जन्मजात शारीरिक विरूपतेच्या किंवा दोषांच्या आठ प्रकारांना ‘अष्टनिंदित पुरुष’ असे संबोधले जाते. चरकसंहिता या ग्रंथामध्ये शारीरिक बांधणीनुसार आठ प्रकारच्या शारीरिक दोषांचा (पुरुषांचा) उल्लेख केला आहे, ज्यांना ‘अष्टनिंदित पुरुष’ मानले जाते. ‘निंदित’ म्हणजे कमी दर्जाचे नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीने टाळण्याजोगे किंवा विशेष लक्ष देण्याची गरज असणारे. या आठ प्रकारांमधील व्यक्ती शारीरिक रचनेच्या किंवा जनुकीय दृष्टीने असामान्य असतात. अशा व्यक्तींना विविध प्रकारचे आजार जडू शकतात. हे आजार सततच्या उपचारांनी नियंत्रणात राहणारे परंतु, काही प्रमाणात बरे होणारे (याप्य) किंवा पूर्णपणे बरे न होणारे (असाध्य) असतात. सद्यस्थितीत अशा अष्टनिंदित पुरुषांवर त्यांच्या विशिष्ट आजारानुसार आणि शारीरिक स्थितीनुसार योग्य उपचार केले जातात. अष्टनिंदित पुरुष या संकल्पनेमध्ये समाविष्ट केलेल्या विकृतींपैकी किंवा शारीरिक स्थितींपैकी काही स्थिती संपूर्ण शरीरावर परिणाम न करता केवळ विशिष्ट अवयव किंवा शरीर रचनेवर परिणाम करतात. आनुवंशिकता किंवा संप्रेरकांशी संबंधित असलेल्या शारीरिक विरुपतेचा देखील यात समावेश होतो.

अष्टनिंदित पुरुष या संकल्पनेतील आठ प्रकारच्या शारीरिक स्थिती पुढीलप्रमाणे आहेत –
(१) अतिदीर्घ : या प्रकारात व्यक्तीची उंची प्रमाणापेक्षा अधिक असते. या शारीरिक स्थितीची तुलना महाकायता (Gigantism) या विकाराशी केली जाते. या विकारात लहान वयात पीयूषिका ग्रंथीमध्ये (Pituitary gland) गाठ (Tumor) निर्माण झाल्यामुळे वाढीची संप्रेरके असामान्यपणे स्रवली जातात. त्यामुळे व्यक्तीची उंची प्रमाणापेक्षा जास्त वाढते. हा एक दुर्मीळ आजार असून यामध्ये व्यक्तीची उंची सात ते नऊ फूटांपर्यंत वाढते. हा विकार हाडांशी संबंधित असून यामध्ये हातापायाची हाडे लांब व जाड होतात, तसेच हातापायाची बोटे जाड होतात. उंच व्यक्तीच्या शरीरामध्ये पेशींची संख्या जास्त असल्याने पेशीविभाजनाची प्रक्रियाही अधिक होते. त्यामुळे जास्त उंच असलेल्या व्यक्तींना कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो, असे अभ्यासकांचे मत आहे.
(२) अतिऱ्हस्व : या प्रकारात व्यक्तीची उंची अतिशय कमी असते. अशाप्रकारच्या व्यक्तींमध्ये शरीराच्या अवयवांचे प्रमाण विसंगत आढळते. वाढीच्या संप्रेरकांशी संबंधित विकार आणि चयापचय क्रियेतील दोष यांमुळे बुटकेपणा (Dwarfism) ही विकृती आढळून येते. कंकाल दुर्रचना (Skeletal dysplasia) हा आनुवंशिक आजार असून ही हाडांच्या असामान्य वाढीशी संबंधित स्थिती आहे, ज्यामुळे बुटकेपणा येतो. साधारणपणे प्रौढ व्यक्तीची उंची चार फुटांपेक्षा कमी असेल तर ती व्यक्ती बुटकी समजली जाते. शरीरातील वात, पित्त व कफ या त्रिदोषांमध्ये असंतुलन निर्माण झाल्यास हाडे असामान्यपणे लांब किंवा आखूड होऊ शकतात, ज्यामुळे अतिउंची किंवा बुटकेपणा उद्भवतो.
(३) अतिलोम : या प्रकारात व्यक्तीच्या शरीरावर आवश्यकतेपेक्षा जास्त केस येतात. याची तुलना स्त्रियांमधील अतिलोमता (Hirsutism) या विकाराशी केली जाते. या विकारात स्त्रियांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर (छाती, पोट, पाठ) पुरुषांप्रमाणे काळे, जाड, नको असलेले केस अनैसर्गिकरीत्या वाढतात. हे प्रामुख्याने शरीरातील अँड्रोजेन (Androgen) या पुरुष संप्रेरकांचे (Hormones) प्रमाण वाढल्यामुळे घडते. शरीरावरील केस हे अस्थी ऊतींचे (Bone tissue) उत्सर्जन असते. जेव्हा अस्थी ऊती वाढतात तेव्हा शरीरावरील केस देखील वाढतात. काही विशिष्ट औषधांच्या दुष्परिणामांमुळेही शरीरात अशी लक्षणे दिसून येतात.
(४) अलोम : या प्रकारात व्यक्तीच्या शरीरावरील केसांचे प्रमाण खूप कमी असते. अशा प्रकारची स्थिती पुरुषांमध्ये आढळणाऱ्या षंढाभता (Eunuchoidism) या विकारात आढळून येते. हा पुरुषांमधील असामान्य विकार असून ज्यामध्ये प्रजनन अवयवांचा पूर्ण विकास झालेला नसतो, तसेच काही प्रमाणात स्त्रियांसारखी लैंगिक वैशिष्ट्ये विकसित होतात. लैंगिक संप्रेरकांच्या सामान्य निर्मितीअभावी चेहऱ्यावर व शरीरावर केस नसणे तसेच आवाज बारीक असणे अशी लक्षणे पुरुषांमध्ये स्पष्टपणे आढळून येतात. शुक्र धातू (वीर्य) आणि पुरुष संप्रेरकांच्या कमतरतेमुळे वृषण अकार्यक्षम होतात.
(५) अतिकृष्ण : (Hyperpigmentation). या प्रकारात व्यक्तीचा रंग (वर्ण) खूप गडद असतो. शरीरातील रस व रक्त धातूंमधील दोष, त्रिदोषांच्या संतुलनातील बिघाड, विरुद्ध आहार, शरीरातील विषारी घटकांचे अधिक प्रमाण, संप्रेरकांमधील असंतुलन यांचा परिणाम त्वचेचा रंग आणि आरोग्यावर दिसून येतो. शरीरात मेलॅनिन (Melanin) नावाचे रंगद्रव्य जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे अतिगडद वर्ण दिसतो. वांग (Melasma) या सर्वसामान्य त्वचेच्या विकारात प्रामुख्याने चेहऱ्यावर गडद तपकिरी किंवा राखाडी तपकिरी रंगाचे डाग पडतात. तसेच प्राथमिक अधिवृक्क कार्यन्यूनता (Primary adrenal insuffieciency) या विकारात शरीरातील अधिवृक्क ग्रंथी (Adrenal gland) कॉर्टिसॉल आणि अल्डोस्टेरॉन या आवश्यक संप्रेरकांची पुरेशा प्रमाणात निर्मिती करत नाहीत. या विकारात त्वचा काळी पडते. विशेषत: ओठ व जबडे काळे पडतात. तसेच थकवा येणे, चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे इत्यादी लक्षणे आढळतात.
(६) अतिगौर : (Hypopigmentation). या प्रकारात व्यक्तीचा रंग (वर्ण) खूप फिकट असतो. अशा प्रकारची व्यक्ती खूप गोरी असते. या शारीरिक स्थितीशी तुलना त्वचाजाड्यता (myxedema) या विकाराशी केली जाते. यामुळे अवटु अल्पक्रियता (Hypothyroidism) ही स्थिती उद्भवते. या विकारात त्वचेखाली म्यूकोपॉलिसॅकॅराइड (Mucopolysaccharides) आणि पाणी साचल्यामुळे त्वचा जाड, सूज आल्यासारखी व कोरडी होते. अशा ठिकाणी दाबल्यावर खड्डा पडत नाही. या प्रकारच्या त्वचेला विशिष्ट चमक असते. याशिवाय चेहरा, ओठ, डोळ्यांच्या पापण्या व पाय यांवर सूज येते. शरीरात मेलॅनिन हे रंगद्रव्य तयार होत नसेल किंवा कमी प्रमाणात तयार होत असेल तर विवर्णता (Albinism) हा विकार होतो. या विकारात त्वचा अत्यंत पांढरट किंवा फिकट होते. केस पांढरे किंवा पिवळसर होतात. डोळ्यांच्या बुबुळाचा रंग हलका गुलाबी होतो. हा एक आनुवंशिक आजार आहे.
(७) अतिकृश : या प्रकारातील व्यक्ती अत्यंत कृश किंवा बारीक शरीरयष्टी असलेली असते. या शारीरिक स्थितीशी तुलना क्षीणता (Cachexia) या विकाराशी केली जाते. पीयूषिका ग्रंथीचे कार्य मंदावल्यामुळे हा विकार होतो. या विकारात खूप जास्त प्रमाणात वजन कमी होणे, स्नायूंची झीज होणे, तीव्र थकवा येणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे आणि भूक न लागणे ही लक्षणे आढळून येतात. याला सिमाँड आजार (Simmonds’s disease) असेही म्हणतात. अत्यंत गंभीर परिस्थितीत हृदय, मूत्रपिंड, यकृत, जननग्रंथी, थायरॉइड, ॲड्रिनल ग्रंथी यांसारख्या अंतर्गत अवयवांची झीज होते. यामुळे शरीर अत्यंत कृश होऊन मृत्यू देखील ओढवू शकतो.
(८) अतिस्थूल : (Obesity). या प्रकारात शरीरातील धातूंचा समतोल बिघडून मेद धातूचे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे शरीर लठ्ठ होते. व्यक्तीचे वजन सामान्य वजनापेक्षा २० किंवा यापेक्षा अधिक असते किंवा देह वस्तुमान निर्देशांक (Body mass index) ३० किंवा यापेक्षा अधिक असतो, अशी व्यक्ती अतिस्थूल समजली जाते. अतिगोड, थंड, चरबयुक्त किंवा तेलकट आहाराचे सेवन करणे, शारारिक व्यायामाचा अभाव, मानसिक ताण, आनुवंशिकता या कारणांमुळे लठ्ठपणा येतो. या शारीरिक स्थितीची तुलना मेदोजनन कष्टपोषण (Adiposogenital dystrophy) या विकाराशी केली जाते. याला फ्रोलिच संलक्षण (Frohlich’s syndrome) असेही म्हणतात. हा अधोथॅलॅमस (Hypothalamus) आणि पीयूषिका ग्रंथीच्या बिघाडाशी संबंधित एक दुर्मिळ अंत:स्रावी (Endocrine) विकार आहे. या आजारात प्रामुख्याने बालपणात लठ्ठपणा, शरीराची वाढ खुंटणे, अविकसित जननेंद्रिये आणि संप्रेरकांचे असंतुलन ही लक्षणे दिसून येतात.
थोडक्यात, ‘अष्टनिंदित पुरुष’ या संकल्पनेत प्रामुख्याने शारीरिक व्यंग, आनुवंशिक दोष, संप्रेरकांमधील असंतुलन यांमुळे निर्माण होणाऱ्या स्थितींचा समावेश होतो. सध्याच्या काळात आढळणाऱ्या काही आजारांना ‘निंदित व्याधी’ म्हटले जाऊ शकते. परंतु, असे असले तरी आयुर्वेदातील निंदित पुरुष या संकल्पनेमध्ये त्रिगुणसूत्रता (Trisomy; गुणसूत्रांची संख्या जोडित दोन असण्याऐवजी तीन असते.), स्त्रीसदृश वक्षवृद्धी (Gynecomastia; शरीरातील संप्रेरकांच्या बिघाडामुळे पुरुषांच्या स्तनांचा आकार स्त्रियांप्रमाणे वाढतो.), अकालवार्धक्य (Projeria; लहान मुलांमध्ये अकाली वृद्धत्वाची लक्षणे आढळून येणारा दुर्मिळ आनुवंशिक आजार.), बालपक्षाघात (Poliomyelitis) आणि जन्मजात शारीरिक अपंगत्व यांसारख्या शारीरिक विकृतींचा विचार अद्याप झालेला नाही.
संदर्भ :
- चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय २१ (अष्टोनिन्दित पुरुष).
- https://charyaayurveda.com/blogs/blog/ashta-nindita-purusha
- https://www.easyayurveda.com/8-physical-deformities-as-per-ayurveda/
- https://www.researchgate.net/publication/378183459_A_Review_of_Astha_Nindita_Purush_Eight_Type_of_Congenital_Deformity_according_to_Present_Era
समीक्षक : कौस्तुभ चौंडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
