पावटे, डी. सी. : (२ ऑगस्ट १८९९ – १७ जानेवारी १९७९). विख्यात भारतीय गणितज्ज्ञ, लेखक, मुंबई प्रांताचे पहिले भारतीय शिक्षण संचालक आणि पंजाब राज्याचे माजी राज्यपाल. ‘रँग्लर पावटे’ म्हणूनही ते परिचित. पूर्ण नाव दादण्णा चिंताप्पा पावटे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शेजारचे ममदापूर हे त्यांचे गाव. त्यांच्या वडिलांचे नाव चिंताप्पा, तर आईचे नाव शांतम्मा. त्यांना तीन भाऊ होते.
पावटे यांचे प्राथमिक शिक्षण ममदापूर व गोकाक येथे झाले. त्यांनी कोल्हापूर येथील राजाराम हायस्कूलमधून आपले माध्यमिक शिक्षण विविध गुणवत्ता शिष्यवृत्त्या मिळवून पूर्ण केले. पुढे मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले (१९१९). त्यांचे पदवीपर्यंतचे उच्च शिक्षण धारवाड येथील कर्नाटक कॉलेज या शासकीय महाविद्यालयात झाले. त्यांनी १९२३ साली गणित विषयात मुंबई विद्यापीठाची बी. ए. ऑनर्स पदवी पहिल्या वर्गात सर्वप्रथम येऊन संपादन केली. त्यानंतर १९२४ साली ते गणिताचे उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात दाखल झाले. त्यांना केंब्रिजच्या सिडने ससेक्स कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. केंब्रिजमध्ये शिकण्यासाठी कर्नाटकमधील सिरसिंगी ट्रस्टने त्यांना दरमहा चारशे रुपयांची शिष्यवृत्ती दिली होती. त्याशिवाय त्यांना त्यांच्या कॉलेजची गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळत होती. १९२७ साली त्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करून केंब्रिज विद्यापीठाचा मॅथिमॅटिकल ट्रायपॉस रँग्लर होण्याचा बहुमान मिळवला. पावटे यांच्या पत्नीचे नाव गिरिजाबाई. पावटे दांपत्याला दोन मुलगे आणि एक मुलगी अशी तीन अपत्ये झाली.
पावटे यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात काही काळ गणित विषयाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून काम केले (१९२८-३०). नोकरीच्या पहिल्या सहा महिन्यांत विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांनी परिश्रमपूर्वक ‘एलेमेंटरी टेक्स्टबुक ऑफ कॅलक्युलस’ हे पुस्तक लिहून कलकत्त्याच्या (कोलकाता) प्रकाशकांकडून प्रकाशित केले. गणिताचे विद्यार्थी व प्राध्यापकांना ते पुस्तक अत्यंत उपयुक्त असल्याने पुढील पस्तीस वर्षांत त्याच्या सोळा आवृत्त्या निघाल्या. बनारस हिंदू विश्वविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. सी. व्ही. रामन, डॉ. मेघनाद सहाय, डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांच्याशी पावटेंचा चांगला परिचय झाला.
पावटे यांनी मुंबई प्रांताच्या शिक्षण विभागात विविध प्रशासकीय पदांवर मुंबई व पुणे येथे प्रशंसनीय कामगिरी बजावली (१९३०-५४). स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मुंबई प्रांताचे पहिले शिक्षण संचालक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांनी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली (१९५४) आणि धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची निवडणूक लढवून जिंकली. कर्नाटक विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू म्हणून नवोदित विद्यापीठासाठी जमीन संपादन करून दूरदृष्टीने विद्यापीठाच्या विकासाच्या योजना आखल्या, त्या कार्यान्वित करण्याचे आराखडे तयार केले, सर्व कामाचे कालबद्ध नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात कर्नाटक विद्यापीठाचा सर्वांगीण विकास झाला. या काळात त्यांनी आंतरविद्यापीठ मंडळाचे अध्यक्ष; विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य, तसेच राष्ट्रकुल विद्यापीठ संघटना कार्यकारी समितीचे सदस्य अशी पदे भूषवली. १९५९ साली पावटे यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती समारंभात तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद प्रमुख उपस्थित होते. या समारंभाच्या निमित्ताने लोकवर्गणीतून संकलित झालेल्या निधीतून कर्नाटक विद्यापीठाने हुशार, गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके, शिष्यवृत्ती देण्याची योजना कार्यान्वित केली. त्याचबरोबर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यापीठाचे शिल्पकार म्हणून पावटे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला.
पावटे यांची १९६७ पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी सहा वर्षे कार्यकुशलतेने व सन्मानपूर्वक हे पद भूषवले (१९६७-७३). बंगळुरू येथील बसव स्मारक समितीचे पावटे एक संस्थापक सदस्य व खजिनदार होते. त्यांच्या पुढाकारामुळे विधानसौधाशेजारी भव्य बसव भवनची उभारणी झाली. ‘मेम्वॉयर्स ऑफ ॲन एज्युकेशनल ॲडमिनिस्ट्रेटर’ आणि ‘माय डेज ॲज गव्हर्नर’ ही त्यांची अन्य दोन महत्त्वाची पुस्तके. पावटे यांना भारत सरकारने ‘पद्मभूषण’ या नागरी पुरस्काराने (१९६७), तसेच म्हैसूर व अमृतसर विद्यापीठांनी मानद डी. लिट. पदवीने सन्मानित केले.
बंगळुरू येथे त्यांचे निधन झाले.
त्यांच्या स्मरणार्थ डॉ. डी. सी. पावटे स्मृती प्रतिष्ठानने कर्नाटकातील असामान्य गुणवत्तेच्या पदवीधर विद्यार्थ्यांस केंब्रिज विद्यापीठात संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती सुरू केली. त्यांचा मुलगा अशोक यांनी कर्नाटक विद्यापीठात डॉ. डी. सी. पावटे अध्यासन प्रायोजित केले होते (२०१२); तथापि ते अल्पावधीच बंद झाले.
संदर्भ :
- डोळे, ना. य., अनु., ‘मी, एक शिक्षण संचालक’, पुणे, १९७०.
- पावटे, के. डी., ‘लाइफ अँड टाइम्स ऑफ लेट डॉ. डी. सी. पावटे’, २०११.
समीक्षक : अवनीश पाटील