एक प्रसिद्ध शिवरूप. शिव–पार्वतीचे एकाच देहात उभयरूप म्हणजे अर्धनारीश्वर किंवा अर्धनारीनटेश्वर होय. शिव आणि शक्ती हे संयुक्त तत्त्व सृष्टीचे मूळ आहे. या उभयतांच्या संयोगातून चराचर विश्व निर्माण झाले, अशी समजूत आहे. त्यासंबंधी अनेक कथा लोकमानसात प्रचलित आहेत. शिवागमानुसार शिव आणि शक्ती यांची नित्य समरसता म्हणजेच अद्वैत असे मानले जाते. शक्तियुक्त होतो, तेव्हाच शिव कार्यक्षम बनतो. योनी विकसित करणारा ‘बीजी’ (बीज देणारा) आणि विकासाची शक्ती हे बीज आहे. योनिशिवाय बीज चिरकाल टिकू शकत नाही. त्यामुळे बीजी आणि योनी हे खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहेत.

फार पूर्वी लिंग व योनी ही दोन स्वतंत्र प्रतीके होती. पुढे या दोन्हींचे शिवलिंगात एकीकरण घडवून त्यांची संयुक्त उपासना सुरू झाली. प्रजावृद्धीसाठी स्त्री आणि पुरुष या उभयतांचे एकत्र येणे अपरिहार्य आहे, हाच त्यामागचा आशय आहे. अर्धनारीश्वर रूपाच्या उत्पत्तीसंबंधी ‘शिवपुराणा’त एक कथा आहे; ब्रह्मदेवाने अनेक नर (प्रजापती) निर्माण केले, परंतु त्यांच्याकडून अपेक्षित अशी जीवनिर्मिती होईना तेव्हा त्याने शिवाची प्रार्थना केली. शिव अर्धा नर आणि अर्धी नारी अशा स्वरूपात प्रकट झाला आणि त्याने ब्रह्माला त्याच्या कार्यातील त्रुटी दाखवून दिली. ब्रह्मदेवाने या अर्धनारीश्वर रूपातील शिवाला स्त्रियांची निर्मिती करण्यास सांगितले आणि स्त्रीच्या आगमनानंतर विश्वनिर्मितीचे कार्य सुरळीतपणे होऊ लागले. आणखी एका कथेनुसार, शिवगण भृंगी याने पार्वतीविना केवळ शिवाचीच भक्ती करण्याची, केवळ शिवालाच प्रदक्षिणा घालण्याची प्रतिज्ञा केली होती; हे न आवडल्याने पार्वती आपल्या तपसामर्थ्याने शिवाशी एकरूप झाली.
‘विष्णुधर्मोत्तरपुराण’, ‘अंशुमद्भेदागम’, ‘उत्तरकामिकागम’, ‘पूर्वकारणागम’, ‘सुप्रभेदागम’, ‘शिल्परत्न’ इ. ग्रंथांत अर्धनारीश्वराचे वर्णन आढळते. हेमाद्रीनेही ही प्रतिमा कशी घडवावी याचा तपशील ‘चतुर्वर्गचिंतामणी’ या ग्रंथात दिला आहे. त्यानुसार, या प्रतिमेची उजवी बाजू शिवाची (पुरुषरूपी) आणि डावी बाजू शक्तीची (स्त्रीरूपी) असली पाहिजे. ही संपूर्ण प्रतिमा शिरोभूषणापासून ते पायापर्यंत सरळ उभ्या रेषेत विभागली गेली पाहिजे. हातांची संख्या दोन, तीन वा चार असावी. डावीकडील अर्धे शरीर स्त्रीचे घडवावे. तिच्या मस्तकी केशसंभार दाखवावा, कपाळी तिलक असावा. कानात नक्रकुंडल, सर्पकुंडल किंवा साधे कुंडल असावे. स्तन एकच असून तो वाटोळा व घन असावा. पायाच्या घोट्यापर्यंत येणारे वस्त्र नेसवावे. गळ्यात हार, हातात कंकणे व कमरेला मेखला घातलेली दाखवावी. हातात आरसा, कमळ, पोपट यांपैकी काही असावे किंवा, डावा हात कटीवर, अथवा नंदीच्या मस्तकावर ठेवलेला असावा. उजवीकडचे नररूप सर्व लक्षणांनी युक्त असावे. त्याच्या मस्तकी जटाजूट व त्यावर चंद्रकोर असावी. खांद्यावर नागयज्ञोपवित आणि शरीराला भस्मलेपन असावे. तो ऊर्ध्वलिंग असून कमरेला मेखला असावी. त्याने हातात त्रिशूळ, परशु, अंकुश, टंक, कपाल आणि अक्षमाला यांपैकी काही धारण केलेले असावे, एक हात अभय किंवा वरदमुद्रेत असावा.

शिवाचे उजवीकडील शरीर पुरुषाचे व डावीकडील शरीर स्त्रीचे असावे, हा तपशील साधारणत: सर्वमान्य आहे. पण केवळ ‘विष्णुधर्मोत्तरपुराण’ ऊर्ध्वलिंगाचा उल्लेख करते. अशा प्रकारच्या प्रतिमा उत्तर भारतात आढळतात. कलेतिहासतज्ज्ञ सी. शिवराममूर्ती यांच्या मते ही पद्धत ओडिशापर्यंत पाहावयास मिळते, मात्र दक्षिणेत नाही. सर्वप्रथम अर्धनारीश्वर प्रतिमा घडवल्या गेल्या त्या इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात, मथुरेच्या कुषाण कलेत. मथुरा संग्रहालयातील एका शिलापट्टावर एकाच ओळीत अर्धनारीश्वर, विष्णू, गजलक्ष्मी आणि कार्तिकेय कोरलेले आहेत. येथे अर्धनारीश्वर द्विभुज असून त्याच्या हातात आयुध नाही. प्रतिमेचा उजवीकडील भाग पुरुषाचा असून डावीकडील भाग स्त्रीरूपी आहे, तर ऊर्ध्वलिंग आणि योनी यांचे एकत्रित अंकन आहे.
मथुरा संग्रहालयात दोन सुरेख अर्धनारीश्वर प्रतिमा आहेत; मात्र त्यांचे फक्त वरचे भाग आता शिल्लक आहेत. सारनाथ संग्रहालयातही एक गुप्तकालीन सर्वतोभद्र चतुर्भुज अर्धनारीश्वर मूर्ती आहे. अशाच आणखी काही प्रतिमा राजस्थान व मध्य प्रदेश येथेही आढळतात. प्रतिहारकालीन एक उत्कृष्ट प्रतिमा उत्तर प्रदेशातील कनौज येथील शासकीय संग्रहालयात आहे. उभ्या अर्धनारीश्वराच्या उजव्या दोन हातात अनुक्रमे त्रिशूळ व सर्प असून डाव्या हातात आरसा आहे. पायाशी उजवीकडे मनुष्यरूपात नंदी व डावीकडे एक स्थूल गण दिसतो.

बदामी (बादामी), घारापुरी आणि वेरूळ येथील अर्धनारीश्वर प्रतिमा अतिशय भव्य आणि सुबक आहेत. बदामी येथील अर्धनारीश्वर चतुर्भुज असून त्याचा उजवा पाय किंचित दुमडलेला तर डावा पाय ताठ आहे. वरच्या उजव्या आणि डाव्या हातात अनुक्रमे सर्पवेष्टित परशु आणि निलोत्पल असून खालचे दोन्ही हात वीणा सांभाळण्यात गुंतले आहेत. उजवीकडील जटामुकुटावर चंद्रकोर व एक नरमुंड आहे, तर डाव्या बाजूस अलंकारांनी सजलेला करंडमुकुट आहे. उजव्या कानात सर्पकुंडल आहे आणि कमरेपासून खाली हरणाचे कातडे लपेटलेले दिसते, तर डावी बाजू वस्त्राने आवृत्त आहे. तिच्या शेजारी एक स्त्रीप्रतिमा असून तीही आभूषणांनी सजली आहे. तिच्या डाव्या हातात एखादे तबक असावे असे वाटते. शिवाच्या उजवीकडे नंदी आणि त्यामागे अस्थिपंजर अवस्थेतील एक भक्त (बहुदा भृंगी) दिसतो.
सुमारे १७ फूट उंचीची अर्धनारीश्वराची मूर्ती घारापुरी येथे आहे. सुमारे ६ व्या-७ व्या शतकातील ही चतुर्भुज मूर्ती अतिशय भव्य, अनेक देवदेवता, ऋषिमुनी, अष्टदिक्पाल यांनी वेढलेली आहे. तंजावरजवळ कंडियूर येथील शिवमंदिरात चोळ काळातील (९ वे शतक) तीन हातांचा अर्धनारीश्वर बैलाला टेकून बसला आहे. त्याचा एक उजवा हात बैलाच्या डोक्यावर असून वरच्या हातात परशु दिसतो. स्त्रीरूपाच्या हातात कमळ आहे. महाबलिपुरम् येथील धर्मराज रथात असलेल्या प्रतिमेलाही तीन हात आहेत. अशा प्रतिमांमध्ये शिवाचे दोन व पार्वतीचा म्हणून एक हात दर्शविलेला असतो. उत्तर पल्लव काळात अर्धनारीश्वर नंदीवर बसलेला दिसतो. दारासुरम येथील अर्धनारीश्वराची मूर्ती उभी असून त्रिमुख व आठ हातांची आहे.
संदर्भ:
- Banerjea, J. N., Development of Hindu Iconography, University of Calcutta, Calcutta, 1956.
- Rao, T. A. G., Elements of Hindu Iconography, Vol. II, Part I, II, Motilal Banarsidass Publishers Pvt. Ltd., Delhi, 1914; 1997.
- Sriniwasan, P. R. Rare Sculptures of Early Chola Period, Lalitkala, Vol. 5., 1959.
- खरे, ग. ह., ‘मूर्तिविज्ञान’. भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९३९; २०१२.
- जोशी, नी. पु., ‘भारतीय मूर्तिशास्त्र’, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९; २०१३.
- जोशी, महादेवशास्त्री, ‘भारताची मूर्तिकला’, जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, पुणे, १९८०.
- देगलूरकर, गो. बं., ‘घारापुरी दर्शन’ (जोगेश्वरी व मंडपेश्वर लेणींसह), स्नेहल प्रकाशन. पुणे, २०१३.
- देगलूरकर, गो. बं., ‘शिवमूर्तये नमः’, स्नेहल प्रकाशन, पुणे, २०१४.
समीक्षक : श्रीकांत गणवीर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.