संगीत महाभारती विद्यालय ही भारतातील प्रमुख अकादमींपैकी एक नामांकित संस्था म्हणून संगीत शिक्षण आणि संशोधनाच्या जगात ओळखली जाते. १९५६ मध्ये ही संस्था आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक, संगीत शिक्षणतज्ञ आणि लेखक पद्मभूषण पं. निखिल घोष यांनी मुंबईत स्थापन केली. संगीत आणि नृत्याचे शास्त्रीय आणि सखोल प्रशिक्षण देऊन, त्याद्वारे समाजाला जीवनाचे अधिक विकसित, समृद्ध आणि अर्थपूर्ण भान देऊन संगीत त्याच्या शुद्ध स्वरूपात जास्तीत जास्त घरांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देश या संस्थेच्या स्थापनेमागे होता. याव्यतिरिक्त संगीतात वास्तव संशोधन तसेच संगीतविषयक प्राचीन ऐवजांचा संग्रह, त्यांचे दस्तऐवजीकरण आणि संगीतविषयक अमूल्य माहितीचा प्रसार हे संगीत महाभारती या संस्थेचे उल्लेखनीय प्रकल्प आहेत.
संगीत महाभारती विद्यालय या संस्थेचे विद्यमान प्राचार्य पं. निखिल घोष यांचे सुपुत्र पं. नयन घोष हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेत संगीत आणि नृत्य शिक्षणाव्यतिरिक्त मुंबई आणि उपनगरातील कलाप्रेमी नागरिकांसाठी वार्षिक मैफली, नामवंत कलाकार, संगीततज्ज्ञ आणि इतर संबंधित क्षेत्रातील तज्ञांची संगीतविषयक व्याख्यान-प्रात्यक्षिके तसेच संगीत सत्रे आयोजित करून शास्त्रीय संगीतात जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
संगीत महाभारती या संस्थेस महाराष्ट्र आणि भारत शासनाची मान्यता असून संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली यांची मान्यता आहे. या संस्थेत वयाच्या ६ व्या वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना विविध कलांच्या सादरीकरणातील आंतरसंबंध विशद करून सांगितले जातात; कधीकधी संयुक्त संगीत उपक्रमांमध्ये भाग घेऊन आणि प्रख्यात अतिथी संगीतकारांच्या सहवासात नेऊन त्यांची सांगीतिक समज वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाते. या संस्थेने सामूहिक संगीत शिक्षण आणि मुलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक क्रांतिकारी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर केला आहे. गुरू-शिष्य परंपरेतील प्रख्यात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष क्षमतांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तेजक आणि अनुकूल वातावरण मिळते आणि त्यांच्यापैकी अनेकांनी कलाकार आणि पात्र शिक्षक म्हणून त्यांची कौशल्ये सिद्ध केली आहेत. येथे शिकविला जाणारा ‘संगीत नवीन’ हा त्रिस्तरीय पदविका अभ्यासक्रम, ‘संगीत तीर्थ’ हा द्विस्तरीय पदवी अभ्यासक्रम आणि ‘संगीत गौरव’ हा द्विस्तरीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शासनाच्या शिक्षण विभागाकडून मान्यताप्राप्त आहे. हे अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या डिप्लोमा, बीए आणि एमए/बीएडच्या समकक्ष आहेत. मुलांसाठी खास तयार केलेला ‘म्युझिक मुकुल’ अभ्यासक्रम हा देखील संस्थेचा एक अग्रगण्य उपक्रम आहे, जिथे मुलांना मनोरंजक गाणी आणि खेळांद्वारे संगीताच्या मूलभूत गोष्टींची ओळख करून दिली जाते.
संगीत महाभारतीने ऑक्सफर्डसाठी ‘ऑक्सफर्ड एन्सायक्लोपीडिया ऑफ द म्युझिक ऑफ इंडिया’ हा भारतीय संगीतशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण खंड संकलित केलेला आहे. संगीत महाभारती विद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये १३ व्या शतकातील महान कलावंतांची छायाचित्रे आणि माहितीच्या समृद्ध संग्रहाव्यतिरिक्त दुर्मीळ हस्तलिखिते, पुस्तके आणि शोधप्रबंधांचा मोठा साठा आहे. याशिवाय दृश्राव्यफीती, श्राव्यफीती आणि चित्रपटांच्या रूपात जतन केलेल्या कार्याचा आणि महान कलावंतांच्या मुलाखतींचा दुर्मीळ संग्रह उपलब्ध आहे.
पुढील विषयांमध्ये संस्थेत पद्धतशीर व्यावहारिक आणि सैद्धांतिक प्रशिक्षण दिले जाते.
अ) गायन संगीत – हिंदुस्थानी शास्त्रीय आणि हलके संगीत.
ब) वाद्ये – सतार, तबला, हार्मोनियम आणि बासरी.
क) नृत्य – कथ्थक आणि ओडिसी.
अभ्यासाचे अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत.
१. संगीत मुकुल : मुलांसाठी एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
२. संगीत नवीन : त्रिस्तरीय पदविका अभ्यासक्रम.
३. संगीत तीर्थ : द्विस्तरीय पदवी अभ्यासक्रम (संगीत नवीन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर)
४. संगीत गौरव : द्विस्तरीय पदव्युत्तर अभ्यासक्रम (संगीत तीर्थ अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर).
५. संगीत दीक्षा : मूलभूत शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (स्तर १).
६. संगीत दीक्षा रत्न : प्रगत शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (स्तर २).
७. संगीत भ्रमर : सुलभ स्वरसंगीतातील हौशींसाठी अभ्यासक्रम.