लक्ष्मीनारायण ‘शफीक’ औरंगाबादी याने लिहिलेला फार्सी भाषेतील मराठ्यांचा एक इतिहास. हा दिनांक १८ नोव्हेंबर १७९९ रोजी लिहून पूर्ण झाला. याची लेखनशैली बखरवजा असून, भोसले घराण्याच्या उदयापासून ते पानिपतच्या तिसऱ्या लढाईपर्यंतचा इतिहास यात आलेला आहे. ‘बिसात-उल-गनाईम’ याचा अर्थ ‘शत्रूचे शौर्य’ असा होतो. स्वत: लेखकाने सांगितल्याप्रमाणे हा इतिहास एका अज्ञात लेखकाने लिहिलेल्या मराठी बखरीवर आधारलेला आहे. त्याखेरीज परंपरा आणि दंतकथांचाही आधार लक्ष्मीनारायण याने घेतलेला आहे.

लक्ष्मीनारायणचे कुटुंब मूळ लाहोरचे. याचे आजोबा हे प्रथम निजामाचे आजोबा ख्वाजा आबिद यांच्या पदरी होते. याचे वडील मनसाराम हे प्रथम निजामाचे स्वीय सचिव होते. त्यांनी दख्खनच्या इतिहासाशी संबंधित दोन फार्सी ग्रंथही लिहिले आहेत. खुद्द लक्ष्मीनारायण हा फार्सी भाषेचा मोठा विद्वान होता. ‘बिसात-उल-गनाईम’ या ग्रंथाखेरीज त्याने मासिरे असफी हा ऐतिहासिक ग्रंथ, तसेच फार्सी काव्य आणि कवी यांसंबंधीचा एक ग्रंथही लिहिलेला आहे.

ग्रंथाच्या सुरुवातीला लेखकाने आपली भूमिका मांडली आहे. ‘दख्खनमधील निव्वळ प्रभावशाली नव्हे तर एकमेव बलशाली असणाऱ्या मराठ्यांचा इतिहास लिहिण्याची त्याला बुद्धी झाली. मुसलमान लेखकांनी त्यांच्या ग्रंथांत त्यांच्या विरोधकांचा उल्लेख तिरस्काराने केलेला असून, त्यांचे वर्णन करताना कठोर आणि निंदाव्यंजक शब्द वापरलेले आहेत. दैनंदिन गोष्टींतही धार्मिक द्वेष झिरपलेला दिसून येतो. विरोधकांचे गुण आजिबात न उल्लेखिता त्यांच्या फक्त दोषांचेच वर्णन केले जाते. जुन्या आणि सद्यःकालीन फार्सी ग्रंथांच्या लेखकांनी मराठ्यांनी त्यांच्या उत्कर्षादरम्यान केलेल्या कामांकडे दुर्लक्षच केले असल्याने, सदर ग्रंथात हे दोष टाळण्यात आलेले आहेत.’ लेखकाने शक्यतोवर मराठी भाषा जाणणारे आणि मराठ्यांशी संबंधित असलेले लोक हेरून त्यांच्यापासून माहिती मिळवून ती लेखनिविष्ट केलेली आहे व या प्रक्रियेत अविश्वसनीय वाटणाऱ्या माहितीकडेही दुर्लक्ष केलेले नाही.

यानंतर लेखक मराठ्यांच्या सत्तर कुळांची यादी देतो. त्यांमधील मुख्य भोसले, शिर्के, निंबाळकर, चव्हाण, जाधव, शिंदे, मोहिते, गायकवाड यांची नावे देऊन भोसले या आडनावाची व्युत्पत्ती देतो. भोसले कुळाची उत्पत्ती उदेपूरच्या राणा शासकांपर्यंत तो पोचवतो, तसेच या राणा शासकांच्या वंशजांबद्दलच्या काही दंतकथांचाही तो उल्लेख करतो. मराठ्यांच्या इतिहासाची सुरुवात तो भोसल्यांच्या दख्खनमधील स्थलांतराने आणि शहाजीराजांचे वडील मालोजीराजे यांच्या उदयापासून करतो. जिजाबाई आणि शहाजीराजे यांच्या लग्नापर्यंतचे प्रसंग हे नेहमीच्या मराठी बखरींतल्याप्रमाणेच आहेत. शहाजीराजांची उत्तरकालीन कारकीर्द, शिवाय मुरार जगदेव आणि मलिक अंबर यांबाबतचे तपशील मात्र अचूक नाहीत.

यानंतरच्या प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची हकीकत दिलेली आहे. शिवजन्माची तारीख वैशाख शुद्ध पंचमी शके १५४९ अर्थात इ. स. १६२७ मधील नमूद आहे. इ. स. १६३० मधील योग्य तारखेपेक्षा ही तारीख वेगळी आहे. शिवचरित्राच्या वर्णनाने पुस्तकाचा बराच मोठा भाग व्यापलेला आहे. जवळपास ११० पाने असलेल्या या ग्रंथातील ४० पाने निव्वळ शिवचरित्रविषयक आहेत. शिवचरित्राचे वर्णन त्यामुळे बऱ्यापैकी तपशीलवार आलेले आहे. यावरून लक्ष्मीनारायण हा साधारणपणे मराठ्यांचा व त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचा चाहता असल्याचे दिसून येते. त्याने केलेले अफझलखान प्रकरणाचे विशेषत: तो प्रतापगडाच्या पायथ्याला पोचल्यानंतरचे वर्णन चित्रदर्शी आहे.

यानंतर आग्र्याहून सुटका व औरंगजेबासोबतच्या पत्रव्यवहाराचे वर्णन येते. कुत्बशाहीला इ. स. १६७७ साली दिलेल्या भेटीबद्दलही लक्ष्मीनारायण लिहितो. गोवळकोंड्यातील येसाजी कंक आणि हत्ती यांमधील लढाईचे वर्णन पाहता काही प्रसिद्ध मराठी बखरींचा आधार त्याने घेतला असावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू विषप्रयोगाने २४ रबिउलआखिर हिजरी १०९१ रोजी झाला असे तो नमूद करतो. पिल्ले जंत्रीनुसार ही तारीख १४ मे १६८० अशी येते. ३ एप्रिल १६८० या योग्य तारखेशी ती जुळत नाही. यानंतरच्या प्रकरणात छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यामागे ठेवलेल्या खजिन्याचे तसेच किल्ल्यांचे तपशीलवार वर्णन यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांची औरंगजेबाने त्याविरुद्ध शिवीगाळ केल्याच्या रागातून हत्या केली, तसेच मराठ्यांच्या संघर्षामुळे त्रस्त झाल्याने औरंगजेबाने तहाची चाचपणी सुरू केली. असे तो सांगतो. या कथाभागात ऐकीव माहितीवर बराच भर दिलेला आढळतो. यानंतर छत्रपती शाहू महाराजांबद्दलच्या काही अफवा सांगून झाल्यावर पुढच्या प्रकरणात निजामाकडील चंद्रसेन जाधव, सुलतानजी निंबाळकर व जानोजी निंबाळकर या मराठे सरदारांची हकिकत येते व पेशव्यांचा उदय आणि त्यांचा निजामासोबतचा संघर्ष यांचेही वर्णन येते.

मराठ्यांचा उत्तरेतील उत्कर्ष व पानिपतच्या लढाईपर्यंतच्या घटनांचा परामर्श लेखकाने विस्ताराने घेतला आहे. जाटराजा सूरजमल याने सदाशिवरावभाऊंना दिल्लीपुढे मोहीम करण्यास मनाई केली होती, असे लक्ष्मीनारायण नोंदवतो. खुद्द पानिपताच्या लढाईचे वर्णन, त्यातही अखेरच्या गर्दीत सदाशिवरावभाऊ धारातीर्थी पडले त्याचे वर्णन त्याने लक्षवेधी शैलीत केलेले आहे. सदाशिवरावभाऊ, विश्वासराव, जनकोजी, समशेरबहादूर, इब्राहिमखान गारदी इ. मराठे वीरांच्या पराक्रमाचे वर्णन करताना लेखकास मराठ्यांचे असलेले कौतुक स्पष्टपणे दिसून येते. पानिपताच्या लढाईनंतर बाळाजी बाजीराव पेशव्यांचा मृत्यू झाल्याचे कथन करून ग्रंथ समाप्त होतो.

या ग्रंथातील अनेक घटना व त्यांमागील कारणमीमांसा ऐतिहासिक विश्लेषणाच्या कसोटीवर टिकणाऱ्या नाहीत. त्या अर्थाने हे इतिहासाचे एक दुय्यम साधन आहे. परंतु निव्वळ मराठ्यांच्या इतिहासाला वाहिलेले फार्सी ग्रंथ मुळात कमी असून, बहुतांशी ते आनुषंगिक रीत्या मराठ्यांचा परामर्श घेतात. शिवाय बहुतेक फार्सी इतिहासग्रंथ हे मुसलमान लेखकांनी लिहिलेले आहेत. तुलनेने बिसात-उल-गनाईम मध्ये एका हिंदू विद्वानाची मराठ्यांबद्दलची मते यातून दिसून येतात. ग्रंथलेखनाचे फार्सीभाषक माध्यम जरी इस्लामी संस्कृतीशी जवळीक साधणारे असले तरी लेखनात मात्र मराठ्यांची भलामण केलेली आढळते. तत्कालीन घटनांबद्दल तेव्हाच्या समाजमनाचे मत तपासण्याकरिता या ग्रंथाचे महत्त्व मोठे आहे.

संदर्भ :

  • Malik, Z. U., ‘PERSIAN HISTORIOGRAPHY OF MARATHAS IN THE SECOND HALF OF EIGHTEENTH CENTURY’, Proceedings of the Indian History Congress, Vol. 52, pp. 481-489, 1991.
  • Pillai, L. D. Swamikannu, An Indian Ephemeris, Vol. VI – A. D. 1600 to A. D. 1799, Published under the authority of the Government of Madras, 1922.
  • Pagadi, Setu Madhav Rao, ‘THE BISAT-UL-GANAIM OF LAXMINARAYAN SHAFIQ AURANGABADI, A PERSIAN CHRONICLE OF MARATHA HISTORY, Proceedings of the Indian History Congress, Vol. 21, pp. 365-369, 1958.

समीक्षक : निखिल परांजपे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.