एक शारीर घटक (तत्त्व). शरीरात बाह्य पदार्थ आल्यानंतर शरीर घटकांशी ते आत्मसात व्हावे म्हणून त्याचे पचन करण्याचे काम अग्नी तत्त्व करते. आयुर्वेदामध्ये अग्नी तत्त्वाला सर्वांत शक्तिशाली आणि परिवर्तन घडवून आणणारे तत्त्व मानले जाते. अन्नाचे पचन करणे, अन्नातील पोषक घटक आत्मसात करणे व ऊर्जा निर्मिती करणे हे अग्नीचे मुख्य कार्य आहे. बल, आरोग्य, आयु आणि प्राण या सर्व बाबी अग्नीवर अवलंबित असतात. आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने विचार केल्यास अग्नी संकल्पनेचा केवळ पचनक्रिया व चयापचय यांच्याशी संबंध लावला जातो; परंतु आयुर्वेदात अग्नीचे व्यापक स्वरूप स्पष्ट केले आहे. यामध्ये अग्नी ही केवळ रासायनिक प्रक्रिया नसून एक जैवशक्ती आहे हे समजून येते. शरीराचे दोषधातू, उपधातू, इंद्रिये यांचे सूक्ष्म घटक व त्यांनी बनलेले अवयव यांत अग्नी असतो. अग्नी हा पित्तांतर्गत असून त्याचे पचनकार्य अखंड चालू असते. त्यासोबत शरीरातील प्रत्येक घटकाचा गुण वाढविण्याचे कार्य देखील अग्नी करते. पचनानंतर मलद्रव्ये, विशुद्ध द्रव्ये व सारद्रव्ये बनत असतात. त्याचे स्थूलत: पाचक, रजक, आलोचक, भ्राजक व साधक असे पाच भाग कल्पिले असून त्यांची कार्येही निरनिराळी आहेत.

अग्नी तत्त्वाचे कार्य

आयुर्वेदामध्ये शरीरातील स्थान आणि मुख्य कार्य यांनुसार अग्नीचे जठराग्नी (१), भूताग्नी (५) आणि धात्वाग्नी (७) असे तेरा प्रकार सांगितले आहेत –

जठराग्नी : हा मुख्य अग्नी असून तो इतर सर्व अग्नींचा आधार आहे. जठराग्नी उत्तम असेल तर इतर अग्नींचे कार्य देखील उत्तम राहते. हा अग्नी जठरात म्हणजे लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात स्थित असतो. आहाराचे प्राथमिक पचन करणे, त्यातील पोषक घटक आत्मसात करणे आणि शरीराला पोषण पुरवणे ही जठराग्नीची कार्ये आहेत. अन्नपचनासाठी आवश्यक असलेले अम्ल (Acid) निर्माण करण्यास तो मदत करतो. तसेच संपूर्ण शरीरातील इतर अग्नी केंद्रांना ऊर्जा पुरवण्याचे देखील काम करतो.

भूताग्नी : हे पंचमहाभूतांमध्ये विद्यमान असलेले अग्नीचे तत्त्व आहे. अन्नातील पार्थिव (पृथ्वी तत्त्व), आप्य (जल तत्त्व), तैजस (अग्नी तत्त्व), वायव्य (वायू तत्त्व) आणि आकाशीय अंशांचे शरीराला ग्राह्य स्वरूपात रूपांतर करणे हे त्याचे कार्य आहे.

धात्वाग्नी : शरीर हे रस,रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या सात धातूंनी संघटित असते. आहाराचे जठराग्नीद्वारा पचन झाल्यानंतर निर्माण होणारा आहाररस हा क्रमश: या धातूंमध्ये परिवर्तित होतो व शरीराचे पोषण करतो. त्या त्या धातूच्या धात्वाग्नीने संबंधित धातूचे पोषण होते; उदा., रस धातूचे रसाग्नीने पोषण होते. धातूंची सम्यक अवस्था आरोग्याचे लक्षण मानली जाते, तर धातूंची क्षीणता किंवा वृद्धी रोगोत्पत्तीचे कारण ठरते. धात्वाग्नीचे कार्य बिघडले तर शरीरशक्‍ती कमी होणे, रोगप्रतिकारशक्‍ती खालावणे, रक्‍त कमी झाल्याने शरीर निस्तेज होणे इत्यादी लक्षणे आढळतात.

जठराग्नी आणि भूताग्नीकडून आहाराचे योग्य प्रकारे पचन झाले तर त्यापासून तयार होणाऱ्या आहाररसात शरीरातील प्रत्येक इंद्रियाला, प्रत्येक पेशीला परिपोषित करण्यासाठी आवश्‍यक असणारे गुण असतात. हा आहाररस हृदयातून संपूर्ण शरीरात पोहोचतो आणि शरीरधातूंची पूर्ती करून शरीराची वृद्धी होण्यासाठी मदत करतो.

आयुर्वेदात अग्नीच्या पुढील चार अवस्था सांगितल्या आहेत –

(१) समाग्नी : वात, पित्त व कफ हे तीन दोष आणि सात धातू समस्थितीत असताना निर्माण होणारी आदर्श अवस्था. सम्यक अग्नीमुळे घेतलेल्या अन्नाचे योग्य पचन होते, शरीर घटकांचे योग्य पोषण होऊन आरोग्य उत्तम राहते.

(२) मंदाग्नी : शरीरात कफ दोषाची वृद्धी झाल्यामुळे अग्नी मंद होतो म्हणजेच परिणामी पचनक्रिया मंद होते. अपूर्ण पचन झाल्याने शरीरात अजीर्ण, पोट फुगणे, थकवा, भूक न लागणे, सुस्ती आणि ऊर्जेचा अभाव इत्यादी लक्षणे दिसून येतात.

(३) तीक्ष्णाग्नी : पित्त दोष वाढल्यास अग्नी तीक्ष्ण स्वरूपाचा होतो, त्यामुळे अन्नाचे पचन अतिजलद व अयोग्य होते. परिणामी दाह, अम्लपित्त, अपचन, छातीत जळजळ होणे, ओठ व घसा कोरडा होणे, ताप येणे, अतिभूक लागणे, गोड खाण्याची तीव्र इच्छा होणे, त्वचेचा दाह होणे, तीव्र राग किंवा चिडचिड होणे, निराश वाटणे, एकाग्रता कमी होणे अशी अनेक लक्षणे आढळतात. ही लक्षणे वारंवार उत्पन्न झाल्यास पुढे त्यासंबंधी रोग निर्माण होतात.

(४) विषमाग्नी : वातदोष वाढल्यामुळे अग्नी विषम होतो. यामुळे पचन अनियमित होते. ही अग्नीची एक अस्थिर किंवा अनियमित अवस्था असून यामध्ये अग्नी कधी अतिशय प्रदीप्त तर कधी अतिशय मंद होऊ शकतो. विषम अग्नी असलेल्या व्यक्तीस भूक लागण्याबाबत अनियमितता जाणवते. त्यामुळे अपचन, पोट फुगणे, बद्धकोष्ठता किंवा अतिसार, त्वचा आणि तोंड कोरडे पडणे, सांधे आणि स्नायूंचे विकार होणे, अहितकर अन्न खाण्याची तीव्र इच्छा होणे इत्यादी समस्या उद्भवतात. तसेच अन्नाचे व्यवस्थित पचन न झाल्याने शरीरात ‘आम’ (टाकाऊ पदार्थ) तयार होते, जे अनेक रोगांचे मूळ कारण मानले जाते. त्यामुळे आयुर्वेदामध्ये अग्निदीपन व आमपाचन या चिकित्सापद्धती विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात.

अग्नी संतुलित राहावा यासाठी करावयाची उपाययोजना :

(१) अग्नीची कार्यक्षमता (पाचनशक्ती) उत्तम राहण्यासाठी चांगल्या व संतुलित आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. आहार पचायला जड, प्रकृतीला प्रतिकूल (अतितेलकट, मसालेदार किंवा तिखट पदार्थ, अतिगोड, अतिकडू, अतितुरट, अतिथंड पदार्थ इत्यादी), शिळा, विरुद्ध, संस्कार न करता तयार केलेला असला तर तो अग्नीद्वारा पचू शकत नाही. अन्न पचायला जितके कठिण असेल तितका जास्त अग्नी या प्रक्रियेत वापरला जातो. दीर्घकाळपर्यंत पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण आल्यास कालांतराने अग्नी कमजोर होऊ शकतो. त्यामुळे सात्विक, हलके व सहज पचणाऱ्या अन्नाचे सेवन करावे.

(२) दररोज एकाच वेळी जेवणाची सवय ठेवावी. दुपारच्या वेळी (दुपारी १२ ते २ दरम्यान) जेव्हा सूर्य सर्वात प्रखर असतो, तेव्हा जठराग्नी उत्तम असतो, त्यामुळे दुपारचे जेवण मुख्य आणि भरपेट असावे.

(३) अन्नाचा प्रत्येक घास सजगतेने खाल्ल्याने पाचक विकर स्रवले जातात. हे विकर अन्नाचे पचन अधिक सहज आणि जलद होण्यास मदत करतात. खाण्याच्या क्रियेवर पूर्ण लक्ष केंद्रित केल्याने शरीरातील अग्नी केंद्रे ऊर्जावान होतात. त्यामुळे शांत आणि आनंदी वातावरणात अन्न ग्रहण करावे.

(४) एकावेळी अतिरिक्त अन्नाचे सेवन करू नये. आयुर्वेदिक तज्ञांच्या मते अग्नी मजबूत करण्यासाठी एकावेळी थोडे अन्न खाणे म्हणजे पोट भरेल इतके परंतु, पोटात सुमारे एक तृतीयांश जागा हवेसाठी शिल्लक राहील इतकेच खाणे हे आदर्श प्रमाण आहे.

(५) जेवताना किंवा जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. कारण तसे केल्याने अग्नी कमकुवत होतो व त्यामुळे अन्न पचवणे अधिक कठिण होते.

(६) हिंग, जिरे, काळी मिरी, ओवा आणि हळद यांसारखे मसाल्यांचे पदार्थ अन्न सहजपणे पचवण्यास मदत करतात. त्यामुळे या पदार्थांचा स्वयंपाकात वापर करावा. जिरे, धणे आणि बडीशेप एकत्र उकळून तयार केलेला चहा दिवसभरातून १-२ वेळा प्यायल्यास अग्नी संतुलित राहतो.

(७) व्यक्तीच्या विशिष्ट दोष प्रकृतीनुसार आठवड्यातून एकदा उपवास केल्याने पाचनसंस्थेला अत्यंत आवश्यक असा आराम मिळतो आणि अग्नी पुन्हा प्रदिप्त होतो. अशावेळी फळे किंवा फळांचा रस किंवा भाज्यांचे सूप किंवा तांदूळ व डाळीपासून बनवली जाणारी पातळ खिचडी असा आहार फायदेशीर ठरतो.

(८) नियमित चालण्यामुळे किंवा साध्या व्यायामांमुळे देखील चयापचय सुधारते. तसेच दैनंदिन जीवनात योगासने व प्राणायाम यांचा नियमित सराव केल्यास शरीरातील विशिष्ट दोषांचे असंतुलन दूर होऊन शरीरातील अग्नी संतुलित राखण्यास मदत होते.

थोडक्यात, अग्नी ही आयुर्वेदातील अत्यंत मूलभूत संकल्पना आहे. ती केवळ पचनशक्तीपुरती मर्यादित नसून अग्नीमुळे शरीराचे पोषण, बल, ओज आणि मानसिक आरोग्य टिकून राहते. त्यामुळे आयुर्वेदातील आहार, विहार आणि चिकित्सा या सर्वांचा केंद्रबिंदू अग्निसंरक्षण व अग्निसंवर्धन हा आहे.

पहा : अग्निमांद्य (अपचन).

संदर्भ :

  • अष्टांग हृदय, निदानस्थान, अध्याय १२ (उदर रोग निदान चिकित्सा).
  • अष्टांग हृदय, सूत्रस्थान,  अध्याय १२ व १३ (त्रिदोष चिकित्सा).
  • अष्टांग हृदय, शारीरस्थान, अध्याय ३ (अंगविभाग शारीर चिकित्सा).
  • चरक संहिता, चिकित्सास्थान, अध्याय १५ (ग्रहणी दोषचिकित्सा).
  • सुश्रुत संहिता, सूत्रस्थान, अध्याय ४६ (अन्नपानविधि).
  • https://healthinformaticsjournal.com/index.php/IJMI/article/view/3043/3096

समीक्षक : कौस्तुभ चौंडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.