पचन मार्गामध्ये लॅक्टोज (सामान्य भाषेत दुग्ध शर्करा) पचवण्यास शरीर असमर्थ असणे याला लॅक्टोज असह्यता किंवा लॅक्टोज पचन असमर्थता (Lactose Intolerance) असे म्हणतात. दुधाची अधिहर्षता (Allergy) असणे ही प्रतिक्षमता यंत्रणेची प्रतिक्रिया आहे, तर लॅक्टोज असह्यता हा लॅक्टेज विकराची कमतरता असल्याने उद्भवणारा विकार आहे.

कारणे : लॅक्टोज असह्यता हा दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाण्यात आल्यामुळे निर्माण होणारा विकार आहे. याची लक्षणे पोट फुगणे, पातळ शौच, पोट दुखी, पोटात वायू धरणे, मळमळ आणि पोटात गुरगुरल्यासारखा आवाज येणे ही आहेत. ही सर्व किंवा एकाहून अधिक लक्षणे लॅक्टोज शर्करेचे पचन न होण्याच्या विकाराशी संबंधित आहे. आद्यांत्राच्या (Duodenum) अंत:त्वचा पेशीच्या कुंचली किनारीमध्ये (Brush border) असलेले लॅक्टेज विकर अपुरे असल्यास हा विकार होतो. लॅक्टेज कमतरता हा लॅक्टोज द्विशर्करा पचनाशी संबंधित सर्वसामान्य विकार समजला जातो.
बाळाच्या जन्मानंतर लॅक्टेज विकर पातळी सर्वाधिक असते. परंतु जसे बालक मोठे होते तसे विकराचे प्रमाण कमी कमी होते. लॅक्टोज आहारात कितीही असले, तरी विकराचे प्रमाण कमी होणे हे सर्वसामान्यपणे घडते.
जन्मजात लॅक्टोज असह्यता हा अलिंगी अप्रभावी विकार (Autosomal recessive trait) अत्यंत दुर्मिळ आहे. तर प्राथमिक लॅक्टोज असह्यता ही लॅक्टेज विकराच्या पातळीतील घट बालपणात सुरू झाल्याने होते. याशिवाय द्वितीयक लॅक्टोज असह्यता निरोगी व्यक्तीच्या लहान आतड्यामध्ये दीर्घकालीन आजारामुळे होणारा विकार आहे. लहान आतड्याच्या अंत:त्वचेमध्ये औषधांच्या परिणामांमुळे होणारा बदल झाल्याने लॅक्टोज असह्यता होऊ शकते. जीआर्डिया संक्रमण (Geardia), लघुआंत्र अपशोषण (Sprue), रासायनिक चिकित्सा (Chemotherapy), कुपोषण अशा दीर्घकालीन आजारांमुळे सुद्धा हा विकार झाल्याची लक्षणे आढळतात.

लॅक्टोज असह्यतेचे शरीरक्रियाविज्ञान : (Pathophysiology of lactose intolerance). लॅक्टोज शर्करा ही द्विशर्करा कर्बोदक (disaccharide carbohydrate) असून लहान आतड्यात त्याचे शोषण होण्यासाठी या रेणूचे एकशर्करेमध्ये विकराच्या साहाय्याने विघटन व्हावे लागते. लहान आतड्यात नेहमी स्रवणाऱ्या लॅक्टेजमुळे लॅक्टोजचे विघटन ग्लुकोज व गॅलॅक्टोज यामध्ये होते. परंतु अपुरे लॅक्टेज स्रवल्यामुळे आहारातील लॅक्टोज आतड्यामध्ये साठून राहते. शोषण न झालेल्या लॅक्टोजमुळे आतड्यातील पाण्याचे प्रमाण वाढत जाते. पाणी आणि लॅक्टोज यांचा समतोल बिघडल्यास मोठ्या प्रमाणात द्रव साठल्याने आतड्यात अवरोध उत्पन्न होतो. काही प्रमाणात ही क्रिया अपचन झाल्यासारखी होते. आतड्यातून लॅक्टोज मोठ्या आतड्यात पोहोचल्यानंतर तेथील जीवाणूमुळे लॅक्टोजवरील किण्वण (Fermentation) क्रियेतून लघु साखळी मेद रेणू (short chain fatty acids) आणि हायड्रोजन तयार होतो. अधिक पाणी आणि हायड्रोजन यामुळे पचनमार्गात अडथळे आणि विकार लक्षणे निर्माण होतात.
जागतिक आकडेवारीनुसार सुमारे ७०-७५ % व्यक्तींमध्ये लॅक्टोज असह्यता असते. आशिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतील भागामध्ये यांचे प्रमाण अधिक तर फिनलंड आणि रशियाच्या पश्चिम भागात या विकाराचे प्रमाण कमी आहे. आंत्र दाह विकार असलेल्या रुग्णामध्ये लॅक्टोज असह्यता सर्वाधिक आढळते, तर निरोगी व्यक्तीमध्ये लॅक्टोज असह्यता सहसा आढळत नाही.
मुदतपूर्व जन्माला येणाऱ्या अर्भकामध्ये तुलनेने लॅक्टोज असह्यता असण्याची शक्यता अधिक असते. तर प्राथमिक लॅक्टोज शोषण अडचणी वयाच्या तिसऱ्या वर्षी सुरू झाल्याचे आशियाई आणि अमेरिकन बालके आणि प्रौढ व्यक्तींमध्ये आढळले आहे. लहान आतड्याच्या अंत:त्वचा विकारात सर्व वयाच्या रुग्णांमध्ये व तीव्र कुपोषणामुळे लॅक्टोज असह्यता उद्भवते.
लॅक्टोज असह्यतेचा प्रभाव बालकामध्ये वयाच्या एक ते पाच वर्षांपर्यंत असतो. तर एक ते एकोणीस वयापर्यंत इतर कारणांमुळे लॅक्टोज असह्यता आढळू शकते. प्रौढ व्यक्तींमध्ये याची तीव्रता वयाच्या विसाव्या वर्षापासून चाळीशीपर्यंत उद्भवू शकते.
निदान : २५ — ४० ग्रॅ. लॅक्टोजयुक्त आहार घेऊन श्वासातील हायड्रोजनचे प्रमाण मोजले जाते. हायड्रोजन श्वास चाचणीला सामान्यतः एचबीटी (HBT) चाचणी असेही म्हटले जाते. लहान आतड्यातील जीवाणू न पचलेल्या लॅक्टोजवरील किण्वन क्रियेनंतर मुक्त झालेला हायड्रोजन आणि श्वासावाटे बाहेर येणाऱ्या हायड्रोजनचे प्रमाण यावरून लॅक्टोज असह्यतेचे निदान होते.
उपचार : लॅक्टोज असह्यता विकार आटोक्यात ठेवण्याचा सर्वांत सुलभ उपाय म्हणजे आहारातील लॅक्टोज मर्यादित ठेवणे. लॅक्टेज विकराचा अभाव असलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्यानुसार लॅक्टोजचे सेवन करावे. प्रत्येक व्यक्तीस किती लॅक्टोज सहन होईल हे आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवता येते. जन्मजात लॅक्टोज असह्यता असलेल्या व्यक्ती आणि दीर्घकालीन लहान आतड्याच्या विकारावर उपचार घेणाऱ्या रुग्णाशिवाय सामान्य व्यक्तीस दररोज एका वेळी १२ ग्रॅ. लॅक्टोज आहारातून घेतल्यास लॅक्टोज असह्यतेची लक्षणे दिसत नाहीत. परंतु यापूर्वी आपले वैद्यकीय तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
वनस्पतिजन्य दूध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘दुधात’ उदा., सोया मिल्क, नारळाचे दूध, ओट मिल्क, बदाम दूध, हेझेल नट मिल्क यामध्ये लॅक्टोज नाही. तसेच काही दूध प्रकारामध्ये लॅक्टोज कमी किंवा लॅक्टोजविरहित खाद्य उपलब्ध आहे. त्यामुळे लॅक्टोज असह्यता असणाऱ्यांना पर्यायी खाद्य घेता येते. मानवी लहान आतड्यात असणाऱ्या लॅक्टेजसाठी पर्याय ॲस्पर्जिलस प्रजातीच्या कवकापासून बीटा गॅलॅक्टोसायडेज विकर गोळीच्या स्वरूपात विविध मात्रेत उपलब्ध आहे. वैद्यकीय तज्ज्ञाच्या चिठ्ठीशिवाय हे औषधांच्या दुकानात मिळते. मानवी पचन मार्गात असलेल्या अम्ल माध्यमात हे उत्तम काम करते. उपाशी पोटी न घेता ते नेहमीच्या अन्नाबरोबर घेण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णाच्या आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ल्याने याची मात्रा (Dosage) आणि घेण्याची वेळ पाळावी लागते.
वैद्यकीय तज्ज्ञांनी लॅक्टोज असह्यता असल्याचे सुचवले तरी दूध आणि दुधाचे पदार्थ खाण्याचे टाळले जाते. यामुळे मुद्दाम बनवलेले खाद्य आणि इतर पदार्थांचा आहारात समावेश केल्याने आहारावरील खर्च वाढत जातो. बहुतेक लॅक्टोज असह्यता असलेल्या व्यक्तीमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहारातून वगळल्याने विकाराची लक्षणे आढळून येत नाहीत. दूध, आइसक्रीम आणि वितळले जाणारे सॉफ्ट चीज यांचे सेवन मर्यादित केल्याने सकारात्मक परिणाम आढळतो. लॅक्टोजविरहित दूध किंवा सोया, बदाम आणि तांदूळ यांचा आहारात समावेश हा पर्यायी उपाय आहे. योगर्ट आणि घट्ट चीज (चेड्डर चीज) हे द्रव दुधाऐवजी पचन मार्गात सहन होते.
संदर्भ :
• https://emedicine.medscape.com/article/187249-overview#showall
• https://en.wikipedia.org/wiki/Lactose_intolerance
• worldststistics-lactose intolerances
समीक्षक : रेपाळ, गजानन
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
