ग्रीक मिथकशास्त्रातील १२ ऑलिम्पिअन्सपैकी हर्मिस ही दुसरी कनिष्ठ देवता होय. झ्यूस आणि मायाचा हा मुलगा ‘देवतांचा दूत’ म्हणून प्रख्यात आहे. त्याचे लॅटिन नाव मर्क्युरी आहे.

जादूटोण्याची, फसवणुकीची, व्यापाराची, सीमासुरक्षेची, चौर्याची आणि मुत्सद्देगिरीची ही देवता असून ग्रीकांनी ह्या देवतेची कुठेही निंदा न करता उलट तिची स्तुतीच केलेली अनेक ठिकाणी दिसते. हर्मिसची ही गुणवैशिष्ट्ये प्रामुख्याने एखाद्या प्रवाश्यामध्ये दिसत असल्याने नंतर हर्मिस असे ‘दगडांच्या रचून ठेवलेल्या थरा’लाही म्हटले जाऊ लागले. हा असा ढीग रस्त्यामध्ये प्रवाशांसाठी मार्गनिदर्शक, सीमादर्शक आणि तीर्थस्थाने दाखविणारे चिन्ह म्हणून अनेकदा ठेवलेला असे. अनेक विद्वानांच्या प्रतिपादनानुसार हर्मिस ह्या शब्दाचे मूळ ग्रीक शब्द ‘हर्मा’ असून त्याचा अर्थ ‘दगडांचा ढीग, सीमा दाखविणारे चिन्ह’ असाच आहे. मुळात प्रवासी आणि खोड्या करणारा अशा ह्या हर्मिसला इतर प्रवाशांना सोबत देण्यास आवडते. ग्रीक मिथकांप्रमाणे तो जादूची कांडी वापरून माणसांना फसवितो. त्याने ही युक्ती ‘मृतात्म्यांचा नेता’ म्हणून आपले कर्तव्य पार पाडताना त्यांना हेडीसच्या राज्यामध्ये ‒ पाताळामध्ये ‒ पोहचवितानासुद्धा वापरली आहे, असे त्याच्याविषयीचे वर्णन मिथकांमध्ये येते. हे त्याचे कार्य पुढल्या काळात जर्मन देवता ओडिनचे हर्मिसला समांतर रोमन देवता अशा मर्क्युरीशी झालेल्या सारूप्याचे निदर्शक आहे; कारण ओडिन हाही मृतांचा पिता मानला गेला आहे.

हर्मिसचा जन्म आर्केडिआ येथील सिलीन या पर्वतरांगेतील एका गुहेत झाल्याचे वर्णिले आहे. ॲट्रिअसच्या कुटुंबाशी त्याच्या असलेल्या सलगीच्या नात्यामुळे अर्गॉस या शहरामध्ये तसेच आर्केडिआमध्ये त्याचा जन्म झाला असल्याने या दोन शहरांमध्ये तो ‘मेंढ्यांच्या कळपांचा देव’ म्हणूनही प्रख्यात आहे. हर्मिसला ‘ॲटलान्डिस’ असेही म्हणतात; कारण त्याची आई माया ही ॲटलसची मुलगी होती.

होमर आणि हीसिअड यांनी त्यांच्या काव्यांमध्ये हर्मिसला फसवणुकीत अत्यंत हुशार आणि मृतांचे कल्याण करणारा असे रंगविले आहे. इलिअडमध्ये त्याला ‘सौभाग्याचा दाता’, ‘मार्गदर्शक आणि संरक्षक’ तसेच ‘फसवणुकीत कुशल’ असे वर्णिले आहे. द हिम्न्स् टु हर्मिस नावाच्या ग्रंथामध्ये त्याच्याविषयी अनेक कथा सापडतात. अग्नीच्या शोधाबरोबरच त्याने लायर नावाचे विशिष्ट तंतुवाद्य तसेच कुस्तीस्पर्धांसारखे अनेक खेळ यांच्या संशोधनाचे श्रेय त्याला दिले जाते. त्यामुळे त्याला व्यायामाचा आश्रयदाता म्हणूनही संबोधतात. ग्रीसमधील नामांकित कवी आणि अभ्यासक कॅलिमकसने असे म्हटले आहे की, हर्मिसने ‘सायक्लोप्स’ (कपाळावर एक डोळा असलेली व्यक्ती)चा वेष धारण करून ओशिॲनिड या सागरी अप्सरांना घाबरविण्याचे काम केले होते. पंख असलेल्या चंदनाच्या साहाय्याने त्याने त्याचा सावत्रभाऊ असणाऱ्या अपोलोकडून गायी चोरल्या होत्या, असे म्हटले जाते. तर पंख असणाऱ्या विचारांच्या मदतीने तो अपोलोच्या क्रोधापासून वाचू शकला, असेही सांगितले जाते.

आजही ग्रीसमधील पर्वतीय रस्त्यांमध्ये हर्मिसचे प्रतीक म्हणून चौकोनाकृती खांब असून त्यांवर वरच्या बाजूस त्याचा अर्धपुतळा, तर खालच्या भागात पुरुषयोनीचे चित्र कोरलेले आहे. हर्मिस प्रजननाचीही देवता मानली जाते. ह्या देवतेकडून संरक्षण मागू इच्छिणारे प्रवासी हर्मिसचे प्रतीक असणाऱ्या खांबावर आणखी एकएक दगड प्रथा म्हणून ठेवतात. कालांतराने त्याच दगडांवर तेलही ओतण्याची प्रथा सुरू झाली.

संदर्भ :

  • Cotterell, Arthur, A Dictionary of World Mythology, Oxford, 1990.
  • Pinsent, John, Greek Mythology, Oxford, 1982.

समीक्षक – सिंधू डांगे

प्रतिक्रिया व्यक्त करा