इमरे कर्तेझ

कर्तेझ, इमरे : (९ नोव्हेंबर १९२९ – ३१ मार्च २०१६). नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले हंगेरियन लेखक. कथाकार, कादंबरीकार, अनुवादक. बुडापेस्ट, हंगेरी येथे मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात जन्म. ५ वर्षांचे असतांना आईवडील विभक्त झाले. १४ वर्षांचे असतांना वैयक्तिक जीवनात वांशिक छळ आणि कारावास. हंगेरियन ज्यू सोबत दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझीव्याप्त पोलंडमध्ये मे, १९४५ पर्यंत ऑश्विट्झ छळछावणीत ठेवले. त्या ठ‍िकाणचा भीषण अनुभव. त्यांनतर ‘व्हीलागोसॅग’ या वृत्तपत्रासाठी वार्ताहर म्हणून कार्य. सरकारने लादलेल्या सांस्कृतिक धोरणास नकार दिल्याने १९५१ मध्ये त्यांची हकालपट्टी झाली. पुढे कारखाना कामगार आणि अवजड उद्योग मंत्रालयाच्या प्रेस विभागात काही काळ काम केले. १९५३ पासून स्वतंत्र पत्रकारिता आणि अनुवादक म्हणून काम. १९८९ च्या क्वाएट रेव्होल्युशन मध्ये सक्र‍िय साहित्यिक म्हणून भूमिका. जर्मनीत स्थलांतर आणि बर्लिन येथील कला अकादमीमध्ये कार्य. जर्मनीत अनुवादक आणि लेखक म्हणून नावलौकिक. २०१४ मध्ये बर्लिन येथून पुन्हा बुडापेस्ट येथे वास्तव्य.

ज्यू असल्याने नाझींनी ऑश्विट्झ येथे छावणीत ठेवले. या काळाचा कर्तेझ यांच्या भूमिकेवर आणि लेखनावर खोलवरचा परिणाम झाला. एक अल्पसंख्याक म्हणून ज्यू व्यक्तीच्या अस्तित्वाचा लढा हा त्यांच्या एकूण लेखनाच्या आणि प्रत्यक्ष आयुष्याच्या केंद्रवर्ती राहिला. सामाजिक दबावांना माणूस बळी पडत असण्याच्या काळात लेखनातून एक व्यक्ती म्हणून जगण्याच्या आणि विचार करण्याच्या शक्यतांचा शोध. भाषा आणि ओळख गमावणे, दबाव, आत्महत्या हे चिंतेचे विषय. मानवी संप्रेषणाच्या मर्यादा आणि अव्यक्त अशा शक्यतांचा शोध. हंगेरियन साहित्यातील अस्पर्श अशा पोट संस्कृतीतील चेतविणारा आवाज म्हणून नावारूपाला आलेले लेखक.

‘फेट्लेस’ (१९७५) या पहिल्या कादंबरीसाठी सर्वदूर ओळख, ज्यातून कोणताही गुन्हा केलेला नसताना जॉर्ज कोवल या १४ वर्षांच्या मुलाला ऑश्विट्झ, बुचेनवाल्ड आणि झिट्झ छळछावण्यात आलेल्या विदारक अनुभवाचे प्रत्ययकारी वर्णन. या नंतर ‘फियास्को’ (१९८८) आणि ‘कादिश फॉर अ चाइल्ड नॉट बॉर्न’ (१९९०) ह्या दोन कादंबऱ्या असे कादंबरीत्रय प्रकाशित. ‘फियास्को’ मध्ये छळछावण्यामधून वाचल्यानंतर जॉर्ज कोवलचा कम्युनिस्ट हंगेरी मधील संघर्ष चित्र‍ित होतो. तर ‘कादिश फॉर अ चाइल्ड नॉट बॉर्न’ मधून असफल विवाह, अयशस्वी लेखक, ज्यू असल्याच्या जॉर्ज कोवलच्या धारणा आणि अत्याचार होत असलेल्या जगात मूल जन्माला न घालणे याबाबत सटीक भाष्य. ‘गली बोट लाँग’ (१९९७) यांसह ‘लिक्विडेशन’ (२००३) कादंबरी प्रकाशित, ज्यात वैयक्तिक आयुष्यातील नैराश्याचे चित्रण. ‘द अल्टीमेट इन’ (२०१४)  कादंबरी तर ‘पाथसिकर’ (१९७७) ही लघुकादंबरी आणि ‘द इंग्लिश फ्लॅग’ (१९९१) या कथासंग्रहातून त्या निर्णायक काळाकडे पुन्हा पुन्हा परतणे. आधुनिक काळाला मानवाच्या अध:पतनचा काळ म्हणून पाहणे, हे अपवाद नसून एक वैश्विक तथ्य आहे.

कादंबरी आणि कथांशिवाय ‘गॅली डायरी’ (१९९२) मधून १९६१ ते १९९१ पर्यंतच्या आणि ‘आय : अनादर क्रॉनिकल ऑफ मेटामोर्फोसिस’ (१९९७) या मधून १९९१ ते १९९५ या काळाच्या नोंदी वाचकासमोर खुल्या केल्या. बुद्धिमत्तेचा आणि सांस्कृतिक समीक्षेचा सक्षम अनुभव ‘द होलोकास्ट ॲज कल्चर’ (१९९३), ‘मोमेंट्स ऑफ सायलेन्स व्हाइल द एक्झिक्युशन स्क्वॅड रिलोडस्’ (१९९८) आणि ‘द एक्झाइल्ड लँग्वेज’ (२००१) यातून निबंध आणि व्याख्याने यांच्या एकत्रीकरणातून जगभरातल्या वाचकांसमोर प्रस्तुत. तसेच ‘डोझीअर के’ (२००६) हे संवादाच्या स्वरूपातील आठवणींचे पुस्तक विशेष. लेखनाशिवाय फ्रीड‍िख नीत्शे (१८४४-१९००), ह्यूगो व्हॉन हॉकमान्सथल (१८७४-१९२९ ), सिग्‍मंड फ्रॉईड ( १८५६-१९३९), श्न‍िट्स्लर आर्टुर (१८६२-१९३१ ) आणि व्ह‍िट्गेन्‍श्टाइन लूटव्हिख (१८८९-१९५१ )  या जर्मन भाषेतील लेखकांचे अनुवादक म्हणून मोठे यश प्राप्त. नीत्शेचे ‘द बर्थ ऑफ ट्रॅजेडी’ (१८७२) आणि फ्रेडरिक ड्युरेनमॅट (१९२१- १९९०) आणि टँकरेड डोर्स्ट (१९२५–२०१७) यांची नाटके आणि व्ह‍िट्गेन्‍श्टाइनचे विविध विचार आणि सूत्रे यांचे हंगेर‍ियन भाषेत अनुवाद प्रसिद्ध.

आंतरराष्ट्रीय सोरोस पुरस्काराने १९९२ आणि १९९५ मध्ये असे दोन वेळेस सन्मानित झाले.  ब्रँडनबर्ग साहित्य पुरस्कार (१९९५), फ्रेडरिक-गुंडॉल्फ-प्रेइस हा जर्मनीतील पुरस्कार प्राप्त (१९९७). ‘लिखाणातून अनियंत्रित अशा हिंस्त्र-रानटी इतिहासाच्याविरुद्ध व्यक्तींचे नाजूक, सहज अनुभव वर उचलून धरण्यासाठी आणि हा अनुभव ज्यांनी घेतलेला नाही अशा व्यक्तींसाठी तो अनुभव शब्दातून प्रतीत करण्यासाठी २००२ चे नोबेल’ या शब्दांत कर्तेझ यांच्या साहित्याला नोबेल पुरस्काराने सन्मान‍ित करण्यात आले. श‍िवाय  कोरीन लिटरेचर प्राईज आणि गोथे मेडल (२००४). ‘ऑनररी सिटीझनशिप ऑफ बुडापेस्ट’ (२००२) आणि ‘हंगेरियन ऑर्डर ऑफ सेंट स्टीफन’ (२०१४) हे विशेष सन्मान प्राप्त.

‘फेट्लेस’ ही कादंबरी १९९० मध्ये जर्मन भाषेत प्रकाशित आणि त्यानंतर आणखी १० भाषांत प्रकाशित. तसेच या कादंबरीवर आधारित चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित. जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, इंग्रजी, रशियन, हिब्रू, स्वीडिश यांसह अनेक भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित. २००९ मध्ये ‘डाय वेल्टला’ दिलेल्या मुलाखतीमुळे स्वतःला ‘बर्लिनर’ म्हणून घोषित केले आणि बुडापेस्टला ‘पूर्णपणे बाल्कनाइज्ड’ म्हटले, या वादग्रस्ततेची चर्चा.

बुडापेस्ट येथे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन.

समीक्षक : प्रभंजन माने

संदर्भ :

  • https://www.nobelprize.org/prizes/literature/2002/kertesz/biographical/
  • https://www.nobelprize.org/prizes/literature/2002/kertesz/facts/

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.