दोन्ही काठ उभ्या भिंतीप्रमाणे असलेली व भूमिगत जलप्रवाहांमुळे बनलेली दरी. जलप्रवाहाच्या शेवटी ही दरी तीव्र उताराच्या उभ्या भिंतींनी झाकली जाते व त्यांच्या तळाशी जलप्रवाह दिसेनासा होतो. त्यामुळे तिला अंध किंवा अदृश्य दरी म्हणतात. काही वेळा दरीच्या तळभागावरील छत कोसळून किंवा त्या भागात गुहा तयार होऊन तीमध्येही प्रवाह अदृश्य होतो व दृश्य भासते. नदीमुळे वा जलप्रवाहाने खडक उभ्या दिशेत कापले जाऊन बनलेल्या अंध दरीचा शेवट कड्यापाशी होतो. अशा दऱ्या नदीच्या वा जलस्रोताच्या जवळच्या भूप्रदेशात आढळू शकतात. असे असले, तरी बहुधा चुनखडकाच्या आधारशिलेवरून नदी वाहताना अंध दरी तयार होते. नदी अथवा प्रवाह चुनखडकावरून वाहताना त्या खडकाची पाण्याने झीज होऊन त्यातील संधी (तडे) पुरेसे रुंद होतात आणि तेथे पडलेल्या निमज्जक विवरांतून (पाणी गिळून टाकणाऱ्या भोकांतून) जलप्रवाह खालीखाली जातात. त्यामुळे खडक खालच्या दिशेत कापले जाण्याची क्रिया घडते. यामुळे चुनखडकाच्या संदर्भात खोऱ्याची पातळी खाली जाते. यातून उभा कडा निर्माण होतो. नदीच्या खालच्या दिशेतील (अनुस्रोत) दरीचा भाग कोरडा होऊन तेथील झीज थांबते. नदीच्या वरच्या दिशेतील (उत्स्रोत) झीज होत राहते. यामुळे पुढच्या बाजूला खोलगट भाग निर्माण होऊ शकतो व कदाचित समोरील बाजूला लहान कडा निर्माण होऊ शकतो.
काळानुसार दरीच्या वरच्या भागात नवे निमज्जक विवर तयार होऊ शकते व आधीचे खालील विवर नाहीसे होते. या नवीन ठिकाणी झीज होऊन दुसरी अंध दरी निर्माण होऊ शकते. असे अनेक वेळा घडून अंध दऱ्यांची मालिका निर्माण होते. यांतील सर्वांत नवीन अंध दरी चढणीच्या वरच्या बाजूला असते. ज्या विवराखाली नदी गडप होते, ते विवर चुनखडक इतर खडकांच्या संपर्कात जेथे येतात, तेथपर्यंत खाली जाते.
चढणीच्या टोकाजवळची अंध दरी अरुंद, खोल व सपाट असून तिचा शेवट अचानकपणे झालेला आढळतो. मार्ल निक्षेप (विशिष्ट गाळाचे भुसभुशीत मिश्रण) यासारख्या अपार्य (न झिरपणारा) अधस्तरावर पार्य खडकाचा थर असतो. अशा चुनखडकात किंवा कार्स्ट भूमिस्वरूप याच्या प्रदेशात अशा अंध दऱ्या तयार होतात. उतरणीच्या टोकाजवळील दरीतून वाहणारे पाणी एक वा अनेक निमज्जक विवरांतून बाहेर निघून जाते.
https://www.youtube.com/watch?v=GoZElGPzoXs
अंध दऱ्या विशेषत: त्यांच्या खालच्या टोकांशी कोरड्या असतात. पुराच्या वेळी निमज्जक विवरात पाणलोट कमी असल्यास त्याच्या पलीकडील दरीत जलप्रवाह चालू राहू शकतो. अशा भूरूपाला अर्ध-अंध दरी म्हणतात.
गुहांच्या समन्वेषणासाठी अंध दऱ्या ही सोयीस्कर ठिकाणे असतात. उदा., नैर्ऋत्य इंग्लंडमधील मेंडिप येथील प्रसिद्ध ‘स्विल्डॉन होल’ ही गुहा. या गुहेत एका अंध दरीतून आत जाता येते. ही येथील सर्वांत लांब (९,१५० मी.) गुहा असून हिच्या गाभ्यातून वाहणारा झरा तेथून सु. ३ किमी. अंतरावरील ‘वूकी होल’ या विवरातून बाहेर पडलेला दिसतो.
समीक्षक : माधव चौंडे