लिंगस्वरूप शिव. शिव-आराधनेत मूर्ती व लिंग या दोन्हींनाही महत्त्व आहे. त्यांसंबंधी अनेक कथा लोकमानसात प्रचलित आहेत. शिवमूर्तींचा अभ्यास हा लिंगस्वरूप शिवाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. लिंगपूजा ही फार प्राचीन काळापासून जगाच्या अनेक भागांत अस्तित्वात आहे. मात्र वैदिक संस्कृतीने काही शतके उलटल्यानंतर ती स्वीकारली. शिवलिंगे दोन प्रकारची असतात : स्वयंभू (निसर्गनिर्मित) आणि कृत्रिम (मानवनिर्मित). जे लिंग स्वतः प्रकट झाले आहे, ते स्वयंभू लिंग म्हणून ओळखले जाते. ते काही कारणाने थोडे झिजले तरी त्याचे देवत्व नष्ट होत नाही, अर्थात त्याचा जीर्णोद्धारही होऊ शकत नाही. भारतात अशी सुमारे ७० स्वयंभू शिवलिंगे आहेत. स्वयंभू लिंगे ही अनियमित स्वरूप व आकाराची असतात. मानवनिर्मित लिंगे ही दगड, वाळू, लाकूड, धातू, स्फटिक, रत्ने इत्यादींची घडविली जातात. त्यांचे स्वरूप, आकार यात स्थान, साधनपरत्वे पुष्कळ फरक असू शकतो. भारतीय पुरातत्त्वज्ञ टी. ए. गोपीनाथ राव (१८७२-१९१९) यांनी शिवलिंगांचे चल व अचल असे वर्गीकरण केले आहे. ज्याची गाभाऱ्यात स्थापना केली जाते, ते अचल लिंग होय. मानुषलिंगाचे तीन भाग असतात : खालचा चौकोनी म्हणजे ब्रह्मभाग, त्यावर अष्टकोनी विष्णू भाग व सर्वांत वरचा गोलाकार शिव-भाग. या भागांच्या उंचीतील फरकाने लिंगांचे निरनिराळे प्रकार पडतात. मात्र सर्वच शिवलिंगांचे असे भाग पडत नाहीत. सध्या ज्यास शिवलिंग समजले जाते त्याचे साधारणतः शाळुंका आणि ऊर्ध्व पाषाण असे दोन भाग पडतात. शाळुंका हे योनिप्रतीक आणि ऊर्ध्व पाषाण हे लिंगप्रतीक होत. सृष्टीच्या सुफलनाचे प्रतीक असे हे शिवलिंग शिवमंदिराच्या गर्भगृहात ऊर्ध्वलिंग स्वरूपात स्थापन केलेले असते. शाळुंका किंवा पीठावर अभिषेकाचे व इतर पाणी वाहून नेण्यासाठी एक खोलगट पन्हळ किंवा ‘जलनिर्गम’ असते. ती लिंगाच्या डावीकडे असावी असे विधान आहे.

एकमुख शिवलिंग, खोह (मध्य प्रदेश).

प्रारंभी घडीव शिवलिंग हे हुबेहूब पुरुषाचे शिस्न वाटावे अशा प्रकारे त्याच्या अग्रभागी ब्रह्मसूत्राच्या रेषा काढल्या जात. मात्र स्वयंभू लिंगावर अशा रेघा असतीलच असे नाही. कालांतराने हे ब्रह्मसूत्र आणि वरील मणिभाग नाहीसे होऊन सरळसोट शिवलिंगे अस्तित्वात आली. लिंगावर शिवमुख, प्रतिमा दिसू लागल्या. प्रारंभिक लिंगे ही स्तंभस्वरूप होती, हळूहळू त्यांत बदल होत एकमुख, द्विमुख, चतुर्मुख लिंगे प्रचलित झाली; अर्थात हे स्थित्यंतर शेकडो वर्षांच्या काळात झाले. मुखलिंगे इ. स. पू. पहिल्या शतकापासून प्रचलित आहेत. सध्या ज्ञात असलेल्या मुखलिंगांमध्ये भरतपूरच्या संग्रहालयात असलेले अघापूरचे एकमुखी शिवलिंग सर्वाधिक प्राचीन समजले जाते. त्यावर शंकराचे पागोटे घातलेले मुख आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात कुषाणकालीन शिवलिंगाखाली विटांचा ओटा किंवा लेण्यात कोरून काढलेले असल्यास त्याखाली चौथरा अशी रचना दिसते. अभिषेकाचे पाणी वाहून नेण्यासाठी त्यात प्रणालकाचीही व्यवस्था असते. कुषाण काळातील एकमुखलिंगे अनेकदा सापडतात, त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे आडवा त्रिनेत्र, कुरळे केस, जटाभार, क्वचित पागोटे, कपाळावर ललाटपट्ट ही होत.

गुप्तकाळातही मुखलिंगे निर्माण होत होती, मात्र त्यांत काही बदल झाले; त्रिनेत्र उभा झाला, मुखासोबत गळा व त्यात घातलेली ‘एकावली’ देखील दिसू लागली. डोक्यावर बांधलेल्या जटांसह खांद्यावर विखुरलेल्या जटाही दिसतात. मुखलिंगाची उंची कमी होऊन त्यांचा घेर वाढला, लिंगाचा बराच भाग मुखाने झाकला जाऊ लागला. मध्य प्रदेशातील खोह या गावी एक गुप्तकालीन सुरेख एकमुख लिंग आहे. ते लिंगाच्या खालच्या एकतृतीयांश भागात कोरलेले असून डोक्यावर जटामुकुट, चंद्रकोर तसेच कपाळावर त्रिनेत्र आहेत. गळ्यावरील वळ्या व त्याखाली एकावलीही दिसते. गुप्तोत्तर काळात एकमुख लिंगांची लोकप्रियता कमी झाली. द्विमुखलिंग दुर्मीळ असून मथुरा संग्रहालयात एक द्विमुखलिंग आहे. पहाडपूर (बांगला देश) येथील उत्खननात इ. स. आठव्या शतकातील मृत्तिकाफलकावर त्रिमुख शिवलिंग सापडले. योनीसह असलेल्या या लिंगावरील तिन्ही मुखांच्या कानात चक्रकुंडले व मस्तकावर जटाजूट आढळतात.

चतुर्मुख शिवलिंग, पाटेश्वर (महाराष्ट्र).

शिवलिंगाच्या चारही बाजूस एक-एक मुख कोरलेले असते तेव्हा त्यास चतुर्मुख लिंग म्हणतात. ही शिवाची चार रूपे आहेत असे मानले जाते. ‘महाभारता’तील कथेप्रमाणे एकदा तिलोत्तमा नावाची स्वरूपसुंदर अप्सरा देवमंडळाला प्रदक्षिणा घालू लागली, तेव्हा तिला न्याहाळण्यासाठी शंकराची चार तोंडे उत्पन्न झाली. ही चार तोंडे म्हणजे अघोर, उष्णीषिन्, योगी आणि स्त्री ही होत. ही मुखे कोणकोणत्या दिशांना असावीत, हे कुषाणकालपर्यंत निश्चित नव्हते, ते गुप्तकाळात झाले. विष्णुधर्मोत्तर पुराणात त्यांची माहिती अशी येते की, पूर्वेकडील मुख हे इंद्रपदांचे शासन करणारे व पागोटे घातलेले ‘उष्णीषिन्’, पश्चिमेस योगीस्वरूप आणि मुंडन केलेले ‘योगी’, दक्षिणेकडील मुख हे संहार करणारे ‘अघोर’, तर उत्तरेकडे स्त्रीमुख असते. स्त्रीमुखाव्यतिरिक्त इतर मुखांवर त्रिनेत्र असतो. ‘रूपमंडन’ या ग्रंथात लिंगाच्या सभोवार घडवावयाची ही मुखे दिशानुक्रमे तत्पुरुष, अघोर, सद्योजात, वामदेव आणि ईशान या पंचब्रह्मांची असावीत असे वर्णन केले आहे. एकच मुख घडवल्यास, ते पूर्वेकडे असावे. दोन असल्यास ती पूर्व व पश्चिम या दिशांना, तीन मुखे असल्यास, ती पूर्व, दक्षिण आणि उत्तरेस असावीत. चार किंवा पाच मुखे असल्यास चार दिशांना चार तसेच एक ऊर्ध्व दिशेस घडवावे असे सांगितले आहे. अशा प्रकारची चतुर्मुख व पंचमुख लिंगे कौशांबी (अलाहाबाद), मथुरा, दिल्ली संग्रहालय, बिर्ला अकादमी संग्रहालय (कोलकाता) येथे आहेत. गुप्तकाळानंतरची चतुर्मुख लिंगे जास्त अलंकारिक आहेत; अशी लिंगे राजस्थान, उत्तर प्रदेश या भागात आढळतात.

उत्तर भारतात पंचमुख लिंगेही पूर्वापार आढळतात. भीटा (अलाहाबाद) येथील पंचमुख लिंग हे इ. स. पू. तिसऱ्या ते दुसऱ्या शतकातील आहे. त्यावर चारही बाजूंना मुखे असून वर शिवाची प्रतिमा आहे. तिचा उजवा हात अभय मुद्रेत असून डाव्या हातात घट आहे. चेहरा भग्न झाला आहे, पण खांद्यापर्यंत येणारे केस, कर्णकुंडले व गळ्यातील हार स्पष्ट दिसतात. चारही दिशांना असलेल्या मुखांपैकी एक मुंडीत, दुसरे स्त्रीमुख, तिसरे पागोटे घातलेले व चौथे संहारक आहे. विदिशा आणि खजुराहो येथे एकाच योनिपीठावर पाच लिंगांचा समूह असलेली पंचमुख लिंगे पाहावयास मिळतात. विदिशा येथे तर मधोमध असलेल्या पाचव्या लिंगावर आकाशाकडे तोंड करून शिवाचे ‘ईशान्’ हे मुख आहे.

मध्य प्रदेशातील मंदसोर येथे एक गुप्तकालीन भव्य अष्टमुखलिंग मिळाले आहे. तेथे ‘पशुपतिनाथ’ या नावाने त्याची पूजाअर्चा केली जाते. त्याला एकूण आठ तोंडे आहेत; मध्यभागी एक रौद्र व तीन सौम्य मुखे, तर त्यांच्या सुमारे दीड फूट खाली इतर चार मुखे आहेत. ‘कूर्मपुराण’ व ‘शिवतंत्र’ यांत त्यांची नावे सापडतात; पण त्यांत एकवाक्यता नाही. पेजेंग (इंडोनेशिया) येथेही एक अष्टमुखलिंग आहे.

कायलिंग, परशु रामेश्वर मंदिर, गुडीमल्लम (आंध्र प्रदेश).

कायलिंग : यालाच विग्रहलिंग किंवा मूर्तिलिंग असेही म्हणतात. लिंगावर किंवा लिंगाला चिकटलेली संपूर्ण शिवप्रतिमा असल्यास तिला कायलिंग असे म्हणतात. मथुरा (उत्तर प्रदेश), भरतपूर (राजस्थान), गुडीमल्लम (जि. तिरुपती, आंध्र प्रदेश), जावा (इंडोनेशिया) इ. ठिकाणी अशी कायलिंगे मिळाली आहेत. लखनौ वस्तुसंग्रहालयात इ. स. पू. सु. पहिल्या शतकातील एक मूर्तिलिंग आहे, मात्र ते बरेच भग्न झाले आहे. त्याच्या माथ्यावर मानवी ऊर्ध्वांग दिसते. त्याच्या डाव्या हातात घट असून उजवा हात अभयमुद्रेत आहे. खांद्यावर वस्त्र आणि कानात कुंडले आहेत. या प्रतिमेच्या खालच्या भागात, चार उपदिशांना चार मुखे आहेत. इतिहास संशोधक ग. ह. खरे (१९०१-१९८५) यांच्या मते ती स्त्रीमुखे असावीत. त्याखाली एक शिलालेख आहे.

गुडीमल्लमच्या परशुरामेश्वर मंदिरात एक सुंदर कायलिंग आहे. जवळपास पाच फूट उंचीच्या शिवलिंगाच्या तीन चतुर्थांश भागात अपस्मार पुरुषावर उभी द्विभुज शिवप्रतिमा आहे. तिच्या उजव्या हातात बकऱ्याचे (किंवा मेंढ्याचे) मागचे दोन पाय व डाव्या हातात कलश व परशू आहेत. डोक्यावर मोठे पागोटे आहे व हार, मेखला इ. अलंकार दिसतात. या शिवलिंगाच्या वरील भागास मानवी शिस्नमण्याचा आकार दिलेला स्पष्टपणे दिसतो. टी. गोपीनाथ राव यांच्या मते, हे कायलिंग इ. स. पहिल्या शतकातील असावे, मात्र इतर विद्वानांच्या मते त्याचा काळ आठवे-नववे शतक इतका पुढचा आहे. जावा (इंडोनेशिया) येथे सहाव्या-सातव्या शतकातील एक चतु:कायलिंग सापडले. मध्यभागी लिंग असून त्याच्या चारही बाजूंस ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्य या चार देवता आहेत. या सर्व प्रतिमा चतुर्भुज आहेत. ब्रह्मदेव त्रिमुखी असून एका हातात कमंडलू आहे. विष्णूच्या हातात पृथ्वी आणि शंख आहेत. शंकर त्रिनेत्र, जटामुकुटधारी असून त्याचा हात वरदमुद्रेत आहे, तर सूर्याच्या मागच्या दोन हातात कमळे असून पायात बूट आहेत.

राजस्थानातील पुष्करजवळ नांद या गावी इ. स. सु. तिसऱ्या शतकातील एक कुषाणकालीन कायलिंग आहे. त्यावर वरपासून खालपर्यंत कोरलेल्या प्रतिमांमुळे ते वेगळे व अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यावर ब्रह्म, विष्णू व शिव भागासह एक सौर भागदेखील आहे. विष्णू भागावर विष्णू, एकानंशा बलदेव आणि वासुदेवाचे अंकन आहे. ब्रह्मभागाच्या चारही बाजूस मुकुटधारी द्विभुज प्रतिमा आहेत. त्याच्यावर सौरभाग असून तेथे टोपी घातलेली व हातात कमळ घेतलेली प्रतिमा दिसते. त्याच्यावर शिवभाग आहे तेथे द्विभुज लकुलिशाची प्रतिमा कोरली आहे. अशा एकूण वीस लहानमोठ्या प्रतिमा आहेत.

सहस्रलिंग, पाटेश्वर (महाराष्ट्र).

शिवलिंगांचे आणखी काही प्रकार म्हणजे अष्टोत्तरशतलिंगे, सहस्रलिंगे, धारालिंगे आणि सर्वतोभद्रलिंगे हे होत. अष्टोत्तरशतलिंगात लिंगाच्या पूजाभागावर १०८ लहान लहान लिंगे कोरलेली असतात. याचप्रमाणे १००० लिंगे कोरलेली असल्यास त्याला सहस्रलिंग असे म्हणतात. महाराष्ट्रातील साताऱ्याजवळ पाटेश्वर येथे एक सहस्रलिंग आहे. ज्या लिंगावर उभ्या पन्हळी किंवा धारा पडलेल्या असतात ते धारालिंग होय. सर्वतोभद्रलिंग हा कायलिंगाचाच एक प्रकार असून तो गुप्तोत्तर काळात विकसित झाला. शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सौर इ. सर्व मतप्रवाहांचे एकीकरण किंवा महाविलयन यात पाहायला मिळते. रामनगर (वाराणसी) येथील संग्रहालयात एक सर्वतोभद्रलिंग आहे. त्यावर चारही बाजूस सूर्य, गणपती, शिवपार्वती आणि वराह कोरलेले दिसतात, तर ग्वाल्हेरच्या संग्रहालयातील एका सर्वतोभद्रलिंगावर विष्णू, शिव, ब्रह्मा आणि सूर्य आढळतात. अशी लिंगे प्रामुख्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांत आहेत.

लिंगोद्भव शिव, वेरूळ (महाराष्ट्र).

लिंगोद्भव शिव : एका पुराणकथेनुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठत्वाविषयी भांडण झाले; तेव्हा तेथे एक अग्निस्तंभ उत्पन्न झाला आणि त्याचे आदि-अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. त्याप्रमाणे त्याच्या शिखराचा शोध घेण्यासाठी ब्रह्मदेव हंस बनून आकाशात उडाला आणि विष्णू वराहरूपाने पाताळात शिरला. अथक शोधानंतरही त्यांना यश आले नाही तेव्हा शिव तेथे लिंगोद्भव स्वरूपात प्रकट झाले आणि त्यांनी दोघांची समजूत घातली. ‘सुप्रभेदागम’ या ग्रंथानुसार मूर्तीचे वर्णन शिवाचे पाय व मुकुट लिंगात लुप्त झालेले असावेत, वरच्या बाजूस हंसरूप ब्रह्मा आणि खालच्या बाजूस वराहरूपी विष्णू दाखवावेत असे आढळते. लिंगोद्भव शिवमूर्ती उत्तरेपेक्षा दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतात. वेरूळ, औंढा नागनाथ, अंबरमाळगम्, तंजावर, पट्टदकल, कांचीपुरम येथील लिंगोद्भव प्रतिमा उल्लेखनीय आहेत.

वेरूळच्या दशावतार लेण्यात एक सुंदर लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे. एका स्तंभाच्या मध्यभागी शिव प्रकट होताना दिसतात, या चतुर्भुज प्रतिमेच्या मागच्या दोन्ही हातांत बहुधा परशू व मृग आहेत. पुढील उजवा हात अभयमुद्रेत तर डावा हात कमरेवर दिसतो. पुराणात अग्निस्तंभ असा उल्लेख असल्याने शिल्पकाराने या स्तंभाच्या दोन्ही बाजूंस ज्वाळा दाखविल्या आहेत. चतुर्मुख ब्रह्मदेव आकाशात उड्डाण करत असून विष्णू वराहरूपाने जमीन उकरण्याचा प्रयत्न करत आहे. तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरात एका स्तंभावर चतुर्भुज लिंगोद्भव शिवाची प्रतिमा आढळते. तिच्या वरील दोन हातात परशू व मृग असून खालील उजवा हात अभयमुद्रेत आणि डावा हात कमरेवर आहे. खाली पाताळात शिरू पाहणारा वराह, तर वरच्या बाजूस ब्रह्मदेव दर्शविले आहेत.

ज्योतिर्लिंगे : भारतात बारा सुप्रसिद्ध शैवतीर्थे असून ती सर्व लिंगस्वरूप आहेत. ही ज्योतिर्लिंगे पुढीलप्रमाणे : १. सोमनाथ (गुजरात) २. श्री शैल मल्लिकार्जुन (आंध्र प्रदेश) ३. महाकालेश्वर (मध्य प्रदेश) ४. ओंकारेश्वर (मध्य प्रदेश) ५. केदारनाथ (उत्तराखंड) ६. भीमाशंकर (महाराष्ट्र) ७. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश) ८. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र) ९. परळी वैजनाथ (महाराष्ट्र) १०. औंढा नागनाथ (महाराष्ट्र) ११. रामेश्वर (तमिळनाडू) १२. घृष्णेश्वर (महाराष्ट्र)

संदर्भ :

  • Rao, T. A. G., ‘Elements of Hindu Iconography’, Vol. II Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
  • खरे, ग. ह., ‘मूर्तिविज्ञान’. भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे,  १९३९; २०१२.
  • जोशी, नी. पु., ‘भारतीय मूर्तिशास्त्र’, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९; २०१३.
  • जोशी, महादेवशास्त्री, ‘भारताची मूर्तिकला’, जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स,  पुणे, १९८०.
  • देगलूरकर, गो. बं., ‘शिवमूर्तये नमः’, स्नेहल प्रकाशन. पुणे, २०१४.

छायाचित्र संदर्भ :

  • एकमुख शिवलिंग, खोह (मध्य प्रदेश) : खरे, ग. ह., ‘मूर्तिविज्ञान’. भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे,  १९३९; २०१२.
  • लिंगोद्भव शिव, वेरूळ (महाराष्ट्र) :  Rao, T. A. G., ‘Elements of Hindu Iconography’, Vol. II Part I, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
  • कायलिंग, परशु रामेश्वर मंदिर, गुडीमल्लम (आंध्र प्रदेश) : https://en.wikipedia.org/wiki/Gudimallam_Linga
  • चतुर्मुख शिवलिंग, पाटेश्वर (महाराष्ट्र) : वल्लरी जोशी.
  • सहस्रलिंग, पाटेश्वर (महाराष्ट्र) : वल्लरी जोशी.

समीक्षक : श्रीकांत गणवीर