
ॲडिपिक अम्ल हे संयुग हेक्झेनडायोइक अम्ल, हेक्झेन -१,४-डायोइक अम्ल, ब्युटेन-१,४-डायकार्बॉक्झिलिक अम्ल, १,४- ब्युटेनडायकार्बॉक्झिलिक अम्ल या नावांनी देखील ओळखले जाते. औद्योगिक दृष्टिकोनातून ते महत्त्वाचे डायकार्बॉक्झिलिक अम्ल आहे. याचे रासायनिक सूत्र C6H12O4 असे आहे. हे द्विप्रोटॉनदायी म्हणजेच डायप्रोटिक अम्ल आहे (यामध्ये दोन अम्लीय गट आहेत).
संशोधन : ऑग्यूस्त लोराँ (Auguste Laurent) या फ्रेंच रसायनतज्ञाने नायट्रिक अम्लासह विविध चरबींचे ऑक्सिडीकरण करून ॲडिपिक अम्लाचा शोध लावला (१८३७). प्राण्यांच्या चरबीला लॅटिन भाषेमध्ये adeps असा शब्द असल्याने त्या नावावरून या अम्लाला ॲडिपिक अम्ल असे नाव देण्यात आले.
संश्लेषण : ब्युटाडाइनच्या (CH2=CH—CH=CH2) हायड्रोकार्बॉक्झिलीकरणाद्वारे ॲडिपिक अम्ल तयार केले जाते.
CH2=CH—CH=CH2 + 2 CO + 2 H2O ⟶ HOOC (CH2)4 COOH
भौतिक गुणधर्म : ॲडिपिक अम्ल हे सामान्य तापमान व दाब असताना पांढऱ्या स्फटिकासारख्या चूर्ण (powder) स्वरूपात असते. हे गंधहीन आहे. ॲडिपिक अम्ल मिथेनॉल व एथेनॉल यामध्ये सहज विद्राव्य आहे. तसेच ॲसिटोन व ॲसिटिक अम्ल यामध्ये देखील विद्राव्य आहे. सायक्लोहेक्झेनमध्ये काही प्रमाणात विद्राव्य आहे.
रासायनिक गुणधर्म : (१) ॲडिपिक अम्ल व हेक्झामिथिलीन डायअमाइन यांच्यामध्ये बहुवारिकीकरणाद्वारे नायलॉन – ६६ हे बहुवारिक तयार होते.
(२) ॲडिपिक अम्लाची अल्कोहॉलासोबत विक्रिया होऊन डायएस्टर तयार होतात.
(३) ॲडिपिक अम्लाची सोडियम हायड्रॉक्साइडासोबत विक्रिया होऊन क्षार तयार होतात.
H2C6H6O4 + 2 NaOH ⟶ Na2C6H8O4 + 2 H2O
(४) ॲडिपिक अम्लाला ३५०० — ४००० से. इतक्या तापमानाला तापवले असता सायक्लोपेंटेन (C5H8O) तयार होतो.
HOOC (CH2)4 COOH ⟶ C5H8O+ 2 CO2 + 2 H2O
सुरक्षितता : ॲडिपिक अम्ल हे त्वचेला सौम्य प्रमाणात त्रासदायक आहे. ॲडिपिक अम्ल ज्वलनक्षम (combustible) आहे.
उपयोग : प्रामुख्याने नायलॉनच्या उत्पादनामध्ये ॲडिपिक अम्लाचा वापर केला जातो. तसेच पॉलियूरेथेनच्या उत्पादनामध्ये देखील याचा वापर करतात.
संदर्भ : 1. https://en.wikipedia.org/wiki/Adipic_acid
- https://www.google.com/search?q=adipic+acid+chemical+properties&sca_esv=a65b7b10558ceea0&sxsrf=AE3TifPZOI-zpvkMyefM_otBqXvM_SGYMQ%3A1764313716407&ei=dEopad_KGMOG4-EPkI3zaA&oq=adipic+acid+&gs_lp=Egxnd3Mtd2l6LXNlcnAiDGFkaXBpYyBhY2lkICoCCAAyBBAjGCcyChAjGIAEGCcYigUyChAjGPAFGCcYyQIyChAAGIAEGEMYigUyBRAAGIAEMgUQABiABDIFEAAYgAQyBRAAGIAEMgUQABiABDIKEAAYgAQYQxiKBUjsC1D6AVj6AXABeAGQAQCYAYcBoAGHAaoBAzAuMbgBAcgBAPgBAZgCAqACmgHCAgcQIxiwAxgnwgIKEAAYsAMY1gQYR5gDAIgGAZAGCpIHAzEuMaAHywmyBwMwLjG4B5EBwgcDMi0yyAcO&sclient=gws-wiz-serp
- https://www.inchem.org/documents/icsc/icsc/eics0369.htm
समीक्षक : विश्वकोश संपादक
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
