अमिताभ : अमिताभ बुद्धांची संकल्पना इ.स.पू. पहिले ते इ.स. दुसरे शतक या कालावधीत विकसित झाली. अमित आहे आभा (प्रकाश/जीवन) ज्याची, अशा एका बुद्धाचे नाव. हे महायान बौद्ध धर्मातील एक प्रमुख ध्यानी बुद्ध आहेत. महायान पंथात अनेक बुद्धांचा आणि बोधिसत्त्वांचा प्रवेश झालेला आहे. त्यांच्या नावाचा अर्थ ‘अमर्याद प्रकाश’ असल्याने, अमिताभ यांचा प्रकाश संपूर्ण विश्वात पसरतो आणि सर्व जीवांवर प्रकाश टाकतो, असे म्हटले जाते. यामुळे अमिताभ यांना अनेकदा प्रकाशमान दाखवले जाते, जे महायान बौद्ध धर्मातील करुणा, मोक्ष व त्यांच्या ज्ञानाचे प्रतीक आहे. इतर अनेक बौद्ध ग्रंथांमध्येही अमिताभ यांचा उल्लेख आढळतो. जपानी लेखक केनेथ तनाका म्हणतात की, “एकतीस संस्कृत ग्रंथांमध्ये आणि शंभराहून अधिक चिनी व तिबेटी भाषांतरांमध्ये अमिताभ आणि/किंवा सुखावतीचा उल्लेख आहे”. सुरुवातीच्या महासांघिक सिद्धांतांशी असलेले हे संबंध अशी शक्यता सुचवतात की, अमिताभ हे सुरुवातीला बुद्धाच्या अनंत आयुष्याचे आणि प्रकाशाचे प्रतीक असावे, जे ऐतिहासिक बुद्ध शाक्यमुनींच्या अलौकिक आयामांकडे निर्देश करते.

त्यांचे तत्त्वज्ञान ‘शुद्ध भूमी’ हे बौद्ध धर्मावर आधारित आहे, जे भक्ती, श्रद्धेचे बळ आणि ‘नमो अमिताभ’ नामाच्या जपाद्वारे ‘सुखावती’ स्वर्गात पुनर्जन्म घेऊन मोक्षप्राप्ती सुलभ करण्यावर भर देते. सुखावती-व्यूह नावाचे एक प्राचीन बौद्धसूत्र आहे. त्याचे चिनी भाषांतर दुसऱ्या शतकात झाले आहे. अमिताभ बुद्धांनी ‘सुखावती’ नावाचे पश्चिम दिशेचे एक शुद्ध क्षेत्र (स्वर्ग) निर्माण केले आहे. अमिताभ यांना ‘सुखावती नावाच्या स्वर्गाच्या पश्चिम दिशेचा अधिष्ठाता’ म्हटले जाते. मोक्षप्राप्ती किंवा बुद्धत्वप्राप्ती सुगमतर करण्याच्या महायान पंथाच्या प्रयत्नात त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. या क्षेत्रात जन्म घेणे म्हणजे दुःखातून मुक्ती मिळवणे आणि सुलभतेने बुद्धत्व प्राप्त करणे होय, असे मानले जाते. महायान पंथात, विशेषतः शुद्ध भूमी परंपरेत, स्व-प्रयत्नांपेक्षा अमिताभ बुद्धांच्या कृपेवर अवलंबून राहणे (परशक्ती) महत्त्वाचे मानले जाते. पुढे पुढे तर केवळ ह्या बुद्धाला नमन केले किंवा त्यांचे नामस्मरण केले, तरी साधकाला आपल्या पापापासून मुक्तता मिळते व स्वर्गात स्थान मिळते, असा समज दृढ झाला. अमिताभ बुद्धांना करुणा आणि प्रकाश यांचे प्रतीक मानले जाते, जे सर्व प्राण्यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी कार्य करतात. अमिताभ बुद्धांचे महत्त्व व्हिएटनाम, चीन व जपान या देशांत विशेष वाढले असून, तेथे अद्यापही बौद्धसाधक त्यांच्या नावाने जपमाळ ओढीत असतात. हल्लीच्या जपानमधील ‘जोदो’ नावाचा बौद्ध संप्रदाय ह्याच तत्त्वावर आधारलेला असून, तो सर्वसाधारण समाजात अत्यंत लोकप्रिय झालेला आहे.

अमिताभ यांचा उल्लेख करणारे पहिले ‘बौद्धसूत्र’ हे कुशाण भिक्षू लोकक्षेमा यांच्या प्रत्युत्पन्न समाधी सूत्राचे (बोझौ सनमेई जिंग) चीनी भाषांतर आहे. अमिताभ आणि त्यांची शुद्ध भूमी सुखावती यांचा उल्लेख करणाऱ्या इतर महत्त्वाच्या महायान ग्रंथांमध्ये ‘अजितसेन सूत्र’, ‘कमळ सूत्र’, ‘निर्वाण सूत्र’, ‘महामेघ सूत्र’ आणि ‘समाधिराज सूत्र’ यांचा समावेश होतो. अमिताभ यांवर लक्ष केंद्रित करणारी अनेक भारतीय ‘धरणी सूत्रे’ (विशिष्ट जादुई मंत्रांवर केंद्रित केलेली सूत्रे) देखील आहेत. जेफ विल्सन लिहितात की, ‘तैशो त्रिपिटका’तील एक-पंचमांशाहून अधिक सूत्रांमध्ये अमिताभ यांचा उल्लेख आहे; परंतु पूर्व आशियाई बौद्ध धर्मात विशेषतः तीन सूत्रे प्रमाणभूत मानली जातात. महायान ग्रंथांमध्ये अमिताभ यांचा उल्लेख काही ग्रंथांमध्ये आढळतो, ज्यात ‘दशभूमिकविभाषा’चा समावेश आहे, जो परंपरेनुसार नागार्जुनांचा मानला जातो. भारतात अमिताभ बुद्धांची उपासना तुलनेने कमी आहे.
- झेन बौद्ध धर्म : अमिताभ हे जपानी बौद्ध धर्मातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व बनले होते. अमिताभ-केंद्रित साधनांच्या लोकप्रियतेमुळे अखेरीस केवळ अमिताभ यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या स्वतंत्र ‘प्युअर लँड’ पंथांची स्थापना झाली.
- वज्रयान बौद्ध धर्म : अमिताभ हे वज्रयान बौद्ध धर्मातील एक प्रभावशाली बुद्ध होते. अक्षोभ्य, अमोघसिद्धी, रत्नसंभव आणि वैरोचन यांच्यासह त्यांना पंचतत्त्वांपैकी एक मानले जाते. या गूढ बौद्ध तत्त्वज्ञानानुसार अमिताभ यांना लोटस बुद्ध परिवाराचा भाग मानले जाते, जो लाल रंग, पश्चिम दिशा आणि ज्ञानसमूहाचे प्रतिनिधित्व करतो.
- अमिताभ यांच्याशी संबंधित देवी : अनेक स्रोतांमध्ये अमिताभ यांच्याशी संबंधित अनेक स्त्रीदेवतांचा उल्लेख आढळतो. या देवी बुद्धांच्या सोबती, अवतार किंवा सद्गुणांचे प्रकटीकरण म्हणून विविध भूमिका बजावतात आणि संरक्षण, शुद्धीकरण व सुखावतीच्या पवित्र लोकात पुनर्जन्मासाठी त्यांची पूजा केली जाते.अमिताभ आणि त्यांची पत्नी पांडरवासिनी यांच्या मिलनाचे गूढ चित्रण पांडरवासिनी (संस्कृत – ‘पांढरे वस्त्र परिधान करणारी’ किंवा ‘पांढऱ्या रंगात राहणारी’), जिला पांडर म्हणूनही ओळखले जाते. ही बौद्ध धर्माच्या गूढ परंपरांमध्ये अमिताभ बुद्धांची प्रमुख प्रज्ञा-सहचरी (प्रजा) आहे.
- आर्यवलोकितेश्वर : माता-नाम-धारणी सूत्रात धरणी नावाच्या देवीचा आणि अवलोकितेश्वराच्या आईचा (संस्कृत – अवलोकितेश्वर-माता) उल्लेख आढळतो.
- विशुद्धप्रभा (संस्कृत – शुद्ध प्रकाश) : ही एक स्त्रीदेवता आहे, जिचे आवाहन विशुद्धप्रभा धारणीमध्ये केले जाते, जी ‘शुद्ध निर्मळ प्रकाशाच्या किरणांच्या महान वाहकाचे सूत्र’ (चीनी : ताइशो १०२४) यामध्ये आढळते.
- महाशितवती (संस्कृत – महान शीत किंवा अत्यंत शांत) : ही पंचरक्षा देवींपैकी एक आहे. या प्रत्येक देवीचा संबंध पाच बुद्धांपैकी एका बुद्धाशी आहे आणि तिचा उगम अमिताभपासून झाला आहे.
अनंत जीवनसूत्रामध्ये अमिताभ यांची बारा नावे दिली आहेत. तर शाश्वत जीवनसूत्राच्या उपलब्ध संस्कृत आवृत्तीमध्ये अठरा नावांची वेगळी यादी आहे.
पूर्व आशियाई बौद्ध धर्मात अमितायुस आणि अमिताभ (विविध चीनी लिप्यंतरण, भाषांतरांमध्ये) ही नावे अदलाबदलीने वापरली जातात; तथापि तिबेटी बौद्ध धर्मात, अमितायुसला अमिताभ यांपासून वेगळे मानले जाते आणि हिमालयीन कलेत त्यांना वेगळ्या प्रकारे चित्रित केले जाते. तिबेटी बौद्ध धर्मात अमितायुसला दीर्घायुष्याचा बुद्ध म्हणूनही ओळखले जाते. पूर्व आशियाई बौद्ध धर्मात अमिताभ यांना बहुतेकदा दोन बोधिसत्व अवलोकितेश्वर आणि महास्थामप्राप्त यांच्यासोबत त्रिकुटाचा भाग म्हणून चित्रित केले जाते. तर तिबेटी बौद्ध धर्मात या त्रिकुटात त्याऐवजी अवलोकितेश्वर आणि वज्रपाणी किंवा पद्मसंभव यांचा समावेश असतो.
संदर्भ :
- Buswell, Robert E. Encyclopedia of Buddhism, New York, 2004.
- Foard, James Harlan; Solomon, Michael; Payne, Richard Karl, The Pure Land Tradition : History and Development, 1996.
- Gomez, Luis, Trans., The Land of Bliss : The Paradise of the Buddha of Measureless Light : Sanskrit and Chinese Versions of the Sukhavativyuha Sutras, Honolulu, 1996.
- Jones, Charles B. Chinese Pure Land Buddhism, Understanding a Tradition of Practice, Honolulu, 2019.
- Kroeber, Shay Whar, Buddha Amitabha : Sukhavati, 2018.
- Lewis, T. T. Sukhavati Traditions in Newar Buddhism, South Asia Research, 1996.
- Pas, Julian F. Visions of Sukhavati : Shan-Tao’s Commentary on the Kuan Wu-liang- Shou-Fo Ching, Albany, 1995.
- Tanaka, Kenneth K. The Dawn of Chinese Pure Land Buddhist Doctrine : Ching-ying Hui-yüanʼs Commentary on the Visualization Sutra, New York, 1990.
- Williams, Paul, Mahayana Buddhism : The Doctrinal Foundations, London, 2008.
समीक्षक : मनोज गायकवाड
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.