आंग्रे, संभाजी कान्होजी : (मृत्यू : १७४२). मराठा आरमाराचे एक देदीप्यमान नेतृत्व, कुशल आरमारी प्रशासक आणि पराक्रमी ‘सरखेल’. कान्होजी आंग्रे यांनी निर्माण केलेल्या आरमारी सत्तेचा वारसा पुढे नेत असतानाच, त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज आणि डच या परकीय सत्तांना आपल्या शौर्याने जेरीस आणले होते.
संभाजी आंग्रे यांचा जन्म सरखेल कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या प्रथम पत्नी मथुराबाई (राजूबाई) यांच्या पोटी झाला. ते कान्होजींचे द्वितीय पुत्र आणि सेखोजी आंग्रे यांचे धाकटे बंधू होते. आंग्रे घराण्याच्या लष्करी परंपरेनुसार, संभाजींना बालपणापासूनच सागरी युद्धकला, जहाजांची बांधणी, आरमाराची व्यूहरचना आणि सागरी प्रशासनाचे सखोल शिक्षण मिळाले होते. समुद्र आणि सह्याद्रीची किनारपट्टी हा त्यांचा नैसर्गिक संचार असल्याने त्यांच्यात साहसी वृत्ती आणि लष्करी चातुर्य भिनले होते.
सन १७२९ मध्ये कान्होजी आंग्रे यांच्या निधनानंतर मराठा आरमाराची धुरा ज्येष्ठ सुपुत्र सेखोजी आंग्रे यांच्याकडे सोपवण्यात आली. कान्होजींनी आपल्या हयातीतच पुत्रांमध्ये भविष्यात सत्तासंघर्ष होऊ नये, म्हणून मुलखाची विभागणी केली होती. मात्र, १७३३ मध्ये सेखोजींच्या अकाली निधनानंतर संभाजी आणि त्यांचे सावत्र बंधू मानाजी आंग्रे यांच्यात वारसाहक्कावरून तीव्र कलह निर्माण झाला.
संभाजींचा स्वभाव तापट आणि बाणा स्वाभिमानी होता. त्यांच्या झंझावातापुढे मानाजींचा टिकाव लागणे कठीण होते. या संघर्षात मानाजींनी थोरले बाजीराव पेशवे यांची मदत मागितली. पेशव्यांना आंग्र्यांची एकसंध शक्ती आपल्या अधिकाराला आव्हान देऊ शकते असे वाटत असल्याने, त्यांनी राजकीय धोरण म्हणून आंग्रे सत्तेच्या विभाजनाला पाठिंबा दिला. फेब्रुवारी १७३५ मध्ये बाजीराव पेशव्यांनी कुलाब्यात मुक्काम ठोकून मानाजींना लष्करी पाठबळ दिले.
दि. २ एप्रिल १७३५ रोजी अलिबाग जवळील ‘नवदरे’ येथे एक ऐतिहासिक तह झाला. या तहान्वये आंग्रे दौलतीची अधिकृतपणे दोन भागांत विभागणी करण्यात आली. या विभागणीनुसार, मानाजी आंग्रे यांना ‘वजारत-म-आब’ हा नवीन किताब बहाल करून त्यांच्याकडे कुलाबा आणि उत्तर कोकणच्या प्रदेशाची जबाबदारी सोपवण्यात आली. दुसरीकडे, संभाजी आंग्रे यांना त्यांचे वडिलोपार्जित ‘सरखेल’ हे पद देऊन त्यांच्या आधिपत्याखाली सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि दक्षिण कोकणचा प्रदेश देण्यात आला.
मराठा आरमाराच्या इतिहासात या विभागणीने दूरगामी परिणाम झाले. कान्होजी आंग्रे यांनी अत्यंत कष्टाने आणि मुत्सद्देगिरीने निर्माण केलेली एकसंध आरमारी शक्ती या अंतर्गत कलहामुळे विभागली गेली. मराठा आरमाराच्या या कमकुवतपणाचा आणि अंतर्गत यादवीचा फायदा घेत पुढे इंग्रज, पोर्तुगीज आणि डच यांसारख्या परकीय सत्तांना कोकण किनारपट्टीवर आपले पाय रोवण्यास सोपे झाले.
जंजिऱ्याच्या सिद्दीचा बंदोबस्त करणे हे मराठ्यांचे दीर्घकालीन उद्दिष्ट होते. १७३३ मध्ये सिद्दी रसूल याकुतखानच्या मृत्यूनंतर जंजिरेकरांत वारसाहक्कावरून युद्ध सुरू झाले. छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे बाजीराव आणि आंग्रे बंधूंनी जंजिरा मोहिमेचे नियोजन केले. संभाजींनी अंजनवेल आणि गोवळकोटच्या मोहिमेत पराक्रम गाजवला. मात्र, नेमक्या याच वेळी मानाजींसोबत असलेल्या वितुष्टामुळे संभाजींचे लक्ष विचलित झाले. इंग्रजांनी आणि सिद्दीने फोडा आणि झोडा या नीतीचा वापर करत आंग्रे बंधूंमधील दरी अधिक वाढवली. इंग्रजांनी सिद्दीला गुप्तपणे रसद पुरवली. परिणामी, १९ एप्रिल १७३६ रोजी चिमाजी आप्पांनी सिद्दी साताला ठार करून विजय मिळवला असला, तरी आंग्र्यांमधील गृहकलहामुळे जंजिरा पूर्णपणे काबीज करण्याचे मराठ्यांचे स्वप्न हुकले.
संभाजी आंग्रे यांची खरी ओळख त्यांनी इंग्रज आणि पोर्तुगीजांविरुद्ध दिलेल्या निकराच्या लढ्यामुळे आहे. त्यांनी इंग्रजांचे ‘डर्बी इंडियामन’ जहाज पकडून आणि त्यांच्या व्यापारावर निर्बंध घालून इंग्रजांवर मोठी जरब बसवली. १७३९ मध्ये इंग्रजांनी संभाजींचे मुख्य ठाणे असलेल्या घेरिया (विजयदुर्ग) वर मोठा हल्ला करण्याची योजना आखली. १५ जानेवारी १७३९ रोजी हे ब्रिटिश नौदल अधिकारी बॉगवेल हे ‘कॅरोलिना’ आणि ‘किंग जॉर्ज’ यांसारखी आधुनिक जहाजे घेऊन विजयदुर्गसमोर ठेपले. ७ ते २० मार्च १७३९ दरम्यान इंग्रजांनी किल्ल्यावर भीषण तोफमारा केला. मात्र, संभाजींच्या आरमारी व्यूहरचनेमुळे आणि राजापूर नदीची (खाडीची) माहिती नसल्याने इंग्रजांना किल्ल्याच्या जवळही जाता आले नाही. संभाजींनी आपली जहाजे खाडीच्या उथळ आणि सुरक्षित जागी नांगरून ठेवली होती, जिथे इंग्रजांची अवजड जहाजे पोहोचू शकत नव्हती. अखेर, बॉगवेलला पराभव स्वीकारून रिकाम्या हाताने मुंबईला परतावे लागले.
संभाजींना युद्धात हरवणे अशक्य आहे म्हणून इंग्रजांनी राजनैतिक डावपेच आखले. कप्तान इंचबर्डला स्थानिक भाषा आणि राजकारणाची उत्तम जाण होती. त्याने मानाजींना संभाजींविरुद्ध फूस देऊन त्यांना लष्करी मदत केली. इंचबर्डने उंदेरी आणि इतर ठिकाणी सिद्दीला रसद पुरवून संभाजींची आरमारी कोंडी केली. या अंतर्गत दुहीमुळे मराठा आरमाराची शक्ती आपापसांत लढण्यात खर्च झाली.
संभाजी आंग्रे हे पराक्रमी योद्धा, दूरदृष्टी असलेले कुशल प्रशासक आणि जहाज बांधणी क्षेत्रातील जाणकार होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मराठा आरमाराला तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. विशेषतः विजयदुर्ग येथे त्यांनी जहाजांच्या डागडुजीसाठी आणि बांधणीसाठी अद्ययावत गोदी विकसित केली. त्यांच्या तांत्रिक कौशल्यामुळेच मराठा आरमारातील जहाजांची भारवहन क्षमता ३०० टनांवरून ४०० टनांपर्यंत वाढवणे शक्य झाले. त्यामुळे जहाजे अधिक शक्तिशाली आणि प्रदीर्घ मोहिमांसाठी सक्षम बनली.
संभाजी आंग्रे यांच्या आरमारी ताफ्यात विविध प्रकारच्या नौकांचा समावेश होता, ज्या विशिष्ट युद्धकार्यासाठी वापरल्या जात असत. यामध्ये ‘पाल’, ‘गुराब’, ‘गलबत’, ‘मचवा’ आणि ‘होडी’ यांसारख्या वेगवान आणि लढाऊ नौकांचा समावेश होता. त्यांची युद्धनीती प्रामुख्याने भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेणाऱ्या ‘सागरी गनिमी काव्या’वर आधारित होती. परकीय सत्तांची जहाजे मोठी आणि अवजड असल्याने त्यांना खोल समुद्रात हरवणे कठीण असे; त्यामुळे संभाजी आंग्रे अशा जहाजांना युक्तीने उथळ पाण्यात किंवा खाडीच्या अरुंद भागात ओढून आणत आणि तिथे आपल्या चपळ व हलक्या नौकांच्या साहाय्याने त्यांचा अचूक नाश करत असत. यासोबतच, त्यांनी पश्चिम किनारपट्टीवर मराठ्यांचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी ‘दस्तक’ (परवाना) पद्धत अत्यंत कडकपणे लागू केली होती, ज्यानुसार आंग्रेंचा अधिकृत परवाना घेतल्याशिवाय कोणत्याही परकीय सत्तेला व्यापारासाठी समुद्र ओलांडणे अशक्य झाले होते. संभाजी आंग्रे हे अत्यंत कष्टाळू आणि शिस्तप्रिय होते. ते आरमारी कामात स्वतः जातीने लक्ष घालत. स्वराज्याच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.
विजयदुर्ग येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- ढबू. दा. गो. ‘कुलाबकर आंग्रे सरखेल’, अलिबाग, १९३९.
- पिसुर्लेकर, पांडुरंग, ‘पोर्तुगीज मराठा संबंध’, पुणे विद्यापीठ, पुणे, १९६७.
- पुराणिक, श. श्री., ‘तुळाजी एक विजयदुर्ग’, पार्श्व पब्लिकेशन, कोल्हापूर, २०२०.
- पेंडसे, सचिन, ‘मराठा आरमार’, मर्वेन टेक्नॉलॉजीज, पुणे, २०१७.
- शिखरे, सु. व., ‘मराठ्यांच्या आरमाराचा इतिहास’, अप्रकाशित पीएच. डी. प्रबंध, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, २०१७.
समीक्षक : संदीप परांजपे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.