ज्यावेळी वनस्पतिज किंवा प्राणिज पदार्थ आहे त्या स्वरूपात शरीरात वापरता येऊ शकत नाही, त्यावेळी तो शरीराकरिता योग्य अशा स्वरूपात परिवर्तित करून वापरला जातो; त्याला ‘कषाय’ असे म्हणतात. ‘कष’ धातूपासून (‘हिंसा’ अशा अर्थाने) कषाय शब्द बनला आहे. मूळ पदार्थाची (द्रव्य) हिंसा करून अर्थात त्याचे स्वरूप नष्ट करून बनविला जातो म्हणून ‘कषाय’. सेवन करताना गळ्याला अपाय (कषाय) करण्यामुळे किंवा रोगांचे कर्षण (ऱ्हास) करण्यामुळे त्या पदार्थाला कषाय असे म्हटले जाते.

कषायाचे मूळ पाच प्रकार आहेत – स्वरस, कल्क, शृत, शीत व फाण्ट. यांनाच पंचविध कषायकल्पना असे म्हणतात. सहा रसांपैकी लवण (खारट) रस वगळून इतर पाच रसांच्याच या कल्पना बनू शकतात. सुश्रुताचार्यांनी वनस्पतींचे क्षीर (दूध) वाढवून सहा कल्पना तर काश्यपसंहितेने त्यात अभिषव (मद्य) कल्पना वाढवून सात कल्पना मानल्या आहेत.

स्वरस : ताज्या किंवा आर्द्र द्रव्यातून यंत्राच्या साहाय्याने पिळून काढला जातो. त्यास ‘स्वरस’ किंवा ‘रस’ असे म्हणतात. तो वस्त्राने गाळून घेतला पाहिजे. याची मात्रा २ तोळे सांगितली आहे.

कल्क : द्रव पदार्थासोबत कुटून बनविलेल्या कल्पनेस ‘कल्क’, ‘आवाप’ किंवा ‘प्रक्षेप’ असे म्हणतात. चूर्ण ही कल्पना कल्काच्या अंतर्गतच येते. यासच ‘रज’ वा ‘क्षोद’ असे म्हणतात. कल्काची व चूर्णाची मात्रा १ तोळा सांगितली आहे.

शृत : आर्द्र किंवा शुष्क द्रव्याचे यवकूट (भरड चूर्ण) किंवा बारीक तुकडे करून त्याला पाण्यात उकळून व त्यानंतर गाळून घेतल्यावर जो कल्प तयार होतो त्यास ‘शृत’, ‘क्वाथ’, ‘कषाय’ किंवा ‘निर्यूह’ असे म्हणतात. याची मात्रा ४ तोळे सांगितली आहे.

शीत : एक तोळा द्रव्याचे यवकूट करून त्यात सहा पट पाणी घालून त्यास रात्रभर ठेवून सकाळी हाताने चोळून घेऊन गाळून घ्यावे. त्यास ‘शीत’ किंवा ‘हिम’ म्हणतात. याची मात्रा ८ तोळे (१ पल) सांगितली आहे.

फाण्ट : द्रव्याचे ४ तोळे चूर्ण करून त्यात १६ तोळे उकळते पाणी टाकावे. थोडे थंड झाल्यावर वस्त्राने गाळून घ्यावे. त्यास ‘फाण्ट’ असे म्हणतात. याची मात्रा ८ तोळे सांगितली आहे.

या पंचविध कषायकल्पना द्रव्यानुसार आणि रोगानुसार बदलत जातात.

संदर्भ :

  • अष्टांगसंग्रह – कल्पस्थान, अध्याय ८ श्लोक १०.
  • काश्यपसंहिता – खिलस्थान, अध्याय ३, श्लोक २९, ३५.
  • चरकसंहिता – सूत्रस्थान, अध्याय ४, श्लोक ७.
  • सुश्रुतसंहिता – सूत्रस्थान, अध्याय ४४, श्लोक ९१.
  • शार्ङ्गधर संहिता – मध्यम खंड, अध्याय १ (श्लोक ५), अध्याय २ (श्लोक १२),  अध्याय ३ (श्लोक २), अध्याय ४ (श्लोक १), अध्याय ५ (श्लोक १), अध्याय ६ (श्लोक १).

समीक्षक : जयंत देवपुजारी