मध्य आशियातील एक प्रमुख पर्वतश्रेणी. पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये पसरलेल्या या पर्वताची लांबी सुमारे ८०० किमी. व सरासरी रुंदी सुमारे २४० किमी. आहे. पर्वताची सरासरी उंची सस.पासून ४,५०० मी. असून त्यातील काही उंच शिखरे ५,५०० मी.च्या दरम्यान आहेत. पाकिस्तान-अफगाणिस्तान सहरहद्दीजवळ असलेले तीरिच मीर (७,६९२. मी.) हे हिंदुकुशमधील सर्वोच्च शिखर पूर्व हिंदुकुशमध्ये आहे. पुराणांत उल्लेखिलेले निषाद पर्वत, माल्यवत ही हिंदुकुश पर्वताचीच नावे असावीत, असे तज्ज्ञांचे मत आहे. या पर्वतावर सदैव बर्फ साचून राहत असल्यामुळे त्याला चंद्राचा पर्वत (मौंटन्स ऑफ द मून) असेही म्हणतात. हिंदुकुश या नावाबद्दल वेगवेगळी मते आढळतात. कुश म्हणजे मृत्यू. या पर्वतश्रेणीतील अतिशय धोकादायक खिंडींमुळे कुश हा शब्द वापरला गेला असावा. हिंदुकुशचा शब्दश: अर्थ ‘हिंदू नाशक’ (किल्स द हिंदू) असा केला गेला आहे. पूर्वी भारतीय उपखंडातील गुलामांना मध्य आशियातील मुस्लिम दरबारात हजर करण्यासाठी नेले जात असे. अफगाणिस्तानातील या अतिशय ओबडधोबड व रुक्ष पर्वतश्रेणीतील प्रतिकूल वातावरणात त्यांपैकी बरेचजण मृत्युमुखी पडत. त्यावरून याला हिंदुकुश हे नाव आले असावे, असेही मानले जाते. हिंदुस्थानचा पर्वत म्हणून हिंदुकुश अशीही या नावाची एक शक्यता वर्तविली जाते. ऐतिहासिक दृष्ट्या अगदी तरुण पर्वत म्हणून हिंदुकुश असेही मानले जाते. इ. स. सुमारे १००० मध्ये पहिल्यांदा हा पर्वत नकाशात दाखविण्यात आला.
भूगर्भरचना : हिंदुकुश पर्वताची भूगर्भरचना पूर्वेकडील काराकोरम पर्वतासारखीच आहे. हिंदुकुश हा काराकोरम श्रेणीचाच एक भाग असल्याचे काही तज्ज्ञ मानतात. सुमारे ५० द. ल. वर्षांपूर्वी भारतीय व यूरेशियन भूपट्ट एकमेकांकडे सरकताना झालेल्या टकरीमुळे हिमालयाबरोबरच या दोन्ही पर्वतांची निर्मिती झाल्याचे मानले जाते. अजूनही हा प्रदेश अस्थिर असल्यामुळे हे जगातील एक मोठे भूकंपप्रवण क्षेत्र बनले आहे. पर्वताचा बराचसा भाग रूपांतरित खडकांनी व्यापला आहे. येथे काही ग्रॅनाइट खडक (अग्निजन्य खडक) आढळत असून त्यांची निर्मिती सुमारे ६५ द. ल. वर्षांपूर्वी झाली असावी.
भूरचना : पामीर नॉटपासून वेगवेगळ्या दिशांना ज्या वेगवेगळ्या पर्वतरांगा गेलेल्या आहेत, त्यांपैकी नैर्ऋत्येस गेलेली पर्वतरांग म्हणजे हिंदुकुश होय. ही पर्वतश्रेणी हिमालयाशी निगडित असली, तरी सिंधू नदीने ती हिमालयापासून अलग केली आहे. त्यामुळे ही स्वतंत्र पर्वतश्रेणी मानली जाते. भारताच्या वायव्य भागात हिमालय पर्वत जेथे संपतो, तेथून हिंदुकुशाला सुरुवात होते. याच्या वायव्येकडील अमुदर्या (पामीर नदी) आणि आग्नेयीकडील सिंधू या दोन नद्यांची खोरी या श्रेणीमुळे अलग झाली आहेत. भारत-पाकिस्तान यांच्या उत्तर सरहद्दीजवळून पश्चिमेस पाकिस्तानात व पुढे अफगाणिस्तानात ही श्रेणी पसरलेली आहे. अफगाणिस्तान व पाकिस्तान यांदरम्यानची काही सरहद्द या श्रेणीने सीमित केली आहे. हिंदुकुशचा सर्वाधिक विस्तार अफगाणिस्तानातच आहे. अफगाणिस्तानात ही श्रेणी कोह-ई-बाबा, पारोपामिसस, सफेद कोह व सिआह कोह या लहान लहान पर्वतरांगांमध्ये विलीन होते. पश्चिमेकडील आर्मेनियन नॉटशी हिंदुकुशचा अप्रत्यक्ष संबंध दिसतो; कारण हिंदुकुश व आर्मेनियन नॉट यांदरम्यान वायव्य अफगाणिस्तानातील
पारोपामिसस, इराणच्या ईशान्य भागातील खोरासान आणि वायव्य भागातील एल्बर्झ या पर्वतश्रेण्या आहेत. हिंदुकुशमध्ये वेगवेगळ्या पर्वतश्रेण्या आहेत. हिंदुकुश पर्वतप्रणालीचे पूर्व, मध्य व पश्चिम हिंदुकुश असे तीन विभाग केले जातात. पूर्व हिंदुकुशचा विस्तार पाकिस्तानात पूर्वेस करंबर (४,३४३ मी.) खिंडीपासून ते पश्चिमेस दोराह किंवा दो राह (४,५५४ मी.) खिंडीपर्यंत आहे. अगदी पूर्व भागातील करंबर व बारोघिल (३,८०४ मी.) या खिंडींदरम्यानचा हिंदुकुशचा भाग विशेष उंच नाही. येथील बरेच पर्वतीय भाग गोल घुमटाकार आहेत. त्याच्या पश्चिमेस या पर्वताची मुख्य श्रेणी एकदम उंचावत गेलेली असून ती अधिक ओबडधोबड बनली आहे. बाबा तांगी येथे ही उंची ६,५१३ मी. पर्यंत वाढलेली आहे. त्यानंतरच्या १६० किमी. पर्यंतच्या भागात सर्वाधिक उंचीचा पर्वतीय भाग आहे. यातील सुमारे बारा शिखरे ७,००० मी. पेक्षा अधिक उंचीची आहेत. पूर्व हिंदुकुशमधील उंच शिखरांचा एक समूह अफगाणिस्तानातील उरगंड (७,०३९ मी.) भोवती, तर दुसरा त्याच्या दक्षिणेस साराघ्रारा (७,३४९ मी.) गिरिपिंडाभोवती आहे. नोशाक (७,४८५ मी.), इस्तोरो नाल (७,३४९ मी.) ही येथील प्रमुख शिखरे आहेत.
मध्य हिंदुकुशचा विस्तार दोराह खिंडीपासून ते काबूलच्या वायव्येस असलेल्या शेबर किंवा शीबर (२,९८७ मी.) खिंडीपर्यंत आहे. याचा बहुतांश भाग अफगाणिस्तानात काबूल शहराच्या उत्तरेस आहे. या पर्वतीय भागामुळे उत्तरेकडील बदख्शान या परंपरागत अफगाण प्रदेशापासून दक्षिणेकडील काबूल नदीच्या वरच्या टप्प्यातील नुरिस्तान व कूहिस्तान (कोहिस्तान) हा प्रदेश वेगळा केला गेला आहे. कोह-ई-बंदाकोर (६,८४३ मी.), कोह-ई-मोंदी (६,२४८ मी.) व मीर समीर (६,०५९ मी.) ही या भागातील अधिक उंचीची शिखरे आहेत. या शिखरांभोवती कमी उंचीच्या पर्वतश्रेण्या आहेत. पुस्तीग्राम (५,००० मी.), वेरान (४,६९४ मी.), राम गोल (४,६९४ मी.) व अंजोमन (४,२२१ मी.) या येथील प्रमुख खिंडी आहेत.
पश्चिम हिंदुकुशचा विस्तार पश्चिम अफगाणिस्तानात हेरात या अफगाण शहरापर्यंत झालेला आढळतो. येथे या भागाला कोह-ई-बाबा असे संबोधले जाते. काबूल, कोहिस्तान, पंजशीर व गोरबंद ही येथील प्रमुख खोरी आहेत. कमी उंचीच्या वेगवेगळ्या पर्वतरांगांमध्ये हा भाग विलीन होत गेलेला दिसतो. कमी उंचीमुळे येथील खिंडींमधून वाहतुकीचे मार्ग काढले आहेत. उदा., शेबर खिंड. हिंदु राज हा हिंदुकुशचा चौथा भाग मानला जात असून त्याचा विस्तार पाकिस्तानमध्ये आहे. या भागात लांब व रुंद पर्वतश्रेण्या व उंच शिखरे आहेत. दर्कोट (६, ८४२ मी.), बुनी झोम (६, ५५३ मी.) ही येथील प्रमुख शिखरे आहेत. ही श्रेणी पूर्वेकडून पश्चिमेस काबूल नदीपासून पुढे गेलेली आहे. हा पर्वतीय प्रदेश हिंदुकुशचा भाग मानला, तर पाकिस्तानातील स्वात कुहिस्तान प्रदेशही याच पर्वतप्रणालीचा एक भाग ठरतो.
नदीप्रणाली : हिंदुकुश हा मध्य आशियातील एक प्रमुख जलविभाजक आहे. पूर्व अफगाणिस्तानात या श्रेणीमुळे उत्तरेकडील व दक्षिणेकडील अशा दोन नदीप्रणाली निर्माण झाल्या
आहेत. तुलनात्मक दृष्ट्या उत्तर बाजूवरील नदीप्रणाली साधी, तर दक्षिण बाजूवरील अधिक गुंतागुंतीची आहे. येथे ईशान्य-नैर्ऋत्य व पूर्व-पश्चिमवाहिनी अशा दोन नदीप्रणाली आढळतात. पंजशीर, अलिंगार, कुनार व पंजकोर या नद्या प्रथम ईशान्य-नैर्ऋत्य दिशेस वाहत जाऊन पुढे काबूल नदीला मिळतात. यार्खून व गिझार या नद्या पूर्व-पश्चिम दिशेस वाहतात. चित्रळ नदी पूर्व हिंदुकुशच्या दक्षिण उताराचे जलवहन करते. ही नदी उत्तर पाकिस्तानातील चित्रळ प्रदेशातून वाहत जाऊन कुनार नदीला मिळते. कोटगाझ, निरोधी, आत्रेक व तीरिच या पूर्व हिंदुकुशमधील महत्त्वाच्या हिमनद्या आहेत. उन्हाळ्यात पर्वतीय प्रदेशातील बर्फ वितळून येथील नद्यांना पाणीपुरवठा होतो.
हवामान : हिंदुकुशच्या संपूर्ण श्रेणीचा विचार करता वेगवेगळ्या भागांतील हवामानात बरीच तफावत आढळते. साधारणपणे ४,५०० मी. पेक्षा अधिक उंचीची सदा हिमाच्छादित शिखरे वगळता इतरत्र हवामान कोरडे आहे. हिवाळ्यात कडाक्याची थंडी, तर उन्हाळ्यात कमी उंचीच्या पर्वत उतारांवर बरेच उष्ण हवामान असते. पूर्व हिंदुकुशचे स्थान आशियाई मोसमी हवामानाच्या प्रदेशाला लागून असल्यामुळे तेथे उन्हाळ्यात (जुलै ते सप्टेंबर) पर्जन्य किंवा हिमवृष्टी होते, तर हिवाळे कोरडे असतात. याउलट, मध्य व पश्चिम हिंदुकुशचे स्थान भूमध्य सागरी हवामानालगत असल्यामुळे तेथील उन्हाळे उष्ण व कोरडे, तर हिवाळे (डिसेंबर ते मध्य मार्च) थंड, आर्द्र, पर्जन्य व हिमवृष्टिमय असतात. या पर्वतीय प्रदेशात वृष्टी सामान्यपणे हिमस्वरूपात होत असून उंचीनुसार त्यात तफावत आढळते. अगदी पूर्व भागात, पाकिस्तानमध्ये या पर्वतीय भागावर फार मोठे हिमाच्छादन असते. याच भागात चिअंतर हिमनदी आहे. त्याशिवाय तीरिच मीर शिखराभोवतालच्या अधिक उंचीच्या भागातही तुफान हिमवृष्टी होत असते.
वनस्पती व प्राणी : हिंदुकुशमध्ये वनस्पतिजीवन मर्यादित आहे. मध्य व पूर्व हिंदुकुशच्या दक्षिण उतारावर वनाच्छादन आढळते. या भागात हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होते, तर उन्हाळ्याच्या मोसमी हवामानकाळात अधूनमधून वृष्टी होते.
पाकिस्तानच्या अगदी उत्तर भागात असलेल्या चित्रळ जिल्ह्यात तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट जिल्ह्यातील पर्वतीय प्रदेशातील कमी उंचीच्या उतारांवर वृष्टी तुरळक प्रमाणात होते. या भागात मर्यादित प्रमाणात जूनिपर व बर्च वृक्ष आढळतात. देवदार, सीडार व निळा पाइन यांचे विस्तृत पट्टे पाकिस्तान व अफगाणिस्तानातील पूर्व व मध्य हिंदुकुशातील कटकांवर आढळतात. पश्चिम हिंदुकुशमध्ये अरण्ये नाहीत. त्याऐवजी त्या भागात पॉप्लर, विलो, रशियन ऑलिव्ह अशा चारा वनस्पतींचे उत्पादन घेतले जाते. पर्वतीय भागातील जलसिंचित मरूद्यानांत प्लेन वृक्ष तसेच आर्थिक दृष्ट्या उपयुक्त अशा तुती, बोर, वॉलनट या वृक्षांची लागवड केली जाते. पर्वतउतारांवर जेथे बर्फ साचलेले असते, अशा भागांत अधूनमधून कुरणांचे प्रदेश आढळतात. याच प्रदेशांत उन्हाळ्यात कधीकधी स्थानिक तसेच हंगामी स्थलांतरित लोक पिकांची लागवड करतात. स्वात व दीर जिल्ह्यांतील खोऱ्यांमध्ये तसेच चित्रळ जिल्ह्याच्या काही भागात भातशेती केली जाते. उंचसखल प्रदेशातील गवताळ भूमीला पामीर असे संबोधले जात असून हा प्रदेश पूर्व हिंदुकुशमध्ये वृक्षरेषेच्या वर आढळतो. उत्तर उतारांवर वनस्पती विरळ आहेत. पश्चिम भागात कमी पर्जन्याच्या प्रदेशात अधिक उंचीच्या उतारांवर पशुपालन व्यवसाय चालतो.
सायबीरियन आयबेक्स व मारखोर या रानटी शेळ्या पर्वताच्या उंच भागांत, तर उंच पामीर प्रदेशात मार्को पोलो व यूरीअल या रानटी मेंढ्या आढळतात. एकाकी खोऱ्यांत काळी आणि तपकिरी अस्वले, तर चित्रळ खोऱ्यात चित्ते आढळतात. येथे गरुड व गिधाडे पाहायला मिळतात. उत्तरेकडील प्रवाहांमध्ये तपकिरी ट्राउट मासे मोठ्या संख्येने आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे या पर्वतातील वनस्पती व प्राणिजीवन बरेच घटले असले, तरी त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्नही चालू आहेत.
आर्थिक स्थिती : या पर्वतश्रेणीतील चारा, वने व प्राणी या संसाधनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. हिंदुकुशमधील
रहिवाशांचे शेती आणि शेळ्या-मेंढ्यापालन हे प्रमुख व्यवसाय आहेत. पाण्याची उपलब्धता असणाऱ्या भागात काही प्रमाणात गहू, बार्ली, ज्वारीवर्गीय धान्य, मका, बटाटा, वाटाणा, कडधान्ये इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात. तुती, बोर, अलुबुखार, सफरचंद, बदाम, अक्रोड इत्यादींच्या बागा येथे आढळत असून अवर्षणकाळात येथील लोकांना खाद्य म्हणून ही उत्पादने उपयोगी पडतात. भटके पशुपालक ऋतूंनुसार स्थलांतर करतात. एकाकी पर्वतीय भागातील कुरणांचा पुरेपूर वापर केला जातो. उत्तर हिंदुकुशमध्ये लोहखनिजाचे व इतर दुय्यम खनिजांचे अल्प साठे आहेत. त्यामुळे खाणकाम व्यवसाय अगदी मर्यादित प्रमाणात चालतो. दक्षिणेकडील बाबा पर्वतात हाजीगाकजवळ तसेच काबूलच्या पश्चिमेस पगमान येथे आणि उत्तरेस फैझाबाद येथे लोहखनिजाचे साठे आहेत. अफगाणिस्तानातील मध्य हिंदुकुशमध्ये कारकर व इशपुश्त (इश्पुश्टा) येथे कोळशाच्या खाणी आहेत. पश्चिम हिंदुकुशलगतच्या उत्तरेकडील मैदानी भागातून नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतले जाते. कुनार नदीखोऱ्यात वैदूर्य या खनिजाचे उत्पादन होते. जलविद्युतशक्ती निर्मितीची संभाव्यता अधिक असली, तरी अगदी अल्प प्रमाणात ती निर्माण केली जाते. पर्वतीय भागातील खेड्यांना वीजपुरवठा करण्यासाठी पाकिस्तानात छोटे जलविद्युतशक्ती निर्मिती प्रकल्प उभारलेले आहेत. उत्तरेकडील भागात पोल-ई-खोम्री व कोंडूस येथे जलसिंचन व जलविद्युतनिर्मिती प्रकल्प आहेत.
वाहतूक : हिंदुकुश म्हणजे ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान व भारत (जम्मू व काश्मीर राज्य) यांदरम्यानची एक रोधक पर्वतश्रेणी असली, तरी तिच्यात असणाऱ्या वेगवेगळ्या खिंडींमुळे खऱ्या अर्थाने लोकांच्या हालचालीस व व्यापारास तिचा अडथळा होत नाही. खैबर, खवक, थाली, कुशान, शीबर, सालंग, बारोघिल, दोराह, शिकारी, कीपचाक या यातील प्रमुख खिंडी आहेत. त्या ऐतिहासिक व लष्करी दृष्ट्या तसेच व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या आहेत. या खिंडींमार्गे वायव्येकडून उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात येता येते. मोगलांनी याच खिंडींमार्गे येऊन हिंदुस्थानवर स्वाऱ्या केल्या. पाकिस्तानच्या वायव्य सरहद्दीवरील हिंदुकुश पर्वताच्या सफेद कोह या पर्वतश्रेणीत असलेली व पाकिस्तान-अफगाणिस्तान यांना जोडणारी सुप्रसिद्ध खैबर खिंड आहे. तिच्यातून लमाणमार्ग, पक्की सडक व लोहमार्ग गेले आहेत. प्राचीन काळी भारताचा मध्य आशियाशी चालणारा व्यापार या मार्गाने होत असे. खवक ही दुसरी महत्त्वाची खिंड असून तिच्यातून बारमाही दळणवळण चालते. त्याशिवाय शीबर (उंची २,९८७ मी.) व सालंग (४,०७५ मी.) या दोन खिंडी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. अफगाणिस्तानने रशियन तंत्रज्ञांच्या मदतीने सालंग खिंडीतून २.६७ किमी. लांबीचा बोगदा खोदला आहे (१९६४). जगातील सर्वाधिक उंचीवरील बोगद्यांपैकी हा एक बोगदा आहे. या बोगद्यामुळे उत्तर व दक्षिण अफगाणिस्तान हे प्रदेश एकमेकांना जोडले गेले आहेत. या बोगद्यातून काढलेल्या फरसबंदी रस्त्यामुळे काबूलपासून मझर-इ-शरीफमार्गे अमुदर्या नदीच्या तीरावरील आणि उझबेकिस्तान-अफगाणिस्तान यांच्या सरहद्दीवरील तेरमेझपर्यंतचा अगदी जवळचा मार्ग उपलब्ध झाला आहे. हिमवृष्टी झाली तरी सरकारी बांधकाम मंत्रालयाच्या अफगाण कामगार सेनेकडून रस्त्यावरील बर्फ हटवून तो मार्ग कायम वाहतुकीसाठी खुला ठेवला जातो. पर्वतीय प्रदेशातील वस्ती असलेल्या सर्व खोऱ्यांत मोटाररस्ते काढलेले आहेत.
ऐतिहासिक महत्त्व : भारतीय उपखंड, चीन आणि अफगाणिस्तान यांच्या दृष्टीने या पर्वताला ऐतिहासिक महत्त्व आहे. इ. स. पू. सुमारे १५०० मध्ये पश्चिम आशियातून आलेल्या
आक्रमकांबरोबर या भागात इंडो-यूरोपियन भाषासमूहांपैकी इंडो-इराणीयन भाषा आली. इ. स. पू. सुमारे १००० किंवा त्यापूर्वी आर्य जमातीच्या लोकांनी खैबर खिंडीमार्गे ही पर्वतश्रेणी ओलांडून भारतात प्रवेश केला. त्यांनी सिंधू नदीच्या खोऱ्यात सिंधू संस्कृतीची स्थापना केल्याचे मानले जाते. आर्य लोकांच्या नंतर दार्दसारख्या इतर काही जमातींचे लोकही हा पर्वत ओलांडून भारतीय उपखंडात आले. इतिहासकाळापासून लष्करी दृष्ट्या हिंदुकुशमधील खिंडी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. मॅसिडोनियाचा सम्राट अलेक्झांडर द ग्रेट, गझनीचा महमूद, मंगोल नेते चंगीझखान व तैमूरलंग, बाबर, सिकंदर, नादिरशाह, अब्दाली इत्यादींनी हिंदुकुशमधील वेगवेगळ्या खिंडींमार्गे येऊनच भारतावर स्वाऱ्या केल्या होत्या. भारतात ब्रिटिशांची सत्ता असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने हिंदुकुशमधील खैबर व इतर खिंडी आणि त्यांच्याशी निगडित प्राकृतिक घटकांवर विशेष लक्ष दिले होते. इ. स. सातव्या शतकात ह्यूएनत्संग (यूआनच्वांग) हे चिनी प्रवासी बौद्ध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी हिंदुकुश ओलांडूनच भारतात आले होते. त्यांनी लिहून ठेवलेल्या माहितीनुसार ‘हिंदुकुश हा पर्वतीय प्रदेश म्हणजे हिमपर्वतच आहे. गोठून गेलेले ढग व डोक्यावर तडातड सडकणारा बर्फ यांमुळे पुढचा मार्ग स्पष्टपणे दिसणे कठीण होते‘. हिंदुकुशच्या दक्षिणेकडील, पश्चिमेकडील भागात तसेच
पायथ्यालगतच्या टेकड्यांत प्राचीन बौद्ध संस्कृतीचे पुरातत्त्वीय अवशेष आढळतात. येथील खडकांत कोरलेल्या बौद्ध मूर्ती तालिबानी अतिरेक्यांनी फोडून टाकल्या आहेत. हिंदुकुशमधील बऱ्याच भागांचे अद्याप समन्वेषण झालेले नाही. एकोणिसाव्या शतकात रशिया व ब्रिटनची अफगाणिस्तानातील सत्ता संपुष्टात आल्यानंतर इतर यूरोपियनांनी, विशेषतः जर्मनांनी, प्रामुख्याने मध्य हिंदुकुशमधील प्रदेशाच्या अभ्यासात अधिक रस घेतला. १९३० च्या दशकात जर्मन व फ्रेंचांनी अफगाणिस्तानातील या पर्वतीय प्रदेशाचा प्रमुख शास्त्रीय व पुरातत्त्वविद्येच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी सफरी आयोजित केल्या. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपासून ब्रिटिशांकित भारताचा वायव्य सरहद्द प्रदेश म्हणून हिंदुकुशच्या भूमिस्वरूपाच्या निश्चित अभ्यासास सुरुवात झाली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सोव्हिएट युनियन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि पाकिस्तानने सविस्तर नकाशे तयार करण्यासाठी हिंदुकुशच्या भूमिस्वरूपाची विस्तृत मोजणी हाती घेतली. १९८०–९० च्या दशकात युद्धजन्य परिस्थितीमुळे या कार्यात अडथळे निर्माण झाले. पाकिस्तानच्या अगदी उत्तर कोपऱ्यातील हिंदुकुशच्या पर्वतीय भागातील स्वात खोऱ्याचा काही भाग अद्याप अगम्य आहे. अलीकडच्या काळात पाकिस्तानने या भागाच्या विकासावर अधिक भर दिला आहे.
लोकजीवन : हिंदुकुश पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या बरीच विरळ असून तेथील लोक स्वतंत्र बाण्याचे आहेत. जलसिंचित क्षेत्रांत मानवी वस्ती आढळते. मध्य आणि पश्चिम भागांतील
दऱ्याखोऱ्यांच्या प्रदेशांत प्रामुख्याने इराणी भाषा बोलणारे इस्लामधर्मीय लोक राहतात. किरगीझ या भटक्या जमातीचे लोक पूर्व पामीरच्या उंच पर्वतीय प्रदेशांत राहत होते; परंतु १९८० च्या दशकातील अफगाण युद्धकाळात ते पूर्व टर्कीमध्ये स्थलांतर करून गेले. काबूल शहर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यात पुश्तू जातीच्या लोकांचे प्राबल्य आहे. भटके पूश्तू पश्चिमेकडील टेकड्या आणि उत्तर अफगाणिस्तानातील अधिक उंचीवरील गवताळ प्रदेशात विखुरलेले आहेत. आग्नेय भागातील पाकिस्तानमध्ये कुहिस्तानी वंशाचे लोक राहतात. काश्मीरपासून काबूलपर्यंत या लोकांच्यामध्ये सांस्कृतिक एकता दिसते. येथील लोक पशुपालन व शेतीमध्ये, तर काही भागांत खाणकाम व्यवसायात गुंतले आहेत. चित्रळमध्ये कलशा (काळे) काफिर आणि नुरिस्तानमध्ये काटी (लाल) काफिर लोक राहतात. पूर्वी ते पर्वताच्या बऱ्याच भागांत आढळत. नुरिस्तान काफिरांना १८९६ मध्ये सक्तीने मुसलमान करण्यात आले. वायव्य उतारावर पामीर किंवा मौंटन ताजिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांची विरळ वस्ती आढळते. त्यांपैकी बहुतांश इस्माइली मुस्लिम आहेत. उझबेक व हझारा हे इतर ताजिक लोक सुन्नी मुस्लिम आहेत. ते इराणी भाषिक असून मध्य व पश्चिम भागातील खोऱ्यांत राहतात. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांतील हिंदुकुश पर्वतीय क्षेत्र म्हणजे तालिबानी आणि अल् कायदा या अतिरेकी व दहशतवादी संघटनांचा अड्डा मानला जातो.
समीक्षक : मनिषा पवार