सामान्य घार (मिल्व्हस मायग्रान्स)

पक्षी वर्गाच्या फॅल्कोनिफॉर्मीस (Falconiformes) गणातील असिपिट्रिडी (Accipitridae)  कुलाच्या मिल्व्हिनी (Milvinae) उपकुलातील एक शिकारी पक्षी. याला सामान्य घार, साधी घार किंवा नागरी घार असेही म्हणतात. घारीच्या जगभरात २२ जाती आढळतात. त्यांपैकी ८ जाती इलॅनिनी (Elaninae) व १४ जाती मिल्व्हिनी या उपकुलातील आहेत. सामान्य घारीचे शास्त्रीय नाव मिल्व्हस मायग्रान्स (Milvus migrans) असे आहे. असिपिट्रिडी कुलातील हा सर्वाधिक संख्येने आढळणारा पक्षी आहे. घार समशीतोष्ण व युरेशियाच्या उष्णकटिबंधीय भागात मोठ्या प्रमाणात आढळते. तिची युरोपमध्ये संख्या कमी, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये अधिक आहे. भारतात घार सर्वत्र आढळते. ती हिमालयात सु. २,४४० मी. उंचीपर्यंत आढळते. तसेच नेपाळ, बांगला देश, पाकिस्तान, श्रीलंका आणि म्यानमार या देशांतही ती आढळते. तिच्या काही जाती युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया येथे सापडतात. सामान्य घारीच्या पुढील उपजाती आहेत – (१) यूरोपियन काळी घार (मि. मा. मायग्रान्स; M. m. migrans), (२) काळ्या कानाची घार (मि. मा. लिनिएटस; M. m. lineatus), (३) तैवान घार (मि. मा. फॉर्मोसॅनस; M. m. formosanus), (४) छोटी भारतीय घार (मि. मा. गोविंदा; M. m. govinda), (५) दुभंगलेल्या शेपटीची घार (मि. मा. अफिनिस; M. m. affinis), (६) पिवळ्या चोचीची घार (मि. मा. एजिप्टिअस; M. m. aegyptius)

सामान्य घार आकाराने गिधाडापेक्षा लहान साधारणपणे ५०–६० सेंमी. लांबीची असून वजन सु. ७०० ग्रॅ. असते. तिचा रंग गडद तपकिरी असतो. डोके चपटे; चोच काळी, टोकदार, आखूड व बाकदार असते. चोचीच्या बुडाकडील भाग पिवळसर रंगाचा असतो. डोळे लालसर तपकिरी किंवा पिवळसर रंगाचे असतात. पायाचा रंग पिवळा असून नखे तीक्ष्ण व काळी असतात. घारीचे पंख लांब व टोकदार असून पंखविस्तार सु. १५० सेंमी. असतो. पंख काळ्या रंगाचे असून शरीराचा खालील भाग पिवळसर तपकिरी असतो. शेपूट लांबट व दुभंगलेली असते. दुभंगलेल्या शेपटीमुळे घारीस दिशा व वेग बदलता येतो. तसेच यामुळे ती आकाशात इतर पक्ष्यांपासून वेगळी ओळखता येते. घार एकटी किंवा चार-पाचच्या थव्यात भटकत असते.

सामान्य घार

सामान्य घार नदीकाठी, शेतात, विरळ जंगलात अधिवास करते. ती मानवाच्या सहवासात राहणारी असून खाटिकखाने, मासळीबाजार, मांसबाजार, कचऱ्यांचे साठे, गोदी आणि बंदरे यांच्या आसपास मिळणारे अन्न गोळा करताना बहुसंख्येने दिसते. घार मांसाहारी असून बेडूक, उंदीर, मासे, सरडे, पक्ष्यांची पिले हे तिचे खाद्य आहे. तसेच गांडूळ, मृत प्राण्यांचे मांस व कीटकसुद्धा ती खाते. त्यामुळे तिला नैसर्गिक सफाई कामगार असेही म्हणतात. ती धीट असून माणसांना घाबरत नाही. घारीची नजर तीक्ष्ण असून ती उंचावरून जमिनीवरील प्राण्यांच्या हालचाली अचूक टिपते. तासनतास आकाशात बऱ्याच उंचावरून घिरट्या घालत घार खाद्य शोधते. तिची उडण्याची शक्ती असामान्य आहे. ती कमी तसेच अधिक उंच उडण्यात पटाईत असून उष्ण हवेच्या झोतावर पंख न पसरवता आकाशात उडत राहते.

सामान्य घारीमध्ये नर व मादी दिसायला सारखेच असून आकार व वजनाने मादी नरापेक्षा मोठी असते. त्यांचा नर-मादी जोडा आयुष्यभर टिकतो. घारीचा विणीचा हंगाम प्रदेशपरत्वे निरनिराळा असतो. भारतात तो थंडीमध्ये जानेवारी-फेब्रुवारीमध्ये असतो. नारळ, सुपारी, वड, पिंपळ अशा उंच झाडांवर नर-मादी दोघे मिळून काटक्यांचे मोठे घरटे बांधतात. त्यासाठी काड्या, गवत, वायर, दोरा, कापूस, चिंध्या अशा वस्तूंचा वापर केला जातो. हे घरटे पुन्हा डागडुजी करून पुढील वर्षी वापरले जाते. मादी वर्षातून एकदाच २-४ अंडी घालते. अंडी मातकट पांढऱ्या रंगाची असून त्यावर लालसर तपकिरी ठिपके असतात. अंडी उबविणे व पिलांना भरविणे ही कामे नर-मादी दोघे मिळून करतात. अंडी उबविण्याचा कालावधी ३० ते ३४ दिवसांचा असतो. पिले साधारण २ महिन्यांमध्ये उडण्यायोग्य बनतात, तर २ वर्षांनंतर ती प्रजननक्षम होतात. घार ७-८ दिवस अन्नावाचून जगू शकते. घारीचे आयुर्मान हे २० ते २२ वर्षे असते.

पहा : कापशी घार, मोरघार, मोरांगी घार.

संदर्भ :

  • https://www.britannica.com/animal/kite-bird
  • https://animaldiversity.org/accounts/Milvus_migrans/
  • सलीम अली आणि लईक फतेहअली, अनुवाद : रा. वि. सोवनी, भारतीय पक्षी, नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया.

                                                                                          समीक्षक : सुरेखा मगर-मोहिते