प्रसविका म्हणजेच सुईण किंवा दाई. प्रसविका – परिचारिका तज्ज्ञ ही परिचर्या विज्ञान व प्रसूतिशास्त्र यांचा समन्वय साधणारी, प्रगत कौशल्ययुक्त, स्वायत्त व समाज आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व्यावसायिक शाखा आहे. गर्भधारणा, प्रसूती, प्रसूतिपश्चात कालावधी, नवजात शिशु संगोपन, स्त्री प्रजनन आरोग्य संवर्धन तसेच कुटुंबनियोजन या क्षेत्रांत परिचारिका प्रसविका स्वतंत्रपणे तसेच बहुवैद्यकीय आरोग्यपथकाचा अविभाज्य घटक म्हणून कार्य करतात.
माता-बाल मृत्युदर कमी करणे, सुरक्षित व सन्मानजनक प्रसूती सुनिश्चित करणे आणि स्त्रियांच्या आरोग्यहक्कांचे संरक्षण करणे हे या शाखेचे मूलभूत उद्दिष्ट आहे.
प्रसूतिशास्त्र परिचर्येचा ऐतिहासिक विकास
- प्राचीन व पारंपरिक कालखंड : भारतीय समाजात प्रसविका परिचर्येची परंपरा अतिशय प्राचीन आहे. ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागांत “सुईण” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रसूती साहाय्यक स्त्रिया पिढ्यान्-पिढ्या प्रसूती सेवा देत होत्या. या सेवांचा पाया अनुभवाधारित ज्ञानावर होता. तथापि शास्त्रीय प्रशिक्षण, निर्जंतुकीकरण व आपत्कालीन व्यवस्थापन यांचा अभाव होता.
- वसाहतकालीन व आधुनिक प्रारंभ : ब्रिटिश कालखंडात पाश्चात्त्य वैद्यकीय शिक्षणासह प्रसूतिशास्त्राचा औपचारिक विकास झाला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात प्रसूतिगृहे व महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालये स्थापन झाली. याच काळात परिचारिकांसाठी प्रसविका परिचर्येचे औपचारिक प्रशिक्षण स्वतंत्र शाखा म्हणून सुरू झाले.
आंतरराष्ट्रीय प्रभाव : विसाव्या शतकात जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि आंतरराष्ट्रीय प्रसविका महासंघ (International Confederation of Midwives) यांनी सुरक्षित मातृत्व, कुशल प्रसविका सेवा, पुराव्यावर आधारित प्रसूती व्यवस्थापन व प्रसूतीदरम्यान मानवी हक्क यांवर जागतिक स्तरावर भर दिला. या प्रयत्नांमुळे प्रसविका – परिचारिका तज्ज्ञ ही संकल्पना अधिक शास्त्रशुद्ध, स्वायत्त व व्यावसायिक स्वरूपात विकसित झाली.
भारतातील प्रसविका परिचर्या व रुग्णालयांची भूमिका :
प्रसूती रुग्णालयांची निर्मिती : स्वातंत्र्योत्तर काळात भारतात शासकीय महिला व बाल रुग्णालये, जिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र प्रसूतिविभाग स्थापन झाले. या संस्थांमध्ये प्रसविका -परिचारिकांना संस्थात्मक प्रसूती, आपत्कालीन प्रसूती व्यवस्थापन आणि नवजात शिशु संगोपनाचे शास्त्रीय प्रशिक्षण मिळू लागले.
परिचर्या शिक्षण व नियमन : भारतीय परिचर्या परिषदेमार्फत (Indian Nursing Council) प्रसविका परिचर्येचा अभ्यासक्रम, अभ्यास व्यवस्थापन किंवा प्रशिक्षण व व्यावसायिक मानके निश्चित करण्यात आली. सहायक परिचारिका व प्रसविका (Auxiliary Nurse and Midwife; A.N.M.), सामान्य परिचारिका व प्रसविका (General Nursing and Midwifery; G.N.M.) आणि बी.एस्सी. परिचर्या या अभ्यासक्रमांमध्ये “प्रसविका परिचर्या” हा मूलभूत घटक / महत्त्वाचा विषय म्हणून समाविष्ट आहे.
प्रसविका – परिचारिका तज्ज्ञ : स्वरूप व कार्यक्षेत्र
प्रसविका – परिचारिका तज्ज्ञ या प्रगत कौशल्ययुक्त परिचारिका असून त्या पुढील प्रमुख क्षेत्रांत कार्य करतात : १)स्रीची / मातेची गर्भावस्थेतील नियमित तपासणी, २) गर्भावस्थेतील धोका मूल्यांकन व आरोग्य शिक्षण, ३)सामान्य प्रसूती तसेच निवडक जटिल प्रसूतींचे सुरक्षित व्यवस्थापन इ., ४) प्रसूतिपश्चात माता व नवजात शिशु यांची सर्वांगीण काळजी, ५)स्त्री प्रजनन व लैंगिक आरोग्य सेवा, ६)कुटुंबनियोजन व प्रजनन आरोग्य समुपदेशन, ७)उच्च जोखीम गर्भधारणेची ओळख व संदर्भ सेवा इत्यादी.
संदर्भ व समन्वय सेवा भारतातील सद्यस्थिती – धोरणात्मक बदल : अलीकडील काळात भारत सरकारने प्रसविका-नेतृत्वित सेवा गट (Midwifery-Led Care Unit) ही संकल्पना स्वीकारली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत (Ministry of Health and Family Welfare) राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कुशल प्रसविका सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे.
प्रसविका – परिचारिका तज्ज्ञांची भूमिका : सद्यस्थितीत भारतात प्रसविका परिचारिका तज्ज्ञ या ग्रामीण व दुर्गम भागांत सुरक्षित प्रसूती सेवा पुरवत आहेत; संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवत आहेत; माता-बाल मृत्युदर कमी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत; स्त्रीकेंद्रित, सन्मानजनक व मानवी हक्काधिष्ठित प्रसूती सेवा देत आहेत.
व्यावसायिक व नैतिक अधिष्ठान : प्रसविका – परिचारिका तज्ज्ञ सेवा पुरविताना स्वायत्तता, नैतिकता, गोपनीयता, स्त्रीचा सन्मान तसेच पुराव्यावर आधारित कार्यपद्धती यांचे काटेकोर पालन करतात. प्रसूती ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून सामाजिक, मानसिक व भावनिक अनुभव आहे, ही दृष्टी या शाखेचे मूलभूत तत्त्व मानले जाते.
प्रसविका – परिचारिका तज्ज्ञ ही आधुनिक आरोग्यव्यवस्थेतील माता-बाल आरोग्याची कणा मानली जाते. भारतासारख्या विकसनशील देशात सुरक्षित मातृत्व, स्त्री सशक्तीकरण आणि सार्वत्रिक आरोग्यसेवा या राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रसविका – परिचर्या शाखेचा विस्तार व सशक्तीकरण अत्यावश्यक आहे
संदर्भ :
- Curriculum and regulations for midwifery practice, Indian Nursing Council, 2023.
- Global standards for midwifery education, International Confederation of Midwives, 2021.
- Guidelines for midwifery-led care units in India, Ministry of Health and Family Welfare, Government of India, 2022.
- Midwifery-led care and maternal outcomes in low- and middle-income countries, The Lancet Global Health, 2024.
- Strengthening quality midwifery education for universal health coverage. World Health Organization, 2021.
समीक्षक : सरोज वा. उपासनी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.