाते. येथे आढळणाऱ्या गुग्गूळ (कॉमिफोरा) या पानझडी वनस्पतींवरून या स्थळाला कूबी फोरा असे नाव पडले.
केनियन पुरामानवशास्त्रज्ञ रिचर्ड लीकी (१९४४-२०२२) यांनी १९६७ मध्ये तुर्काना सरोवराजवळ असलेल्या वाळूच्या दांड्यावर (कूबी फोरा स्पिट) संशोधनासाठी मुख्य तळ उभारला. पुढे केनियन सरकारने या प्रदेशाला ‘सिबिलोई राष्ट्रीय उद्यान’ या नावाने आरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले (१९७१). त्यानंतर येथे बहुविद्याशाखीय संशोधन करण्यासाठी कूबी फोरा संशोधन प्रकल्पाच्या (केएफआरपी) माध्यमातून येथील अनेक भागांत सर्वेक्षण आणि उत्खनन सातत्यपूर्ण सुरू झाले.
कूबी फोरा हा जलोढीय (ॲलूव्हिअन ; पुराने वाहून आलेल्या गाळाचा) आणि सरोवरीय (लकस्ट्राइन) गाळापासून तयार झालेल्या पर्वतरांगांनी बनलेला उंच-सखल प्रदेश आहे. हा गाळ ५०० मी. पेक्षा जास्त जाडीचा असून जवळजवळ १,८०० चौ. किमी. क्षेत्रावर पसरलेला आहे. या विस्तीर्ण प्रदेशाचे वर्गीकरण हे प्रामुख्याने जीवाश्म मिळणारी स्थळे आणि या अंतर्गत मिळणारी पुरातत्त्वीय स्थळे असे करण्यात आले असून यांतील १०० हून अधिक स्थळांना अनुक्रमांक दिले आहेत. त्यांतील स्तरीय रचनेनुसार खालील भूस्तरीय भाग (मेंबर) केले आहेत, ते खालीलप्रमाणे :
कूबी फोरा : भूस्तरीय भाग | |
लॉन्यूमन भाग (Lonyumun Member) | ४३ लाख ते ४१ लाख वर्षपूर्व |
मॉइती भाग (Moiti Member) | ४१ लाख ते ३५ लाख वर्षपूर्व |
टुलू बोअर भाग (Tulu Bor Member) | ३३ लाख ते २६ लाख वर्षपूर्व – या स्तरातून ऑस्ट्रॅलोपिथेकस अफारेन्सिसच्या कवटीचे अवशेष मिळाले. |
बर्गी भाग (Burgi Member; Includes Upper Burgi) | २६ लाख ते १८ लाख वर्षपूर्व- या स्तरातून हॅबिलिस मानवाचे जीवाश्म मिळाले. |
केबीएस भाग (Kay Behrensmeyer; KBS Member) | १८ लाख ते १६ लाख वर्षपूर्व – या स्तरातून मासे पकडण्याच्या जाळीचा प्रतीकात्मक पुरावा मिळाला. |
ओकोट भाग (Okote Member) | १६ लाख ते १३ लाख वर्षपूर्व – यातील एफडब्ल्यूजेजे २० (FwJj20) या स्थळावर १५ लाख वर्षांपूर्वी आदिमानवाने अग्नी वापरल्याचा पुरावा मिळाला. |
चॅरी भाग (Chari Member) | १३ लाख ते ६ लाख वर्षपूर्व |
या स्तरांमधून प्लायो-प्लाइस्टोसीन (५० लक्ष ते १० लक्ष वर्षपूर्व) काळातील पुरामानवाचे आणि अनेक नामशेष झालेल्या प्राण्यांचे अश्मीभूत सांगाडे सापडले आहेत. या जीवाश्मांना केएनएम – ईआर (नॅशनल म्यूझीअम ऑफ केन्या – ईस्ट रूडॉल्फ), केएनएम – डब्ल्यूटी (नॅशनल म्यूझीअम ऑफ केन्या – वेस्ट तुर्काना) अशी नावे दिली आहेत. त्यांतील काही उल्लेखनीय जीवाश्म खालीलप्रमाणे :
कूबी फोरा : जीवाश्म |
|
केनिॲन्थ्रोपस प्लॅटिओप्स : चपट्या चेहऱ्याचा पुरामानव | कालमापन ३५ लाख वर्षपूर्व |
केएनएम – डब्ल्यूटी १७००० (ब्लॅक स्कल) : पॅरान्थ्रोपस इथिओपिकस | कालमापन २५ लाख वर्षपूर्व |
केएनएम – ईआर १४७०: रूडॉल्फ मानव | कालमापन १९ लाख वर्षपूर्व |
केएनएम – ईआर १८१३ : हॅबिलिस मानव | कालमापन १९ लाख वर्षपूर्व |
केएनएम – डब्ल्यूटी १५००० (तुर्काना बॉय) : एर्गास्टर मानव | इरेक्टस मानव जातीचा जवळजवळ संपूर्ण सांगाडा तुर्काना सरोवरालगत नरियोकोटोम नदीच्या काठावर मिळाला. हा एक ११ ते १२ वर्षांचा मुलगा होता. कालमापन- १५ ते १६ लाख वर्षपूर्व |
तुर्काना सरोवर परिसरात १४ ते १५ लाख वर्षपूर्व काळात हॅबिलिस मानव आणि इरेक्टस मानव या दोन्ही जाती सहअस्तित्वात होत्या, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. | |
इलेरेट (लेक तुर्कानाजवळील स्थान) : एफडब्ल्यूजेजे१४ ई (FwJj14E) | या स्थळावरील आदिमानवाच्या (होमिनिन्स) पावलांचे ठसे (कदाचित इरेक्टस मानव जातीचे) आपल्यासारख्या शैलीत चालण्याचा सर्वांत जुना निर्विवाद पुरावा दर्शवतात, असे एका नवीन शोधनिबंधात नमूद केले आहे. याचे कालमापन साधारण १५ लाख वर्षपूर्व असे आहे. |
केएनएम – ईआर ७४१ : ओकोट स्तरांतून मिळालेल्या या जीवाश्मावर कापल्याच्या खुणा आहेत. | कालमापन १४.५ लाख वर्षपूर्व |
ओल्डोवान परंपरेची दगडी हत्यारे तुर्काना सरोवराजवळ गाळामध्ये सापडली. या गाळाचे कालमापन २३ लाख वर्षपूर्व असे आहे. तर ॲश्युलियन परंपरेची दगडी हत्यारे १६ लाख वर्षपूर्व कालमापन असलेल्या गाळातून मिळाली. | |
एफएक्सजेजे २० एबी (FxJj20 AB) | या ठिकाणी केलेल्या सूक्ष्म उत्खननांतून शास्त्रज्ञांनी १५ लाख वर्षांपूर्वी इरेक्टस मानवाने आगीचा वापर केल्याचे काही पुरावे सादर केले आहेत. यासाठी त्यांनी दगडी हत्यारे, मातीचे नमुने आणि हाडांचे तुकडे यांवर फोरिअर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रॉस्कोपी (FTIR) या तंत्राचा वापर करून असे सिद्ध केले आहे की, हे पुरातत्त्वीय अवशेष आगीमुळे जळालेले आहेत. |
कूबी फोरा परिसरात मिळालेले अनेक पुरावे हे इरेक्टस मानव या जातीचा विकास कसा झाला असावा, यावर प्रकाश टाकणारे आहेत. येथील अव्याहत चालणाऱ्या संशोधनातून अनेक नवनवीन पुरावे हाती लागतील, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
चित्रपत्र :
संदर्भ :
- Harris, John M.; Leakey, Meave G. & Brown, Francis H. ‘A Brief History of Research at Koobi Fora, Northern Kenya,’ Ethnohistory, Vol. 53 (1) : pp. 35–69, 2006.
- Hlubik, Sarah; Berna, Francesco; Feibel, Craig; Braun, David & Harris, John W. K. ‘Researching the Nature of Fire at 1.5 Mya on the Site of FxJj20 AB, Koobi Fora, Kenya, Using High-Resolution Spatial Analysis and FTIR Spectrometry,’ Current Anthropology, Vol. 58, Supplement 16, 2017.
- Pobiner, B.; Pante, M. & Keevil, T. ‘Early Pleistocene cut marked hominin fossil from Koobi Fora, Kenya’ Science Report,13, 2023.
- https://www.kfrp.com/
- छायाचित्र क्र. २ संदर्भ : https://jewelsafaris.com/sibiloi-national-park
समीक्षक : जयेंद्र जोगळेकर