थोरात, विमल : (७ जुलै १९४९). नामवंत विचारवंत, लेखक, संपादक आणि आंबेडकरी चळवळीतील देशपातळीवरच्या कार्यकर्त्या. भारतातील स्त्रीवादी लेखिकांमध्ये विमल थोरात यांचा  आंबेडकरी चळवळ, दलित साहित्य, स्त्री-पुरुष समता, मानवी हक्क इत्यादीबाबत मोठा अभ्यास आहे. . पावलोपावली अनुभवायला येणाऱ्या पितृसतेला लहानपणापासून उधळून लावणारा करारी स्वभाव. अध्यापन ,कविता, सामाजिक  लेखन आणि दलित शोषित वंचित समूहाच्या समकालीन प्रश्नांवर प्रत्यक्षपणे काम करणारे स्त्रीवादी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांनी उत्तर भारतात दलित साहित्य चळवळ उभी करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

अमरावती जिल्ह्यातील नालवाडा हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामचंद्र खांडेकर हे अमरावती येथे पोलीस अधिकारी होते, आई सरस्वती या गृहीणी होत्या. उच्य शिक्षित आणि सामाजिक बांधिलकी जपणारे एकूण ११ बहीण भावंड त्यांच्या कुटुंबात होती. त्यांचे शालेय शिक्षण चांदूर बाजार ,धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे इत्यादी ठिकाणी झाले. नागपूर विद्यापीठातून त्या पदवीधर झाल्या (१९७४). जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटी दिल्ली (१९७९) येथून त्यांनी हिंदी या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविली.  साठोत्तरी मराठी दलित कविता आणि हिंदी कविता’   हा विषय  घेऊन त्यांनी  एम. फील.साठी संशोधन केले (१९८१). मराठी आणि हिंदी कादंबऱ्यांमध्ये वर्ग आणि जाती संघर्ष एक तौलनिक अभ्यास या विषयात संशोधन करून त्यांनी आचार्य पदवी मिळविली (१९९६).  इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय नवी दिल्ली येथे  मानविकी विभागात हिंदी  विषयाच्या प्राध्यापक होत्या. इग्नू विद्यापीठात   डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक बदल आणि विकास या अध्यासनाच्या समन्वयक होत्या (२००७). मिलिंद महाविद्यालयात ९७५ ला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्री मुक्ती या  एका परिसंवादामध्ये विमल थोरात यांनी मार्गदर्शन केले. येथून  त्यांच्यातील लेखिका उत्तरोत्तर विकसित होत गेली. १९७४ ला त्यांचा विवाह सुखदेव थोरात यांच्याशी झाला.

मराठी दलित कविता और साठोत्तरी हिंदी कविता में सामाजिक और राजनीतिक चेतना (१९९६), भारतीय दलित साहित्य का विद्रोही स्वर, दलित साहित्य का स्त्रीवादी स्वर (२०१७ ) ही त्यांची महत्वाची संशोधनात्मक ग्रंथ होत. स्त्री नैतिकता का तालिबानीकरण, भारतीय दलित साहित्य का इतिहास, प्रभुत्व एवं प्रतिरोध भारतीय दलित कहानिया खंड-१ (२०१२) ही त्यांची संपादित  पुस्तके होत. १३ भाषांमधील  दलित स्त्रीवादी कवितांचे The Silent Volcano (2013) इंग्रजीमध्ये  त्यांनी भाषांतर केले आहे. सुरवातीला त्यांनी दलित महिलांच्या कवितांचे भाषांतर केले. त्यांनी देवदासी या नाटकाचे हिंदीत भाषांतर केले. अन्थोलोजी ऑफ दलित लिटरेचर या एलिनोर झेलीएट यांच्या पुस्तकात बराच भाग विमल थोरात यांनी भाषांतरित केला आहे. सुरवातीच्या काळात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या बहुजन महापुरुषांवर  पुस्तिका लिहित्या. ज्या पुस्तिकांनी प्रबोधन करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी संपादित आणि भाषांतरित केलेल्या  Story written on my back,  Philosophy of Dr. Ambedkar and thoughts, This land is not my motherland या पुस्तकांचा स्वीडिश आणि इतर जागतिक भाषांत भाषांतर झाले आहे.

दलित कवायत्रींच्या कवितांमधून अभिव्यक्त होणारी  दलित स्त्रीच्या तिहेरी शोषणाची अभिव्यक्ती विविध भाषेमध्ये भाषांतरित करून सर्वांना त्याची जाणीव व्हावी या दृष्टीकोणातून भाषांतरित केले आहे. त्याच बरोबर दलित साहित्य आंदोलन हे बहुआयामी आंदोलन आहे भारतातील प्रत्येक भाषेत दलित साहित्य लिखाण सुरू आहे. विविध भाषेमध्ये उपलब्ध असलेले दलित साहित्य राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय भाषेत उपलबद्ध करून दलित साहित्याचे स्वरूप समाजात परिवर्तन आणण्याची क्षमता असणारे साहित्य आहे त्यामुळे समाजात चेतना निर्माण करण्याच्या दृष्टीकोणातून हे विविध भाषेतील साहित्य भाषांतरित केले आहे. दलित जीवनाचे वेगवेगळे पदर त्याची जाणीव राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय स्तरावर व्हावी म्हणूस निवडक साहित्य भाषांतरित केले आहे. त्याच बरोबर त्यांनी अनेक संशोधन पेपरही  लिहिले आहेत. दलित साहित्य आणि कला केंद्राच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी उत्तर भारतातील दलित साहित्य आणि कला विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

दलित साहित्य का स्त्रीवादी स्वर या पुस्तकावरून हे स्पष्ट होते की दलित महिला आता दलित वर्गातील पितृसत्तेविरुद्ध एकत्र येऊन लढा देत आहेत. महात्मा गौतम बुद्ध, ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीने प्रेरित दलित साहित्यातील स्त्रीवादी आवाज समतावादी समाज निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे असे चित्र या पुस्तकातून दिसत असल्याचे त्यांनी मांडले आहे. स्त्री-पुरुष संबंधांची समतावादी व्याख्या देण्यासोबतच, दलित महिलांच्या तिहेरी शोषणाची शोकांतिका व्यक्त करून,  दलित महिलांकडे पाहण्याचा महिला मुक्ती चळवळीचा संकुचित मध्यमवर्गीय दृष्टिकोन बदलण्यात काही प्रमाणात यशस्वी होत आहे अशी मांडणी या पुस्तकात आली आहे. वैयक्तिक अस्मितेच्या संघर्षात महिलांच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित करून ती सामान्य समतावादी चळवळीचा एक भाग होती. त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा अभ्यास या पुस्तकात आहे. मराठी दलित कविता और साठोत्तरी हिंदी कविता में सामाजिक और राजनीतिक चेतना या पुस्तकात त्यांनी १९६० नंतरच्या मराठी दलित कविता आणि हिंदी कविता यामध्ये दिसून येणारी सामाजिक व राजकीय जाणीव यांचा लेखाजोखा मांडला आहे. ६० च्या नंतरच्या दशकातील दलित कविता ही  विद्रोहाची कविता आहे ज्यामध्ये पारंपारिक परंपरा आणि राजकीय उदासीनता यांच्या विरोधात ती भूमिका घेते. पारंपारिक मराठी लिखाणातील काल्पनिक भाषा नाकारत दलित कवितेची भाषा ही अनुभवजन्य आहे. ६० नंतरच्या दलित कवितेमध्ये समता, न्याय,मानव मुक्ती, जाती विरोध अश्या प्रकारचे विषय दिसून येतात. असे महत्वपूर्ण संशोधन या पुस्तकात त्यांनी मांडले आहे. भारतीय दलित साहित्य का इतिहास (बुद्ध काळ से आधुनिक काल तक) या पुस्तकात संपूर्ण भारतातील प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचा साहित्याचा धांडोळा घेऊन दलित साहित्याची परंपरा कशी होती यावर ऐकून १५ भागांमध्ये लिहिले आहे. बुद्धकालीन परंपरा, लोकायत परंपरा, नाथ परंपरा, संत साहित्य परंपरा, कन्नड तेलगु परंपरा दलित साहित्याचा उगम आणि विकास, सामाजिक सांस्कृतिक चळवळ आणि साहित्य, दलित साहित्य आणि विचारधारा, दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र इत्यादी अनेक विषयावर चिकित्सकपणे लिहिले आहे.

इग्नू विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर त्या विद्यापीठात अनुसूचित जाती जमातीच्या राखीव जागा विद्यापीठ सुरु झाल्यापासून कधीही  न भरल्यामुळे त्यांनी कुलगुरुंच्या दालनासमोर उपोषणाला बसून सत्याग्रह केला. कालांतराने  त्यांची मागणी मान्य झाली आणि विद्यापीठात रखीव जागा भरल्या गेल्या. याचं  विद्यापीठामध्ये एम. ए. हिंदीच्या अभ्यासक्रमात दलित साहित्य का विशेष अध्ययन  हा विषय अभ्यासकामत आणण्यासाठी त्यांनी अनेक पातळ्यांवर संघर्ष केला. दलित साहित्य हे राष्ट्रीय स्थरावर एक चळवळ म्हणून चर्चेला याव, यासाठी नवीन लेखकांची पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी तरुण मुला मुलींचे सातत्याने कार्यक्रम घेतले. दलित अस्मिता नावाचे राष्ट्रीय स्तरावरील एक महत्वाचा मंच त्यांनी उभा केला. त्यातून  विविध भाषिक दलित साहित्याची देवाणघेवाण झाली. आत्मविश्वासाने भरलेली नवीन दलित स्त्री साहित्यिकांची एक पिढी  त्यांनी तयार केली. या पार्श्वाभूमीवर सेंटर फॉर दलित लिटरेचर अँड  आर्ट ही संस्था त्यांच्या प्रयत्नातून स्थापन झाली. या संस्थेतर्फे दलित अस्मिता हे मासिक अखंडितपणे सुरु आहे. विमल थोरात या पत्रिकेच्या संपादक आहेत.

दलित विचारावर आयोजित विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. जागतिक रिपब्लिकन महिला परिषद, नागपूर  अध्यक्ष होत्या भारतीय स्त्री मुक्ति दिन परिषद, मुंबई , दलित लेखक संघ, दिल्ली या परिषद आणि सभांचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. ऑल इंडीया दलित महिला अधिकार मंचाच्या त्या  समन्वयक आहेत. या सह अनेक शासकीय, निम-शासकीय खाजगी संस्था संघटनांच्या त्या  पदाधिकारी आहेत. त्रिरत्न पुरस्कार, बहुजन डायव्हर्सिटी मिशन पुरस्कार,  राफ्टो फाउंडेशन पुरस्कार  (नार्वे) २००७, प्रियदर्शनी अशोका पुरस्कार  दिल्ली २००८. हिंदी अकादमी हिंदी सेवा सन्मान (२०१५), सावित्रीबाई फुले पुरस्कार सिंबॉयसिस पुणे,  भगवानदास पुरस्कार (२०२२) असे अनेक सन्मान त्यांना मिळाले आहेत.

संदर्भ : https://www.ambedkartimes.com/Ambedkar%20Times-27-July%202,%202025.pdf ( 20/03/2026 )

समीक्षण : जगतानंद भटकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.