ऑस्ट्रेलियातील सर्वांत मोठी पर्वतश्रेणी. ही देशाच्या पूर्व भागात उत्तर-दक्षिण पसरलेली असून जगातील भूभागावरील सर्वांत लांब श्रेण्यांपैकी ही तिसर्‍या क्रमांकाची आहे. ईस्टर्न हायलँड्स, ईस्टर्न कॉर्डिलेरा, ग्रेट डिव्हाइड या नावांनीही ही श्रेणी ओळखली जाते. ऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्व आणि आग्नेय किनार्‍याला समांतर अशी ही श्रेणी पसरली असून किनार्‍यावरील क्वीन्सलँड, न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या राज्यांत तिचा विस्तार आढळतो. पर्वतश्रेणीची उत्तर-दक्षिण लांबी ३,७०० किमी., रूंदी १६० ते ३०० किमी. आणि स. स.पासून उंची ३०० ते १,६०० मी.च्या दरम्यान आढळते. उत्तर भागात ही श्रेणी किनार्‍यापासून जवळ, तर दक्षिण भागात किनार्‍यापासून आत सु. १६० किमी. वर आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक उंचीचे प्रदेश या पर्वतश्रेणीत असून तिच्यामुळे खंडाचा पूर्व किनारा उर्वरित अंतर्गत कमी उंचीच्या व ओसाड प्रदेशापासून अलग झाला आहे. ग्रेट डिव्हायडिंग रेंज ही एकच सलग पर्वतश्रेणी नसून तिच्यात अनेक पठारमाला, कमी उंचीच्या पर्वतरांगा, सोंडा, तुटलेल्या कड्यांचे प्रदेश, उच्चभूमी प्रदेश, घळ्या, टेकड्या, उन्नत खळगे इत्यादी भूविशेष आढळतात. या श्रेणीच्या मध्यवर्ती माथ्याच्या भागात शेकडो शिखरे असून ती लहानलहान पर्वतरांगा, सोंडा, कॅन्यन, घळ्या, दर्‍या  व मैदानी भागांनी वेढलेली आढळतात.

भूशास्त्रीय आणि भूरचनेच्या दृष्टीने ही श्रेणी जटिल आहे. सुमारे ३०० द. ल. वर्षांपूर्वीच्या कार्बोनिफेरस कालखंडात या पर्वतश्रेणीची निर्मिती झाल्याचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियाच्या अगदी उत्तर भागात असलेल्या क्वीन्सलँड राज्यातील केप यॉर्क द्वीपकल्पाच्या अगदी उत्तर टोकापासून या श्रेणीला सुरुवात होते. त्या राज्यात श्रेणीची सरासरी उंची ६०० ते ९०० मी.च्या दरम्यान असून बेलंडन कर व मकफर्सन या दोन पर्वतरांगांत आणि लॅमिंग्टन पठारावर तिची उंची १,५०० मी.पर्यंत वाढलेली आढळते. त्यानंतरच्या दक्षिणेकडील उच्चभूमीची सरासरी उंची ९०० मी. आहे. न्यू साउथ वेल्स राज्याच्या दक्षिण भागातील आणि व्हिक्टोरिया राज्याच्या पूर्व भागातील अधिक उंचीच्या पर्वतराजीला ऑस्ट्रेलियन आल्प्स या नावाने ओळखले जाते. याच पर्वतराजीत देशातील उंचउंच शिखरे आढळतात. मौंट कॉझिस्को (उंची २,२२८ मी.) हे ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर याच भागात आहे. दक्षिण आल्प्समध्ये विस्तृत हिमक्षेत्रे आढळतात. ग्रेट डिव्हायडिंग रेंजची न्यू साउथ वेल्समधील विच्छिन्न, वालुकाश्मयुक्त पर्वतश्रेणी ब्लू मौंटन किंवा ग्रेट ब्लू मौंटन किंवा ब्लू प्लॅटो या नावांनी ओळखली जाते. अगदी दक्षिण भागातील व्हिक्टोरिया राज्यात ग्रेट डिव्हायडिंग रेंजमधील उच्चभूमी प्रदेश पश्चिमेकडे वळून राज्याच्या पश्चिम भागात असलेल्या ग्रॅमपीअन्झ या पर्वतात विलिन होतो; परंतु ग्रेट डिव्हायडिंग रेंजची दक्षिणेकडे गेलेली सोंड बॅस सामुद्रधुनीपासून पुढे वाढत जाऊन टास्मानिया बेटावर मध्यवर्ती उच्चभूमीच्या स्वरूपात दिसते.

ब्लू मौंटन : एक दृष्य

ही श्रेणी ऑस्ट्रेलियातील प्रमुख जलविभाजक आहे. या श्रेणीमुळे पश्चिमवाहिनी आणि पूर्ववाहिनी या दोन नदीप्रणाली वेगळ्या झाल्या आहेत. त्यामुळे या पर्वतश्रेणीला ग्रेट डिव्हायडिंग रेंज हे नाव पडले आहे. त्यांपैकी मरी व डार्लिंग या नद्यांच्या खोर्‍यांकडे जाणार्‍या पश्चिमवाहिनी नद्या अधिक लांबीच्या, तर  पॅसिफिक महासागराकडे जाणार्‍या पूर्ववाहिनी नद्या कमी लांबीच्या आहेत. अनेक नद्यांचे शीर्षप्रवाह या श्रेणीमध्ये आढळतात. मरी, डार्लिंग, लाक्लन, मरमबिजी, गोल्बर्न, कांडमाइन, फ्लिंडर्झ, हर्बर्ट, मॅकडॉनाल्ड, मॅकिनटायर, नॅमॉई या प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या आणि हेस्टिंग्ज, बर्दिकन, ब्रिस्बेन, रिचमंड, हॉक्सबरी, स्नोई, शोआलहेवन या पूर्ववाहिनी नद्या या पर्वतश्रेणीत उगम पावतात. त्यांपैकी स्नोई ही नदी ग्रेट डिव्हायडिंगमधील स्नोई या पर्वतरांगेतील कॉझिस्को शिखराजवळ उगम पावून तेथील तीव्र पूर्व उतारावरून प्रथम आग्नेयीस, त्यानंतर पश्चिमेस आणि शेवटी दक्षिणेस वाहत जाऊन बॅस सामुद्रधुनीला मिळते. पर्वताच्या उत्तर भागातील पश्चिम उतारावरून वाहणार्‍या नद्या कार्पेंटेरिया आखाताला मिळतात. अनेक नद्यांवर जलसिंचन व जलविद्युतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आले असून यांतील पाणी शुष्क प्रदेशाला पुरविले जाते. अपर निपीअन, स्नोई मौंटन्स, वॉरगंबा धरण हे या पर्वतश्रेणीतील प्रमुख प्रकल्प आहेत.

उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीचा ऑस्ट्रेलियाच्या हवामानावर विशेषत: वर्षणावर परिणाम झालेला आहे. येथील वनस्पती आणि प्राणिजीवनात खूपच विविधता आढळते. येथील पर्वतीय आणि पठारी भागांत चुनखडक, वालुकाश्म, क्वार्टझाइट, सुभाजा, डोलोनाइट इत्यादी प्रकारची खडकरचना आढळते. या श्रेणीतील काही उच्चभूमी प्रदेश तुलनेने सपाट, पाण्याची उपलब्धता असणारे असून ते शेती व चराऊ कुरणांसाठी महत्त्वाचे आहेत. या निसर्गसुंदर पर्वतश्रेणीतील राष्ट्रीय उद्याने, बर्फावरील खेळांचे (स्कीइंग) प्रदेश ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. विशेषत: ब्लू पर्वत त्यासाठी प्रसिद्ध आहे. न्यू साउथ वेल्समधील ब्लू पर्वतीय प्रदेशात ब्लू मौंटन नॅशनल पार्क हे २,६७,९५४ हेक्टर क्षेत्रात विस्तारलेले राष्ट्रीय उद्यान असून २००७ मध्ये त्याचा समावेश जागतिक वारसा स्थळांत करण्यात आलेला आहे. अल्पाइन, ग्रॅमपीअन्झ ही इतर राष्ट्रीय उद्याने ग्रेट डिव्हायडिंग रेंजमध्ये आहेत. पर्वतश्रेणीच्या पश्चिमेकडील प्रदेश कृषी (गुरचराई, मिश्रशेती, फलोद्यान), लाकूडतोड आणि खाणकामांसाठी प्रसिद्ध आहे. ॲथर्टन, तवुंबा, आर्मडेल, ओबरॉन, गोलबर्न, कॅनबेरा, ऑमीओ ही या पर्वतीय भागातील महत्त्वाची नगरे आहेत. पर्वतश्रेणी ओलांडून जाणारे अनेक रस्ते, महामार्ग व लोहमार्ग काढण्यात आलेले आहेत.

सुमारे १४,००० वर्षांपूर्वी या पर्वतीय प्रदेशात मूळ ऑस्ट्रेलियन जमातींचे वास्तव्य असल्याचे वेगवेगळे पुरावे मिळाले आहेत. उदा., त्यांच्या वस्तीची ठिकाणे, दगडाची व इतर हत्यारे, दगडांवरील खोदकाम इत्यादी. इ. स. १७८८ मध्ये यूरोपीयनांनी येथील किनार्‍यावर वसाहती स्थापन केल्या; परंतु या पर्वताच्या पश्चिम भागाकडे स्थलांतर करण्यात त्यांना या पर्वतश्रेणीचा अडथळा ठरत होता. इ. स. १८१३ मध्ये ग्रेगरी ब्लॅक्सलँड, विल्यम चार्ल्स वेंटवर्थ आणि विल्यम लॉसन यांच्या पथकाने सोईस्कर मार्गांचा शोध घेऊन पहिल्यांदा ही पर्वतश्रेणी ओलांडली. तेव्हापासून यूरोपीयनांचे अंतर्गत भागाकडील स्थलांतर आणि तेथील शेती व्यवसायास प्रारंभ झाला.

समीक्षक : माधव चौंडे