मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यांतील एक महत्त्वाचे परिवर्तन. माणूस हा बोलणारा प्राणी आहे, अशी माणसाची एक साधी व्याख्या करता येते. किंबहुना चिन्हांचा उपयोग करून, म्हणजेच भाषेचा वापर करून एकमेकांशी संपर्क साधणे हे केवळ माणसालाच जमते असे मानले जाते. परस्पर संपर्कासाठी रंग, शब्द, प्रतीके व भाषेचा वापर करणे हे मानवपणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामधील भाषा हा मानवी मेंदूच्या आकलनक्षमतेचा प्राणिविश्वात इतरत्र न आढळणारा एक अनोखा पैलू आहे. भाषा आणि संस्कृती हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत, कारण भाषेमुळेच आधीची पिढी पुढच्या पिढीकडे आपल्या अनुभवांचे संचित देत असते.
अनेक मानवेतर प्राणी परस्पर संपर्कासाठी विविध हावभाव, विशिष्ट आवाज आणि देहबोली अशा अनेक माध्यमांचा वापर करतात. त्यांना एकत्रितपणे ‘प्राण्यांची भाषा’ (ॲनिमल लँग्विजीस) असे म्हणले जात असले तरी मानवांची बोलण्याची आणि भाषा वापरण्याची क्षमता त्यांपेक्षा निराळी आहे. मानव प्रजातीच्या मानवपणाच्या गुणधर्मांमध्ये भाषिक कौशल्य हा अविभाज्य भाग आहे. मानवी उत्क्रांतीच्या गेल्या किमान ६० लक्ष वर्षांच्या प्रवासात आर्डीपिथेकस, ऑस्ट्रॅलोपिथेकस, पॅरान्थ्रोपस आणि होमो अशा मानव व मानवसदृश जातींचे अस्तित्व असल्याचे दिसून आले आहे. मानवी उत्क्रांतीच्या अशा निरनिराळ्या अवस्थांपैकी कोणत्या अवस्थेत बोलण्याची सुरुवात झाली? बोलण्याची आणि भाषेची गरज का निर्माण झाली असावी? बोलणे आणि भाषा यांचा एकूण बौद्धिक क्षमतेशी काय संबंध आहे? सर्व मानवांची भाषा एकाच ठिकाणी उत्पन्न झाली, की मुळातच अनेक भाषांची उत्क्रांती झाली? भाषिक क्षमता हे जैविक अनुकूलन (बायॉलॉजिकल ॲडॉप्टेशन) आहे, की तो मानवाच्या एकूण सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचाच एक भाग आहे? भाषेच्या उत्क्रांतीशी संबंधित हे व असे इतर अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत.
मानवांची उत्क्रांती प्रत्यक्षात माकड नव्हे तर मर्कट-कपिसारख्या कोणत्यातरी एका समान पूर्वजापासून झाली. प्राणी ते माणूस या प्रवासात सलगपणा असल्याने, माणूस आणि इतर प्राण्यांच्या एकमेकांशी संपर्क साधण्याच्या पद्धतीत साम्य आहे. असे असले तरी त्याचप्रमाणे काही बाबतींत महत्त्वाचे फरकदेखील आहेत. मानवेतर प्राण्यांमधे एकमेकाशी संपर्क साधण्याच्या पद्धतीमधे काहीसा साचेबंदपणा असतो. प्राण्यांना ठरावीक मर्यादेच्या वारंवारतेचे (फ्रिक्वेन्सी) आवाज काढता येतात. परंतु त्यांना विशिष्ट आवाजांच्या वेगवेगळ्या वापराने अमर्याद अर्थ निर्माण करता येत नाहीत. मानवाला उत्क्रांतीच्या दृष्टीने सर्वांत जवळचे असणारे चिंपँझी आणि गोरिला हे कपी एकमेकांशी संपर्क साधायला मर्यादित प्रमाणात आवाजाचा वापर करतात, तथापि ते माणसांप्रमाणे बोलू शकत नाहीत. प्रत्येक जनसमूहाच्या भाषेला विशिष्ट व्याकरण व ठरावीक रचना असते आणि मौखिक प्रतीकात्मक चिन्हांचा उपयोग केलेला असतो. शब्द आणि वाक्ये यांच्या अमर्याद रचना करून माणूस आपले विचार इतरांपर्यंत पोहचवतो. या शिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषेच्या (बोली अथवा लिखित) माध्यमातूनच माणूस आयुष्यात घेतलेल्या अनुभवांची शिदोरी पुढच्या पिढीकडे सोपवतो आणि त्यांमधून संस्कृती जपून ठेवतो. याउलट प्राणिसृष्टीमधला इतर कोणताही प्राणी माणसांसारखा बोलू शकत नाही. भाषेच्या अभावी मानवेतर प्राण्यांचे अनुभवजन्य ज्ञान ते मेल्यानंतर नष्ट होऊन जाते. मानवी भाषा आणि मानवेतर प्राण्यांमधील संपर्कपद्धतीमधील साम्यभेदांकडे भाषाविज्ञानाने आणि जीवविज्ञानाने कोणत्या भिन्न भूमिकांमधून पाहिले हे बघणे गरजेचे आहे.
भाषेचा उगम आणि विकास हा भाषाविज्ञानाखेरीज पुरातत्त्वविद्या, पुरामानवशास्त्र, जीवविज्ञान, चेताविज्ञान, मानसशास्त्र आणि प्रायमेटविज्ञान अशा अनेक ज्ञानशाखांना रस असणारा विषय आहे. साहजिकच भाषाविज्ञानात आणि इतर संबंधित ज्ञानशाखांमध्ये भाषेचा उगम आणि उत्क्रांती याबद्दल अनेक सिद्धांत आहेत. भाषाविज्ञानात कार्य करण्यासाठी स्थापन झालेल्या पॅरिसमधील ‘सोसायटी द लिन्ग्विस्टिक द पॅरिस’ या संस्थेने १८६६ मध्ये भाषेचा उगम या विषयावरील लेख ग्राह्य नाहीत असे जाहीर करून टाकले असले तरी भाषाविज्ञानात या संबंधात संशोधन चालू राहिले. भाषावैज्ञानिकांनी केलेल्या भाषांच्या सर्वंकष अभ्यासाप्रमाणेच पुराजीवविज्ञानातील नवनव्या मानवी जीवाश्मांचा शोध आणि आनुवंशविज्ञानातील प्रगती यांच्यामुळे गेल्या काही दशकांमध्ये भाषेचा उगम आणि उत्क्रांती या विषयांना नवीन दिशा मिळालेली आहे.
उत्क्रांतीवादाला भक्कम सैद्धांतिक बैठक प्राप्त करून देणाऱ्या चार्ल्स डार्विन यांनी भाषेच्या उगमाबाबत जीवविज्ञानाच्या दृष्टीकोनातून विचार केलेला होता. मानवी भाषेला वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे आणि एकंदर मानवी संपर्कपद्धतीमध्ये भाषा हे एक अतिशय महत्त्वाचे अंग आहे हे डार्विन यांनी नमूद केले होते. डार्विन यांनी त्यांच्या ‘द डिसेन्ट ऑफ मॅन अँड सिलेक्शन इन रिलेशन टू सेक्स’ या १८७१ मधील पुस्तकात ‘सिंगिंग एप’ म्हणजे गाणारा कपि ही सिद्धांतकल्पना मांडली. सुरुवातीच्या काळात अर्थहीन आवाजांमधून भाषेचा प्रारंभ झाला आणि नंतर भाषेत अर्थवाहक घटक निर्माण झाले. प्राण्यांची खाणाखुणा करण्याची पद्धत आणि त्यांचे ओरडणे यातच काहीतरी फरक होऊन मानवी भाषा तयार झाली असावी, अशी ही कल्पना होती. अशा प्रकारे जैवविज्ञानाच्या दृष्टीकोनातून भाषेचा उगम व विेकास यांच्याकडे बघायला एकोणिसाव्या शतकातच प्रारंभ झाला असला तरी भाषेचा उगम ही मानवी उत्क्रांतीची परिसीमा आहे अशी अनेक क्षेत्रांमधल्या अभ्यासकांची दीर्घकाळ धारणा होती. मानवामधे भाषा व वाचा (बोलणे) याला सुरुवात केव्हा आणि कशासाठी झाली हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असले तरी काही भाषावैज्ञानिकांना मात्र ते निरर्थक वाटत होते. उदा., अमेरिकन भाषावैज्ञानिक विल्यम ड्वॉइट व्हिटनी (१८२७-१९८४) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाषेच्या उगमासंबंधी विचार करणे हा मुळातच अवैज्ञानिक उपद्व्याप वाटत होता.
एकोणिसाव्या शतकात जगातल्या सर्व भाषांचा उगम एकाच आदिभाषेपासून (प्रोटो लँग्वेज) झाला असावा या सिद्धांताला अनुसरून संशोधन होत असले, तरी १९५० पर्यंत भाषाविज्ञानात भाषेचा उगम या विषयाकडे कोणी फारसे लक्ष दिलेले नव्हते. नोम चॉम्स्की (जन्म १९२८) या अमेरिकन भाषावैज्ञानिकांनी भाषाविज्ञानात संरचनावादी विचारधारेचा (स्ट्रक्चरलिस्ट पॅरडाइम) पगडा असतानाही भाषेचा उगम कसा झाला असावा याबद्दल नव्याने विचार सुरू केला. चॉम्स्कींच्या सैद्धांतिक मांडणीवर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास केलेले विख्यात डच प्राणिवैज्ञानिक नीकोलास टिनबर्जेन (१९०७-१९८८) यांच्या संशोधनाचा प्रभाव होता. मानवी मेंदूमधे इतर प्राण्यांमध्ये न आढळणारा असा विशिष्ट भाग असतो आणि त्याच्यामुळे भाषा निर्माण होते हा चॉम्स्कींच्या प्रतिपादनातील मुख्य मुद्दा आहे. या भागाला त्यांनी भाषिक अवयव (लँग्वेज ऑर्गन) असे नाव दिले. तसेच मानवी भाषेची रचना सार्वत्रिक व्याकरणावर (युनिव्हर्सल ग्रामर) आधारित आहे आणि मानवेतर प्राण्यांमधे या व्याकरणाचा अभाव असतो, असे मत चॉम्स्कींनी मांडले. अर्थातच गरजेमधून भाषेचा उगम झाला नसून मेंदू प्रगत होत असताना एक कौशल्य म्हणून भाषा निर्माण झाली, असे चॉम्स्कींनी मानले आहे.
जीवविज्ञानाच्या दृष्टीकोनातून भाषेचा उगम व विेकास या क्षेत्रात एरिक लेनेबर्ग (१९२१-१९७५) या विख्यात भाषावैज्ञानिकांचे संशोधन महत्त्वाचे आहे. त्यांचे ‘बायोलॅाजिकल फाउंडेशन्स ऑफ लँग्वेज’ (१९६७) हे पुस्तक हा ‘जैवभाषाविज्ञान’या शाखेमधील महत्त्वाचा टप्पा आहे. मस्सिमो पिआटेली पाल्मारिनी यांनी १९७४ मध्ये आयोजित केलेल्या परिषदेत जैवभाषाविज्ञान (बायोलिंग्विस्टिक्स) ही संज्ञा सर्वप्रथम वापरली. सन २००७ पासून जैवभाषाविज्ञान या विषयालाच वाहिलेले ‘बायोलिंग्विस्टिक्स’ हे नियतकालिक प्रसिद्ध होत आहे. भाषिक कौशल्याच्या संदर्भात मानवेतर प्राणी (विशेषतः प्रायमेट गणातील कपी) आणि माणूस यांच्यामध्ये मुळातच फरक करायला हवा या प्रचलित मतापेक्षा वेगळा असा विचार चार्ल्स हॉकेट (१९१६-२०००) या भाषावैज्ञानिकांनी मांडला. भाषेच्या उगमासंबंधी हॉकेट यांचे कार्य ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. कारण त्यांनी भाषेच्या रचनेविषयी मूलभूत व्याख्या तयार केल्या. तसेच माणूस आणि इतर प्राणी यांच्यातील संपर्कपद्धतींची तुलना करताना भाषेच्या रचनेमधील निरनिराळ्या वैशिष्ट्यांचा उपयोग करावा असे सुचवले.
डेरेक बिकरटन (१९२६-२०१८) या अमेरिकन भाषावैज्ञानिकांनी ‘रूट्स ऑफ लँग्वेज’ या १९८१ मधील पुस्तकात वेगळा विचार मांडलेला दिसतो. बिकरटन यांनी ‘लँग्वेज बायोप्रोग्रॅम’ ही सिंद्धांतकल्पना मांडली आहे. मानवांमध्ये जन्मजात अशी जैविक प्रणाली असते की, त्यामुळे बालकांना कोणतीही भाषा आत्मसात करता येते अशा या कल्पनेच्या मुळाशी भाषिक कौशल्य मिळवण्याची क्षमता ही एखाद्या जैविक आराखड्याप्रमाणे असल्याचे मानलेले आहे. बिकरटन यांच्या मते शब्दांच्या अगदी छोट्या मालिका असलेल्या सोप्या आणि व्याकरणाचे कमीतकमी नियम असणाऱ्या एखाद्या आदिभाषेपासून आजच्या प्रगत भाषा तयार झाल्या आहेत. इरेक्टस मानव या आता नामशेष झालेल्या जातीचे मानव ही भाषा वापरत असावेत, असे मत बिकरटन यांनी मांडले होते. मुद्दाम भाषा शिकवण्याचे प्रयोग केलेल्या चिंपँझीसारख्या कपिंची भाषा, दोन वर्षांखालील मुलांची भाषा आणि काही कारणाने भाषा शिकण्यात अडचण आलेल्यांची भाषा यांचे इरेक्टस मानवांच्या भाषेशी साम्य असावे. आदिभाषेपासून आधुनिक भाषा निर्माण होण्यामागे एखादे ‘उत्परिवर्तन’ (म्युटेशन) हे कारण असून नंतर उत्क्रांतीच्या ओघात गुंतागुंतीच्या सामाजिक वर्तनासाठी उपयुक्त असल्याने हे उत्परिवर्तन स्थिरावले. भाषेच्या उगमासंबंधी हा ‘बिग बॅन्ग’ प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांतांमागे दोन अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना आढळतात. बिकरटन यांच्या मते प्रत्येक प्रजातीची बाह्य जगाकडे पाहून त्यातून माहिती घेण्याची प्रक्रिया प्राथमिक स्वरूपाची आहे. याला त्यांनी ‘प्राथमिक प्रातिनिधीक प्रणाली’ (प्रायमरी रिप्रेझेंटेशनल सिस्टीम) असे नाव दिले. जगण्यासाठी अत्यावश्यक त्या सर्व क्रिया करण्यासाठी ही प्रणाली पुरेशी ठरते. माणसाच्या बाबतीत मात्र या खेरीज संपूर्णपणे निराळी अशी ‘द्वितीय प्रातिनिधीक प्रणाली’ प्रणाली’ (सेकंडरी रिप्रेझेंटेशनल सिस्टीम) असते. या प्रणालीमुळे आकलन होत असलेल्या ज्ञानाचा संबंध त्या क्षणी घडणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांशी नसतो. या खास प्रणालीमुळे आपण शब्दांच्या माध्यमातून प्रत्यक्ष न पाहिलेल्या अथवा अनुभवलेल्या घटनांचे ज्ञान मिळवतो आणि असे जमा झालेले ज्ञान भाषेच्या माध्यमामधून पुढच्या पिढीकडे देऊ शकतो.
स्टीव्हन पिंकर (जन्म १९५४) या कॅनेडियन मानसशास्त्रीय भाषावैज्ञानिकांनी चॉम्स्कींचा ‘माणसांमध्ये मुळातच भाषिक क्षमता असते आणि माणूस व इतर प्राणी यांच्यातील संपर्कपद्धतींमधे उत्क्रांतीशी निगडित सलगपणा असावा’ हा सिद्धांत मान्य केला आणि ही क्षमता उत्क्रांतीच्या ओघात अनुकूलन म्हणून विकसित झालेली आहे असे सुचवले. मानवी भाषेची रचना कमालीची क्लिष्ट आहे आणि ती तयार होण्यामागे उत्क्रांती तत्त्वातील ‘नैसर्गिक निवड’ (नॅचरल सिलेक्शन) हा घटक आधारभूत मानावा, असे मत पिंकर यांच्या ‘द लँग्वेज इंस्टिंक्ट, हाउ द माइंड क्रिएटस लँग्वेज’ (१९९४) आणि ‘हाउ द माइंड वर्कस’ (१९९७) या पुस्तकांत मांडण्यात आले आहे. केवळ मानवी मेंदूचा आकार मोठा असल्याने निव्वळ अपघाताने भाषेचा उगम झाला ही बिकरटन यांची कल्पना खरी नसून भाषा वापरण्याचे कौशल्य हळूहळू विकसित झाले व असे कौशल्य असणाऱ्या मानवी समूहांची नैसर्गिक निवड झाली, असा पिंकर यांच्या प्रतिपादनाचा मुख्य गाभा आहे. तथापि स्टीफन जे गुल्ड (१९४१-२००२) या अमेरिकन पुराजीववैज्ञानिकांनी अशा नैसर्गिक निवडीसाठी पुरेसा पुरावा उपलब्ध नाही असे विरोधी मत नोंदवले आहे.
एकविसाव्या शतकात भाषेचा उगम व विेकास यांच्याकडे पाहण्यात प्राण्यांमधील संपर्क पद्धतींवरील नवीन संशोधन (मानवेतर प्रायमेट प्राण्यांची भाषा आणि कपिंना भाषा शिकवण्याचे प्रयोग), पुराजीवविज्ञानातील नव्या मानवी जीवाश्म प्रजातींचा शोध (निअँडरथल मानव, फ्लोरेस मानव, डेनिसोव्हा मानव आणि लुझोन मानव), आणि त्यांच्यामधून प्राचीन डीएनए रेणू मिळवण्याचे तंत्रज्ञान, भाषिेक कौशल्यासाठी आवश्यक जनुकांचा शोध, आनुवंशविज्ञानातील प्रगती आणि मेंदूविज्ञानातील नवीन संशोधन या सर्वांमुळे फरक पडला आहे.

भाषेच्या उत्क्रांतीकडे पुराजीवविज्ञानाच्या दृष्टीकोनातून बघताना असे दिसते की, प्रामुख्याने झाडांमध्ये वावरणाऱ्या ऑस्ट्रॅलोपिथेकस या मानवपूर्व प्राण्यांना बोलता येत नसावे. त्यांच्या मेंदूचा आकार चिंपँझींप्रमाणे छोटा होता. सुमारे २० लक्ष वर्षांपूर्वी दोन पायांवर तोल सांभाळत नियमितपणे चालू लागलेल्या इरेक्टस मानवांच्या कवटीचे (८५० ते ११०० घन सेंमी.) व पर्यायाने मेंदूचे आकारमान वाढले होते. इरेक्टस मानवांच्या मेंदूमध्ये आधीच्या ऑस्ट्रॅलोपिथेकस प्राण्यांमध्ये नसलेला ‘ब्रोकाज एरिया’ हा भाग विकसित झालेला होता. ब्रोकाज एरिया हा भाग म्हणजे मेंदूच्या डाव्या बाजूकडील ललाट पालिची (फ्रंटल लोब) तिसरी घडी आहे. बोलणे व भाषा वापरण्याच्या कौशल्यासाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण याच भागाचे घशाचे स्नायू व जीभेची हालचाल यांच्यावर नियंत्रण असते. त्याप्रमाणे मानवांमध्ये ‘वेर्निकेज एरिया’ हा भाग असतो. या भागामुळे भाषा समजते. जर या भागात बिघाड झाला तर त्या माणसाला बोलता येते, पण ऐकलेली भाषा समजत नाही.
इरेक्टस मानवांमध्ये मेंदूत विविध भागांचा विकास होत असताना त्या बरोबरीने स्वरयंत्र घशात खालच्या बाजूला घसरत गेले. स्वरयंत्र खाली गेल्याने घशात जी जागा मोकळी झाली त्यामुळे जीभेला हालचाल करण्यासाठी अधिक लागा मिळू लागली व त्यामुळे मानवपूर्व प्राण्यांपेक्षा मानवांना आधिक प्रकारचे आवाज काढता येऊ लागले. हे बदल अर्थातच एका रेषेत अचानक घडलेले नसून उत्क्रांतीच्या ओघात आवाजात असे वैविध्य असलेल्यांची नैसर्गिक निवड होत जाऊन बोलण्याच्या विकासाला चालना मिळाली.

प्राचीन डीएनए रेणू मिळवण्याचे तंत्रज्ञान प्रगत होत गेल्याने गेल्या दशकात भाषिक कौशल्यासाठी आवश्यक असलेल्या काही जनुकांचा शोध लागला आहे. इंग्लंडमधील ‘केइ’ या आद्याक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना इंग्लिश मातृभाषा असूनही व्याकरण नीट येत नव्हते व भाषा नीट वापता येत नव्हती. त्यांच्या जनुकीय अभ्यासातून असे दिसले की, त्यांच्यातील सातव्या गुणसूत्रावरील विशिष्ट डीएनए क्रमात (एफओएक्सपी२) बिघाड आहे. या एफओएक्सपी२ जनुकाच्या अधिक अभ्यासातून भाषेच्या वापरात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसून आले. याचप्रमाणे वाचन अक्षमता (डिस्लेक्सिया) व स्वमग्नता (ऑटिझम) या विकारातील भाषादोषांना कारणीभूत असलेल्या जनुकांचा शोध लागला आहे. एफओएक्सपी२ जनुकाखेरीज इतर नऊ जनुकांचा संबंध भाषा व वाचा यांच्याशी असल्याचे आढळले आहे. सन २०१० पासून निअँडरथल मानवांच्या
जनुकांची क्रमवारी कळल्यानंतर भाषेच्या उगमाबद्दल संपूर्णपणे नवी माहिती हाती आली आहे. निअँडरथल मानव व आधुनिक सेपियन मानव यांच्यात तुलना केल्यावर असे दिसते की, दोन्हीतील एफओएक्सपी२ जनुकात काही प्रमाणात साम्य आहे. सन २०१५-१६ मधील या संशोधनामुळे असे दिसते की, काही प्रमाणात आपल्याप्रमाणेच निअँडरथल मानवांना बोलता येत असावे. या अगोदर १९८३ मध्ये इझ्राएलमधील केबारा केव्ह्ज या पुरातत्त्वीय स्थळावर एका निअँडरथल मानवाचा सांगाडा मिळाला होता. सुमारे साठ हजार वर्षांपूर्वीच्या या पुरुषाच्या (टोपणनाव मोशे मानव) हायॅाइड या हाडाचा आकार आधुनिक मानवांमधील हाडाप्रमाणे असल्याचे आढळले होते. हे निरीक्षण महत्त्वाचे आहे, कारण बोलताना स्वरयंत्राचे जे स्नायू वापरले जातात त्यांना हायॅाइड या हाडाचा आधार असतो. मोशे मानव हा निअँडरथल मानव आपल्याप्रमाणेच कदाचित बोलू शकत असेल या तेव्हा काढलेल्या अनुमानाला आता जनुकीय संशोधनाने दुजोरा मिळाला आहे.
आनुवंशविज्ञान, पुरातत्त्व आणि मेंदूविज्ञान यांच्यातील एकत्रित पुराव्यांवरून असे दिसते की, जरी इरेक्टस मानव (अथवा एर्गास्टर मानव उपजाती) हे आदिमानव अठरा ते सहा लक्ष वर्षपूर्व या काळात प्राथमिक स्वरूपाची भाषा व खाणाखुणा वापरत असले तरी मेंदूचा विकास व त्याचा आकार वाढल्यानंतर गेल्या एक लाख वर्षांत खऱ्या अर्थाने भाषेचा उगम झाला. विशेषतः साठ ते चाळीस हजार वर्षांपूर्वी अधिक प्रगत भाषिक व वाचिक कौशल्यांचा विकास घडून आला. त्यानंतर आज जी व्याकरणबद्ध आधुनिक भाषा वापरतो ती गेल्या अवघ्या पंधरा ते वीस हजार वर्षांमध्ये निर्माण झाली.
संदर्भ :
- Bouchard, Denis, The Nature and Origin of Language, Oxford University Press, Oxford, 2013.
- Gong, T.; Shuai, L. & Y. Wu, 2018. ‘Rethinking foundations of language from a multidisciplinary perspective, Physics of Life Reviews, Vol. 26-27, pp. 120-138, 2018.
- Kemmerer, David, ‘Neurolinguistics: Mind, Brain and Language, The Routledge Handbook of Linguistics, (Ed., Allan, K.), Routledge, 2014.
- Mao, T.; Man, Z.; Lin, H. & Yang, C. 2020. ‘How biological elements interact with language: The biolinguistic inquiry’, Frontiers in Bioscience, Vol. 25, pp. 930-947, 2019.
- Sefarth, R. M. & Cheney, Dorothy L. The Social Origin of Language, Princeton University Press, Princeton, 2018.
- गोखले, करुणा, ‘चालता बोलता माणूस’, राजहंस प्रकाशन, पुणे, २०१७.
चित्रसंदर्भ :
- ब्रोकाज एरिया : https://www.researchgate.net/figure/Brocas-Area-Vs-Wernickes-Area-Source_fig1_256001173
- चिंपँझी व मानवी घशाची तुलना : https://www.ling.upenn.edu/courses/ling001/com_bio.html
समीक्षक : सुषमा देव
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.