पाकट माशाचा कास्थिमत्स्य उपवर्गातील मायलिओबॅटिफॉर्मिस (Myliobatiformes) गणातील मायलिओबॅटोइडी (Myliobatoidei) या उपगणात समावेश होतो. या उपगणात पुढील सु. ११ कुलांचा समावेश होतो – हेक्झाट्रायगोनिडी [Hexatrygonidae (Sixgill ray) – सहा कल्ले असणारे रे मासे], जिम्नुरिडी [Gymnuridae (Butterfly rays) – फुलपाखराच्या आकाराचे रे मासे], प्लेसिओबॅटिडी [Plesiobatidae (Deepwater stingrays) – खोल पाण्यातील रे मासे], युरोलोफिडी [Urolophidae (Round stingrays) – चपटे गोलाकार मासे], मायलिओबॅटिडी [Myliobatidae (Eagle rays)- गरुड मासे], एटोबॅटिडी [Aetobatidae (Pelagic eagle rays) – उथळ पाण्यातील गरुड मासे], डॅसिॲटिडी [Dasyatidae (Whiptail rays) – चाबूक मासे], मोब्युलिडी [Mobulidae (Manta and devil rays) – महाकाय परंतु, निरुपद्रवी रे मासे], ऱ्हायनोप्टेरिडी [Rhinopteridae (Cownose rays) – गायीप्रमाणे मुख असणारे रे मासे], पोटॅमोट्रायगोनिडी [Potamotrygonidae (River stingrays) – नदीतील रे मासे]. पाकट माशांच्या २९ प्रजातींमध्ये सु. २२० जाती आहेत. ज्या रे माशांची शेपूट लांब असते व त्यावर नांगीसारखा काटा असतो, त्यांना स्टिंग रे म्हणतात. (पहा : आ. २.१ व २.२).

पाकट मासे उष्ण तसेच समशीतोष्ण प्रदेशातील समुद्र किनाऱ्यालगतच्या उथळ पाण्यात आढळतात. दक्षिण तसेच दक्षिणपूर्व आशिया खंडातील नद्या व सरोवरांत पाकट माशाच्या काही महाकाय प्रजाती आढळतात. भारतीय उपखंडात सर्वसाधारणपणे गरुड मासा, गाय मासा, झिणझिणा पाकट, करवत मासा इत्यादी पाकट माशांचे प्रकार आढळतात. झिणझिणा पाकटाला लांब शेपूट व नांगी नसते. डॅसिॲटिस (Dasyatis) प्रजातीतील पाकट भारतीय सागरी किनाऱ्यावर मोठ्या संख्येने सापडतात. पाकट व मोरी माशांचा सध्या संरक्षित माशांच्या यादीमध्ये समावेश केला आहे.
पाकट माशाचे शरीर तबकडी अथवा पतंगाप्रमाणे पसरट असून त्याला चाबकाप्रमाणे लांबसडक शेपूट असते. काही अपवाद वगळता शरीराची रंगसंगती भोवतालच्या वातावरणाशी मिळतीजुळती अशी काळपट राखाडी किंवा तपकिरी रंगाची असते. वक्षपराने मुख, शीर्ष आणि धड यांना पूर्णपणे वेढून टाकलेले असते. डोळे ऊर्ध्व पृष्ठभागावर परंतु, एकमेकांपासून लांब असतात. मुख व कल्ले अधर पृष्ठावर असतात. भक्ष्य पकडण्यासाठी डोळ्यांचा उपयोग मर्यादित स्वरूपाचा असतो. अंत:कंकाल कास्थींनी बनलेला असतो. (पहा : आ. १). पाकट माशाच्या आकारमानात विविधता आढळते. काही पाकट अवघे २५ सेंमी. रुंदीचे, तर दक्षिण पूर्व आशियातील नद्यांमध्ये सापडणारे महाकाय पाकट ३-४ मी. लांबीचे (शेपटीसहित) व सु. अर्धा टन वजनाचे असतात.

पाकटाच्या शेपटीच्या तळाशी विषग्रंथी असणाऱ्या एक किंवा दोन नांग्या (काटे) असतात. नांगीचा उपयोग पाकट मासे स्वसंरक्षणासाठी करतात. ही नांगी व्हॅसोडेंटिन या अत्यंत मजबूत कास्थीपासून तयार होते, जी त्वचेमधून सहजपणे आरपार जाऊ शकते. उथळ सागरी तळाशी असल्याने अशा वाळूमधून चालताना धोक्याची जाणीव होताच शेपटी उंचावून ते डंख मारतात. नांगीची लांबी काही प्रजातींमध्ये एक फूटापेक्षाही जास्त असून ती अणकुचीदार व अत्यंत कठीण असते. मानवामध्ये अशी नांगी अस्थिभेद करू शकते. नांगीची झीज झाल्यास किंवा ती तुटल्यास त्या ठिकाणी दुसरी नांगी निर्माण होते. नांगीमधील विषद्रव्याच्या केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, पूर्ण वाढ झालेल्या माशांपेक्षा लहान आणि विशेषकरून मादीचे विष हे जास्त जालीम आणि वेदनादायी असते. पाकट माशाचा वावर उथळ पाण्यात असल्यामुळे त्याच्याकडून इजा झाल्याची अनेक उदाहरणे मानवी समाजात मोठ्याप्रमाणात आढळतात. पाकट माशाकडून इजा झाल्यास त्याच्या नांगीतील विषामुळे जखमेच्या ठिकाणी तीव्र वेदना होतात. तसेच जखमेच्या ठिकाणी सूज येणे, मळमळ, उलट्या, डोकेदुखी, थकवा, अतिसार, स्नायू पेटके इत्यादी लक्षणे दिसतात. जर नांगी शरीरात खोलपर्यंत घुसली असेल तर जखमेच्या ठिकाणी खूप वेळ रक्तस्राव होणे, संसर्ग होणे, रक्तदाब कमी होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. गंभीर परिस्थितीत अवयव देखील कापावे लागतात. मोठ्या पाकट माशाची नांगी शरीरात घुसल्यास ती प्राणघातक ठरू शकते. प्रथमोपचारामध्ये पाकट माशाने ज्या ठिकाणी डंख मारला आहे तो भाग त्वरित गरम पाण्यात बुडवून ठेवल्यास वेदना कमी होण्यास मदत होते. (पहा : आ. ३).

पाकट माशांमध्ये वाताशय नसल्याने पोहण्याची क्षमता फारशी विकसित झालेली नसते. ते पाण्याच्या तळाशी वाळू किंवा चिखलात शरीर खुपसून घेऊन बहुतांश काळ निपचित पडून राहतात. ते अत्यंत संथ गतीने हालचाल करतात. काही प्रजाती अन्नाच्या शोधात कळपाने स्थलांतर करतात. पाण्याच्या तळाशी उपलब्ध असणारे मासे, खेकडे, कोळंब्या, शिंपले, कालव तसेच अपृष्ठवंशीय प्राणी हे त्यांचे खाद्य आहे. भक्ष्य प्राण्यांच्या हालचालीने पाण्यात जैवविद्युतक्षेत्र वा लहरी निर्माण होत असतात. पाकटांच्या मुखाभोवती संवेदी लोरेंझींनी कुंभिका (Ampullae of Lorenzini) असतात. त्याद्वारे त्यांना विद्युत तरंगातील बदल ओळखता येतात. तसेच त्यांना पाण्याच्या तापमानातील सूक्ष्म बदल देखील लगेच समजतात. त्यामुळे ते भोवताली असलेल्या भक्षाचा सहजपणे मागोवा घेऊ शकतात. अधर पृष्ठावर असलेल्या तोंडाच्या साहाय्याने त्यांना भक्ष्य पकडणे शक्य होते. मजबूत दातांनी भक्ष्याचा चावून लगदा केला जातो. झिजलेल्या दातांच्या जागी नवीन दात निर्माण होतात.
प्रजननक्षम मादीच्या शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या सूक्ष्म गंधामुळे नर मादीकडे आकर्षित होतात. प्रजनन काळात नर पाकटाचे दात टोकदार बनतात. पाकटामध्ये प्रजजन काळात दातांच्या आकारात बदल घडून येणे हे पृष्ठवंशीय प्राण्यांमधील एकमेव उदाहरण आहे. पाकटाच्या बाह्यत्वचेवर श्लेष्माचा संरक्षक थर असल्याने ती निसरडी असते, त्यामुळे मिलनाच्या वेळेस मादीच्या शरीराची पकड घेण्यासाठी नराला या दातांचा उपयोग होतो. मादीची त्वचा नरापेक्षा अधिक जाड असते. विणीचा हंगाम संपल्यावर येणारे नराचे दात सपाट असतात.
पाकट मासे पिलांना जन्म देतात. अंड्यांचे निषेचन व गर्भाची वाढ मादीच्या शरीरात होते. अंड्यातील बलकापासून भ्रूण आपले पोषण मिळवतात. गर्भाशयातील ग्रंथींनी स्रवलेली प्रथिने, मेद आणि श्लेष्मयुक्त पोषक द्रव्ये शोषून घेतात आणि वाढ पूर्ण होईपर्यंत ती मादीच्या शरीरातच राहतात. गर्भधारणेचा काळ हा साधारण चार महिन्यांचा असून वर्षांतून दोन वेळा वीण होते. एकावेळेस मादी ४–६ पिलांना जन्म देते. नुकतीच जन्मलेली पिले आकारमान वगळता हुबेहूब प्रौढ माशांप्रमाणेच दिसतात.

पाकट बहुतेकवेळा तोंडातून पाणी आत घेतात व ते क्लोमांवर पसरले जाते. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन क्लोमांद्वारे शोषून घेतला जातो. क्लोम रंध्रातून कमी ऑक्सिजनयुक्त पाणी बाहेर सोडले जाते. पाण्याच्या तळाशी असताना जेव्हा तोंड उघडणे शक्य नसेल त्यावेळी श्वासरंध्रावाटे पाणी आत घेतले जाते. हे पाणी क्लोमांवरून सोडले जाते. ही श्वसन पद्धत फार कार्यक्षम नसली तरी ज्या वेळी फार हालचाल नसेल तेव्हा पुरेसा ऑक्सिजन मिळवण्यास उपयोगी पडते. क्लोमांवर पटल (Operculum) नसते.
गोड्या पाण्यातील महाकाय पाकट (Giant freshwater stingray) : दक्षिण-पूर्व आशियातील नद्यांमध्ये आढळणारा हा सर्वांत मोठा मासा आहे. डॅसिॲटिडी कुलातील या माशाचे शास्त्रीय नाव युरोजिम्नस पॉलिलेपिस (Urogymnus polylepis) किंवा हिमँट्युरा च्याऊफ्राया (Himantura chaophraya) असे आहे. महाकाय पाकट माशाच्या पाठीचा रंग करडा तपकिरी व पोटाचा रंग पांढरा असतो. याची शेपटीसहित लांबी सु. २ मी. व वजन सु. ३०० किग्रॅ. असते. नर मादीपेक्षा आकाराने लहान असतात. चाबकासारख्या लांब शेपटीच्या तळाशी धनुष्याच्या बाणाप्रमाणे एक फूटाहुन लांब अणकुचीदार नांगी असते. सन २०२२ मध्ये मेकाँग (Mekong) नदीत आढळलेल्या मादी पाकट माशाची शेपटीसहित लांबी ३.९८ मी. व रुंदी २.२ मी., तर वजन ३०० किग्रॅ. होते. आतापर्यंत नोंदविला गेलेला हा गोड्या पाण्यातील सर्वांत मोठा मासा आहे. (पहा : आ. ४).
चाबूक मासा (Whiptail ray) : डॅसिॲटिडी कुलातील या माशाचे शास्त्रीय नाव हिमँट्युरा फ्लुव्हियाटिलीस (Himantura fluviatilis) असे आहे. भारतात गंगा नदीच्या पात्रात हा मासा आढळतो. पाठीचा रंग जांभळट राखाडी असून चकतीच्या कडांकडे तो अधिक गडद होत जातो. खालची बाजू फिकट असून तिच्या कडांवर अनियमित आकाराचे गडद पट्टे असतात. याची रुंदी १.४ मी.पर्यंत असते. याच्या लांब शेपटीमुळे याला चाबूक पाकट असेही नाव आहे.

गरुड मासा (Eagle ray) : मायलिओबॅटिडी कुलामध्ये गरुड माशांचा समावेश होतो. या माशाच्या एटोमायलिअस (Aetomyleus) आणि मायलिओबॅटिस (Myliobatis) या दोन प्रजातींमध्ये सु. २४ जाती समाविष्ट आहेत. ॲटोमायलिअस निकोफिआय (Aetomylaeus nichofii) ही जाती पूर्व अटलांटिक महासागर, हिंद महासागर व पॅसिफिक महासागर येथे आढळते. या माशाच्या वक्षपराच्या त्रिकोणी आकारामुळे त्याचे शरीर पक्ष्याच्या पंखांसारखे दिसते. या पाकट माशाची रुंदी ३०–५० सेंमी. असून शेपटीची लांबी शरीराच्या लांबीच्या दुप्पट असते. याच्या शेपटीवर नांगीसारखा काटा नसतो. पाठीचा रंग राखाडी तपकिरी असून त्यावर ७-८ निळ्या रंगाचे पट्टे असतात. मासा जसजसा प्रौढ होत जातो तसतसे हे पट्टे फिकट होत जातात. खालची बाजू फिकट पांढरी असून तिच्या कडा गडद रंगाच्या असतात. यांचे अन्नग्रहण पाण्याच्या तळाशी होत असले तरी ते समुद्राच्या पृष्ठभागाशी येतात. अनेकदा हे मासे पाण्यात उंच उडी मारताना आढळतात.
गाय मासा (Cownose ray) : ऱ्हायनोप्टेरिडी कुलातील या माशाचे शास्त्रीय नाव ऱ्हायनोप्टेरा बोनासुस (Rhinoptera bonasus) असे आहे. ही जाती पश्चिम अटलांटिक व कॅरेबियन समुद्र येथे आढळते. भारतात पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर हे मासे दिसून येतात. या माशाच्या पाठीचा रंग तपकिरी काळा असून त्याची खालची बाजू फिकट पांढरी किंवा पिवळसर असते. याचे डोके मोठे असून डोक्याच्या मध्यभागात असलेल्या बाकामुळे मस्तिष्काची पाळे (उंचवटे) गायीच्या नाकाप्रमाणे दिसत असल्याने तो सहजपणे ओळखता येतो.
अन्नासाठी किंवा मौजेखातर केली जाणारी शिकार, नद्यांवर बांधली जाणारी धरणे, जलस्रोतावर आधारित ऊर्जा निर्मिती प्रकल्प, जलप्रदूषण अशा मानवी हस्तक्षेपामुळे आणि परिसंस्थांच्या होत असलेल्या अतोनात हानीमुळे पाकट माशाच्या अनेक प्रजाती लुप्तप्राय होऊ लागल्या आहेत. तसेच मत्स्यालयांसाठी मोठ्या प्रमाणावर पकडून बंदिस्त केल्याने त्यांच्या प्रजननाची क्रिया खंडित होते. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाकरिता इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) या संस्थेने पाकट माशाच्या अनेक जाती धोक्यातील जाती म्हणून घोषित केल्या आहेत.
पहा : करवत मासा, कास्थिमत्स्य, झिणझिणा पाकट, मँटा रे, रे मासे.
संदर्भ :
https://www.britannica.com/animal/stingray
https://www.fishbase.se/summary/FamilySummary.php?ID=20
https://www.fishsiam.com/species/stingray-giant-freshwater/
https://www.nationalgeographic.com/animals/fish/g/giant-freshwater-stingray/
https://www.scribd.com/document/514439378/Stingray-disam
https://www.wikihow.com/Treat-a-Stingray-Sting
समीक्षक : नंदिनी देशमुख
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.