मल्लिक, पंडित राम चतुर : (५ ऑक्टोबर १९०२—११ जानेवारी १९९०). भारतीय शास्त्रीय संगीतातील दरभंगा घराण्याचे अध्वर्यू. शास्त्रीय संगीतातील ‘धृपद – धमार’ या प्राचीन गायनशैलीची परंपरा लाभलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक व संगीतकार तसेच धृपद, ठुमरी, ख्याल आणि मैथिली लोकगीतांचे प्रतिभावंत गायक.
‘धृपद- सम्राट ‘म्हणून गौरविल्या गेलेल्या राम चतुर मल्लिक यांचा जन्म बिहार राज्याच्या उत्तरेकडील दरभंगा जिल्ह्यातील ‘अमता’ या लहानशा गावात झाला. त्यांचे पिता पंडित राजित राम सिंह मल्लिक हे दरभंगा महाराजांच्या दरबारातील प्रसिद्ध संगीततज्ञ होते. तसेच ते संस्कृत भाषेतील लेखक कवी होते. धृपद शैलीत गायल्या जाणाऱ्या हजारो भजनांची रचना त्यांनी केली. ‘राग विनोद’च्या निर्मितीचे श्रेयही त्यांना दिले जाते. त्यांचे हस्तलिखित वैदिक स्तोत्रांचा संग्रह असलेले ‘भक्त विनोद’ हे पुस्तक त्यांच्या वारसांनी अद्याप जतन करून ठेवले आहे. अशी सांगीतिक परंपरा लाभलेल्या कुटुंबात जन्मलेल्या राम चतुर मल्लिक यांना संगीताचे बाळकडू बालवयातच मिळाले. राम चतुर मल्लिक यांनी पित्या व्यतिरिक्त चुलते क्षितिपाल मल्लिक तसेच सतारवादक रामेश्वर पाठक यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.
वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचे पहिले मैफिलीतील गायन सादरीकरण झाले.१९२४ साली दरभंगा महाराज कामेश्वर सिंह यांनी त्यांना दरबारी गायक म्हणून नियुक्त केले. त्याकाळी राजगायकांना सार्वजनिक गायन सभेत गाण्याची परवानगी नव्हती; पण रामजींवर राजघराण्याने कोणतेही निर्बंध घातले नव्हते. ते सार्वजनिक मैफिलीतही मुक्तपणे गाऊ शकत. साहजिकच सर्व स्तरातील लोक त्यांच्या गायनाचे चाहते होते.
दरभंगा महाराजांचे कनिष्ठ बंधू विश्वेश्वर सिंह हे रामजींच्या गायनाचे चाहते होते. १९३७ साली विश्वेश्वर सिंह यांच्यासोबत राम चतुर मल्लिक प्रथमच भारताबाहेर इंग्लंड व फ्रान्सला गेले आणि तेथे आपल्या शास्त्रीय गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. स्वातंत्र्यपूर्व तसेच फाळणीपूर्व काळात, जगभरात आणि भारतात पतियाळा, जयपूर, काश्मीर अशा अनेक संस्थानातील मैफिलींमुळे गायनक्षेत्रातील जाणकार लोकांसाठी ते कौतुकाचा विषय ठरले. उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अमीर खाँ, उस्ताद सलामत खाँ यांसारख्या समकालीन गायकांनीही रामजींच्या गायकीची प्रशंसा केली. जगभरात अनेक ठिकाणी त्यांच्या संगीत मैफिली खूप गाजल्या.
धृपद गायकीमधील गौहर, डागर, खंडार, नौहर अशा चारही शैलींवर राम चतुर मल्लिक यांचे प्रभुत्व होते. यामधील आलाप चार चरणात पूर्ण होतो. सुरुवातीला एक विस्तृत आलाप असतो, त्याचा मंद मधुर विकास हळूहळू एक वेगवान लय पकडतो. इथे लयकारीला महत्त्व असते. रामजींची अनुपम लयकारी श्रोत्यांना अवीट आनंद देत असे. कुमार गंधर्वांनी कबीरांचे दोहे किंवा किशोरी आमोणकर यांनी मीरेच्या रचना घरोघरी पोहचविल्या, त्याचप्रमाणे दरभंगा घराण्याच्या या गायकांनी विद्यापतींच्या पदांना जनमानसात रुजविण्याचे कार्य केले. संगीत क्षेत्रात राम चतुर मल्लिक हे नाव आजही अतिशय आदराने घेतले जाते. संगीत समीक्षक ‘गजेंद्र नारायण सिंह’ यांनी राम चतुर यांच्याबद्दल — ‘राम चतुर हे खऱ्या अर्थाने गानचतुर होते. गायकीच्या प्रत्येक प्रकारावर त्यांची प्रभावी पकड होती.’ असे गौरवोद्गार काढले आहेत.
‘ऑल इंडिया रेडिओ’केंद्राशी राम चतुर यांचे स्थापनेपासूनच नाते निर्माण झाले होते. आकाशवाणीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात रामजींच्या गायनाचे अनेक वेळा प्रसारण होत असे. आकाशवाणी वार्षिक संगीत संमेलनात सहभागी होण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित केले जाई. ऑल इंडिया रेडिओ मार्फत दिला जाणारा ‘द टॉप ग्रेड’ हा सर्वोच्च सन्मान कुठल्याही कलाकाराला विभिन्न प्रकारच्या स्वर चाचणी (ऑडिशन) नंतरच प्राप्त होत असे. पण राम चतुर मल्लिकजी एकमात्र असे कलाकार होते, ज्यांना हा सन्मान कोणत्याही स्वर चाचणीशिवाय आदरपूर्वक बहाल केला गेला. १९५३ साली पाटणा राजभवनात प्रजासत्ताकदिनानिमित्त राम चतुर यांच्या गायनसभेचे आयोजन केले गेले आणि ही परंपरा अनेक वर्षे अव्याहतपणे सुरू होती.
राम चतुर मल्लिक यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले. त्यामध्ये बिहार संगीत नाटक अकादमी फेलोशिप (१९५३), स्वामी हरिदास संगीत समारंभ व ‘सूरसिंगार संसद’ मुंबई येथे तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते मानपत्र व ताम्रपत्र प्रदान (१९५७), बिहारचे तत्कालीन राज्यपाल ए. एस. अय्यंगार यांचे मार्फत संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६४), भारत सरकारकडून शास्त्रीय संगीत क्षेत्रातील पद्मश्री (१९७४), खैरागड (म.प्र.) येथील इंदिरा कला विश्वविद्यालय येथे डी.लीट. पदवीने सन्मानित (१९८३), मध्य प्रदेश सरकार मार्फत ‘तानसेन पदवी’ तसेच बिहार सरकार मार्फत ‘महामहोपाध्याय ‘ पदवी यांचा समावेश होतो.
राम चतुर मल्लिक यांचे निधन बिहार राज्यातील पाटणा येथे झाले. राम चतुर मल्लिक यांचा सांगीतिक वारसा आजही समर्थपणे चालविला जातो. त्यांचे चुलत बंधू विदुर मल्लिक यांनी ८०च्या दशकात ‘धृपद’ अकॅडमी’ची स्थापना केली असून, राम चतुर मल्लिक यांचे शिष्य अभय नारायण मल्लिक, प्रेम कुमार मल्लिक यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला आहे. फ्रेंच लेखक, पत्रकार, संगीतकार, निर्माता पीटर पॅनके यांनी माहितीपटासाठी राम चतुर मल्लिक यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिकांची एक शृंखला तयार केली आहे. फ्रान्स,जर्मनी व कोलंबिया येथे पंडित राम चतुर यांच्या गायन शैलीवर आधारित माहितीपट तयार करण्यासाठी त्यांच्या गायनाची दृकश्राव्यफीत तयार करण्यात आली आहे.
संदर्भ :
- सिंह, विजयकुमार, बिहार की संगीत परंपरा : एक अवलोकन, नालंदा, २०१८.
समीक्षक : उज्ज्वला करमळकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.