हान, ओटो :  (८ मार्च १८७९–२८ जुलै १९६८). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. अणुकेंद्रकाचे विखंडन या शोधाबद्दल हान यांना १९४४ सालचा रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांनी किरणोत्सार आणि किरणोत्सारी रसायनशास्त्रात पायाभूत संशोधन केले. रसायनशास्त्रात पायाभूत संशोधन करून थोरियम किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणजेच थोरियम-२२७ चा समस्थानिक, थोरियम सी म्हणजेच पोलोनियम-२१२, रेडियम डी म्हणजेच शिसे—२१० या समस्थानिकांचा  शोध लावला.

हान यांचा जन्म फ्रँकफुर्ट येथे झाला. त्यांनी प्रथम रसायनशास्त्र आणि खनिजशास्त्राचा अभ्यास केला आणि नंतर मारबुर्ग विद्यापीठातून सेंद्रिय रसायनशास्त्रात पीच्.डी. पदवी मिळवली (१९०१). त्यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक थेओडॉर झिंके यांचे सहाय्यक म्हणून ऑटो हान यांनी त्याच विद्यापीठात दोन वर्षे काम केले. त्यांनी लंडन विद्यापीठात सर विल्यम रॅम्झी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून किरणोत्सारी थोरियम  या मूलद्रव्याचा शोध लावला (१९०४). प्रथम त्यांना वाटले की हे नवीन मूलद्रव्य आहे. पण नंतर हे निश्चित झाले की ते नवीन मूलद्रव्य नसून थोरियमचा समस्थानिक म्हणजेच थोरियम-२२८. कारण समस्थानिक या संकल्पनेचा वापर प्रथम ब्रिटिश शास्त्रज्ञ फ्रेडरिक सॉडी यांनी केला.  माँट्रिऑल येथील मॅक्गिल विद्यापीठाच्या अर्नेस्ट रदरफर्ड प्रयोगशाळेत अणुकेंद्रकीय रसायनशास्त्रात पायाभूत संशोधन करून थोरियम किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणजेच थोरियम-२२७ चा समस्थानिक, थोरियम सी म्हणजेच पोलोनियम-२१२, रेडियम डी म्हणजेच शिसे-२१० या समस्थानिकांचा  शोध लावला.

हान जर्मनीला परतले आणि बर्लिन येथील विद्यापिठात व्याख्याते म्हणून रूजू झाले. याच विद्यापीठात संशोधन करत असताना त्यांनी ऊर्जेसंबंधी फार मोठा शोध लावला. वस्तूचे ऊर्जेत आणि ऊर्जेचे वस्तूत रूपांतर करणे शक्य आहे, असे आइन्स्टाइन यांचे E=mc2 हे सूत्र सांगत होते. किरणोत्सर्ग नसणार्‍या मूलद्रव्याचे कृत्रिम रितीने किरणोत्सर्गी द्रव्यात रूपांतर करता येते, ही गोष्ट नोबेल पारितोषिक विजेते ज्युलिओ आणि इरेन क्यूरी या फ्रेंच शास्त्रज्ञांनी दाखवून दिली होती. जर्मनीमध्ये बर्लिन विद्यापीठात ऑटो हान यांनी  फ्रिट्झ स्ट्रासमन आणि लिझे माइटनर यांच्या मदतीने युरेनियम या अतिजड मूलद्रव्याच्या अणुकेंद्रावर न्युट्रॉन कणांचा मारा करणारे प्रयोग चालू केले.

ह्या प्रयोगात निरनिराळे किरणोत्सारी अणू तयार होत आहेत हे त्यांना आढळले. प्रथमत: ती युरेनियमच्या पुढच्या मूलद्रव्याची समस्थानके असावीत असा कयास होता.पण त्याचे सखोल रासायनिक पृथक्करण केल्यावर असे आढळून आले, की ह्या किरणोत्सारी पदार्थाचे रासायनिक गुणधर्म बेरीयम आणि लांथेनियमसारखे आहेत. हान आणि स्ट्रासमन यांनी या शोधाबद्दल लेख लिहिताना असे नमूद केले, की न्यूट्रॉनसारख्या हलक्या कणाने युरेनियमसारख्या जड अणूचे विभाजन होणे पटत नसले तरी आमच्या प्रयोगावरून तरी हेच घडत असावे असे वाटते.

लिझी माइटनर यांनी ज्या वेळेस हे वाचले त्यावेळेस त्यांच्या लगेच लक्षात आले की खरोखरच न्युट्रॉन कणांच्या आघाताने युरेनिअमच्या अणूकेंद्राचा विच्छेद होऊन त्यामधून दोन हलके अणू निर्माण होतात. या दोन हलक्या अणूंचे एकंदर वस्तुमान मात्र युरेनिअमच्या वस्तुमानापेक्षा कमी असते. वस्तुमानातील या फरकाचे आइन्स्टाइन यांच्या सूत्रानुसार ऊर्जेत रूपांतर होते. या क्रियेला; अणूकेंद्रकाचे विखंडन (Nuclear fission) असे नाव देण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात पराभूत झाल्यानंतर जर्मन राष्ट्राने शरणागती स्वीकारली (१९४५). पण  त्यापूर्वीच दोस्त राष्ट्रांनी हान यांना अटक केली व ब्रिटनमध्ये त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. तिथेच त्यांना अमेरिकेने जपानच्या ‍हीरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्याची बातमी समजली. हान यांना खूप दु:ख झाले. अणूकेंद्राचे विखंडन केल्याबद्दल रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार ऑटो हान यांना देण्यात आला (१९४४). या स्थानबद्धतेतून हान यांची सुटका झाली आणि ते जर्मनीला परतले. अणुबॉम्ब निर्मितीला आणि वापराला त्यांनी नंतर नेहमीच विरोध केला.

हान यांनी कैसर व्हिल्हेल्म संस्थेत अध्यक्ष म्हणून काम करायला सुरूवात केली. या संस्थेचे ते शेवटचे अध्यक्ष होते. कैसर व्हिल्हेल्म संस्थेचे नाव बदलून मॅक्स प्लांक असे करण्यात आले. या संस्थेत ते  संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

हान यांचे गटिंगेन येथे निधन झाले.

संदर्भ :

  • नोबेल लॉरेट्स इन केमिस्ट्री- डब्ल्यू. ए. इ. मॅकब्रिडे

समीक्षक – श्रीराम मनोहर