प्रामुख्याने इ. स. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील फार्सी साधनांमधील मराठ्यांचे चित्रण. या आधीच्या साधनांत मराठ्यांचे वर्णन प्रामुख्याने बंडखोर म्हणून येते. तुलनेने इ. स. १७५० नंतरच्या साधनांत विविधांगी लेखन आढळते. मराठ्यांच्या उत्तरेतील वाढत्या वर्चस्वामुळे तेथील लेखकांना त्यांची दखल घेणे भाग पडले. मराठ्यांचा उत्तरेतील वाढता वावर, त्यामुळे स्थानिक शासनयंत्रणा, समाजजीवन, धार्मिक व राजकीय समीकरणे इ. अनेक महत्त्वाच्या गोष्टींची दखल यात घेतलेली आहे. मराठे-अफगाण संघर्षाला वाहिलेले काही ग्रंथही यातून लिहिले गेले.

मराठ्यांच्या वर्चस्वामागील कारणांचा आढावा घेताना मोगल साम्राज्याचे पतन या महत्त्वाच्या पैलूकडे या काळातील इतिहासलेखकांनी लक्ष पुरवलेले आहे. त्यांच्या मते मोगलांचे पतन आणि मराठ्यांचा उत्कर्ष या दोन्ही गोष्टी मोगलांच्या दख्खनमधील माघारीपासून सुरू झाल्या. मराठ्यांच्या लष्करी सामर्थ्यामागील कारणांबद्दल लिहिताना भोसले कुटुंबाचे मूळ, पेशव्यांचे राहणीमान आणि वागणूक, त्यांची युद्धपद्धती व सैन्यरचना या प्रमुख मुद्द्यांचा विचार केलेला आहे. त्याशिवाय मराठ्यांच्या तसेच जाट, अफगाण इत्यादींच्या स्वाऱ्यांनी उत्तरेत झालेल्या नुकसानाबद्दलही त्यांनी लिहिले आहे. काईम चांदपुरी, आझाद बिल्ग्रामी, प्रेमकिशोर फिराक, अब्दुर्रहमान उर्फ शाहनवाज खान, मुहम्मद अली खान अन्सारी इ. अनेक लेखकांचे ग्रंथ या घटनांचा परामर्श घेतात.

इ. स. १७७२ मध्ये मराठे व मोगल यांच्या संयुक्त सैन्याने रोहिल्यांवर केलेल्या स्वारीत रोहिलखंडमधील नजीबाबाद, शुकरताल, मुरादाबाद, चांदपूर इ. ठिकाणांच्या झालेल्या विध्वंसाचे तपशीलवार वर्णन काईम चांदपुरीच्या लेखनात सापडते. या स्वारीआधी समाजाच्या विविध स्तरातील लोक गुण्यागोविंदाने व सुखात राहत असून युद्धामुळे नजीबखानाचा मीरबक्षी राजा गुलाबराय याच्या पदरचे हजारो लोक देशोधडीला लागल्याचे तो सांगतो. त्याच्या लेखनातील विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्याने तत्कालीन मोगल बादशाह शाह आलमवरही तीव्र शब्दांत टीका केलेली आढळते. याचे कारण म्हणजे मराठे व मोगलांचे संयुक्त सैन्य शाह आलमच्या नेतृत्वाखाली होते. याआधीही मोगल दरबाराशी संबंधित लेखकांनी त्यांच्या समकालीन राज्यकर्त्यांवर टीका केल्याची उदाहरणे ‘तारीख-इ-अहमदशाही’ व ‘तारीख-इ-आलमगीर सानी’ या ग्रंथांत सापडतात, परंतु त्या लेखकांनी कारवाईच्या भीतीने स्वत:चे नाव प्रकाशात येऊ दिले नव्हते. चांदपुरी मात्र रोहिल्यांच्या बाजूने लिहिताना मराठ्यांसोबतच मोगलांवरही टीका करतो.

मोगल शासनपद्धत मोडकळीस येऊन त्याजागी मराठ्यांचे राज्य येण्याचा एक मोठा दृश्य परिणाम म्हणजे पूर्वीच्या अमदानीतील कैकजणांची वतने, जमीनजुमला इ. वर मराठ्यांचा कबजा होऊन त्यांना बेघर व्हावे लागले. यात मध्यम व निम्नस्तरातील अधिकाऱ्यांचा भरणा होता. नव्या मराठेशाहीच्या अमदानीत जुन्या अधिकाऱ्यांना एक तर त्यांच्या पदांवरून हाकलले गेले किंवा पदे भरताना त्यांना वगळले गेले. या अधिकारीवर्गाचा प्रतिनिधी म्हणून आझाद बिल्ग्रामी याने नानासाहेब पेशव्यांवर बरीच टीका केलेली आढळते.

मोगलांविरुद्ध कुणी बंड केल्यास त्याला काही इतिहासकार इस्लामविरोधातले बंड असे संबोधत – भले दोन्ही बाजूस हिंदू व मुसलमान या दोन्ही धर्मांतील सरदार व सैनिक असले तरीही. उदा., अहमदशाह बहादूर (इ. स. १७४८-१७५४) या मोगल बादशाहविरुद्ध सफदरजंगाने बंड केल्यावर सफदरजंगाला बंडखोर, काफिर तर अहमदशाह बहादूरने उभ्या केलेल्या फौजेला लष्कर-इ-इस्लाम असे संबोधले.

महादजी शिंदे यांना शाह आलमने वकील-इ-मुत्लक म्हणून नेमल्यावर अनेक पातळ्यांवर प्रदीर्घकाळ चाललेला मोगल-मराठे संघर्ष अखेरीस थांबला. दोन्ही सत्तांनी एकमेकांशी जुळवून घेतले व दिल्लीतील राजकारणाचा एक नवा अध्याय सुरू झाला. महादजींनी दिल्लीच्या आसपासच्या बऱ्याच मोठ्या भागात कायदा व सुव्यवस्थेचे पुनरुज्जीवन केले. तेथील स्थानिकांशीही जुळवून घेतल्यामुळे तेथील लोकांचे महादजींबद्दल अनुकूल मत झाले होते. मात्र महादजींनी स्थानिक उत्तर भारतीय अधिकारीवर्ग तयार न केल्यामुळे जुना, बाजूस पडत चाललेला अधिकारीवर्ग व राजकारण्यांच्या मनातील त्यांच्याबद्दलचे व पर्यायाने मराठ्यांबद्दलचे पूर्वग्रह तसेच राहिले. तत्कालीन फार्सी साधनांतून ते दृष्टीस येतात. पण पूर्वीपेक्षा या काळातील ऐतिहासिक लेखनातील एक मोठा बदल म्हणजे मराठ्यांना पूर्वीप्रमाणे सरसकट निंदाव्यंजक विशेषणे लावलेली आढळत नाहीत. मराठे उत्तरेतील शासनकर्ते असल्याचा हा परिणाम असावा. सरदारान-इ-मराठा (मराठे सरदार) अथवा सरदारान-इ-जनूब (दख्खनमधील नेते) अशा शब्दांत त्यांचा उल्लेख आढळतो. जुन्या अधिकारीवर्गाचा प्रतिनिधी व मोगल साम्राज्याचा मोठा अभिमानी असलेला प्रेमकिशोर फिराक याने लिहिलेल्या ‘वाका-इ-आलमशाही’ नामक ग्रंथात शाह आलमच्या महादजींना जवळपास पूर्णत: शरण जाण्यावर व त्याच्या महादजींवरील अवलंबित्वावर बरीच टीका केलेली आहे.

प्रेमकिशोर फिराकच्या बरोबर उलट दृष्टिकोन अब्दुर्रहमान उर्फ शाहनवाझ खान याचा आहे. महादजींच्या काळात मोगलांना पुन्हा वैभवाचे दिवस येतील अशी आशा याच्या लेखनात दिसून येते. हा शाह आलमच्या दरबारात असून याने ‘मिरात-इ-आफताबनुमा’ हा ग्रंथ लिहिला. त्यात मराठ्यांबद्दल, विशेषत: त्यांच्या उत्तरेतील स्वाऱ्यांबद्दल बरीच माहिती असून त्यातही शाह आलम आणि महादजींमधील अनेक वाटाघाटी विस्तृतपणे वर्णिल्या आहेत. ‘तारीख-इ-मुझफ्फरी’ या ग्रंथाचा लेखक मुहम्मद अली खान अन्सारी, ‘मराठा नामा’ या ग्रंथाचा लेखक अली इब्राहिम खान यांचेही याबद्दल मत असेच आहे. ‘मराठा नामा’ या ग्रंथात भोसले घराण्याचे मूळ, त्यांचा उदय, सातारकर शाहू छत्रपतींची कारकीर्द आणि इ. स. १७५७ मधील निजामाचा सिंदखेडमधील पराभव या घटनांचे तपशीलवार वर्णन आढळते.

इ. स. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात व इ. स. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतातील अनेक राज्यांत ब्रिटिश रेसिडेंटही राहू लागल्यावर त्यांच्या प्रोत्साहनाने त्या त्या राज्यांचे फार्सी भाषेत परंतु इंग्रजी पद्धतीने घटना, स्थल, काल, इत्यादींच्या अचूक वर्णनावर भर दिलेले इतिहासही लिहिले जाऊ लागले. नागपूरकर भोसल्यांच्या दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट रिचर्ड जेन्किन्सच्या प्रोत्साहनाने एका अज्ञात लेखकाने इ. स. १८२३ मध्ये लिहिलेला ‘तारीख-राजा-इ-लै-नागपूर’ हा ग्रंथ यातच मोडतो. या ग्रंथाच्या लेखकाने त्याला उपलब्ध असलेल्या ‘बखर पूना’, ‘बखर नागपूर’, ‘किताब छत्तीसगड’, ‘किताब जमाबंदी’ इ. अनेक ग्रंथांची यादी दिलेली असून, प्रत्येक पानावर त्याच्या विधानांचे आधुनिक पद्धतीने तळटीपेत संदर्भ दिलेले आहेत.

मराठ्यांच्या प्रभावाखालील व उत्तरोत्तर अंमलाखालील दिल्ली दरबार हा यांपैकी अनेक ग्रंथांच्या केंद्रस्थानी होता. हे सर्व ग्रंथ दिल्लीतील एकसंध सत्तेच्या बाजूने लिहिलेले आढळतात. जुन्या पद्धतीने लिहिल्यामुळे सर्व घटनांचे मुख्य कारण ईश्वरेच्छा हे दिलेले असले तरी कैक सामान्य व उच्चवर्गीय माणसांना त्यांच्या कृतीप्रमाणे जरूर तिथे दोषही दिलेला आढळतो. या ग्रंथांतून लेखकांच्या दृष्टिकोनासोबतच अर्थव्यवस्था, सामाजिक जीवन, राजकीय घडामोडी, इ. संबंधी बरीच नवी माहितीही मिळते. मराठ्यांच्या इतिहासासोबतच उत्तर भारताच्या इतिहासासाठीही हे ग्रंथ त्यामुळे बरेच महत्त्वाचे आहेत.

संदर्भ :

  • Bilgrami, Ghulam Ali Azad, Khazana-E-Amrah, 1763. Published by Munshi nawal Kishor, Lucknow, 1871.
  • Chandpuri, Qaim, Kulliyat-i-Qaim, Imtiyaz Ali Taj, Majlis-e-Taraqqi-e-Adab, Lahore. 1965.
  • Gordon, Stewart N., ‘The Slow Conquest: Administrative Integration of Malwa into the Maratha Empire, 1720—1760’, Modern Asian Studies, Vol. 11, No. 1, pp. 1-40, Cambridge University Press, UK, 1977.
  • Khan, Ali Ibrahim, Maratha Nama, India Office Library, Ms. Ethe, no. 490.
  • Malik, Z. U., ‘PERSIAN HISTORIOGRAPHY OF MARATHAS IN THE SECOND HALF OF EIGHTEENTH CENTURY’, Proceedings of the Indian History Congress, Vol. 52, pp. 481-489, 1991.

समीक्षक : निखिल परांजपे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.