(स्थापना : १८८८ ) 

अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी (एएमएस) ही अमेरिकेतील गणितासाठी कार्यरत असलेल्या संस्थांपैकी अव्वल दर्जाची आणि महत्त्वाची एक संस्था आहे. या संस्थेची स्थापना १८८८ मध्ये झाली. आज असलेली कायदेशीर मान्यता मात्र संस्थेला १९२३मध्ये मिळाली. गणिती संशोधन, शिष्यवृत्ती आणि शिक्षण यांकडे अधिकाधिक जणांना आकर्षित करण्यासाठी प्रकाशने, सभा, प्रचार आणि इतर कार्यक्रम राबवून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गणिती समूहांची सेवा करणे, हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. आपले कार्यक्रम राबविण्यासाठी एएमएसने निश्चित केलेली ध्येये खालीलप्रमाणे :

          १. गणिती संशोधन, गणितज्ज्ञांमधील परस्परसंवाद आणि गणिताचा वापर यांना प्रोत्साहन देणे.

          २. गणिती समज आणि कौशल्ये यांच्या प्रसाराला प्रोत्साहन देणे.

          ३. सर्व स्तरांवरी गणिती शिक्षणाला पाठबळ पुरविणे.

          ४. सर्वांना गणितात पूर्णपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे व सुविधा पुरविणे. त्यामुळे                         गणितव्यवसायाचा दर्जा सुधारेल.

          ५. गणिताविषयी जागरूकता वाढवणे आणि त्याचा इतर ज्ञानशाखांंशी आणि दैनंदिन जीवनाशी असणारा संबंध या संदर्भातील गुणग्राहकता वाढविणे.

एएमएसचे मुख्यालय प्रॉविडेन्स, ऱ्होड आयलंड येथे आहे. Mathematical Review’s (मॅथेमॅटिकल रिव्ह्यूज) याचे ऑनलाइन प्रकाशन MathSciNet® (मॅथसायनेट) म्हणून आोळखले जाते. हे त्यांचे नियतकालिक अॅन आर्बर, मिशिगन येथील कार्यालयातून प्रकाशित केले जाते. तर वॉशिंग्टन, डी.सी. येथील कार्यालय गणिती समुदायाला व्यापक वैज्ञानिक समुदायाशी आणि विज्ञान-निधीच्या गुंतवणुकीचे निर्णय घेणाऱ्यांशी जोडून देते. तिन्ही संस्थांतील एकंदर २०७ कर्मचारी एएमएसच्या जगड्व्याळ कार्याचा गाडा चालवतात.

एएमएसचे सभासद आणि वैश्विक गणिती समुदाय यांसाठीचे उपक्रम आणि सेवा यांत व्यावसायिक कार्यक्रम, प्रकाशने, सभा, परिषदा, तरुण बुध्दिवंतांसाठीच्या कार्यक्रमांना पाठबळ, संशोधक व लेखकांसाठी MathSciNet (मॅथसायनेट) सारख्या उपयोजन सामग्रीची उपलब्धता (याच्या मदतीने MathSciNet च्या दुव्यांसह प्रमाणित संदर्भ तयार करता येतात); तसेच सभासद, विद्यार्थी, शिक्षक, माध्यमे व सामान्य लोकांना संसाधने पुरविणारे ‘सार्वजनिक जागरूकता कार्यालय’ इतक्या गोष्टींचा एएमएसमध्ये समावेश होतो. यांमुळेच की काय जगभरातील ३०,००० व्यक्ती आणि ५८० संस्था एएमएसचे सभासद आहेत.

एएमएसच्या व्यवस्थापनात अधिकारी, परिषद-मंडळ, परिषदेची कार्यकारी समिती, विश्वस्त मंडळी, अनेक समित्या व कार्यकारी संचालक यांचा समावेश होतो. कार्यकारी संचालक, वित्त व प्रशासन, संगणक सेवा, प्रकाशन, संपादकीय, सभा आणि व्यावसायिक सेवा, सरकारी पातळीवरील संबंध व कार्यक्रम आणि मॅथेमॅटिकल रिव्ह्यूज असे.एएमएसचे प्रमुख विभाग आहेत. प्रकाशन विक्री, देणगीदार, स्थायी स्वरूपात मिळालेली दाने, गुंतवणूकीवरील व्याज आणि सरकारी अनुदाने हे एएमएसचे आर्थिक स्रोत आहेत. संस्थेचे वार्षिक अंदाजपत्रक अमेरिकन डॉलर्स (यूएस $ )२५दशलक्ष इतके प्रचंड आहे.

एएमएसची प्रकाशने तीन प्रकारांची आहेत. पहिल्या प्रकारात गणित-नियतकालिके आहेत. या नियतकालिकांतील आठ नियतकालिके मूलभूत संशोधनाला, चार अनुवादित संशोधनाला व दोन मुक्त लेखनाला वाहिलेली आहेत. यांतून दर वर्षी १,१०० पेक्षा जास्त लेख प्रकाशित होतात. दुसऱ्या प्रकारात पुस्तके आहेत. यांमध्ये वर्षाला जवळपास ऐंशी नवीन पुस्तके, ३,५००च्या वर संशोधन-लेख, २७ सक्रिय मालिकांतील तसेच मालिकांबाहेरील विषयांवरील मोनोग्राफस् व कार्यवृत्ते प्रसिद्ध केली जातात. याशिवाय ई-पुस्तके, त्यांचे सदस्यत्त्व व वर्गणी गोळा करणे हे जागतिक व्याप्तीचे कामही चालते. तिसऱ्या प्रकारात १९४० मध्ये स्थापण्यात आलेल्या ‘मॅथेमॅटिकल रिव्ह्यूज‘चा अंतर्भाव होतो. मॅथेमॅटिकल रिव्ह्यूजच्या खुल्या ऑनलाइन माहिती भांडारात (म्हणजेच मॅथसायनेटमध्ये) २९ लक्ष बाबी नोंदविण्यात आल्या आहेत. यांत दर वर्षी अंदाजे १,२५,००० बाबींची भर टाकली जाते. या कामांतून २,००० नियतकालिके, १७ लक्ष मूळ लेखांचे दुवे, सहा लाख ९४,००० लेखकांची सूची आणि १५,१०० सक्रिय समीक्षक अंतर्भूत केले जातात.

गणितातील विद्वत्तापूर्ण साहित्यात भौमितिक श्रेणीने भर पडत आहे. माहितीच्या या महापुरातून विद्यार्थी आणि संशोधकांना सर्वोत्कृष्ट व विश्वसनीय संशोधन सहज शोधता येणे व उपलब्ध होणे गरजेचे आहे. याच बांधिलकीतून एएमएसने मॅथसायनेट हा गणिती संशोधनासाठी अत्यंत परिपूर्ण तसेच विश्वसनीय स्रोत तयार केला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते खंद्या संशोधकांपर्यंत जे कोणी गणित किंवा तत्संबंधित विषयांवर संशोधन करीत आहेत किंवा संशोधन सुरू करण्यासाठी विषय शोधत आहेत त्या सर्वांकरिता मॅथसायनेटचा वापर करणे अनिवार्य ठरते. प्रगत गणिताच्या विविध शाखांत कशाप्रकारे वाढ होत आहे आणि त्यात कोणते गणितज्ज्ञ सध्या योगदान करत आहेत याचा मागोवा घेण्यासाठीदेखील हे साधन उपयुक्त ठरत होते. मॅथसायनेटचा उपयोग पुढील बाबींसाठी होतो  :

  • नवीन विषयांबाबतीतील ज्ञान चटकन मिळविण्यासाठी
  • संशोधकांच्या संशोधनाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने दुवे मिळवण्यासाठी
  • लेख किंवा पुस्तक शोधून त्यातील संदर्भ सूचीचा मागोवा घेण्यासाठी
  • इच्छित गणित विभागाची माहिती मिळवून तेथील नोकरीसाठीच्या मुलाखतीची तयारी करण्यासाठी

आंतरजालावर मॅथसायनेटची सेवा विनामूल्य उपलब्ध आहे.

पोस्टडॉक्टरल विद्यार्थ्यांना एएमएस संशोधन – मॅथसायनेट गणित-संशोधन समूहांचे सहकार्य, पुस्तके व नियतकालिके आणि प्रवासासाठी आर्थिक मदत पुरविते.

सामाजिक माध्यमांशीही एएमएसने स्वतःला काळजीपूर्वक जोडून घेतले आहे. फेसबुक, ट्विटर, गुगल+, लिंक्डइन, यूट्यूब, इन्स्टाग्रॅम आणि आयट्यून्स या सामाजिक आंतरजालांवर देखील एएमएसचे अस्तित्व आहे. एएमएसचा ब्लॉगही असून त्याचा RSS नित्यनूतन ठेवण्यासाठी काही व्यक्तींना खास आमंत्रित केले जाते.

ज्या संस्था विज्ञानाची पाठराखण करतात, संशोधनासाठीच्या अनुदानाला समर्थन देतात, गणितासंबंधी जागरूकता वाढवितात आणि गणित-व्यवसायात कार्यरत आहेत अशा संस्थांच्या आघाड्यांबरोबर एएमएसने गणित व विज्ञान या दोनही विषयांना प्रगतीपथावर ठेवण्यासाठी सातत्याने सक्रियतेने काम केले आहे.

गणितात असामान्य कर्तृत्व गाजविणाऱ्यांच्या गौरवार्थ एएमएसने वेगवेगळी एकोणीस पारितोषिके ठेवली आहेत. याशिवाय गणित विषयात विशेष काम करणाऱ्यांना, गणितशास्त्रातील संशोधन व शिक्षणासाठी पाठबळ देऊन समाजसेवा करणाऱ्यांना, आणि लोकांमधील गणिताची समज वाढविण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्यांना एएमएस वेगवेगळ्या तेरा बक्षिसांनी गौरवते. इतर सहा संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये वा बक्षिसांमध्ये देखील एएमएसचा सहभाग आहे.

संदर्भ:

समीक्षक – विवेक पाटकर

प्रतिक्रिया व्यक्त करा