कॅर्ताँ, आंरी (कार्टन, हेन्री) (८ जुलै १९०४ – १३ ऑगस्ट २००८).
फ्रेंच गणितज्ज्ञ. त्यांचे संपूर्ण नाव आंरी-पॉल कॅर्ताँ. कॅर्ताँ यांनी प्रामुख्याने बैजिक संस्थितीच्या क्षेत्रात काम केले. प्रतिसमजातिक क्रिया, समस्थेयता गट, गट प्रतिसमजातिक ह्या विषयांवरील कॅर्ताँ ह्यांचे योगदान महत्वत्त्वपूर्ण मानले जाते. ‘कॅर्ताँ’स थिअरम्स’ या नावाने ओळखली जाणारी दोन प्रमेये आणि बीजगणितामधील ‘कॅर्ताँ मॉडेल’ ही त्यांच्या नावे प्रसिद्ध आहेत.
कॅर्ताँ यांचा जन्म नॅन्सी, फ्रान्स येथे झाला. फ्रेंच गणितज्ज्ञ एली कॅर्ताँ ह्यांचे ते सुपुत्र.पॉल मोंटेल ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कॅर्ताँ यांनी १९२८ साली पॅरिसमधील इकोल नॉर्मल सुपिरीए संस्थेतून गणितात डॉक्टरेट प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी फ्रान्समधील विविध विद्यापीठांत गणिताचे अध्यापन केले. त्यांची बहुतांश प्राध्यापकीय कारकीर्द पॅरिसमध्येच घडली.
कॅर्ताँ ह्यांनी प्रामुख्याने बैजिक संस्थितीच्या (Algebric topology) क्षेत्रात काम केले. प्रतिसमजातिक क्रिया(cohomology operation), समस्थेयता गट(homology group), गट प्रतिसमजातिक(group cohomology) या विषयांवरील कॅर्ताँ ह्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. संभार सिद्धांतवरही कॅर्ताँ ह्यांचे काम महत्वाचे ठरले आहे. संभार सिद्धांताचा, अनेक चलांचे वैश्लेषिक फल, समजातिक बीजगणित, बैजिक संस्थिती, विभवशास्त्र ह्या विषयांमध्ये प्रभावीसाधन म्हणून वापर करता येऊ शकतो, हे कॅर्ताँ ह्यांनी दाखवून दिले. कॅर्ताँ’स थिअरम्स या नावाने ओळखली जाणारी दोन प्रमेये आणि बीजगणितामधील कॅर्ताँ मॉडेल ही त्यांच्या नावे प्रसिद्ध आहेत.
पहिल्या जागतिक महायुद्धात फ्रांसमधील बरेच गणितज्ज्ञ मारले गेले आणि त्यामुळे तेथील गणिताच्या क्षेत्रात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. ती पोकळी भरून काढण्यासाठी तसेच आधुनिक गणिताचा तर्कशुद्ध पाया रचण्यासाठी कॅर्ताँ ह्यांच्यासोबत इतर आठ नावाजलेल्या गणितज्ज्ञांनी एकत्र येऊन निकोला बुर्बकी (Nicolas Bourbaki) ह्या नावाने १४ जानेवारी, १९३५ रोजी एक संघटना स्थापन केली. आधुनिक गणितासंबंधी मूलभूत विषयांवर भाष्य करणारी सर्वसमावेशक अशी एलिमेंट्स ऑफ मॅथेमॅटिक्स ही पुस्तकांची सुरू करण्यात आलेली मालिका ह्या संघटनेचे सर्वात महत्त्वाचे काम मानले जाते. त्या पुस्तकांवर लेखक म्हणूनही निकोला बुर्बकी हे टोपण नाव दिलेले असे. गणित अचूक आणि वस्तुनिष्ठपणे मांडले जावे हा आग्रही दृष्टीकोन या संघटनेचा वैचारिक गाभा होता.
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या फ्रांसमधील खडतर काळात कॅर्ताँ यांना अमेरिकेत जाण्याची संधी असूनही ते फ्रांसमध्येच राहिले. जरी त्यांच्या भावाची हत्या त्या काळात नाझी सैन्याने केली, तरी युद्ध संपल्यावर त्यांनी जर्मन गणितज्ज्ञांशी उदार मनाने संपर्क साधून गणिती संबंध स्थापित केले.
होमोलॉजिकल अलजिब्रा हे त्यांचे सॅम्युअल एलेनबर्ग सोबत लिहिलेले पुस्तक फारच गाजले आणि आजही अनेक ठिकाणी ते पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जाते. त्याशिवाय त्यांच्या नावावर बरीच पुस्तके आणि दर्जेदार शोधलेख असून त्यांत त्यांचे वडील एली कॅर्ताँ यांच्या सोबतही एक लेख आहे. त्यांचे अधिकांश कार्य फ्रेंच भाषेत असून ते वेगवेगळ्या भाषांत अनुवादित केलेगेले आहे. कॅर्ताँ यांचे प्रमुख गणिती काम तीन खंडामध्ये प्रसिद्ध झालेले आहे.
कॅर्ताँ ह्यांनी १९४८ ते १९६४असा दीर्घकाळ विविध गणिती विषयांवर परिसंवादांचे आयोजन केले, ज्यांना ‘कॅर्ताँ परिसंवाद’ असे म्हटले जाते. प्रत्येक वर्षी प्रगत गणितातील एक विषय त्यासाठी निवडून त्यावर जाणकार गणितज्ज्ञांकडून सखोल आणि विस्तृतपणे नवा प्रकाश पाडला जाई. त्यामुळे गणिताच्या विविध शाखांच्या ज्ञानात उल्लेखनीय भर पडली. तसेच जीन-प्रीअरे सेर, आर्मंड बोरेल, अलेक्झांडर ग्रोथेनडीक, फ्रँक अॅडम्स, रन थोम अशा विसाव्या शतकातील अनेक महान गणितज्ज्ञांना घडवण्यात आणि प्रोत्साहन देण्यात ह्या परिसंवादांचा अत्यंत मोलाचा सहभाग होता. त्या परिसंवादांत सादर केलेल्या लेखांचे एक पुस्तक १९६७ साली प्रसिद्ध करण्यात आले.
१९८० साली त्यांना गणितातील एक मानाचा असा वुल्फ पुरस्कार प्रदान करण्यात आला. कॅर्ताँ हे फ्रेंच विज्ञान अकादमी, फिनिश अॅकेडेमी ऑफ सायन्सेस अँड लेटर्स, रॉयल डॅनीश अॅकेडेमी ऑफ सायन्सेस अँड लेटर्स, रॉयल सोसायटी ऑफ लंडन अशा अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निवडले गेलेले सदस्य होते. त्यांना दहाहून अधिक विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली होती.
दोन्ही महायुद्धानंतर फ्रान्समधील गणिताचे पुनरूज्जीवन करण्यात कॅर्ताँ यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. १०४ वर्षाचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेले कॅर्ताँ गणिताच्या प्रगती इतकेच मानवतावादी हक्कांसाठी झटणारे असे व्यक्तिमत्व होते. रशियन गणितज्ज्ञ लिएनीड प्ल्यूस्च (Leonid Plyushch) आणि उरुग्वेयन गणितज्ज्ञ होसाय लुई मासेरा (Jos’e Luis Massera) ह्या गणितज्ज्ञांची क्रमश: सोवियेत रशिया आणि उरुग्वे या देशातील कैदेतून सुटका करण्यात कॅर्ताँ ह्यांनी काही नावाजलेल्या गणितज्ज्ञांसोबत अत्यंत मोलाची भूमिका बजावली. त्यासाठी त्यांना न्यूयॉर्क विज्ञान अकादमीच्या पेगल्स पारितोषिकाने गौरवण्यात आले.
कॅर्ताँ यांचे पॅरिस, फ्रांस येथे निधन झाले.
संदर्भ :
- http://en.wikipedia.org/wiki/Henri_Cartan
- http:// www.ams.org/notices/199907/fea-cartan.pdf
- http:// www-history.mcs.st.andrews.ac.uk/Biographies/Cartan_Henri.html
- http:// www.revolvy.com/topic/Henri%20 cartan &item type = topic
समीक्षक – विवेक पाटकर