अंशी राष्ट्रीय उद्यान

अंशी राष्ट्रीय उद्यान हे कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पश्चिम घाटातील हे एक महत्त्वाचे जैवविविधतापूर्ण संरक्षित क्षेत्र असून हे उद्यान काली व्याघ्र प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे. काली व्याघ्र प्रकल्प १,३०० चौ.किमी. क्षेत्रात पसरलेले आहे. या भागातील वनक्षेत्र १० मे १९५६ रोजी ‘दांडेली वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आले. या अभयारण्याचा काही भाग वेगळा करून ‘अंशी राष्ट्रीय उद्यान’ तयार करण्याचा प्रस्ताव २ सप्टेंबर १९८७ रोजी अंमलात आणला गेला. यानुसार सुमारे ३४० चौ.किमी. (१३० चौरस मैल) क्षेत्रफळाचे ‘अंशी राष्ट्रीय उद्यान’ अस्तित्वात आले. काली नदी ही उत्तर कन्नड जिल्ह्यातील लोकांची जीवनरेखा असून ती दांडेली वन्यजीव अभयारण्य आणि अंशी राष्ट्रीय उद्यान यांना जोडते. हे उद्यान वन्यजीवांच्या अनेक वैविध्यपूर्ण प्रजातींसाठी महत्त्वपूर्ण आश्रयस्थान आहे.

काली व्याघ्र प्रकल्प : प्रवेशद्वार

अंशी राष्ट्रीय उद्यान आणि दांडेली वन्यजीव अभयारण्य यांना एकत्रितपणे जानेवारी २००७ मध्ये ‘दांडेली अंशी व्याघ्र प्रकल्प’ म्हणून घोषित केले गेले. डिसेंबर २०१५ मध्ये ‘दांडेली अंशी व्याघ्र प्रकल्पा’चे नाव ‘काली व्याघ्र प्रकल्प’ असे करण्यात आले. काली नदीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हे नाव बदलण्यात आले. पश्चिम घाट पर्वतरांगेत १४° ५४’ ते १५° ०७’ उत्तर अक्षांश आणि ७४° १६’ ते ७४° ३०’ पूर्व रेखांश दरम्यान वसलेल्या काली व्याघ्र प्रकल्पाची उंची समुद्रसपाटीपासून २७–१,०५९ मी.पर्यंत (८९–३,४७४ फूट) बदलते. येथील माती लॅटेराइट प्रकारची असून तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे या भागात पावसाचे प्रमाण अधिक असूनही उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते. अंशी राष्ट्रीय उद्यान हे उत्तर पश्चिम घाट पर्वतीय पर्जन्य जंगले आणि आर्द्र पानझडी जंगलांच्या पर्यावरणीय क्षेत्रांमध्ये आहे. ही दोन्ही क्षेत्रे वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (WWF; World Wide Fund for Nature) या संस्थेने धोक्यात असल्याचे घोषित केले आहे.

अंशी राष्ट्रीय उद्यानामध्ये पुढील वनस्पती आढळतात – कोकण ब्युटी लीफ ट्री (Calophyllum apetalum), मलबार चिंच, तमाल (Garcinia Morella), रान जायफळ (Knema attenueta), कचकुम्भ (Hopea ponga), फॉल्स हेम्प ट्री किंवा जंगली भेंडी (Tetramerous nudiflora), सप्तपर्णी किंवा ब्लॅकबोर्ड ट्री (Elstonia scholaris), माऊंटन स्वीट थॉर्न किंवा रांतांबूट (Flacortia Montana), गुळांबा (Machilus macranthus), इंडियन ओक किंवा फनशी /पोंसी (Carallia brachiata), सत्यानाशी (Argemone mexicana), ऑर्चिड (Bauhinia), निलगिरी (Eucalyptus tereticornis), घाणेरी किंवा टनटनी (Lantana camara), सिल्व्हर ओक (Gravillea robusta), सागवान (Tectona grandis) आणि जांबा (Syzigium jambosa) इत्यादी .

अंशी राष्ट्रीय उद्यान व दांडेली वन्यजीव अभयारण्य या दोन्हींमधून वाहणारी काली नदी

अंशी राष्ट्रीय उद्यान त्याच्या समृद्ध प्राणिजीवनासाठी प्रसिद्ध आहे. या उद्यानामध्ये विविध वन्यजीवांची माहिती देणारे कन्नड व इंग्रजी भाषेतील अनेक फलक लावलेले आहेत. येथे दुर्मिळ काळा बिबट्या (ब्लॅक पँथर) त्याच्या नैसर्गिक अधिवासात आढळतो. भारतीय हत्तींचे मोठे कळप येथील घनदाट जंगलांत फिरतात. हे उद्यान व्याघ्र अभयारण्याचा भाग म्हणून वाघांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. येथील इतर मोठ्या सस्तन प्राण्यांमध्ये भारतीय गवा, अस्वल, भारतीय रानडुक्कर, बोनेट माकड, उत्तर मैदानी राखाडी लंगूर, राखाडी सडपातळ लोरिस, तसेच भुंकणारे हरीण (मुंटजॅक), उंदीर हरीण (शेवरोटेन), सांबर, ठिपकेदार हरीण, चितळ यांसारख्या अनेक हरणांचा समावेश आहे. रानकुत्रा, कोल्हा, रानमांजर, बिबट्या मांजर, लहान भारतीय सिव्हेट, भारतीय राखाडी मुंगूस, उडणारी खार, साळिंदर, मलबार सिव्हेट, भारतीय महाकाय खार आणि खवलेवाला पँगोलिन हे प्राणीदेखील येथील जंगलांमध्ये आढळतात.

या उद्यानात पक्ष्यांच्या दोनशेहून अधिक प्रजाती आढळतात. हॉर्नबिलच्या ग्रेट हॉर्नबिल, मलबार पाइड हॉर्नबिल, मलबार ग्रे हॉर्नबिल, इंडियन ग्रे हॉर्नबिल या जाती आणि एशियन फेअरी ब्लू बर्ड हे पक्षी येथील मुख्य आकर्षण आहे. याशिवाय सारस (Adjutant stork), राखी रानपाकोळी (Ashy woodswallow), ब्राह्मणी घार, गरुड (Cretsted serpent eagle), सुतारपक्षी (Golden backed woodpecker), बेडूकतोंड्या (Sri Lanka Frogmouth) आणि हरियाल इत्यादी पक्षी येथे आढळतात.

नकाशा क्र. १. काली व्याघ्र प्रकल्प : वनक्षेत्र

उद्यानातील सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये किंग कोब्रा, चष्मेवाला कोब्रा, रसेल व्हायपर, सॉ-स्केल्ड व्हायपर, सामान्य क्रेट, भारतीय रॉक पायथॉन, धामण, वेल साप, हिरवा किंवा बांबू पिट व्हायपर आणि सरडे (Monitor lizard) यांचा समावेश होतो.

अंशी राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम कालावधी आहे. हे उद्यान सकाळी ६:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत खुले असते. येथील हवामान वर्षभर बऱ्यापैकी दमट असते. पर्यटकांसाठी काली नदीमध्ये जकूझी (Jacuzzi), बोटिंग, राफ्टिंग (Rafting) आणि कॅनोइंग (Canoeing) यांसारख्या जलक्रीडांचे नियोजन केले जाते. तसेच पर्यटकांना येथून २० किमी. अंतरावरील अत्यंत सुंदर दूधसागर धबधब्यापर्यंत निसर्गभ्रमण (Treck) करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. अंशी राष्ट्रीय उद्यानातील (काली व्याघ्र प्रकल्पातील) अनेक रस्ते सायंकाळी ६:०० ते सकाळी ६:०० वाजेपर्यंत वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद असतात. काली व्याघ्र प्रकल्प अभयारण्यातून वाहणाऱ्या काली नदीवर अनेक धरणे बांधली आहेत. या उद्यानामध्ये अनेक जलविद्युत धरणे आणि एक अणुऊर्जा केंद्र आहे. अंशी राष्ट्रीय उद्यानाजवळ दांडेली हे शहर असून तेथून धारवाड, हुबळी, बेळगाव आणि बंगळूरूसाठी दररोज बस सेवा उपलब्ध आहे. तसेच येथून गोवा राज्य देखील जवळ आहे.

 

दांडेली वन्यजीव अभयारण्य

अंशी राष्ट्रीय उद्यानालगत असलेले हे अभयारण्य उत्तर कन्नड जिल्ह्यातील काली नदीच्या काठावरील समृद्ध जंगलांचा भाग व्यापते. दांडेलीच्या जंगलात प्राणी व पक्ष्यांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात. याच कारणास्तव कर्नाटक सरकारने १९५६ मध्ये दांडेली जंगलाला ‘राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित केले. दांडेली अभयारण्य सु. ८६६.४१ चौ.किमी. क्षेत्रफळात विस्तारलेले असून कर्नाटकातील हे दुसरे सर्वांत मोठे वन्यजीव अभयारण्य आहे.

कर्नाटक राज्य सरकारने जून २०१५ मध्ये हत्ती प्रकल्पांतर्गत ‘दांडेली हत्ती राखीव क्षेत्रा’ची (Dandeli Elephant Reserve) अधिकृत घोषणा केली. हे क्षेत्र २,३२१ चौ.किमी. इतक्या विस्तीर्ण भागात पसरले असून यातील ४७५ चौ.किमी. क्षेत्र मुख्य (कोअर) भाग आणि उर्वरित क्षेत्र संरक्षक (बफर) भाग म्हणून समाविष्ट आहे. २००२ मध्ये अस्तित्वात आलेल्या ‘म्हैसूर हत्ती राखीव क्षेत्रा’नंतर कर्नाटकातील हे दुसरे हत्ती राखीव क्षेत्र आहे. दांडेली अभयारण्यातील वनक्षेत्र हे पानझडी वनांचे असून त्यात बांबू आणि सागवान या वृक्षांच्या लागवडीचे मिश्रण आढळते.

नकाशा क्र. २. दांडेली वन्यजीव अभयारण्य व अंशी राष्ट्रीय उद्यान

व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या अंशी राष्ट्रीय उद्यानासह दांडेली हे सु. ४० वाघांचे निवासस्थान आहे. याशिवाय हे अभयारण्य बिबट्या, काळा बिबट्या, हत्ती, हरिण, अस्वल, काळवीट, सरपटणारे प्राणी आणि तीनशेहून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींचे नैसर्गिक निवासस्थान आहे. या अभयारण्यात मलबार पाइड हॉर्नबिल हे पक्षी झाडांवरील फळे खाण्यासाठी ऑगस्ट–सप्टेंबर या कालावधीत मोठ्या संख्येने एकत्र येतात.

‘हेगडा टेंबा’ (Hegada Temba) हे येथील सर्वांत उंच ठिकाण असून हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सु. ९७० मी. उंचीवर आहे. हे ठिकाण विहंगम दृश्य (Panoramic View), ट्रेकिंग आणि पक्षी निरीक्षणासाठी उत्तम मानले जाते. या अभयारण्यात सरासरी २,५०० मिमी. पाऊस पडतो. निसर्गभ्रमंती, जंगल सफारी, वन्यजीव छायाचित्रण, पक्षीनिरीक्षण, जंगल कॅम्पिंग, माउंटन बाइकिंग आणि ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग, व्हाइट वॉटर राफ्टिंग, बोट राईड, कायाकिंग, रिव्हर स्विमिंग, वॉटरबॉल झोरबिंग (Waterball zorbing), झिपलाइन (Zipline) यांसारख्या विविध उपक्रमांचा अनुभव या अभयारण्यामध्ये घेता येतो. याव्यतिरिक्त दांडेली अभयारण्य व परिसर येथील आवश्य भेट देण्यासारखी ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत –

कावला गुहा (Kavala Caves) : ही गुहा दांडेली वन्यजीव अभयारण्यात खोलवर वसलेली आहे. साधारण ३७५ पायऱ्या उतरून नंतर अरुंद वळणदार बोगद्यांमधून ४० फूट रांगत गेल्यावर ज्वालामुखीच्या चुनखडीयुक्त गुहेत नैसर्गिकरित्या तयार झालेले शिवलिंग येथे पहायला मिळते.

नकाशा क्र. ३. दांडेली वन्यजीव अभयारण्य आणि अंशी राष्ट्रीय उद्यान या परिसरातील विविध ठिकाणे

सिंथेरी रॉक्स (Syntheri Rocks) : हा ज्वालामुखीमुळे तयार झालेला सु. ३०० फूट उंचीचा एकसंध ग्रॅनाइट खडक असून यात लहान लहान गुहा आहेत. हजारो वर्षांपासून या गुहांवरून वाहणाऱ्या कनेरी नदीने त्यांना सुंदर आकार दिला आहे.

साथोडी धबधबा (Sathodi Falls) : हा धबधबा दांडेली अभयारण्य परिसरातील ‘मिनी नायगरा’ म्हणून ओळखला जातो. येथे पोहोचण्यासाठी घनदाट जंगलातून एक निसर्गरम्य ट्रेक करावा लागतो.

उलवी गुहा (Ulavi Caves) : दांडेली शहरापासून ४५–५० किमी. अंतरावर दांडेलीच्या घनदाट वनक्षेत्रात या गुहा आढळतात. उलवी गुहा निसर्गत: तयार झालेल्या असून या गुहा म्हणजे जमिनीखालील खडकांच्या पोकळ्यांतील एक मालिकाच आहे.

साइक्स पॉइंट आणि शिरोली शिखर (Sykes Point & Shiroli Peak) : दांडेली अभयारण्य परिसरातील ही उंच ठिकाणे असून येथून पश्चिम घाटातील खोल दऱ्या आणि नद्यांचे विस्तीर्ण व अखंड दृश्य दिसते. तसेच येथे सूर्यास्ताचा आनंद घेता येतो.

याशिवाय दांडेली वन्यजीव अभयारण्य परिसरात असलेली क्रोकोडाइल पार्क, हनी पार्क, कुलगी नेचर कॅम्प इत्यादी ठिकाणे देखील येथील आकर्षणे आहेत. दांडेली वन्यजीव अभयारण्याला भेट देण्यासाठीचा योग्य कालावधी ऑक्टोबर ते मार्च असा आहे. हे अभयारण्य सकाळी ६.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत खुले असते. येथे रस्ते तसेच रेल्वेमार्गाने सहज पोहोचता येते. तसेच बसची सोयीस्कर सेवाही येथे उपलब्ध आहे.

संदर्भ :

  • https://en.wikipedia.org/wiki/Kali_Tiger_Reserve#External_links
  • kalitigerreserve.org
  • https://nationalparksassociation.org/india-national-parks/anshi-national-park
  • https://www.dandeli.com/about.php                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                              

समीक्षक : मोहन मद्वाण्णा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.