आरोग्य ही संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते. आरोग्य म्हणजे स्थूलमानाने शारीरिक, मानसिक, सामाजिक संतुलनाची स्थिती होय. आरोग्यास असंतुलन निर्माण झाल्यास रोग जडतात. जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसिक दृष्ट्या सक्षम असते, ती आरोग्यसंपन्न मानली जाते. म्हणून कार्यात्मक योग्यता हा स्वास्थाचा मुख्य निकष आहे. परिचारिका रुग्णालय किंवा कुटुंबाभिमुख आरोग्य सेवा देताना तसेच सर्व वयोगटातील व्यक्तींना आरोग्य शिक्षण देताना या संकल्पनेचा उपयोग करतात.
आरोग्य ही एक सकारात्मक, व्यापक आणि जीवनासाठी आवश्यक असलेली संसाधन संकल्पना आहे, जी केवळ आजारापासून मुक्ती नसून परिपूर्ण सुस्थिती दर्शवते. थोडक्यात “एखादी व्यक्ती किंवा गट आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यास आणि पर्यावरणात बदल घडवून आणण्याच्या किंवा जुळवून घेण्याच्या गरजा पूर्ण करण्यास कितपत सक्षम आहे हे दर्शवते.” आरोग्य हे दैनंदिन जीवनासाठी उद्दिष्ट नसून एक संसाधन आहे ज्यामध्ये शारीरिक क्षमतांसोबतच सामाजिक आणि वैयक्तिक संसाधनांवरही भर दिला गेला, जे आरोग्याचाच एक भाग आहेत.
व्याख्या : १९४८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आरोग्याची व्याख्या “केवळ रोग आणि दुर्बलतेचा अभाव नव्हे, तर संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थिती” अशी केली.
आरोग्याचे पैलू/आयाम (Dimensions of Health) : आरोग्याकडे केवळ आजाराचा अभाव म्हणून न पाहता, ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची एक सर्वांगीण स्थिती मानली जाते. यात एकमेकांवर प्रभाव टाकणाऱ्या परस्पर संबंधित पैलूंचा समावेश होतो. आरोग्याच्या मुख्य पैलूंमध्ये शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य यांचा समावेश होतो.
- शारीरिक आरोग्य : शरीराच्या सर्व प्रणालींचे इष्टतम कार्य, शारीरिक स्वास्थ्य, पोषण, निरोगी शरीर इत्यादींचा समावेश शारीरिक आरोग्यात होतो.
- मानसिक आरोग्य : यामध्ये व्यक्तीच्या विचाराची स्पष्टता, आकलन क्षमता, समस्या निवारण क्षमता तसेच मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करून त्यावर योग्य निर्णय घेण्याची क्षमता यांचा समावेश होतो.
- सामाजिक आरोग्य : यात सामाजिक प्रसंगांनुरूप संवाद साधुन सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे आणि परस्परांना सहकार्य करणारा समुदाय उभारणे यांचा समावेश होतो.
- आध्यात्मिक आरोग्य : हा पैलू प्रामुख्याने व्यक्तीच्या कृतींना वैयक्तिक श्रद्धा, मूल्ये आणि आंतरिक शांततेच्या भावनेशी सुसंगत ठेवतो. यात जीवनाचा उद्देश शोधण्यावर भर दिला जातो.
वरील चार मुख्य पैलूंव्यतिरिक्त भावनिकता, व्यावसायिकता, तत्त्व, संस्कृती, सामाजिक व आर्थिक स्थिती, शैक्षणिक पार्श्वभूमी व पात्रता, आहार, उपचार प्रक्रिया व परिणाम इत्यादी पैलूंचा देखील आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
आरोग्याचे निर्धारक घटक (Determinants of health) : व्यक्तीच्या तसेच समाजाच्या आरोग्यावर विविध घटक एकत्रितपणे परिणाम करत असतात. लोक निरोगी आहेत की नाही हे त्यांच्या परिस्थिती व पर्यावरणावरून ठरते. राहण्याचे ठिकाण, पर्यावरणीय स्थिती, आनुवंशिकता, उत्पन्न, शिक्षण, मित्र-कुटुंब यांच्याशी असलेले संबंध अशा अनेक घटकांचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. याउलट आरोग्यसेवांची उपलब्धता आणि त्यांचा वापर यांसारख्या सामान्यत: विचारात घेतल्या जाणाऱ्या घटकांचा परिणाम अनेकदा त्यामानाने कमी होतो.
- आनुवंशिकता : मनुष्यातील जैविक अथवा मानसिक वैशिष्ट्ये किंवा आनुवांशिक गुणधर्म इत्यादींच्या परिणाम स्वरूप काही व्याधी उद्भवतात उदा. बौधिक मतिमंदत्व, गुणसूत्र विकृती, चयापचय विकृती इ.
- आरोग्य पारिस्थितीकी : ही एक अशी संकल्पनात्मक चौकट आहे. जी मानवी आरोग्य, प्राणी जीवन (संख्या) आणि भौतिकी व सामाजिक पर्यावरण यांच्यातील गतिमान व परस्परावलंबित संबंधांचा अभ्यास करते. यामध्ये व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अंतर्गत वातावरण (उदा., शरीरांतर्गत संस्था व त्यांचे कार्य) व बाह्य वातवरण (उदा., पर्यावरणीय, समाजशास्त्रीय इ.) अशा दोन घटकांचा समावेश होतो.
- जीवनशैली : दैनंदिन सवयींचा व्यक्तीच्या आरोग्यावर साधक किंवा बाधक परिणात होत असतो.
- सामाजिक – आर्थिक परिस्थिती : केवळ जीवशास्त्रच नाही तर सामाजिक – आर्थिक स्थिती, शहरीकरण, पर्यावरणीय संपर्क हे देखील आरोग्याचे निर्धारक घटक आहेत.
- आरोग्य व कुटुंब कल्याण सेवा : विविध पातळीवर पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य संवर्धन, संरक्षण, प्रतिबंध आणि उपचारात्मक इ. विविध आरोग्य सेवा यांचा प्रत्येक व्यक्ती, समाजातील समूह आणि संपूर्ण समाजाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो.
सकारात्मक आरोग्य : सकारात्मक आरोग्य हा आरोग्याकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टीकोन आहे. जो लोकांना जीवनातील शारीरिक, भावनिक व सामाजिक आव्हानांचा सामना करण्यास सक्षम बनवतो, तसेच शक्य असेल तेव्हा त्यांना स्वत:च्या गोष्टींची सूत्रे स्वत:च्या हाती ठेवण्यास मदत करतो.
सकारात्मक आरोग्याचे निर्देशांक : १) व्याधीमुक्त जीवन, २) शरीर व शारीरिक प्रक्रियांच्या विचारांवर नियंत्रण, ३) दैनंदिन कार्यात आवश्यक उत्साह, ४) चिंतामुक्त व तणावरहित आयुष्य, ५) भूक लागणे व पचनक्रिया स्वाभाविक असणे, ६) वयोमानानुसार योग्य वजन, ७) योग्य झोप व विश्रांती, ८) भावनिकदृष्ट्या स्थिरता व स्वयंनियंत्रण ठेवण्यात सहजता, ९) सामाजिक सक्षमता इत्यादी काही सकारात्मक आरोग्याचे निर्देशांक आहेत.
आरोग्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत असून, आरोग्य हा मानवाचा मूलभूत हक्क समजला जातो. चांगले आरोग्य राखणे ही वैयक्तिक व समाजिक आणि अंतर राष्ट्रीय जबाबदारी आहे. परिचारिका ह्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणारी एक महत्त्वाचा घटक आहे. परिचारिका प्रशिक्षणात आरोग्य संवर्धन, प्रतिबंध व उपचारात्मक सेवा इ. संकल्पना समाविष्ट केलेल्या असून प्रतिबंधात्मक सामाजिक आरोग्य परिचर्या विषयात त्या प्राविण्य मिळवू शकतात.
संदर्भ :
- Park, J. E. Preventive and Social Medicine, ed. 23rd , 2015.
- मोमीन, सफिया सिराज, सामाजिक आरोग्य व परिचर्या, 2023.
समीक्षक : मराठी विश्वकोश संपादक
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
