भूकवचाला घड्या पडून किंवा त्याचे वलीभवन (वलीकरण) होऊन जे पर्वत निर्माण होतात, त्यांना वली पर्वत किंवा घडी पर्वत म्हणून ओळखले जाते. भूपट्ट सांरचनिकी सिद्धांतानुसार पृथ्वीचे भूकवच हे एकूण सहा मोठ्या आणि सुमारे बारा लहान तुकड्यांचे म्हणजे भूपट्टांचे किंवा भूमंचांचे मिळून बनले आहे. सहा मोठ्या भूपट्टांना अमेरिकन, आफ्रिकन, यूरेशियन, भारतीय-ऑस्ट्रेलियन (इंडो-ऑस्ट्रल), पॅसिफिक व अंटार्क्टिक अशी नावे आहेत. लहान भूपट्टांनाही वेगवेगळी नावे आहेत. पॅसिफिक भूपट्टाप्रमाणे एखाद्या भूपट्टाच्या क्षेत्रामध्ये केवळ महासागर असू शकतो, यूरेशियन भूपट्टाप्रमाणे केवळ भूखंड असू शकते किंवा भारतीय भूपट्टाप्रमाणे महासागर व भूखंड असे दोन्ही असू शकतात. यास वलित पर्वत असेही म्हणतात.
प्रत्येक भूपट्टाच्या कडांवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्य चालू असते. भूपट्टांच्या सीमा पृथ्वीवरील ज्वालामुखींचे व निरनिराळ्या सांरचनिक घटकांचे उगमस्थान आहेत. भूपट्टांच्या मंद गतीने परंतु सातत्याने होणाऱ्या विशिष्ट दिशांतील हालचालींमुळे त्यांच्या सीमारेषेच्या भागात पर्वत निर्माणकारी (गिरिजनक) हालचाली घडून येतात. जेव्हा दोन भूपट्ट एकमेकांकडे सरकतात, तेव्हा त्यांच्या सीमारेषेवर दाब पडून फुगवटा आल्याप्रमाणे किंवा वळ्या (घड्या) पडल्याप्रमाणे पर्वतरांगा निर्माण होतात, त्यांनाच वली पर्वत असे संबोधले जाते. टेबलावर अंथरलेल्या कापडाला (टेबल क्लॉथ) किंवा जमिनीवर अंथरलेल्या सतरंजीला एका बाजूने दाब दिला असता ज्याप्रमाणे त्या कापडाला किंवा सतरंजीला वळ्या पडतात, तशीच वलीकरणाची प्रक्रिया दोन भूपट्टांच्या सीमारेषेवर घडत असते. घडी पर्वतात एकमेकांना समांतर पर्वतरांगा आणि त्यांदरम्यान खोल दऱ्या अशी या पर्वतरांगांची रचना असते. वली पर्वतातील उंचवट्याच्या भागाला उद्वली, तर खोलगट भागाला अधोवली असे म्हणतात. जगातील बहुतेक मोठ्या पर्वतश्रेणींची उत्पत्ती वलीकरणाच्या वा घड्या पडण्याच्या प्रक्रियेतून झालेली आहे. हिमालय, हिंदुकुश, एल्ब्रुस, झॅग्रॉस, व्हर्खोयान्स्क (आशिया), आल्प्स, कार्पेथियन, ॲपेनाइन, दिनारिक (यूरोप), अँडीज (दक्षिण अमेरिका), रॉकी, अलास्का पर्वत (उत्तर अमेरिका), सिएरा माद्रे (मध्य अमेरिका) ही घडीच्या पर्वताची प्रमुख उदाहरणे आहेत.
सामान्यपणे भूखंडाच्या क्षेत्रातील भूपृष्ठाच्या घनतेच्या मानाने महासागरी क्षेत्रातील भूपृष्ठाची घनता जास्त असते. त्यामुळे महासागरी व भूखंडीय भूपट्ट एकमेकांना धडकतात, तेव्हा जड महासागरी भूपृष्ठ हलक्या भूखंडीय भूपृष्ठाच्या खाली घुसून (अधोगमन होऊन) भूपृष्ठाच्या खाली असलेल्या प्रावरणात विलीन होते. भूखंड धारण करणारा भूपट्ट जेव्हा महासागरी भूपट्टाला लागून असतो, तेव्हा कमी घनतेमुळे तो महासागरी भूपट्टावर आरूढ होतो, तेव्हा त्यांच्या कडांवर वलीकरण क्रिया घडून वली पर्वतांची निर्मिती होते. अँडीज पर्वत हे याचे एक उदाहरण होय. अत्यंत दीर्घकाळ चालणाऱ्या या जटिल (गुंतागुंतीच्या) प्रक्रियेला किंवा हालचालीला गिरिजनन असे नाव आहे. वलित (घड्या पडून निर्माण झालेल्या) पर्वतांच्या निर्मितीच्या सुरुवातीला भूखंडानजीकचा उथळ सागराचा तळ हळूहळू खाली वाकविला जाऊन पन्हाळीसारख्या भूद्रोणी तयार होतात व त्यांच्यात १२ ते १५ किमी. जाडीचे अवसाद (गाळ) साचविले जातात. पृथ्वीच्या कवचाच्या ज्या हालचालीमुळे भूद्रोणी निर्माण होतात, त्याच हालचालींचा पर्याप्त परिणाम म्हणून पुढे त्यांतील गाळांच्या थरांवर क्षैतिज म्हणजे आडव्या दिशेने दाब येऊन त्यांना घड्या पडतात. भूद्रोणी तयार होण्यास सुरुवात होण्यापासून तो तिच्यातील गाळाच्या थरांना घड्या पडून ते वरच्या दिशेने उंचावले जाण्यापर्यंतचा गिरिजननाचा काळ कित्येक लक्ष वर्षांचा असू शकतो. हिमालय, अॅपालॅचिअन पर्वत (उत्तर अमेरिका), आल्प्स ही गिरिजननाने निर्माण झालेल्या वलित पर्वतांची उत्तम उदाहरणे आहेत. भारताच्या उत्तर सीमेवर असणारा हिमालय पर्वत दक्षिणेकडील भारतीय भूपट्ट आणि उत्तरेकडील यूरेशियन भूपट्ट यांच्या सीमारेषेवर निर्माण झालेला आहे. अॅल्फ्रेड व्हेगेनर (वॅगनर) यांच्या खंडविप्लव (वहन) सिद्धांतानुसार दक्षिणेकडील गोंडवनभूमी (गोंडवानालँड) हे भूखंड उत्तरेकडील लॉरेशिया (अंगारालँड) भूखंडाकडे सरकू लागल्यामुळे दोन्ही खंडे एकमेकांजवळ येऊ लागली. परिणामत: त्या वेळी त्यांच्या दरम्यान असणाऱ्या टेथिस समुद्राखालील गाळाच्या (स्तरित) खडकांवर दाब पडून तेथील भूकवचाला वळ्या पडू लागल्या. दाब जसजसा वाढत गेला, तसतशा वळ्या उंचावत गेल्या. ही पर्वतनिर्माणकारी हालचाल सुमारे ५० द. ल. वर्षांपूर्वी सुरू झाली असावी. हे वलीकरण अगदी दीर्घकाळपर्यंत चालू राहून टेथिस समुद्राच्या जागेवर एकमेकींना समांतर अशा उंच हिमालयीन पर्वतश्रेण्या अस्तित्वात आल्या. साधारणपणे वली पर्वत भूखंडाच्या सीमारेषेवर महासागरालगत निर्माण झालेल्या भूद्रोणीच्या जागेवर झालेले असल्याने उत्तर व दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला, पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यालगत रॉकी व अँडीज हे पर्वत उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेले आढळतात. तसेच आल्प्स पर्वत भूमध्य समुद्राच्या उत्तर किनाऱ्यालगत, तर हिमालय पूर्वीच्या टेथिस समुद्राच्या किनाऱ्यालगत पूर्व-पश्चिम दिशेत पसरले आहेत. गाळाच्या खडकाला वळ्या पडून त्यांची निर्मिती होत असल्यामुळे भूकवचात प्रामुख्याने गाळाचे खडक, त्याबरोबरच रूपांतरित खडकही आढळतात. येथील भूकवचात शेल, चुनखडक, पट्टिताश्म इत्यादी खडक आढळतात. अँडीज हा जगातील सर्वांत लांब वली पर्वत आहे.
वलित पर्वतश्रेणींचा अनुप्रस्थ (आडवा) छेद घेतल्यास दोहो बाजूंना जटिल वलीकरण झालेल्या पर्वतांच्या रांगा आणि मध्याशी त्या मानाने कमी वलीकरण झालेला, उंचावलेला पठारी प्रदेश आढळतो. मूळ भूद्रोणीच्या दोहो बाजूंना असणाऱ्या कणखर भूभागांना अग्रभूमी म्हणतात. मध्य आशियातील हिमालय पर्वत हे या रचनेचे उत्तम उदाहरण आहे. या वलित पर्वतश्रेणींच्या प्रमुख रांगा पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या असून, त्यांपैकी उत्तरेकडे कुनलुन रांगा व दक्षिणेकडे हिमालय रांगा आहेत. त्यांच्या मधील भागात तिबेटचे पठार आहे. कुनलुनच्या उत्तरेस असणारे तारीम खोरे आणि हिमालयाच्या दक्षिणेकडचे सिंधु-गंगेचे खोरे हे अग्रभूमीचे भाग आहेत.
वली पर्वतांची निर्मिती होण्याची क्रिया पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तीनदा घडली असावी, असे भूशास्त्रज्ञांचे मत आहे. वलित पर्वतांपैकी सध्या दिसणाऱ्या बहुतेक मोठ्या पर्वतश्रेणी क्रिटेशसपासून ते होलोसीनपर्यंतच्या (सुमारे १४ कोटी वर्षांपूर्वीपासून ते १० हजार वर्षांपूर्वीपर्यंतच्या) काळात घडून आलेल्या अल्पाइन गिरिजनन क्रियेने निर्माण झालेल्या आहेत. त्यांचे आज दिसणारे उठावाचे स्थलरूप तर गेल्या ७० लक्ष वर्षांत घडून आलेल्या उत्थान (उंचवण्याच्या) व क्षरण (झीज) यांच्या क्रियांमुळे तयार झालेले आहे. भूवैज्ञानिक दृष्ट्या प्राचीन म्हणजे पुराजीव महाकल्पातील (सुमारे ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) हेर्सिनियन आणि कॅलेडोनियन गिरिजनांनी, तसेच कँब्रियन पूर्व (सुमारे ६० कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील पॅन आफ्रिकन, ग्रेनव्हिल, हडसोनियन इत्यादी गिरिजनांनी निर्माण झालेल्या पर्वतश्रेणींचे उंचावलेले भाग झिजून आता फक्त पायाचे भाग शिल्लक राहिलेले दिसतात. वयानुसार वली पर्वतांच्या निर्मितीचे एकूण तीन प्रकार पडतात.
- (१) अति प्राचीन घडीचे पर्वत : अति प्राचीन काळात निर्माण झालेल्या वली पर्वतांना प्राचीन घडीचे पर्वत असे म्हणतात. या पर्वतांची निर्मिती सुमारे २२५ दशलक्ष ते ६०० दशलक्ष वर्षांपूर्वी पुराजीव महाकल्पात झाली असावी. या पर्वतांच्या निर्मितीची सुरुवात ज्या भूहालचालींमुळे झाली, त्या भूहालचालींना ‘कॅलेडोनियन भूहालचाली’ म्हणून ओळखतात. कॅलेडोनियन भूहालचालींवरून या कालखंडाला ‘कॅलेडोनियन कालखंड’ म्हणून ओळखतात. या कालखंडात निर्माण झालेले पर्वत प्रामुख्याने कॅनडातील लॉरेनचन व ॲल्गोमा पर्वतापासून ते ब्रिटिश बेटे व पुढे स्कँडिनेव्हियापर्यंत पसरले आहेत.
- (२) प्राचीन घडीचे पर्वत : प्राचीन कालखंडात निर्माण झालेल्या वली पर्वतांना मध्यजीव महाकल्पकालीन वलीपर्वत म्हणतात. या पर्वतांची निर्मिती तृतीयक कालखंडाच्या आधी (सुमारे ६० दशलक्ष वर्षांपूर्वी) झाली असावी. कॅलेडोनियन, हर्सेनियन, लॅरामाइड आणि सेवियर या भूहालचालींमुळे यांची निर्मिती झाली आहे. हे पर्वत भूसांरचनिक क्रियेच्या दृष्टीने अत्यंत स्थिर असून दीर्घ काळापासून त्यावर अनाच्छादनाची क्रिया सतत चालू असल्यामुळे त्यांचे रूपांतर आता अवशिष्ट पर्वत प्रकारात झालेले आहे. आशिया खंडाच्या ईशान्य भागातील अल्ताई, दक्षिण आफ्रिकेतील ड्रेकन्सबर्ग, ऑस्ट्रेलियातील ग्रेट डिव्हायडिंग रेंज, उत्तर अमेरिकेतील अॅपालॅचिअन, रशियातील उरल, भारतातील अरवली इत्यादी पर्वत प्राचीन घडीचे पर्वत आहेत. विदारण आणि क्षरण कार्यामुळे उरल व अॅपालॅचिअन पर्वतांचे रूपांतर आता अवशिष्ट पर्वत प्रकारात झालेले आहे.
- (३) अर्वाचीन घडीचे पर्वत : मध्यजीव महायुग संपल्यानंतर तृतीयक कालखंडात (सुमारे ६६ ते २६ दशलक्ष वर्षांपूर्वी) पृथ्वीच्या पृष्ठभागावर पर्वतनिर्माणकारी हालचालींमुळे जे घडीचे पर्वत निर्माण झाले, त्यांना अर्वाचीन वली पर्वत असे म्हटले जाते. आपण या पर्वतांना अर्वाचीन पर्वत म्हणत असलो, तरी त्यांच्या निर्मितीला लक्षावधी वर्षे होऊन गेली आहेत. या अर्वाचीन वली पर्वतांना ‘अल्पाइन वली पर्वत’ म्हणूनही ओळखतात. या पर्वताच्या नावावरून हे पर्वत ज्या काळात निर्माण झाले, त्या काळाला ‘अल्पाइन कालखंड’ म्हणतात. या अल्पाइन पर्वतात जगातील सर्वांत उंच पर्वतशिखरे आढळतात. उदा., मौंट एव्हरेस्ट. या पर्वतांची निर्मिती झाल्यापासून त्यांची उंची सतत वाढत आहे. म्हणून या युगातील सर्व पर्वत अजूनही विकसित अवस्थेत असल्यामुळे त्यांना तरुण पर्वत असेही संबोधले जाते. जगातील सर्व ज्वालामुखीची शिखरे, तसेच भूकंपाचे पट्टे याच पर्वतप्रणालीतून गेलेले आहेत. हे सर्व घडीचे पर्वत गाळाच्या थरांचे बनलेले आहेत. यात मुख्यत्वेकरून पंकाश्म, वालुकाश्म व चुनखडक यांचे प्रमाण जास्त आढळते. या सर्व पर्वतांत तांबे, कथिल, सोने, जिप्सम, इतर धातू आणि खनिज तेल यांचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत.
वली पर्वताची वैशिष्ट्ये : वली पर्वतांमध्ये पुढील वैशिष्ट्ये आढळतात.
- पृथ्वीवरील सर्व वली पर्वत सर्वांत तरुण असून ते स्तरित खडकांना वळ्या पडून निर्माण झाले आहेत.
- या सर्व पर्वतांमध्ये प्राण्यांचे व वनस्पतींचे अवशेष आढळतात.
- या सर्व पर्वतांची लांबी अधिक असून रुंदी त्यामानाने कमी आहे. उदा., हिमालय पर्वताची पूर्व-पश्चिम लांबी २,४०० किमी. असून रुंदी मात्र ४०० किमी. आहे.
- या सर्व पर्वतांत आढळणाऱ्या समान वयाच्या गाळाच्या खडकांच्या थरांची जाडी जास्तीत जास्त असते. उदा., आल्प्स पर्वतात ही जाडी त्याच्या तळापासून सुमारे १२ किमी. इतकी आढळते. सर्व वली पर्वतांची उत्पत्ती भूद्रोणींच्या क्षेत्रात, उथळ समुद्रात झाली आहे. भूद्रोणींच्या तळावर गाळाचे थर एकावर एक सातत्याने हळूहळू साचून व दाब पडून गाळाची जाडी वाढत गेली आहे.
- वली पर्वतांच्या अंतर्गत भागात महाप्रचंड अशा ग्रॅनाइट खडकाचे अंतर्वेशन झालेले असून ते पर्वतरांगेच्या अनुषंगाने कित्येक किमी. लांबीपर्यंत पसरलेले आहे.
- बहुतेक सर्व वली पर्वतांचा आकार वक्राकार असून त्यांच्या एका बाजूचा उतार अंतर्वक्र, तर बाह्य उतार बहिर्वक्र स्वरूपाचा असतो. उदा., हिमालय पर्वत.
- वली पर्वतात आढळणारे संरचनात्मक भूविशेष पर्वत निर्मितीच्या काळात पडलेल्या प्रचंड दाब व उष्णता यांचे परिणाम आहेत. त्यामुळे वली पर्वतात विविध आकाराच्या वळ्या आढळतात. उदा., संमित वळ्या, असंमित वळ्या, एक प्रवणक वळ्या, समनत वळ्या, असमनत वळ्या, परिवलित वळ्या, पंखाकृती वळ्या, ग्रीवाखंड इत्यादी.
- सर्व वली पर्वतांची निर्मिती भूपट्टांच्या अभिसारी सीमाभागात झालेली असल्यामुळे या भागात भूभ्रंशमूलक प्रक्रिया सतत सक्रीय असतात. त्यामुळे जगातील सर्व वली पर्वत भूकंप व ज्वालामुखीप्रवण क्षेत्र बनले आहेत.
- जगातील सर्व वली पर्वतात खनिज संपत्तीचे प्रचंड साठे आढळतात. त्यात प्रामुख्याने कथिल, तांबे, सोने, शिसे, जस्त, चांदी, चुनखडी, जिप्सम, खनिज तेल, नैसर्गिक वायू इत्यादींचे साठे आढळतात.
संदर्भ : Monkhouse, F. J., Principles of Physical Geography, New York, 1970.
समीक्षक : शंकर चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.