झिंगाडे, सुरेखा : (४ मार्च १९५१). भारतीय जीवरसायनशास्त्र आणि पेशी आवरण अभ्यासक. त्यांचे कर्करोगासंदर्भातील जीवशास्त्र, रक्ताच्या कर्करोगाशी संबंधित मज्जारज्जू, पेशी आवरणातली प्रथिने आणि तोंडाच्या कर्करोगासाठी कारणीभूत प्रोटिऑमिक्स असे संशोधनक्षेत्र आहे.
श्रीमती सुरेखा यांचा जन्म हुबळी (कर्नाटक) येथे झाला. वडिलांच्या फिरस्तीच्या नोकरीमुळे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मेरठ, चेन्नई, मुंबई व कोलकाता येथे झाले. पुढे पदवी शिक्षणासाठी त्यांनी बंगळूरुच्या सेंट्रल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बेंगलोर विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी मिळाल्यानंतर त्यांनी आयआयटी, मुंबई येथून पदव्युत्तर पदवी मिळविली. पुढे त्यांनी ‘भाभा अणू संशोधन केंद्र’ इथे प्रशिक्षण केंद्रात रुजू होण्याकरिता परीक्षा दिली, परंतु काही कारणांनी त्यांची निवड होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांनी आयआयटी, मुंबईची प्रवेश परीक्षा दिली. पदव्युत्तर अभ्यासक्रमात नैसर्गिक उत्पादन रसायनशास्त्र (नॅचरल प्रॉडक्ट केमिस्ट्री) आणि जनुकशास्त्र यांसारख्या विषयांसंबंधी त्यांना कुतूहल निर्माण झाले. आयआयटीच्या शेवटच्या वर्षी पहिला क्रमांक पटकावून पीएच.डी.साठी त्यांनी बंगळूरुच्या भारतीय विज्ञान शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी जीवरसायनविज्ञान विषयाचा अभ्यास करायचे ठरविले. त्यामुळे रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या दुहेरी जगात त्यांच्या संशोधन प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या बॉस्टन विद्यापीठात चार विषयांकरिता प्रवेश केला.
प्रथिनांचे स्वरूप व रचना अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्या वेळी रसायनशास्त्रातले वैज्ञानिक धडपडत होते. जनुकांचा क्रम लावणे हा चर्चेचा विषय होता. याच क्षेत्राचा पाया रचणाऱ्या डॉ. रिचर्ड लॉरसन यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती सुरेखा काम करू लागल्या. जनुकांच्या रासायनिक संश्लेषणांच्या संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॉ. हरगोविंद खोराना यांसारखे वैज्ञानिक श्रीमती सुरेखा यांच्या विद्यापीठात येऊन विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधत. जनुकांमध्ये असे बदल करणे शक्य झाले, तर माणसांची जनुके प्रयोगशाळेत तयार होतील, या भीतीने सामान्य लोक या संशोधन संस्थांच्या बाहेर उभे राहून प्रखर विरोध दर्शवत होते. जीवरसायनशास्त्र ही एक नवी वैज्ञानिक शाखा अस्तित्वात येत असतानाच पेशी आवरण या विषयाचा अभ्यास करणारी नवी शाखाही उदयाला येत होती. या नव्या विषयांनी श्रीमती सुरेखा यांचे लक्ष वेधले आणि याच विषयात संशोधन करायचे त्यांनी ठरवविले.
श्रीमती सुरेखा यांना बॉस्टन विद्यापीठात सापडलेल्या नव्या वाटेवरचा प्रवास भारतात करावयाचे ठरवले आणि भारतात परतण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मुंबईच्या ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थेत ओबेद सिद्दीकी यांच्या प्रयोगशाळेमध्ये त्या पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून रुजू झाल्या. पेशी आवरणशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी ड्रोसोफिला या कीटकाचा अभ्यास केला. कर्करोगाच्या पेशी आवरणाचा अभ्यास करण्याची संधी त्यांना कर्करोग संशोधन संस्थेमध्ये मिळाली. त्या तेथे सायंटिफिक ऑफिसर म्हणून रुजू झाल्या. २००२ मध्ये संस्थेच्या पन्नासाव्या वर्षी टाटा कर्करोग संशोधनचे स्थलांतर मुंबईच्या परळ भागातून नवी मुंबईच्या खारघरमध्ये करण्यात आले. उपसंचालक या पदावर त्यांनी संस्थेच्या उभारणीची जबाबदारी स्वीकारली. त्यांचे संशोधनक्षेत्र कर्करोगासंदर्भातले जीवशास्त्र, रक्ताच्या कर्करोगाशी संबंधित मज्जारज्जू, पेशी आवरणातली प्रथिने आणि नव्याने खुणावणारी तोंडाच्या कर्करोगासाठी कारणीभूत प्रोटिऑमिक्स असे विविध स्वरूपाचे आहे. ७६ शोधनिबंध, विविध क्रमिक पुस्तकांतले अनेक धडे आणि ४ एकस्वे मिळविणाऱ्या श्रीमती सुरेखा सेवानिवृत्तीनंतरही अनेक कामात व्यग्र आहेत. सध्या त्या इंडियन वुमन सायंटिस्ट ॲसोसिएशनच्या विश्वस्त असून लेडी टाटा मेमोरिअल ट्रस्टच्या इंडियन सायंटिफिक ॲडव्हायजरी कमिटीच्या अध्यक्ष आहेत. अनेक वैज्ञानिक नियतकालिकाच्या त्या समीक्षक आहेत. काही विद्यापीठे आणि महाविद्यालयांना अभ्यासक्रमातल्या फेरबदलांसाठी मार्गदर्शक आहेत.
जुनाट मायलॉइड ल्यूकेमिया (एक प्रकारचा स्नायू कर्करोग), त्यातील पेशी पटल प्रथिने व त्यांचे संकेत पारगमन (सिग्नल ट्रान्सडक्शन), तसेच कर्करोग प्रोटीऑेमिक्स इ. क्षेत्रात त्यांचे काम प्रसिद्ध आहे. अनेक वैज्ञानिक नियतकालिकांच्या कार्यकारी संपादक मंडळाच्या त्या सदस्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा विद्यार्थ्यानी पीएच.डी. आणि दोन विद्यार्थ्यानी एम.एससी. केलेली आहे.
कळीचे शब्द : #पेशी #पटल #प्रथिने #पारगमन #मुख कर्करोग #प्रोटीऑमिक्स
संदर्भ :
समीक्षक : किशोर कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.