कैर्न्स, जॉन फोर्स्टर : (२१ नोव्हेंबर १९२२).

ब्रिटिश वैद्य आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी जनुकांच्या प्रती कशा तयार होतात याचे प्रात्यक्षिक करून सिद्ध केले.

कैर्न्स यांचा जन्म ऑक्सफर्ड येथे झाला. त्यांचे आजोबा ऑक्सफर्डमधील एका कॉलेजचे प्रमुख होते. प्राथमिक शिक्षण झाल्यावर १९३९ साली ते औषधशास्त्राचा अभ्यास करण्यास ऑक्सफर्ड ‍विद्यापीठात दाखल झाले. तेथुन ते १९४६ साली पदवीधर झाले. १९४७ ला रॅडक्लिफ रुग्णालयात रोगनिदान शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केले. १९५० साली अतिसूक्ष्म जंतूंचा अभ्यास करण्यास ऑस्ट्रेलियात वॉल्टर आणि एलिझा इन्स्टिटयूटमध्ये विषाणूशास्त्रज्ञ म्हणून दाखल झाले. १९५२-५४ मध्ये त्यांनी एंटबे, युगांडा मधील प्रयोगशाळेत काम केले. १९५५ ला ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथील नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये महत्त्वाच्या पदावर ते रुजू झाले. १९६७ पर्यंत तेथे काम केल्यावर त्यांना फेलोशिप मिळाली. कोल्ड स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळेत त्यांचे काम सुरू झाले व कार्नेगी इन्स्टिट्यूटमधील उत्पत्ती शाखेबरोबर शाळेचे एकत्रीकरण झाले. कोल्ड स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळेत १९७२पर्यंत काम करून इंपिरियल कॅन्सर रिसर्च फंडतर्फे मिल हिल प्रयोगशाळेचे ते १९८० पर्यंत प्रमुख होते. पुढे ते१९९१ पर्यंत हार्वर्ड स्कूलच्या पब्लिक हेल्थ शाखेत अध्यापक म्हणून कार्यरत होते.

कैर्न्स यांनी इ. कोलाय (E. coli) या सूक्ष्मजीवातील वर्तुळाकार जनुकांच्या प्रती कशा तयार होतात हे स्व-प्रारणचित्रण (ऑटो रेडिओग्राफी; Auto Radiography) या तंत्राने दर्शविले. सूक्ष्मजीवातील जनुक वर्तुळाकार असल्यास पेशीला तशा प्रती बनवणे आव्हानात्मक असते. अशा जनुकांच्या प्रती बनत असताना वर्तुळाकार डीएनए (DNA; डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्ल) दोन्ही बाजूस खेचला जातो व ग्रीक अक्षर थिटा (q) असल्याचे भासते, स्वप्रारणचित्रण पद्धतीने याची खात्री करता येते. ई. कोलाय या एकपेशीय (prokaryote) सूक्ष्मजीवाच्या जनुकीय छोट्या प्रतीचे त्यांनी निरीक्षण केले. त्यांनी मॅथ्यू मेसेल्सन यांच्यासह ड्रोसोफिला या बहुपेशीय (eukaryotes) कीटकाच्या जनुकांचेदेखील परीक्षण केले आणि त्यातील जनुकांच्या प्रती मिळवल्या. त्यांना मॅक आर्थरची फेलोशिप आणि रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून सन्मानित करण्यातआले.

कैर्न्स यांनी जीवशास्त्रातील महत्त्वाच्या विषयांवर पुढील पुस्तके लिहिली : कॅन्सर– सायन्स अॅण्ड सोसायटी (Cancer : Science and Society; 1978), मॅटर्स ऑफ लाईफ अँड डेथ : पर्सपेक्टिव्ह ऑन पब्लिक हेल्थ, मॉलेक्युलर बायॉलॉजी, कॅन्सर ॲण्ड द प्रॉस्पेक्ट फॉर द ह्युमन रेस (Matters of Life and Death: Perspectives on Public Health, Molecular Biology, Cancer, and the Prospects for the Human Race ; 1997). त्यांनी जेम्स वॉटसन (James Watson) आणि गुंथर स्टँट (Gunther Stent) यांच्याबरोबर बॅक्टेरियोफाज आणि जीवशास्त्राची उत्पत्ती या लेखांचे संपादन केले.

संदर्भ :

समीक्षक – रंजन गर्गे

प्रतिक्रिया व्यक्त करा