कोर्नबर्ग, आर्थर  (३ मार्च १९१८ – २६ ऑक्टोबर २००७).

अमेरिकन वैद्यक आणि जीवरसायनशास्त्रज्ञ. परीक्षा नलिकेत डीएनए संश्लेषण केल्याबद्दल १९५९ सालचे वैद्यक वा शरीरक्रियाशास्र या विषयाचे नोबेल पारितोषिकसेव्हेरो ओचोआ या शास्त्रज्ञांसमवेत मिळाले. आर्थर कोर्नबर्ग हे इ. कोली. ह्या सूक्ष्मजीवातील डीएनए पॉलीमरेज ह्या वितंचकाच्या शोधाबद्दल आणि शुद्धीकरणाकरिता प्रसिद्ध होते.

कोनबर्ग यांचा जन्म ब्रूकलिन येथे झाला. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून वडलांच्या हार्डवेअरच्या दुकानात गिऱ्हाइकांना मदत करण्याचे काम केले. पित्ताशयाच्या (spore) संसर्गाने आई गेल्यानंतर कोर्नबर्ग याना पित्ताशयाच्या संदर्भात अभ्यासाचे एक आकर्षण निर्माण झाले. त्यांनी विज्ञानातील पदवी मिळवल्यावर (१९३७) काविळीसंदर्भात वैद्यकीय अभ्यास करून संशोधनातील पहिला अनुभव मिळवला. ह्या अभ्यासामुळे राष्ट्रीय स्वास्थ्य संस्थेच्या  (National Institute of Health) संचालकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले व आर्थर कोर्नबर्ग यांना राष्ट्रीय स्वास्थ्य संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. रॉचेस्टर विद्यापीठातून एम. डी. केल्यावर (१९४१) त्यांनी अमेरिकेच्या सार्वजनिक वैद्यकीय विभागात अधिकारी म्हणून नोकरी केली. प्रथम त्यांची नौदलामध्ये जहाजावरील डॉक्टर म्हणून आणि नंतर बेथस्डा, मेरीलँड येथील राष्ट्रीय संस्थेमध्ये संशोधन सहायक म्हणून नेमणूक झाली. सेव्हेरो ओचोआ  यांच्याकडे न्यूयॉर्क विद्यापीठात व नंतर प्राध्यापक डॉ. कार्ल चोरी यांच्याकडे वॉशिंगटन विद्यापीठात त्यांनी वितंचक विषयक प्रशिक्षण घेतले. बेथस्डाला परत आल्यानंतर त्यांनी वितंचक विभाग स्थापन केला. नंतर ते वॉशिंगटन विद्यापीठाच्या मिसूरी येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून रूजू झाले.

जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक ह्यांनी १९५० च्या पूर्वार्धात जरी डीएनएच्या विभाजनाचे औपचारिक प्रारूप मांडले होते, तरी, आर्थर कोर्नबर्ग ह्यांनी पेशींमधील गुणसूत्राला (क्रोमोसोम) लागणाऱ्या मोठ्या प्रमाणातील डीएनएचे संश्लेषण कसे होते, ह्याच्या प्रत्यक्ष रासायनिक प्रक्रियेचा शोध लावला.

आर्थर कोर्नबर्ग आणि त्याचे सहकारी ह्यांनी नंतर डीएनए दुरुस्त करण्यासाठी लागणारे वितंचक आणि डीएनएची व गुणसूत्रांची लांब वाढ होण्यासाठी लागणारे वितंचक शोधून काढले. ह्याचा उपयोग डीएनए हाताळण्यासाठी आणि त्यामुळे डीएनए पुनर्बांधणी तंत्रज्ञानासाठी व गुणसूत्रांच्या आणि जनुकांच्या अभियांत्रिकीसाठी झाला.

डीएनए संश्लेषणाचे काम करत असताना आर्थर कोर्नबर्ग अखेर असे डीएनए पॉलीमरेज मिळवू शकले की ज्यामुळे हुबेहूब एका नैसर्गिक विषाणूसारखी ५००० न्यूक्लीओटाइड लांब डीएनएची साखळी ते तयार करू शकले. अशा पद्धतीने ते पहिले जीवरसायनशास्त्रज्ञ होते की ज्यांनी प्रयोगशाळेत fiX174 virus हा विषाणू कृत्रिमरीत्या तयार केला (१९६७).

आर्थर कोर्नबर्ग यांना नोबेल पुरस्काराशिवाय वितंचक रसायनशात्रासाठी पॉल-लेविस पारितोषिक, विज्ञानाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि गैरडनेर फौंडेशन पुरस्कार देण्यात आले. आर्थर कोर्नबर्ग यांची राष्ट्रीय विज्ञान परिषदेवर आणि रॉयल सोसायटी ऑफ लंडन या संस्थेवर नेमणूक झाली.

आर्थर कोर्नबर्ग आपल्या वयाच्या ८० व्या वर्षानंतरसुद्धा पूर्ण वेळ संशोधन करत होते. आर्थर कोर्नबर्ग ह्यांनी शैक्षणिक कामाशिवाय DNAXमॉलीक्युलर आणि सेल्युलर बायॉलॉजी संस्थेच्या स्थापनेसाठी काम केले.

आर्थर कोर्नबर्ग ह्यांना अध्यापन करणे आवडायचे व त्यांनी डीएनए रिप्लिकेशनवर पाठयपुस्तक आणि त्याच्या वैज्ञानिक अनुभवावर आधारित आत्मचरित्र लिहिले. त्याचे नाव होते For the love of Enzymes. आर्थर कोर्नबर्ग ह्यांना विज्ञान ही निर्माणकल वाटायचा आणि त्यांच्या मते तो कलाविष्कार असतो.

विज्ञान हे कोर्नबर्ग कुटुंबातच होते. आर्थर कोर्नबर्ग यांची बायको त्यांच्याच प्रयोगशाळेत संशोधक होती. आर्थर कोर्नबर्ग ह्यांच्या तीन मुलांनी पण विज्ञानात महत्वपूर्ण योगदान दिले. थॉमस आणि रॉजर हे संशोधक आहेत. टॉम याने डीएनए पॉलीमरेज वेगळे केले. तर रॉजरला प्रथिन निर्मिती प्रक्रियेतील ध्वनीलेखनाच्या (ट्रान्सक्रिप्शन) शोधासाठी  रसायनशास्त्राचे २००६ चे नोबेल पारितोषिक मिळाले.

कोर्नबर्ग जीवरसायन शाळेमध्ये आर्थर कोर्नबर्ग यांचे रॉबर्ट लेहमन, चार्ल्स सी रिचर्डसन, रांड सचेकमन, विल्यम टी विकनेर , जेम्स रॉथमं ,आर्टुरो फलासची  आणि केन-इचि अरे असे विद्यार्थीही काम करत आहेत.

आर्थर कोर्नबर्ग ह्यांनी भरपूर लिखाण केले. त्यातली काही पुस्तके पुढीलप्रमाणे – फॉर द लव्ह ऑफ इन्झाइम्स;  द गोल्डन हेलिक्स : इन्साइड बायोटेक वेनचर्स; इन्झॅमॅटिक सिंथेसिस ऑफ डिएनए; डिएनए सिंथेसिस; डिएनए रेप्लिकेशन;  डिएनए रेप्लिकेशन (2);

कोर्नबर्ग यांचे स्टॅनफर्ड, कॅलिफोर्निया येथे निधन झाले.

 

संदर्भ :

समीक्षक – रंजन गर्गे

प्रतिक्रिया व्यक्त करा