भारतातील एक अनुसूचित जमात. ही जमात मुख्यत: मध्य प्रदेशातील होशंगाबाद, पन्ना, साटणा, देवास इत्यादी जिल्ह्यांच्या डोंगराळ भागांत वास्तव्यास आहेत. ‘म’ म्हणजे ‘आपण’ आणि ‘वासी’ म्हणजे ‘रहिवासी’ या दोन शब्दांतून मवासी हा शब्द तयार झाला आहे. त्यांची २०११ च्या जनगणनेनुसार १,०९,००० इतकी लोकसंख्या होती.

मवासी जमातीची परंपरा कोरकू जमातीसारखी आढळून येते. त्यामुळे ही जमात कोरकू जमातीची उपजमात असल्याचे मानले जाते. जमातीत भोवई, सिलू, ढिकू, दारसोवा, काजले इत्यादी कुळी आहेत. काही लोक आपल्या नावात पहिले ठाकूर लावतात. हे लोक मध्यम बांध्याचे असतात. पुरुष धोतर व बंडी किंवा सदरा घालतात, तर महिला लुगडे किंवा साडी व चोळी परिधान करतात. महिला नेहमी डोक्यावर पदर घेतात. काही मवासी मुले आधुनिक पोषाख वापरतात. यांची घरे मातीच्या भिंती असलेली व घरांवर मातीची जुनी खापरे किंवा कवेलू असलेली आढळतात. शैक्षणिक दृष्ट्या ही जमात मागासलेली आहे.

मवासी लोक हे शेती, शेतमजुरी, रोजंदारी, वन वस्तू गोळा करणे इत्यादी कामे करतात. शिकार करणे हा यांचा पूरक व्यवसाय आहे. यांच्यात सरकारी व खाजगी नोकरी करणारे शक्यतो आढळून येत नाहीत. हे लोक शाखाहारी व मांसाहारी असून भात हे यांचे मुख्य अन्न आहे. हे लोक गोमांस सोडून सर्व प्रकारचे मटण खातात. त्यांच्यात बिडी किंवा सिगारेट ओढणे सामान्य बाब आहे. रोजगार कमी असल्याने जमातीत अन्नाची कमतरता दिसून येते. त्यामुळे बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण दिसून येते.

जमातीची एक पारंपरिक पंचायत समिती असते. मवासी जमातीत लग्नासाठी बोली लावली जाते आणि नंतर लग्न ठरविली जाते. हे लोक हिंदूप्रमाणे सण व उत्सव साजरे करतात.

जमातीत मृत व्यक्तीचे दहन करतात.

संदर्भ : Singh, K. S., People Of India, Oxford University Press, 1998.

समीक्षक : लता छत्रे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.